शनिवार, ३० जुलै, २०११

मंतरलेले दिवस - ३५

Attitude Sickness..

तिची अन माझी ओळख एका कॉमन मैत्रिणीमार्फत झाली.. एकदा माझी मैत्रीण माझा GM मेल वाचत होती तेव्हा 'ती' मला म्हणाली मलाही पाठवत जा तुझे मेल्स.. तसं पाहायला गेलं तर टीम मध्ये बऱ्याच मुली आहेत.. आम्ही सगळ्याजणी वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करतो तरी सगळ्यांची चांगली मैत्री आहे.. पण त्यात 'ती' जरा शिष्ठ वाटल्याने मी स्वतः कधी तिच्याशी बोलायला गेले नाही.. आता तीच म्हणत होती  मेल्स पाठव म्हणून मग मी मग माझ्या यादीमध्ये तिचे नाव घातले.. सुरुवातीला तिचे छान म्हणून प्रतिक्रियादेखील यायची.. 

काही दिवसांनी टीममधल्या एकाचं तिच्याशी जमलंय असं ऐकण्यात आलं..  मला तर ही बातमी ऐकून छान वाटलं.. तो मुलगा चांगला आहे आहे अन हीपण दिसायला सुंदर,अनुरूप जोडा.. शिवाय आपलं आपलं लग्न ठरवणाऱ्यांच्या आई वडिलांना मुलांच्या लग्नासाठी चप्पला झीझवाव्या लागत नाही ही किती चांगली गोष्ट आहे हे मला हल्ली फार जाणवतं.. मला असं जमलं नाही याची खंत नेहमी वाटते.. असो.. तर त्यांच्या  प्रेमप्रकरणाच्या चर्चेचे वारे जोरात वाहू लागले.. अर्थात त्याला कारणीभूत तेच होते.. डोळे मिटून दुध पिणाऱ्या मांजरीला काहीही वाटलं तरी जग तिच्याकडे बघतच असतं.. ही बातमी खरी चांगली होती पण त्याला उगाच वेगळं वळण लागलं.. त्या दोघांचं त्यांच्या रोजच्या जेवणाच्या ग्रुप मधल्या जवळच्यांशी वागणं बदललं.. कितीही चांगला नवरा मिळाला तरी मैत्रीण ही जीवाभावाची मैत्रीण असते हे समजण्याइतपत तिची कुवत नव्हती बहुतेक,कदाचित वयाने लहान असल्याने.. यथावकाश तिचं काही कारणाने माझ्या मैत्रिणीशी, आमच्यातल्या कॉमन मैत्रिणीशी भांडण झालं.. तिने त्यांचा लंच ग्रुप सोडला.. नाश्ता, जेवण, चहा सगळं  त्याच्यासोबत.. गम्मत म्हणजे तिच्यासारखं त्यानेही बोलणं बंद केलं.. नंतर त्याने इन्फी सोडून दुसरीकडे नोकरी धरली... तेव्हा मग ती वेगळ्या मैत्रिणींसोबत जाऊ लागली पण थोड्या दिवसांनी तिचं त्यांच्याशीही पटेनासं झालं.. हळू हळू टीम मधल्या सगळ्या मुलींशी तिने बोलायचं पूर्णपणे बंद केलं.. ती एक सुंदर मुलगी.. फ्रेशर म्हणून लगेच पहिला जॉब इन्फी मध्ये मिळून एखादं वर्ष झालं असावं..  अशा मुलींच्या आसपास मुले नेहमीच घुटमळत असतात.. त्यामुळे आता ती त्या मुलांसोबतच असते पण आम्हा मुलीना मात्र ओळखही दाखवत नाही..

रोज सकाळी आम्ही एकाच वेळेस ऑफिस मध्ये येतो.. वॉशरूम मध्ये गेल्यावर नकळत मी अगदी रोज तिच्याकडे बघून एक स्माईल देत गुड मॉर्निंग म्हणते पण या madam च्या चेहऱ्यावर काहीच भाव नसतात, हास्य तर फार दूरची गोष्ट.. रोज असा अनुभव येऊनही पुन्हा तसंच घडतं..खूप सहजतेने एखाद्याकडे आपण हसून बघतो,शुभेच्छा देतोना.. they say "affection, openness and appreciation of qualities builds a long lasting relationship.."  पण ती मात्र काहीतरी खुन्नस असल्यासारखी वागते.. आमच्यापैकी एकीच नुकतच लग्न झालं म्हणून स्वीट्स आणले होते तर जवळच्या क्युबिकल मध्ये बसूनही 'तिने' ना तिला शुभेच्छा दिल्या ना स्वीट्स घेतले.. अगदी पर्वाची गोष्ट.. रविवारी वाढदिवस झाला तर सोमवारी सगळे मला  belated  happy  birthday  म्हणत होते पण ती काही एका शब्दानेही बोलली नाही.. मी तर रस्त्यावरचा कोणाचा आज वाढदिवस आहे कळलं तरी त्याला शुभेच्छा देते.. कोणी शुभेच्छा दिल्या तर माझा वाढदिवस चांगला आणि नाही दिल्यातर खराब असं काही नसतं.. पण वाढदिवसाला शुभेच्छा देणे हा एक संस्काराचा भाग आहे.. पण यातही लोकं attitude दाखवतात.. यामध्ये कमीपणा वाटतो की काय माहिती नाही..

खरंतर माझं तिच्याशी कधीच काही भांडण झालं नाही.. आणि मी तिला त्याच्यावरून कधी काही विचारलं नाही ना कधी चिडवलं.. तरी ती माझ्याशीही अशी का वागते हा मोठा  प्रश्न  होता.. बर काही चुकलं असेल आमचं तर बोलून दाखवावं.. समोरच्याला कळावं तरी नक्की काय झालंय ते..  त्यावर माझी मैत्रीण स्पष्टपणे  म्हणली की  "तिच्या डोक्यात हवा गेली आहे सध्या.. वेळेवर नोकरी,पैसा, boy  friend सगळं मिळालं आहे  त्यामुळे ती माज करत आहे.. तूही तिला मेल्स पाठवायचे बंद कर".. त्यावर मी मैत्रिणीला म्हणलं.. "माझ्या gm मेल्स मध्ये बरेचदा सुविचार,ओव्या असतात.. त्या तिला जास्त गरजेच्या आहेत त्यामुळे ती जोपर्यंत मला म्हणत नाही की मेल्स पाठवू नको तोपर्यंत मी तिला पाठवणार.. भले ती मेल बघून डिलीट मारत असेल किवा अजून काय.. 'attitude sickness ' झालाय तिला, येईल कधीतरी जमिनीवर.. ती कितीही भाव खाणारी असली तरी मी किती हट्टी आहे हे तिला माहिती नाही.. एक ना एक दिवस माझ्या मेलला ती नक्की उत्तर देईल.. देखते है किसमे है कितना दम.."

एकंदरीत अशा लोकांकडे पाहून मला वाटतं भले मी सुंदर गोरीपान नाही, भले मला कॉलेज झाल्याझाल्या लगेच नोकरी मिळाली नाही,संघर्ष करावा लागला, भले माझ्या नावावर घर गाडी नाहीये,  भले मला कोणी boy friend  नाही,माझं लग्न वेळेवर झालं नाही.. पण काही नाही तरी माझ्या चेहऱ्यावर स्माईल तरी आहे.. कोणाला वाढदिवसाला ,लग्नाला शुभेच्छा देऊन त्यांच्या आनंदात सामील व्हायचे माझ्यावर संस्कार तरी आहेत.. कोणाचं मोकळेपणाने कौतुक आणि आदर करण्याइतपत मोठं माझं मन आहे.. कोणाला गरज असेल तेव्हा शक्य तेव्हढी मदत करायला माझ्याकडे वेळ आणि इच्छा आहे.. am truly luckier than her..


