रविवार, २९ मे, २०११

मंतरलेले दिवस - २९

आज नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये आले,मेल्स बघून स्वारी नाश्त्याला निघाली.. पण रोजसारखा सकाळचा उत्साही मूड नव्हता.. बोलता बोलता मैत्रीणीना म्हणलं आज सकाळी सकळी आईशी भांडण झालं.. डब्यावरून..

माझ्या नेहमीच्या डब्या ऐवजी आईने इतका मोठा डबा दिला होता तो माझ्या पर्स मध्ये कसा मावेल आणि मला हातात डब्यासाठी अजून दुसरी पिशवी  घ्यायला आवडत नाही.. आई म्हणली तुला आणि तुझ्या मैत्रीणीना दहीभात आवडतो ना म्हणून जास्त दिलाय,जेव्हढा पाहिजे तेव्हढा घेऊन जा.. मग थोडी चिडचिड करत मी वेगळ्या पिशवीत डबा घेऊन आले.. ऑफिस मध्ये आल्यापासून सारखं वाटत होतं की मी आईशी असं भांडायला नको होता.. मैत्रिणी म्हणल्या त्यांचंही आईशी असं बरेचदा भांडण होतं.. तरीपण माझं लक्ष कुठे लागेना..

घरी  फोन करावा म्हणलं तर परत डबा प्रकरण नको वाटलं.. तेव्हढ्यात आमच्या प्रोजेक्टला  client appreciation mail आला.. मग ही बातमी सांगण्याचं निम्मित्त काढून आईशी बोलले.. दुपारी जेवताना दहीभाताचा पहिला घास खाल्ला आणि डोळ्यात टचकन पाणी आलं.. कितीही  पैसे मोजेले तरी कुठे हॉटेल मध्ये मिळणार नाही अशी चव होती दहीभाताची.. मला सगळं मिळतंय ना म्हणून किंमत नाही असं अगदी मनापासून वाटलं.. लगेच आईला फोन करून सांगितलं  दहीभात आवडला म्हणून..

असं खुपदा होतं.. आई बाबा सर्वात जवळचे आणि हक्काचे म्हणून बरेचदा त्यांच्यावर राग काढला जातो, त्यांच्यापाशी नाही नाही ते हट्ट केले जातात..  पण मग वाटतं आई बाबा नाही तर कोण समजून घेणार आपल्याला.. त्यांच्यापाशी नाहीतर कोणापाशी हट्ट करणार?  आपल्या आयुष्यात आई बाबां इतकं प्रेम दुसरं कोणीच नाही करू शकत.. माझं लग्न नाही झालं, माहिती नाही कदाचित life partner कडून तेव्हढ प्रेम मिळत असावं पण आई बाबांच्या मायेला कशाचीच सर येऊ शकत नाही असं मला वाटतं..

ये तो सच है के भगवान है..  है मगर फिर भी अन्जान है..

धरती पे रूप माँ बाप का .. उस विधाता की पहचान है!!!

शनिवार, २८ मे, २०११

बाळा तुला या लीला.. कोण बरं शिकवतं..!

कधी खुदकन हसतं..  मध्येच रडू लागतं..

बाळा तुला या लीला..  कोण बरं शिकवतं..!


उठ म्हणलं की झोपतं..  झोप म्हणलं की उठतं..

बाळा तुला या लीला..  कोण बरं शिकवतं..!


स्पर्शाने स्पर्श ओळखतं..  अन डोळ्याने किती बोलतं..

बाळा तुला या लीला..  कोण बरं शिकवतं..!


स्वतः शून्यात हरवतं..  अन इतरांची नजर खिळवतं..

बाळा तुला या लीला..  कोण बरं शिकवतं..!


सर्वाना लळा लावतं..  सर्वास बांधून ठेवतं..

बाळा तुला या लीला..  कोण बरं शिकवतं..!

रविवार, २२ मे, २०११

मंतरलेले दिवस - २८

Parallel Line..

