शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०११

मनाच्या दिव्यात प्रेमाची तेलवात करू..
आनंदाच्या ज्योतिने आसमंत उजळवु...

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०११

मंतरलेले दिवस - ४४

सकाळची वेळ.. नेहमीप्रमाणे ऑफिसच्या बस मध्ये खिडकीची जागा शोधून बसले.. पावसाळी वातावरण होते,हवेत गारवा जाणवत होता.. माझ्या पुढच्या सीटवर बसलेल्या मुलीने तिची खिडकी पूर्ण उघडी ठेवली  होती.. गाडी express way ला लागल्यावर जोरात वारा वाहू लागला.. मला थंडी वाजायला लागली म्हणून तिला खिडकी बंद करतेस का विचारायला मी उठले.. पण तेव्हा पाहिलं तर त्या वाऱ्याचा ती मनसोक्त आनंद लुटत होती.. तिचे केस छान उडत होते आणि ती त्या वातावरणात हरवून गेली होती.. अशात तिचा विरस करावा हे मला ठीक वाटले नाही.. म्हणून मी स्कार्फ लावून तशीच बसले.. प्रश्न थोड्या वेळाचा तर होता.. ऑफिस आले की दोघींना उतरायचेच होते.. तिचा वाऱ्याचा आनंद फार काळ टिकणार नव्हता आणि मला वाऱ्याचा होणारा त्रास सुधा कायम टिकणार नव्हता..

जीवन यात्रेत बरेचदा असेच अनुभव येतात ना.. एखाद्यासाठी जी सुखाची गोष्ट आहे ती दुसर्या कोणासाठी दुखकारक ठरू शकते.. आणि एखाद्याच्या दुखाची गोष्ट कोणालातरी आनंद देत असते.. सगळेच एका वेळेस सुखी होऊ शकत नाही बहुधा.. आणि प्रत्येकाची ही सुख - दुखं क्षणिक असतात..  पण कधीतरी  स्वतःचं दुखं बाजूला ठेवून दुसर्यांच्या सुखात सहभागी व्हायला जमलं  तर त्यातून मिळणारं समाधान मात्र चिरंतन असेल..

अपना तो क्या जिये मरे चाहे कुछ हो..
तुझको तो जीना रास आ गया..
जाने तू या जाने ना, माने तू या माने
ना..

रविवार, २ ऑक्टोबर, २०११

मंतरलेले दिवस - ४३

स्कूल चले हम..

"Life is not only about achieving - it is about contributing.." हे वाक्य मनात नेहमीच घुटमळत असतं.. मी नशीबवान आहे कारण माझ्याकडे मला जे पाहिजे ते करायला साध्यातरी पुष्कळ वेळ असतो (touch-wood).. पण मग भटकंती, वाचन किवा अजून काही कार्यक्रमात भाग घेऊन मी फक्त स्वतःचं मनोरंजन करत असते.. ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी काहीतरी खास काम करून वेळेचा सदुपयोग करावा असे कायम वाटते.. तरी नक्की काय करावं हे मात्र समजत नाही..सहज बोलता बोलता प्रीती म्हणाली शनिवारी शालेय शिबिराला जात आहेस का.. आम्ही client बाजूला असल्याने इन्फी मध्ये काय चालू असतं हे बरेचदा काळतच नाही.. मग लगेचच मेल पहिला आणि शंतनुंना फोन लावला.. आपटे आडनाव वाचून मी मराठीतच सुरु केलं आणि आणि मी येतीये सांगून टाकलं..  फोननंतर मला समजलं  कि ते पूर्वी आमचे DM  होते म्हणून.. नंतर प्रीतिसुधा येणार म्हणाली मग आमच्या चर्चा आणि प्लानिंग सुरु झाले..

स्पार्क हा इन्फीचा एक गट आहे त्याद्वारे शहराबाहेरील गाव-खेडमध्ये शिबिरे घेतली जातात.. आतापर्यंत पुण्याजवळच्या आसपास असे उपक्रम चालू असे,यंदा सांगलीजवळ विटा या गावामध्ये जायचे ठरले होते..विटा मधील आदर्श अभियंता कॉलेज मध्ये आजूबाजूच्या परिसरातील वेगवेगळ्या शाळेमधून जवळ जवळ २८०० विद्यार्थी येणार होते.. अशा आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आम्ही संगणकाबद्दल माहिती देणार होतो.. अशा उपक्रमांना इन्फ़ोशिअनचा नेहमीच भरघोस प्रतिसाद मिळतो.. यंदाही आम्ही ८०जण चाललो होतो.. जायची यायची, खाण्या पिण्याची अशी सगळी सोय ऑफिसने केली होती.. भरीस भर म्हणजे आपण कॉम्पुटरचं काय काय शिकवायचं वगैरे यासाठी ppt  सुधा तयार केलं होतं.. आम्ही फक्त आपला वेळ आणि ज्ञान विद्यार्थ्यांना द्यायचा होता,बस..