माना अपनी जेब से फ़कीर हैं
फिर भी यारों दिल के हम अमीर हैं
मिटे जो प्यार के लिये वो ज़िन्दगी
जले बहार के लिये वो ज़िन्दगी
किसी को हो न हो हमें तो ऐतबार
जीना इसी का नाम है




बुधवार, २७ जुलै, २०११

मंतरलेले दिवस - ३४

Education makes a difference..


Infy campus! इथे येऊन आता मला जवळ जवळ एक वर्ष होईल पण अजूनही दररोज मला ती सुंदर फुलं पाने, हिरवळ ,पाखरे तेव्हढंच मोहवून टाकतात.. रोज सकळी ऑफिस मध्ये आले की किती अन काय पाहू असं होतं..  कधी कामाचा वा इतर गोष्टींचा ताण आला किवा कधी कंटाळा आला, झोप आली, ब्रेक हवा असेल किवा कधी  कधी काहीही कारण नसतानाही की या बागेत एक चक्कर मारल्यावर एकदम टवटवीत वाटते .. उन्हाळ्यात हिरवगार असलेल्या या परिसराचा रुबाब पावसाळ्यात तर विचारूच नका.. छान छान रंगेबिरंगी फुले उमलेली दिसतात.. हिरव्या गालिच्याची किनार लिलीच्या पांढर्या फुलांनी एकदम खुलून दिसते..  झाडांवर फुलांवर पावसाचे पाणी पडल्याने ते अजूनच सुंदर दिसतात.. आणि या सौदर्याचा उपभोग मी जास्तीत जास्त घेते..

परवा असंच फिरत होते तेव्हा पाऊस सुरु झाला.. मग मी माझ्या खाजगी जागेत म्हणजे अम्पी थेटरपाशी आले..  :) मी कुठे सापडले नाहीतर तिकडे असते असं मी माझ्या मैत्रिणींना सांगून ठेवलं आहे.. हे  थेटर अशी एक मोकळी जागा आहे जिथे इन्फीचे मोठे कार्यक्रम होतात.. पण एरवी दुपारी तिथे कोणी नसतं.. एक छोटं स्टेज आणि त्याभोवती प्रेक्षकांना बसण्यासाठी वर्तुळाकारात फरशीच्या पायऱ्या.. आणि सभोवताली कडेनी झाडे.. बरेचदा मी इथे येते तेव्हा क़्वचित एखादा कोणी फोनवर बोलत बसलेलं दिसतं.. बागेची कामं करणारे लोक कायम असतात.. आजही तिथे काही बायका गवत काढण्याचे काम करत होत्या.. झाडाखाली पायरीवर पाऊस लागत नव्हता म्हणून तिथे पावसाचा आनंद घेत बसले होते.. आणि बघता बघता पावसाचा जोर वाढला.. अन  मी भिजू लागले.. इन्फी मध्ये ठिकठिकाणी छत्र्या ठेवलेल्या असतात पण इथे पायऱ्यांवर छत्री कशी असेल.. त्या बायका लांब होत्या त्या लगेचच स्टेजमागच्या रूम जवळ गेल्या.. मी तिथे जाईपर्यंत पूर्ण भिजले असते असा पावसाचा जोर होता.. तेव्हढ्यात बागेतला एक माणूस छत्री घेऊन लांबून म्हणला, "madam ही छत्री घ्या.."  मी नको म्हणलं कारण ती छत्री ते मला द्यायला पुढे आले असते तर रूमपाशी जाईपर्यंत ते स्वतः भिजले असते.. ते जरी बागेतले कामगार असले तरी माणूसच आहेत, जसं पावसात भिजून माझे कपडे ओले झाले असते,मला सर्दी झाली असती तशी त्यानाही होण्याची शक्यता होती.. त्यांचं ते रुमपाशी जाऊन थांबले असते तरी त्यांना कोणी काही म्हणणार नव्हतं.. तरी ते त्यांच्या कामाचा एक भाग म्हणून मला छत्री द्यायला आले.. किती एकनिष्ठ होते ते त्यांच्या नोकरीशी.. त्याचा त्यांना पुरेसा मोबदला मिळत असेल का?

त्या दिवशी मला अगदी प्रकर्षाने  जाणवलं की हे बागेतले लोक सतत मन लावून  काहीना काही काम करत असतात,उन्ह असो वा पाऊस.. ऑफिसमध्ये काहीजण सतत फारश्या पुसत असतात, काचा पुसत असतात.. कॅन्टीन मधले लोक सकाळपासून रात्रीपर्यंत नाश्ता,जेवण ,साफसफाई यात गुंतलेले असतात.. आणि आम्ही संगणक अभियंता वातानुकुलीत ऑफिस मध्ये निवांत पणे काम करत असतो तेही खाणं पिणं अन गप्पा मारत.. तेही मनुष्य प्राणी आणि आपणही माणसंच.. मग ही फट कुठे तयार झाली?  याचं एकच उत्तर म्हणजे 'शिक्षण'.. नशिबाने आपल्याला योग्य शिक्षण मिळालं अन चांगली नोकरी मिळाली यामागे आपल्या पालकांचे आणि देवाचे आभार मानू  तेव्हढे  कमीच.. नाहीका..


They say.. "The purpose of education is to develop knowledge, skills and character. Knowledge makes all the difference. In this life everything perishes over a period of time. Whether it be beauty, diamond, gold or even land. Only one thing withstands destruction. It is Knowledge. The more you give, the more you get."

I'm not lonely, I'm just alone..

Solitude is the joy of being alone,it is being with urself.. while loneliness is getting bored with being alone..

मी कुठल्या समारंभाला गेले आणि तिथले विषय माझे नसतील  तर तिकडे मला एकटं वाटतं,बोर होतं.. म्हणजे गर्दीत असून एकटेपणा वाटणे..
आणि कधी मी एकटीच कुठेतरी भटकत असते तेव्हा मी मनापासून आनंद घेत असते.. म्हणजे एकटं  असून एकटं नसणं..

समर्थांनी दासबोधात  म्हणले आहे ..
जयास येकांत मानला| अवघ्या आधीं कळे त्याला |

सोमवार, २५ जुलै, २०११

मंतरलेले दिवस - ३३

"एकाच या जन्मी जणू.. फिरुनी नवी जन्मेन मी.." :)


नुकताच वाढदिवस झाला आणि पुन्हा एक नवीन आयुष्य सुरु झालं..  जाता जाता मन एकदा भूतकाळात फिरून आलं..  त्या गतकाळातील अनुभवांवरून मिळालेले धडे  इथे नमूद करत आहे..


कधी कधी आपण कोणाला जवळचं मानून त्यांच्यासाठी काही खास करतो..  आणि कालांतराने ते लोक सगळं विसरून जातात, आपल्यासाठी ते काहीही करत नाही.. आशावेळेस आपणच दुखी होतो.
खरतर आपण प्रेमाखातर त्यांच्यासाठी मनापासून काही केलं असतं इथेच आपलं कर्तव्य सपंतं.. ते किंमत ठेवत नाही ही अडचण त्यांची आहे.. याबाबतीत गंभीर त्यानी व्हायला पाहिजे.. आपण आपल्यापरीने सगळं करून पुन्हा आपणच वाईट वाटून का घ्यायचं..


बरेचदा असं जणवतं की काहीजण आपला ठराविक वेळेपुरता काही कारणासाठी एखाद्या वस्तुप्रमाणे वापर करतात आणि नंतर सोडून देतात.. मग आपणास वाईट वाटतं..
या बाबतीत आपण निश्चिंत राहायला पाहिजे.. आपला उपयोग केला गेला असेल तर आपण कोणाच्यातरी कामी आलो म्हणून आनंदी राहायला पाहिजे आणि  अशा व्यक्तीला गरज पडेल तेव्हा ती व्यक्ती आपल्या आयुष्यात पुन्हा येतेच.. आणि नाहीच आली तर ती व्यक्ती मजेत आहे हे समजून आपण शांत आनंदी व्हायला पाहिजे..


काही वेळा आपल्या आसपासचे लोक कोणत्या न  कोणत्या कारणांनी भेदभाव करून आपल्याला कमी लेखतात.. तेव्हा आपला आत्मविश्वास कमी होऊन आपण खचतो..
खरतर समोरचा आपल्याला कमी लेखणारा,आपल्याकडे दुर्लक्ष करणारा माणूस म्हणजे काही अख्ख जग नसतं.. अशा वेळेस आपल्या मनाची अन् बुद्धीची दृष्टी विशाल केली की समजतं की आपण जसे आहोत तसे खूप काही करू शकतो.. जगात कित्येकांना आपण हवे आहोत..


या व्यवहारी जगात सरळ साधेपणा.. प्रामाणिकपणा.. सवेंदनशीलता.. मोकळेपणा.. या गोष्टीना कमजोर समजले जाते..
परंतु याच मूल्यांमुळे माणुसकी नावाची गोष्ट जिवंत राहते.. आणि कुठेतरी तो सगळं पहात असतो त्यामुळे आज ना उद्या योग्य न्याय नक्कीच मिळतो..


आपण नेहमी दुसऱ्यांच्या चुकांवर रागावतो आणि स्वतःच्या चुकांनी हळहळतो..
खरतर कोणीच परिपूर्ण नसतं .. त्यामुळे मनात काही न ठेवता स्वतःला आणि इतरांना मोठ्या मनाने माफ केला तर मन हलकं होतं.. असे केल्यास आपण  खऱ्या अर्थाने स्वतंत्र अन् मोकळे होतो..


आणि सर्वात महत्वाची शिकवण.. भगवदगीतेत म्हणले आहे जसे..

उथ्धरेथ आत्मनात्मानं नात्मानम अवसाथयेत!
आत्मैव हय आत्मनॊ बन्धुर आत्मैव रिपुर आत्मनः!!

"One must deliver himself with the help of his mind and not degrade himself..  You are your Best Friend & You can become your Own Enemy too!!! "




गुरुवार, २१ जुलै, २०११

मंतरलेले दिवस - ३२

तुम आगये हो.. नूर आगया है.. :)

संध्याकाळची वेळ.. ऑफिसमधून घरी जायला अजून वेळ होता.. तेव्हढ्यात फोन आला आणि मी लगेचच घरी निघाले.. डयुटी लागली होती.. :) बाळाच्या आईला आणि आजीला थोडं बाहेर जाऊन यायचं होतं.. मग एकटे आजोबा कसे सांभाळणार म्हणून मावशीला इकडे तिकडे न जाता थेट घरी यायची आज्ञा झाली होती..
घरी गेल्यावर पिल्लूला म्हणलं "अब तुम मेरे कब्जे मै हो.."!!! तसं एरवी मी घेते त्याला पण आज फक्त आमचंच राज्य..  आणि त्याला आजोबांची खूप सवय आहे पण मी आपलं संधी मिळाली म्हणून चार्ज घेतला होता.. दुध झोप सगळे कार्यक्रम आधीच आटोपल्याने स्वारी खेळायच्या मूड मध्ये होती.. त्याला खाली त्याच्या छोट्या गाडीवर ठेवून मी आणि (माझे) बाबा आम्ही त्याच्याशी खेळत बसलो.. "तुझ्यासाठी आज आल्या आल्या pc  सुरु केला नाही बघ मावशीने, केव्हढा हा त्याग " असं म्हणून बाबा मला चिडवत होते..
संध्याकाळी बाळाला ताजातावाने वाटावे म्हणून त्याला आवरायचा कार्यक्रम.. एरवी त्याला चार लोकं सुधा पुरत नाही..  सतत इतके हात पाय मारून सायकल खेळत असतो कि कपडे बदलताना कोणी हात धरायचे, कोणी पाय असे प्रकार चालू असतात.. आज मात्र आम्ही दोघंच होतो.. टोपडं आणि सगळे कपडे काढल्यावर बाळराजे खुदुखुदू हसू लागतात, त्यांना लई भारी वाटतं.. :) कोमट पाण्यानी अंग पुसताना त्याचे भाव असे असतात ना कि काय करतात हे माझं..  Johnson's baby powder चा वास मला स्वतःला फार आवडतो.. त्या वासासाठी मी या वयात पण ती पावडर वापरते मधून अधून.. ;) तर आता मी त्याला कापसाच्या बोळ्याने हळुवारपणे पावडर लावत होते.. त्याला वास येत असेल का, पावडरने ताजे वाटत असेल का, त्याला समजत असेल का आपण काय करतोय ते  असे side by side माझे प्रश्न चालू होते.. तो मात्र नेहमीसारखा टकामका इकडे तिकडे कुतूहलाने पहात होता..
आता कसं छान फ्रेश वाटतंय म्हणे पर्यंत पठ्ठ्याने शुचा कार्यक्रम केला.. कारंज सगळीकडे उडवले.. माझं ड्रेस तर ओला झालाच पण तोही ओला झाला.. आताच त्याला पुसून काढलं होतं,पावडर लावली होती आणि लगेच चित्र बदलून टाकलं.. मावशीला कसं कामाला लावलं अशा नजरेने छोकरा गळ्यातल्या गालात हसत होता.. पुन्हा पुसून आवरलं.. आणि लगेच डायपर , कपडे घातले आणि म्हणलं आता पाहिजे तेव्हढ कर काय करायचं ते.. :) कपड्यांची मजा म्हणजे जे लगेच मिळालं ते घातलं.. matching वगैरे काही प्रकार नव्हता.. एका रंगाचा शर्ट, वेगळीच प्यान्ट आणि मोजे तिसर्या रंगाचे.. पिल्लूला म्हणलं याला multicolors म्हणतात! आता टीट लावायची..  बाळांना छान आवरून कपाळावर किवा गालावर टीट लावली कि किती गोड दिसतात ना ते.. आणि हे काम सगळ्यात अवघड असतं हे माझ्या आताशा लक्षात आलं... इतकी वळवळ चालू होती त्याची.. बाबांनी त्याला धरलं आणि मी टीट लावायचे प्रयत्न करू लागले.. त्याला धरल्यामुळे तो अजून जास्त हालचाल करत होता, डोकं हलवत होता.. अशात मी टीट लावल ते एका बाजूला कडेला लागला.. म्हणलं तुझी आई मला रागावेल बाबा, आमच्या बाळाला असं का आवरलं म्हणून.. ते पुसून पुन्हा एका प्रयत्न.. आता थोडातरी मध्ये लागलं पण हा पोरगा लगेचच ते फिसकटवतो म्हणून त्यावर थोडी पावडर  लावली.. आता आमचं पिल्लू एकदम वारकरी दिसू लागला.. थोडावेळ विठ्ठल विठ्ठल केलं.. या सगळ्या प्रकारात बाळाने एकदाही कुरकुर केली नाही हे विशेष .. :)
आता गप्पा.. आजी आजोबांनी नातवाला गप्पा मारायची जास्तच सवय लावली आहे.. जरा आम्ही इकडे तिकडे पाहिलेलं याला चालत नाही.. त्याच्या अवती भोवती सगळ्यांनी बसायचं अन त्याच्याशी बोलायचं.. मध्येच बाबांना मी काहीतरी ऑफिस मधलं सांगत होते तर याला वाटलं मी त्याच्याशीच बोलत आहे.. माझं सगळं लक्ष देऊन ऐकणारा तो एकमेव पोरगा असावा या पृथ्वीतलावर.. :) सेलमध्ये "कोणास ठाऊक कसा" गाणं लावला तर याला वाटलं मीच गात आहे,किती निरागस भाव दिसले मला त्याच्या डोळ्यात.. त्याने मध्येच हसायचं, मध्येच रडायचं आणि आपण कारणं शोधायची..
नंतर तर त्याच्या गप्पा सुरु झाल्या.. 'ओ, उ' असं काहीतरी बोलून तो खरच काही सांगत होतं.. मीपण त्याला प्रतिसाद देत होते.. बागेत जायचं, थोडा मोठा हो तू, मग जाऊ आपण.. आई आजी भूर गेली म्हणून तक्रार  करतोयस का, आपण त्यांच्याशी कट्टी घेऊया.. बाबा भेटायला आले नाही ना,आले कि आपण रागवू या वगैरे.. बालक आताच हुशार झाले आहेत.. मध्येच लाडीगोडी लावतो तो घे म्हणून.. आणि त्याला मांडीवर चालत नाही.. त्याला घेऊन घरभर फिरायचं.. हे काम मात्र आजी आजोबाना आणि त्याच्या बाबांनाच जमतं.. :)
आई आल्यावर घडल्यात पहिले तर २ तास होऊन गेले होते.. हा वेळ भूरकन उडून गेला मला अजिबात कळले नाही.. बाळ लीलांमध्ये बाकीच्या गोष्टींचा कसा विसर पडतो याचा प्रत्यय मला आज आला.. मी तर रोज थोडाच वेळ भेटते त्याला तरी मी इतके भारावले आहे.. तर बाळाच्या प्रत्यक्ष आईची मनस्थिती कशी होत असेलना.. प्रत्येक स्त्रीला मिळालेली हि एक अमोल देणगी आहेना.. या जन्मात मलाही हे सुख मिळावं हीच माझी ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना..