पहाटे ५.३० वाजता आम्ही कोथरूडवासी चांदणी चौकात जमून बसची वाट पाहू लागलो.. शंतनूनी प्रताप  याच्याशी ओळख करून दिली तेही DM आहेत आणि स्पार्कचे सगळं ते अगदी उत्साहाने पाहतात असे सांगितलं.. आणि प्राजक्ता या एका नवीन मैत्रिणीशी ओळख झाली.. :) दोन बस ऑफिसमधून निघाल्या होत्या.. ८० लोकं जमेपर्यंत निघायला थोडा उशीर झालाच.. बसमध्येच सर्वाना नाश्ता देण्यात आला.. स्यांडविच+पोहे+उपमा असा तो नाश्ता नव्हताच मुळी,जेवण होतं खरंतर.. प्रीती आणि मी पहिल्यांदाच असं सोबत कुठेतरी चाललो होत.. गप्पा मारत प्रवास चालू होतं.. ढगाळ हवामान होतं आणि सर्वत्र हिरवेगार दिसत होते त्यामुळे बसचा प्रवास चांगला वाटत होता.. त्यासोबत tea ब्रेक - फोटो सेशन हे ओघानेच आले.. आज शाळेत कसं काय काय होणार म्हणून सगळे खूप उत्सुक होते..

ड्रायवर गाडी फार हळू चालवत होता.. शाळेत ११ वाजता उपक्रम सुरु होणार होता पण आम्ही पोहचेपर्यंत १२ वाजून गेले होते.. गेल्या गेल्या आदर्श अभियंता कॉलेजच्या विद्यार्थांनी आमचे फुले देऊन स्वागत केले.. आम्ही कोणी कणी कोणत्या वर्गात शिकवायचे हे आधीच ठरले होते.. पण एक बस काहीतरी अडचण आल्याने मागे पडली होती म्हणून आम्हाला कोणत्याही वर्गात जायला सांगितले... एका वर्ग दोघजण घेणार असे ठरले होते.. आम्ही वर्गापाशी गेलो.. प्रीती एका वर्गात शिरली,मी तिच्यासोबत तिकडे जाणार होते पण पहिला तर त्या वर्गात सगळी पोरं होती.. मागे एकदा शाळेत शिकवायला जायचे तेव्हा मुला किती गोंधळ करतात आणि मुली कशा शांतपणे सगळं ऐकतात याचा अनुभव मला होता.. म्हणून मग मी शेजारच्या वर्गात गेले जिथे सगळी कन्यारत्ने होती.. :)

सौ इंदिराबाई भिडे कान्याप्रशालाच्या ६० विद्यार्थिनी आणि त्यांच्या एक शिक्षिका वागत उपस्थित होत्या.. माझ्यासोबत पार्टनर कोणी नव्हतं आणि नंतर तशी गरजही वाटली नाही.. प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर बसवला होता पण माझ्या वर्गात फक्त एक कॉम्पुटर होता.. त्यामुळे मी काय काय सांगायचं ते पाहून माझं माझं सुरु केलं.. पहिल्यांदा विद्यार्थींना मोकळं वाटावं म्हणून थोड्या गप्पा मारल्या.. आपण का जमलो आहोत विचारलं..  सुरुवातीला मुली थोड्या लाजत होता पण नंतर त्या सहजपणे बोलू लागल्या.. त्या मुलीनी क़्वचित कुठेतरी संगणक दुरून बघितला होता.. आता त्यांच्याशी  संगणकाबद्दल बोलताना थेट data, software अशी भाषा वापरली असती तर नक्कीच त्यान ते डोक्यावरून गेले असते.. म्हणून मग मी माणसाच्या शरीराचे अवयव, वाहिन्या, मेंदू, निर्णयक्षमता, स्मरणशक्ती याबद्दल बोलून मग संगणकाचे peripherals , cpu , hardware ,software ,buses  असं समजवायचे प्रयत्न केले.. त्यांनी संगणक कुठे कुठे पाहिलंय मग तिकडे त्याचा काय उपयोग काय होता वगैरे विचारून संगणकाचे फायदे आणि विविध क्षेत्रात त्याचा वापर हे समजावले.. काही मुली छान उत्तरे देत होत्या.. आणि काही backbenchersचे लक्ष नव्हते हे मला समजत होते पण मी काही कोणाला रागावले नाही.. माझा आवाज मागेपर्यंत येतोय हे मधून अधून विचारात होते,मला त्याचीच काळजी होती.. पण वर्गात शांतता असल्याने काही अडचण आली नाही.. मध्येमध्ये प्रश्न विचारून,उजळणी करून मी मुलीना पूर्णपणे सहभागी करून घेतले होते.. माझा हा तास कोणी वेगल्यानी  ऐकला असता तर मी काय शिकवते असे वाटले असते पण त्या मुलींच्या उंचीवर जाऊन त्यांना समजेल अशी उदाहरणे देऊन सांगणे फार महत्वाचे होते.. असं नुसत सांगून सगळं समजणार नव्हतं पण कमीतकमी संगणकाबद्दल थोडी माहिती तरी मिळेल हा हेतू होता.. हे सगळं सांगेपर्यंत २ वाजता जेवायची सुट्टी झाली.. तेव्हा त्यांच्या शिक्षिका मला जेव्हा म्हणल्या छान सांगत आहात तुम्ही तेव्हा माझा उत्साह द्विगुणीत झाला..  :)