गुरुवार, १४ जुलै, २०११

मंतरलेले दिवस - ३१

 कल हो ना हो..

"मुंबई पुन्हा हादरली, तीन स्फोटांची मालिका.. संपूर्ण महाराष्ट्र हादरलं.." मन सुन्न झालं.. निष्पाप जीवांच्या उरावर का बसतात हे लोक समजत नाही.. अतेरिकी , राजकारण हा भाग वेगळा पण त्रास कोणाला झाला.. सफर कोण झालं.. किती गेले, किती जखमी झाले अन कितीजण थोडक्यात वाचले?  त्यातले कित्येकजण खरेदीला गेले असतील, कोणी ऑफिस मधून परतत असतील, कोणी काही कामासाठी बाहेर पडले असतील तेव्हा ते परत कधी येणार नाही अशी शंका त्याच्या घरच्यांच्या किवा स्वतः त्यांच्या मनात चुकूनतरी आली असेल का? त्यांच्यातले कोणी कोणाला भेटून निघाले असतील ती भेट शेवटची याची कल्पना त्यांना असेल का? काहीजण  कोणाला भेटायला निघाले असतील तेव्हा वाट बघणाऱ्याची हालत काय झाली असेल?

बॉम्ब स्फोट ही एक घटना.. तसं भूकंप, पूर, साथीचे रोग (स्वायिन फ्लू), अपघात अशा अचानक उद्भवणाऱ्या अनेक आपत्तींना मनुष्याला तोंड द्यावे लागते.. एक ना एक दिवस प्रत्येकाची वेळ येते.. मरण अटळ आहे.. हे असं इतकं माहिती असताना आपण आपल्या हाताने नाती का तोडायची?  वेळ नाही म्हणून आपल्या सख्यासोयारयाना टाळायचं.. ज्यांच्याशी आता संबंध आहे त्यांच्याशीच बोलायचं अन बाकीच्यांना अजिबात भाव द्यायचा नाही..  'मी का म्हणून' असा खोटा अभिमान धरून संपर्क तोडायचा..  वर्ण, धन संपत्ती, पद, जात अशा हजारो गोष्टीनी आपापसात भेदभाव करायचा.. स्वतः कडे सगळं आहे म्हणून माज करयचा आणि दुसर्यांना कमी लेखून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं.. मनात कोणाबद्दल कशाबद्दल तरी राग धरायचा आणि बोलायचं नाही.. कोणाशीतरी वैर धरायचं..  स्वतःचे हित पाहिचे, बाकीचे गेले उडत..

दोन घडीच आयुष्य आपलं..  आज आहे उद्या नाही, कसलाच भरवसा नाही.. मग कोणाशी असं का तोडून वागायचं? एखाद्याचा काही चुकत असेल किवा त्याच्याबद्दल  काही शंका/संशय असतील  तर ते मनात ठेवण्यापेक्षा स्पष्ट बोलून दाखवलं तर सुधारणा होऊ शकते ना.. वेळ नसेल मिळत तर तसा नीट पद्धतीने सांगू शकतोना..  आणि तुम्ही सुंदर गोरेपान, हुशार असताल, पैसेवाले असताल, तुमचं नशीब बलवत्तर असेल त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना यश येत असेल, तुमचं वेळेवर सगळं होत असेल पण या गोष्टी क्षणिक आहेत.. काळाप्रमाणे बदलणाऱ्या आहेत.. त्यामुळे उन्ह असो वा  पाऊस, आपण एक माणूस म्हणून नेहमी जमिनीवर राहिलं पाहिजे आणि समोरच्याचा एक माणूस म्हणून नेहमी आदर ठेवला पाहिजे भले तो कोणी का असेना..

प्रत्येक दिवस हा शेवटचा आहे आहे असा समजून वागला तर जीवन प्रवासाला खूप वेगळे वळण मिळते.. आज आपण या व्यक्तीशी शेवटचं बोलणार आहोत असं समजायचं.. मग समोरच्यासाठी आपोआप आपलं मन मोठं होतं.. मी हे अनुभवलं आहे.. कैलास मानसला जाताना मी परत येणार नाही अशा भावनेने तयारी केली होती.. सगळ्यांचा निरोप घेतला होता..  अगदी माझ्या खाजगी गोष्टींचं पुढे काय करायचं याची सोय लावून गेले होते म्हणूनच मी त्या अनोळखी लोकांबरोबर यात्रा मस्त एन्जोय करून येऊ शकले.. सरळ शुद्ध मनाने केलेल्या सगळ्या गोष्टीना यश मिळतं, होना..

म्हणून माझी मनापासून नम्र विनंती आहे की ज्यांना तुम्ही हवे आहात त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यांना तुमचा वेळ द्या.. तुम्हाला त्या व्यक्ती आवडत नसतील तरी त्यांच्याशी नातं तोडू नका.. कारण थोड्याच दिवसांचा प्रश्न असतो हा.. और फिर क्या पता कल हो ना हो..

चाहे जो तुम्हें पूरे दिल से
मिलता है वह मुश्किल से
ऐसा जो कोई कहीं है
बस वही सबसे हसीं है
उस हाथ को तुम थाम लो
वह मेहरबाँ कल हो न हो

लहान तोंडी मोठं घास झाला असल्यास माफी असावी..

सोमवार, ११ जुलै, २०११

पहिले पाढे चार...

एक दिवस प्रेमाचा..  दोन दिवस वादाचे..  तीन दिवस विरहाचे..  अन चार दिवस आठवणींचे..

एक दिवस स्वप्नांचा..  दोन दिवस भावनांचे..  तीन दिवस विचारांचे..  अन  चार दिवस वास्तवाचे..

एक दिवस मोहाचा..  दोन दिवस भोगाचे..  तीन दिवस जाणिवेचे..  अन चार दिवस पश्चातापाचे..

एक दिवस तृप्तीचा..  दोन दिवस सुखाचे..  तीन दिवस आसवांचे..  अन चार दिवस कंटाळ्याचे..

एक दिवस जगाचा..  दोन दिवस सोयरयांचे..  तीन दिवस स्वतःचे..  अन चार दिवस ईश्वराचे..

बुधवार, ६ जुलै, २०११

नुतनीकरण

मनाचं आता थोडं नुतनीकरण करायचं आहे..
जमल्यास जुनं देऊन नवं मन घ्यायचं आहे..

क्षणाक्षणांची वर्दी..  आठवणींची त्या गर्दी..
गतकाळाची रद्दी..  अन् भविष्याची यादी..
मनाचं गाठोडं आता थोडं आवरायचं आहे..
जमल्यास जुनं देऊन नवं घ्यायचं आहे..

उडत जाणारे रंग..  सुटत जाणारे संग..
आटत जाणारे गंध..  उसवत जाणारे बंध..
मनाचं आंगण आता थोडं सारवायचं आहे
जमल्यास जुनं देऊन नवं मन  घ्यायचं आहे..

सुखाच्या दीप माळा..  अश्रूंच्या निळ्या ज्वाळा..
प्रश्नांच्या गच्च जाळ्या..  मनाच्या वेड खेळ्या..
मनाचं घरटं आता थोडं सजवायचं आहे..
जमल्यास जुनं देऊन नवं मन घ्यायचं आहे..

आहे ना रे माझ्या सोबत तू

तुझ्या  नावाने मी नेहमीच थोडा थोडा भाव खाते
तू  आहेस पाठीशी हे जगास कायम ठासून सांगते
पाहतोयस ना रे तू हे सारं दुरून कुठून तरी
आहे ना रे माझ्या सोबत तू सदा सर्व काळी..

तुझ्याशी मनमोकळेपणाने मी  सारं काही बोलते
भल्या बुर्या गोष्टींचे गणित रोज तुझ्यापाशी मांडते
ऐकतोयस  ना रे तू हे सारं दुरून कुठून तरी
आहे ना रे माझ्या सोबत तू सदा सर्व काळी..

तुझे लक्ष आहे म्हणून सरळ मार्गाने मी  चालते
तोटा सहन करावा लागलातरी प्रामाणिकपने  वागते
पाहतोयस ना रे तू हे सारं दुरून कुठून तरी
आहे ना रे माझ्या सोबत तू सदा सर्व काळी..

जिथे तिथे जेव्हा जेव्हा शोध तुझाच घेते
सुखदुखात  माझ्या  मी तुझीच करुणा भाकते
ऐकतोयस  ना रे तू हे सारं दुरून कुठून तरी
आहे ना रे माझ्या सोबत तू सदा सर्व काळी..

रविवार, ३ जुलै, २०११

मंतरलेले दिवस - ३० : १६

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 16: 20th June,11


Kathmandu -> Mumbai -> Pune


आता चेहरा ओळखूयेण्या इतपत सुधारला होता..थोडी सर्दी - कफ होता ती तर मला पुण्यातही होतेच..  बाकी काही त्रास झाला नाही..
सकाळी नाश्ता करून काठमांडू विमानतळ गाठले.. 'ने मजसी ने परत मातृभूमीला' अशी अवस्था झाली होती आता.. विमानात खिडकीची जागा मिळाली नाही आणि शिक्षा दिल्यासारखे मी बसले होते तिथे खिडकी नव्हती.. गाणी आणि सिनेमा बघत, खात पीत विमान प्रवास झाला.. कितीतरी आठवणी मनात रेंगाळत होत्या..
दुपारी मुंबईला पोहचल्यावर जाम खुश झाले.. एव्हढे दिवस बाहेर मी पहिल्यांदाच एकटी राहिले होते त्यामुळे घरी कधी जाईन असे झाले होते..
मुंबई विमानतळावर मुंबईकरांचे नातेवाईक त्यांना भेटायला आणि घरी घेऊन जायला आले होते.. मी मुंबईत का राहत नाही मग माझे आई बाबापण आले असते असं उगाच  माझ्या बालमनाला वाटून गेलं.. एका कुटुंबाने आम्हा सर्व यात्रेकरूंचे फुले देऊन स्वागत केले.. आता कोणालाही थांबायचं नव्हतं.. लगेचच सगळे वेगळ्या दिशेत पसार झाले..
येताना गाडीचा प्रकार झाला होता त्यामुळे आता पुण्यात जाण्यासाठी बाबांनी शिस्तीत के के चे बुकिंग केले होते.. लोहगावकर काका काकू , करवा काका आणि मी असे पुण्याच्या प्रवासाला एका गाडीतून निघालो.. नाही नाही अजून ट्रीप संपली नव्हती.. आता express  way लगतचे धबधबे, ढगात बुडलेला लोणावळा खंडाळ्याचा घाट.. आणि मध्येच थांबून खाल्लेला गरम गरम वडापाव आणि चहा.. आहा,ये हुई ना बात.. :) गाडीमध्ये पूर्णवेळ ट्रीप मधल्या गप्पाटप्पा, आठवणी.. अशा रीतीने रानजाई रेसिडन्सी कधी आलं समजलंच नाही!!!