इंफिकडून सर्व मुलामुलींना खाऊ वाटण्यात आला होता.. आणि आमची जेवणाची सोय कॅन्टीन मध्ये करण्यात आली होती.. जेवण गुलाबजाम सोबत मस्त होतं फक्त तेलाचे तवंग जरा जास्तीच होते.. उपवास वाल्यांसाठी खिचडीचीपण सोय केली होती हे पाहून आम्ही थक्क  झालो..  तिथली लोकं आम्ही पुण्याहून आलो म्हणून फार आग्रह करून वाढत होते.. जेवणानंतर आईसक्रीम खाल्ल्यावर एकजण आला आणि म्हणला चहा तयार आहे आणू का..  मी नको म्हणला.. परत त्याने विचारले मग मी आईसक्रीमवर चहा घेतला.. बाकीचे म्हणले काय चालू आहे तुझे तर त्यांना म्हणला तो इतका प्रेमाने विचारात आहे , मला त्याचे मन मोडावे वाटले नाही.. :D काहीजण मला म्हणले तू एकटीच कशी घेत आहेस ,कोणालातरी पाठवतो तुझ्या वर्गात म्हणून..  पण मुलीना शिकवणं सोपं असता म्हणून  माझा नाजूक बारीक आवाज चालून गेला.. प्रीती आणि धनश्री मिळून मुलांचा वर्ग घेत होत्या त्या म्हणल्या मुलांना आवरणं खरंच कठीण असतं.. 

आता पुन्हा वर्गात आले.. मुली अजून मधल्या सुट्टीतून बाहेर आल्या नव्हत्या.. म्हणून मग त्यांना शांत करयला थोडे गमतीचे खेळ घेतले.. नंतर 'soft-skill' असा तास घायचा होतं ज्यामध्ये चांगल्या सवयी,संस्कार याबद्दल सांगायचे होते.. या विषयवार मी अफाट बोलू शकते असं तेव्हा जाणवलं.. नेहमी स्वतःची अन दुसर्यांच्या वेळेची किंमत ठेवावी हे सांगताना मी सहज विचारलं शाळेत तुम्ही वेळेवर येता का.. तर काहीजणी नाही म्हणल्या.. मी का विचारला तर म्हणला ST वेळेवर येतच नाही.. तेव्हा मला फार वाईट वाटलं.. या लहान मुलीना शिक्षणासाठी कुठून कुठून बस पकडून यावे लागते.. त्यांना पुढे कोण काय बनणार विचारलं तेव्हा त्यांची उत्तरे फार मजेशीर होती.. त्यांना म्हणले तुम्ही पुढे कोणीही बना,काहीही करा पण शिक्षण मात्र पूर्ण करा.. शिक्षण घेतल्यावर जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही स्वावलंबीपणे राहू शकाल..

नंतर क्रमाक्रमाने सर्वाना कॉम्पुटरवर प्रात्याक्षिके करून दाखवली आणि अशा रीतीने तास संपला.. पुढच्या शिक्षणासाठी आणि आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.. जाता जाता प्रत्येक मुलगी जवळ येऊन मला म्हणून गेली की "ताई तुम्ही छान शिकवलं.. bye.." हे ऐकून माझं मन भरून आलं.. इथे येताना आम्ही ppt  प्रमाणे सांगणार होतो त्यामुळे मी वेगळी काहीच तयारी केली नव्हती.. ऐनवेळेस जी उदाहरणे सुचली ती सांगून त्यांना संगणकाबद्दल थोडीफार माहिती द्यायचे मनापासून प्रयत्न केले.. त्यांना आवडलं हे पाहून मला फार बरं वाटलं.. 

नंतर मग फोटोस-चहा कार्यक्रम  आटपून परतीच्या प्रवासाला लागलो.. सगळेजण एका वेगळ्याच आनंदात होते.. प्रत्येकजण आपापले अनुभव सांगत होते. आज काहीतरी वेगळं केलं असं सर्वाना जाणवत होते..  Infosys Foundation च्या सुधा मूर्तींची पुस्तके वाचून मी फारच प्रभावित झाले होते.. त्यासाठी काम करायला मिळाव अशी माझी इच्छा होती.. या ना त्या मार्गाने अशा उपक्रमात सहभागी होता आलं म्हणून आज मी फार खुश होते.. :)

They say..
By doing service, one should not feel he has done some obligation to the society. Rather he should thank the society for giving him an opportunity to serve.