मंतरलेले दिवस - ३० : १५

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 15: 19th June,11


Kathmandu

आजचा पूर्ण दिवस आराम करण्यासाठी मोकळा ठेवला होता.. काहीच कार्यक्रम नव्हता.. सिमास चे सगळे मंडळी आज काठमांडू -> दिल्ली -> पुणे असे जाणार होते.. मी काल केळकर काकांना म्हणलं मलाही आज यायचं पुण्यात.. पण आता ऐनवेळेस बदल करणं फार महागात पडलं असतं म्हणून तो विचार डोक्यातून काढून टाकला..
आज  निवांत उठलो.. चहा घेताना कळला कि केसरीची एक तुकडी आमच्या नंतर आली होती त्यांना पहिल्या दिवसानंतर परतावे लागले.. हिमवर्षावामुळे डोलमा पासला जाता नाही आले आणि परिक्रमा पूर्ण झाली नाही.. हे ऐकून मी भूतकाळात शिरले.. माझ्या ओळखीच्या सर्वांनी ही यात्रा केसारीसोबत केली असल्याने मी सर्वात प्रथम केसरीकडे चौकशीला फोन केला होता.. तेव्हा तिकडची एक मुलगी जूनच्या ग्रुपमध्ये एकच जागा शिल्लक आहे ,लवकरात लवकर बुकिंग करा म्हणली मग मी त्याच संध्याकाळी फर्गुसन रस्त्यावर त्यांच्या ऑफिस मध्ये गेले.. आणि तिथे गेल्यावर या madam  म्हणतात की जून मध्ये नाहीतर जुलै मध्ये जागा आहे.. मला म्हणे तुम्ही जुलै मध्ये जा.. आता ती कोण ठरवणारी मी कधी जायचं ते.. बर जागा नसू शकते जून च्या ब्याच मध्ये पण मग फोनवर खोटं कशाला बोलली.. तिला वाटलं असेल एकदा ऑफिसमध्ये समोरासमोर बोलू आणि जुलै च्या ग्रुपमध्ये नाव टाकू..  पण हे असं खोटं बोललाना कोणी कि माझ्या डोक्यात शॉट जातो.. मी म्हणलं मी काम करते ,मला सुट्टीच पाहावा लागता.. जूनमध्ये  सुट्टी मिळेल.. फोनवरच तुम्ही सांगितला असतं जून ची ब्याच भरली आहे तर मी आलेच नसते ना  अशी धावत.. तर ती म्हणायला लागली  आमच्या ब्याचेस २/३ महिन्याआधीच भरतात वगैरे.. मी म्हणलं  बघा जून मध्ये जागा असेल तर ठीक आहे नाहीतर राहूदे.. तर ती नाहीच म्हणली.. मग मी तिला म्हणलं  फोनवर चुकीची माहिती देत जाऊ नका आणि निघून आले... खाली आल्यवर माझ्या डोळ्यात पाणी आले होते की आता मला जाता येणार नाहीका.. मला पुढे अजिबात ढकलायचे नव्हते.. त्यावेळेस माझे आईबाबा पूर्ण तयार झाले नव्हते त्यामुळे मला पाठींबा कोणाचाच नव्हता.. मनातून देवाला म्हणलं मला ही यात्रा आताच करायची आहे.. थोडी निराश झाले होते पण लगेचच सचिन trv कडे जाऊन विचारपूस करायची ठरवले आणि थेट सचिनचे जंगली महाराज रस्त्यावरचे ऑफिस गाठले.. सचिनची ब्याच ५ जून ला आहे आणि त्यात भरपूर जागा आहेत हे कळल्यावर मला फार आनंद झाला.. सचिनचं तसं चांगलं नाव आहे म्हणलं जाऊ आता,पुढे होईल तसं होईल..  नंतर मला केसरीचा १० वेळा तरी कमीतकमी फोन आला कि जूनच्या ग्रुपमध्ये एक जागा आहे म्हणून.. मला त्यांचं असं वागणं काही झेपलं नाही.. मी त्यांना दाद दिली नाही आणि सचिन कडे बुकिंग केले.. आणि आज समजतय की मला केसरीच्या जून च्या ग्रुपमध्ये जागा नाही मिळाली किती चांगली गोष्ट होती.. आज देवाने मला पुन्हा दाखवून दिले कि 'प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असते.. आणि जे होते ते आपल्या चांगल्यासाठीच..'
नंतर आम्हाला खरेदीसाठी एकीकडे नेले गेले तिथे एक मोठा mall  होता.. आता पुण्या मुंबईत काही malls  नाहीयेत का.. आणि या mall  मध्ये इथलं काही खास वेगळं नव्हतं किवा काही स्वस्तही नव्हतं.. तरीही सर्वांनी तिकडे भरभरून खरेदी केली याचं मला फार आश्चर्य वाटलं.. लोकांकडे खूप पैसे आहेत,अजून काय.. मी मात्र एक पैसाही त्या mall  मध्ये खर्च केला नाही.. खरंतर आमच्या हॉटेलच्या परिसरात चांगलं मार्केट होतं.. त्या mall  मधून आल्यावर मी इथे फिरले आणि थोडी खरेदी केली.. :) आता इथे चांगलाच पाऊस चालू होतं.. महेश म्हणला आपण mountain  flight  आधीच केले बरे झाले,आता ते सगळं पावसामुळे बंद झालं आहे..
जरा थकलो होतो म्हणून आणि पावसामुळे आज काठमांडू मध्ये विशेष कुठे फिरलो नाही.. संध्याकाळी गेटटुगेदर होते तेव्हा आम्हा सर्वाना यात्रा पूर्ण केल्याचे abc adventure कडून प्रशस्तीपत्रक देण्यात आले.. :) ते देताना महेश सर्वांबद्दल बोलत होता.. माझ्याबद्दल म्हणला कि डोलमा पास झाल्यावर हिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो अवर्णनीय आहे,मी भीम भय्या , केळकर काका आम्ही त्या आनंदाचे साक्षीदार आहोत!!!
रात्री bag  packing  चे मोठे काम केले...



मंतरलेले दिवस - ३० : १४

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 14: 18th June,11


Nyalam -> Kathmandu


सकाळपासून खूप पाऊस होता इथे.. वातावरण पार बदलून गेले होते.. पावसाळ्यातला धो धो पाऊस पडत होता.. बरं झालं जाताना असा पाऊस नव्हता नाहीतर पारीक्रमा अवघड झाली असती असे सर्वानाच वाटत होते..  आता पुन्हा हिरव्यागार पर्वतांच्या रांगा दिसू लागल्या.. आणि आपल्या इथे लोणावळा खंडाळ्याच्या घाटात दिसतात तसे मनमोहक धबधबे दिसू लागले.. ते फारच वरून कोसळत ओटे त्यामुळे आवाजही खूप येत होता.. कुठे कुठे ढग खाली उतरले होते... कधी गाडी तपासासाठी थांबवली जायची मग आम्ही लगेचच फोटो काध्याला खाली उतरायचो..
दुपारी कोलारी येथे चीन-नेपाल बोर्डर पाशी आलो.. इथे जीप सोडली.. ड्रायवरला thank  u  म्हणले आणि त्याने छान smile दिले.. :)
आता checking  immigration  साठी भली मोठी रांग होती.. आमच्या जवळच श्रेष्ठा यात्रा कंपनीचे लोक रांगेत उभे होते.. असाच बोलता बोलता समजले कि ते आमच्या नंतर २ दिवसांनी आले होते आणि पहिल्या दिवसाच्या पुढे त्यांची परिक्रमा होऊ शकली नाही.. डोलमाला  जाता आले नाही त्यांना.. त्यांनी आम्हाला आमच्या यात्रेबद्दल सगळं विचारला आणि त्यांना फार वाईट वाटलं की इथपर्यंत लांब  येऊन यात्रा पूर्ण करता आली नाही.. काय करणार पण निसर्गासमोर मनुष्य दुबळा आहे..
आता सगळे आपापल्या घरी चालले आहेत अशी जाणीव सर्वांना होऊ लागली.. एकमेकांचे फोन नंबर, पत्ता वगैरे सगळे घेऊ लागले.. मला सगळे जण म्हणले लाडू खायला लवकर बोलव.. कोणी म्हणलं पत्रिका पाठव,आम्हीपण बघतो तुझ्यासाठी स्थळ .. मुलगी 'कैलासी' आहे,आपली पार्टी जड आहे!! मी बर म्हणलं पहा.. कोणी कैलास मानस यात्रेला जाऊन आले की त्यांना 'कैलासी' म्हणतात म्हणे..
मग पुन्हा मैत्री पुलावरून चालत जाऊन चीन मधून नेपाल मध्ये आलो.. नेपाळ मध्ये आल्यावर जरा आपल्या भागात आल्यासारखे वाटू लागले.. इथे जेवणासाठी थांबलो.. तिथे लगेचच currency  exchange  वाला आला.. नंतर मग बसने काठमांडूच्या दिशेने प्रवास सुरु झालं.. हा प्रवास साधारण ६ तासाचा होता.. बाहेर पाऊस, धबधबे,नदी ,ढग आणि बस मध्ये मजा मजा चालू होती सर्वांची.. अशारितीने आम्ही संध्याकाळी काठमांडूच्या वैशाली हॉटेल मध्ये पोहचलो.. तिथे abc  adv चे ईश्वर सर सर्वांच स्वागत करायला उभे होते..
तब्बल ११ दिवसांनी आज गरम पाण्यात अंघोळ केल्यावर किती मस्त वाटतं ते मला विचारा.. तरीही मी जरा जपूनच बाथरूम मध्ये गेले.. एकदा आपटून झाल्याने त्या टबची  भीती मनात बसली होती.. :)
राजू भय्या आणि त्यांचे मित्र उद्या सकाळी लवकर निघणार होते.. म्हणून मग त्यांनी पत्ता  वगैरे दिला.. आणि मला आठवण म्हणून कैलास मानसचे मोठे पोस्टर भेट म्हणून दिले.. :) औरंगाबादचा एक ग्रुप होता तेही उद्या सकाळी निघणार होते.. त्यांच्यात एक डॉक्टर काका होते.. ते मला येऊन म्हणले की कैलास मानस चे दर्शन आई वडिलांच्या पुण्यायीमुळे मिळते, आई वडिलांना कधीही विसरू नकोस.. मी बर म्हणलं.. मी कशी विसरेन माझ्या आई बाबांना.. ते आहेत म्हणून तर मी आहे..
आईला हे टब प्रकरण, कॅमेरा प्रकरण अशा गोष्टी आज फोन करून सांगितल्या..  जेवताना भीम भय्याला म्हणलं इथे जवळपास कुठे पाणीपुरी मिळते का.. एकतर परिक्रमेचा  आनंद साजरा करयचा होता आणि १२ गावची पाणीपुरी खायचा माझा नित्यनेम.. ते म्हणले उद्या जाता येईल पण उद्या तर माझा उपास,गणेश चतुर्थी.. जाऊदे म्हणलं आता पुण्यात जाऊनच पाणीपुरी खावी.. २ days to go ..

मंतरलेले दिवस - ३० : १३

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 13: 17th June,11


Dongaba -> Nyalam

सकाळी लवकर उठून प्रवास सुरु.. आज दिवसभर फक्त प्रवास.. संध्याकाळी न्यालमला मुक्काम.. प्रवास खूप सुंदर होता.. जाताना दिसलेल्या गोष्टी परत दिसत होत्या त्यामुळे सगळा परिसर आता परिचित वाटत होता.. बाहेर अजूनही थंडगार वारे वाहतच होते.. कितीही काढूनही अजून फोटो काढणे चालूच होते..
दुपारी जेवणासाठी एका मोकळ्या जागेवर थांबलो होतो.. चोहीकडे हिमशिखरे.. शेजारी खळखळ वाहणारी नदी.. अशा ठिकाणी आम्ही लुसलुशीत गवतात खाली बसून निवांत जेवण केले.. 'ये हसी वादिया, ये खुला आसमा' या ओळीचा perfect  अर्थ एव्हाना समजला होता..  भीम भय्या, महेश आणि सगळे शेरपा लोकं कैलास मानस दर्शन सुखरूप झाल्याने खूप relax होते ,त्यांच्यावर आम्हा सर्वांची जबाबदारी होतीना...
मध्येच केळकर काका म्हणले अगं चेहरा कसा झालाय तुझा, साल निघायला लागलं आहे, cold  cream  लावत आहेस ना..  मी म्हणलं सकाळ संध्याकाळ निविया फासत आहे.. तर ते म्हणले  तसं नाही, क्रिकेटवाले कसा क्रीमचा थर लावतात तसा लाव.. म्हणजे पुण्यात जाईपर्यंत चेहरा नॉर्मल होईल..
मला फार आश्चर्य वाटलं की ते अगदी घरच्यान्सारख मला सांगत होते..  खरतर आता सर्वांचे चेहरे ट्यान झाले होते आणि असं आम्हा कोणालाही आमच्या घरचे किवा friends  यांनी असे पहिले असते तर कोणी ओळखू शकलं नसतं.. इतके दिवस परिक्रमा पूर्ण करायचा लक्ष होता आणि पूर्णवेळ स्कार्फ, माकड टोपी घातलेली होती त्यामुळे कोणाच्याही चेहऱ्याकडे कोणाचेही विशेष लक्ष गेले नव्हते.. आणि मुख्य म्हणजे कुठेच आरसा नसल्याने आपण स्वतः कसे दिसतोय याची कल्पना कोणालाही नव्हती.. अज्ञानात सुख असतं ना! गाडीच्या आरशात बघायची बुद्धी झाली नाही तिकडे हे बरं झाले एका अर्थाने..
आता काही इतक्या दिवसांचे secrets सांगते.. :) ६ तारखेला काठमांडू सोडल्यापासून अंघोळ केली नव्हती ती काठमांडू ला पोहाचाल्यावारच करायला मिळणार होती.. आणि कपडेही बदलले नाही.. घाम वगैरे नसल्याने आणि प्रचंड थंडी असल्याने विशेष फरक पडला नाही.. सागा सोडला तर सगळीकडे राहायचे हॉटेल्स खूप साधे असून कुठेही टोयलेटची सोय नव्हती.. अर्थात याची कल्पना आम्हाला आधीच दिली गेली होती.. त्यामुळे कित्येकदा चांदण्यात.. स्वच्छ खळखळत्या नदीशेजारी, समोर कैलास दिसतोय अशा ठिकाणी आमचे हे कार्यक्रम  चालायचे.. सगळ्या महिला मंडळाचा हा एक सार्वजनिक कार्यक्रम असायचा.. :
तुम्हाला वाचताना कसेतरी वाटत असेल पण लपवायचा काय त्यात.. जर कोणाला अशा यात्रा करायच्या असतील तर  हे सगळं माहिती असायला पाहिजे आणि यासाठी मनाची तयारी पाहिजे!!! तसं ट्रेकिंग वाल्यांना जास्त जड जात नाही हे.. :)  सचिनवाल्यांनी पहिल्या मिटिंग मध्ये या कार्यक्रमाला 'जंतर मंतर' असे नाव दिले होते.. बरं पडायचं ते कोणाला सांगायचं असल्यास.. हे नाव  फारच प्रसिद्ध झाले नंतर..
संध्याकाळी न्यालमला पोहचले.. आताचे हॉटेल चांगले होते.. तिथे वॉशरूम मध्ये आरसा होता..
एव्हढ्या दिवसांनी मी जेव्हा मला आरशात पहिले तेव्हा खरं सांगते मी मला ओळखूच शकले नाही.. सगळेच असे वेगळे दिसत होते पण त्यातला त्यात आता माझा चेहरा जास्तच  बदलला होता.. कारण माझ्या मनासारखी माझी त्वचाही खूप सवेंदशील आहे.. आणि चालताना दम लागायचा त्यामुळे नाक ओठ खुपदा उघडे ठेवावे लागायचे.. त्यामुळे माझ्या नाकाचे साल पूर्णपणे निघाले होते.. आणि सततच्या बदलणाऱ्या हवामानामुळे , कधी उन्ह कधी पाऊस कुठे बर्फ लागून चेहरा पार काळवंडला होता..
तेव्हा मला  कवी गोविंद यांची हि कविता आठवली.. :)
जुनी इंद्रिये, जुना पिसारा.. सर्व सर्व झडणार हो..  
नव्या तनुचे, नव्या शक्तीचे.. पंख मला फुटणार हो..
सुंदर मी होणार.. सुंदर मी होणार..
नंतर पाण्याने चेहरा पुसून काढून निवियाचा थर लावला आणि शांत बसले.. रात्री  सर्वांकडून  पैसे  गोळा  करून  ड्रायवर  आणि शेर्पाना  टीप  म्हणून  देण्यात  आले.. १३ शेरपा मिळून ५०० rs गोळा केले गेले.. पण मला वाटले वाटून त्यांना प्रत्येकाला किती कमी येतील.. मग मी प्रत्यकी १०० रुपये दिले.. खरतर तेही कमीच होते कारण ही यात्रा शेरपा लोकांमुळेच सुखरूप झाली होती.. all credit goes to them.. आमच्यापैकी काही असे होते की खरेदीला वाटेल ते घ्यायचे आणि टीप देताना मात्र मन छोटं होत होतं त्यांचं,त्यांनी २००/२५० रुपयेच दिले.. चालायचंच..



शनिवार, २ जुलै, २०११

मंतरलेले दिवस - ३० : १२

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 12: 16th June,11


Zuthulphuk ->Zongirpu -> Dongaba

पायाला काहीतरी ओलं लागतंय म्हणून जाग आली.. उठून पहिले तर मोजे ओले झाले होते.. रात्रभर खूप पाऊस झाल्याने तंबूत पाणी शिरले होते.. ते स्लीपिंग ब्याग मधून आत कसे शिरले मला कळले नाही.. घड्याळात  पहिले तर पहाटेचे ३ वाजले होते.. मग तशीच झोपून गेले.. ते थेट ६ वाजता बाहेरचा तंबू काढल्यावर जाग आली.. प्रत्येक तंबूला बाहेरून एक कव्हर होते ते शेर्पाने थेट काढून टाकले,उठवायची ही भारी पद्धत होती.. :)
बाहेर आले तेव्हा उजाडले होते.. आणि पाऊस पडून गेल्यावर सगळं कसं एकदम ताजतवान  दिसतं तसं टवटवीत दिसत होतं.. आणि सगळे आधीच उठून नाश्ता करत होते.. मलाच उठायला जरा उशीर झाला होता.. पण आज फक्त ६ किमी चालायचे असल्याने सगळे निवांत होते..
पावसामुळे किंवा कुठे नदी ओलांडून जावे लागते यामुळे मोजे ओले व्हायची शक्यता असते म्हणून मोज्यांची extra  pair जवळ ठेवायला आधीच सांगितले गेले होते.. पण मी स्याक माझी मी घेणार होते आणि त्यात कमीतकमी समान ठेवायचे होते या गडबडीत extra  मोजे दुसऱ्या ब्यागेतच राहून गेले.. आता माझे मोजे पावसामुळे ओले झाले होते,काय करायचं विचार करत होते.. एकदा तसेच ओले मोजे घालून बाहेर एक चक्कर मारून आले पण तसं ठीक वाटत नव्हतं.. आणि थंडीमुळे मोजे काढून चालायचं धाडस होत नव्हतं.. शेवटी मोजे काढून फक्त शूज घातले.. वेगळा काही पर्याय नव्हतं,बघू म्हणाला आता असंच जाऊ..
उठल्यावर बरेच जण माझ्याशी येऊन बोलले, काल किती वाजता आलीस, कसं वाटलं वगैरे.. तेव्हा कळलं कि काल दोन काकू घोड्यावरून पडल्या मग त्यांची विचारपूस केली.. मुन्ना भाई तयार होते,चल म्हणत होते मग नाश्ता घाईघाईत केला आणि लगेचच आम्ही परिक्रमेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात केली..
आता कोवळं उन्ह पडलं होतं त्यात त्या नदीचे पाणी अगदी चमकत होते.. रात्री एव्हढा पाऊस झाला हे खरंच वाटत नव्हतं..  पुढे साधा रस्ता होता आणि क़्वचित कुठेतरी चढ लागायचा.. काल इतकं चाललो होतो कि आता चालण्याचे काहीच वाटत नव्हते.. आणि कमी उंचीवर आल्याने दम पण जास्त लागत नव्हता.. लवकरात लवकर परिक्रमा पूर्ण करायचा ध्यास लागला होता.. आणि मनात कुठतरी वाटायला लागलं होतं की झालं, परिक्रमा झाली की संपलं मग आपण परत कधी इथे येणार आणि असं पर्वतातून नदीच्या जवळून असं पुन्हा कधी चालणार.. निसर्गाच्या कुशीत असं पुन्हा कधी रहाणार..
आज चालायचा  वेग जास्त होतं.. चालण्यामुळे पायात उष्णता निर्माण होत होती आणि त्यामुळे मोजे न घालूनही मला पायाला थंडी वाजली नाही.. साधारण सकाळी १० च्या दरम्याने आम्ही जोंगीरपू इथे पोहचलो आणि इथे परिक्रमा पूर्ण झाली.. पोहचल्यावर शेर्पाने जूस (गरम गरम) दिला आणि स्वागत केले.. एक भलताच  आनंद आणि समाधान आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता.. घोडेवाले आधीच  आले होते... चालणारे सगळे आल्यवर मग सर्वांनी आनंद साजरा केला,एकमेकांना अभिवादन केले.. मला किती काकुनी जवळ घेतले,आलिंगन दिले.. आणि मग ग्रुप फोटो!!!  आमच्या ५० पैकी ४० जणांनी घोड्यावरून  तर १० जणांनी चालत परिक्रमा पूर्ण केली होती.. चालणाऱ्यापैकी मी एकटीच मुलगी आणि बाकी सगळे काका.. त्यामुळे माझे जास्त कौतुक झाले.. पण खरं सांगायचं तर त्या काकांच जास्त कौतुक केला पाहिजे.. पन्नाशीच्या पुढे त्यांच्या तब्येती इतक्या उंचीवर चांगल्या राहिल्या आणि उत्साहाने त्यांनी परिक्रमा पूर्ण केली.. मी त्यांच्या एव्हढी झाल्यावर माहिती नाही माझ्यात तेव्हढी शक्ती आणि उत्साह असेल का.. आणि घोड्यांवरून परिक्रमा पूर्ण केलेल्यांचेही तेव्हढेच कौतुक.. तेपण अवघड होते बरेच..

आता इथे आमच्या गाड्या परतीच्या प्रवासासाठी सज्ज होत्या.. इकडून आम्ही दार्चेनला गेलो जिथे आमच्यापैकी काही मंडळी जी परिक्रमेला येऊ शकली नव्हती ती राहिली होती.. दार्चेनला गेल्या गेल्या सगळ्यात आधी मी घरी फोन केला आणि आई बाबांना परिक्रमा चालत पूर्ण करता आली हे सांगीतले.. त्यांनाही खूप आनंद झाला.. मात्र फोनला मोठी रांग होती त्यामुळे जास्त बोलता आले नाही.. तिथेच दुपारचे जेवण घेतले.. परिक्रमा पूर्ण झाली म्हणून आज रसगुल्ले होते.. :) तिथून कैलासाचे शेवटचे दर्शन झाले ,खूपच लांबून.. आणि पुढे मानस सरोवर लांबून दिसले.. ते दिसेनासं होईपर्यंत मी तिथे पाहत राहिले.. या यात्रेसाठी मला खूप जणांच्या शुभेच्छा मिळाल्या होत्या त्यासर्वांची मला इथे खूप आठवण झाली.. सगळ्यात आधी माझे आई बाबा आणि घरचे .. त्यांनी मला परवानगी दिलीच नसती तर इथे येण्याची संधी मला मिळालीच नसतीना.. त्यांच्या कडून परवानगी कशी मिळवली हि एक वेगळी मोठी गोष्ट आहे.. :) मग माझा ऑफिस प्रोजेक्टचा client  & TL ,त्यांनी  सुट्टी दिली नसती तर.. नंतर माझे  teammates  आणि ऑफिसमधले friends ज्यांच्याशी इथे येण्याआधी दिवसदिवस किती चर्चा केली होती.. आणि माझे सगळे friends and  well wisher  ज्यांनी मला यात्रेबद्दल शुभेच्छा दिल्या, प्रेरणा दिली, कौतुक केले आणि मार्गदर्शन केले होते.. यासर्वांचे  मी मनातून आभार मानले.. आणि त्यांच्यावतीने कैलास मानसला परत एकदा नमस्कार केला..
आता परतीचा प्रवास सुरु झाला.. असं वाटत होतं कुठे थांबू नये, थेट काठमांडूला जावे आणि तिथून तत्काळ  flight  पकडून लगेच पुण्यात घरी.. खरंच आता सर्वाना घरचे वेध लागले होते..
गाडीमध्ये मग सगळे परिक्रमेच्या वेळेस झालेल्या गमतीजमती सांगत होते.. सगळे मनापासून खुश होते, एक वेगळ्याच हास्याने सर्वांचे चेहरे उजळले होते.. आता प्रवास कमी उंचीच्या दिशेने होता त्यामुळे जास्त प्रवास आणि फक्त रात्रीपुरते राहायचा मुक्काम..
संध्याकाळी आम्ही डोंगबा येथे मुक्कामासाठी थांबलो.. इथेही ४/५ जणी एकेका रूम मध्ये होतो.. थंडी भरपूर होती त्यामुळे अजूनही जर्किन काढायचे धाडस होत नव्हते.. आज रात्रीचं  विशेष म्हणजे आज diamox  गोळी दिली नाही.. काहीतरी चुकल्या चुकल्यासारखे वाटत होते.. आम्ही कितीतरी वेळा गोळीची आठवण केली  पण आता इथून पुढे गोळीची गरज नव्हती.. :)