काही रेघा एकमेकीना अगदी समांतर असतात.. त्यांची दिशा एकच असते पण त्या कधी एक होत नाहीत.. त्यांच्यात कायम एक विशिष्ठ अंतर असतं..
याचप्रमाणे माझ्या आसपास काहीजण आहेत.. त्यांच्या डोळ्यात तीच स्वप्नं आणि ध्येयं आहेत जी माझ्या डोळ्यात आहेत.. ज्या क्षणांनी ते सुखी होतात तशाच क्षणांनी मी सुखावते.. आणि  ज्या गोष्टी त्यांच्या मनाला लागतात त्या मलाही दुखावतात.. त्यांच्या मनात ज्या प्रकारचे विचार येतात त्याच उंचीचे विचार माझ्याही मनात तरळतात.. अर्थात या पृथ्वीतलावर कोणतेही दोन जीव अगदी सारखे नाहीयेत.. every person is unique.. तरीदेखील त्यांच्यात आणि माझ्यात खूप काही साम्य आढळते.. आणि गम्मत म्हणजे असं असून देखील आम्ही कधी जास्त जवळ येत नाही.. म्हणतात ना ,opposites are attracted to each other.. आपल्यात नाही ते आपण दुसऱ्यात शोधात असतो.. आणि ते सापडलं की आपल्या तारा जुळतात.. मान्य आहे की नाती जुळताना एक समान धागा लागतोच.. वर वर वाटतं की सगळं सारखं असलं की मैत्र जमतं..  पण खोलवर तपास केल्यास खूप फरक  जाणवतो.. याउलट जे तंतोतंत आपल्यासारखे असतात त्यांच्यात आणि आपल्यात नेहमीच एक अंतर रहातं.. आणि समांतर असल्याने  अशा व्यक्तींमधल्या भावनांना  नात्याला,आनंदाला कधीच भेद जात नाही..
Such parallel lines get crossed by another line which is called a Transversal line.. जीवन यात्रेत एखादं असं वळण लागतं की कोणत्यातरी माध्यमातून, काही कारणाने अशा आपल्यासारख्याच असणाऱ्या व्यक्तींशी आपली ओळख होते,सहवास मिळतो.. जेव्हा अशी आपल्यासारखीच विचार करणारी, वागणारी व्यक्ती आपल्या नजरेसमोर येते तेव्हा फार बरं वाटतं.. कारण प्रवास एकाच दिशेने चालू असतो.. नशीब वेगळं असतं पण प्रयत्न सारखे असतात..  आपलं वागणं त्या व्यक्तीकडे बघून पडताळता येतं.. आपण एकटे असे नाहीयोत ही जाणीव होते आणि अप्रत्यक्षपणे एक प्रकारचा मानसिक आधार मिळतो.. अशा या व्यक्तींमध्ये जरी अंतर असलं तरी त्यांचे एकमेकांकडे लक्ष असते असं माझा अनुभव आहे..
संदीप खरेने म्हणले आहे जसे.. 
कितीक हळवे कितीक सुंदर
किती शहाणे आपुले अंतर..
त्याच जागी त्या येऊन जाशी
माझ्यासाठी , माझ्यानंतर..

मंगळवार, १० मे, २०११

हेवा वाटतो खरच मला त्या सर्वजणांचा..

हेवा वाटतो खरच मला त्या सर्वजणांचा..
ज्याना कधी काही प्रश्नच मुळी पडत नाही
पडले तरी ते कोणाला विचारत नाही
विचारले तरी त्याना बरी उत्तरे मिळतात
आणि त्या उत्तरानी ते समाधानी होतात !!!

हेवा वाटतो खरच मला त्या सर्वजणांचा..
ज्यांच्याकडून कधी काही चुका होत नाही
झाल्या तरी ते तसं मान्य करत नाही
मान्य करताना ते बरीच कारणे सांगतात
आणि त्यांच्या चुका पदरात घेतल्या जातात !!!

हेवा वाटतो खरच मला त्या सर्वजणांचा..
ज्याना कधी काही लिहावे वाटत नाही
लिहिल तरी ते कोणाला दाखवत नाही
दाखवल तर ते फक्त जवळच्यानच दाखवतात
आणि सर्वांकडून त्याना प्रतिक्रिया मिळतात !!!

हेवा वाटतो खरच मला त्या सर्वजणांचा..
ज्यांच्या हृदयामधे थोडही मन नाही
मन असल तरी ते चंचल बिलकुल नाही
चंचल असल तरी ते त्याला काबूत ठेवतात
आणि त्या मनासकट ते शांतपणे जगतात !!!

रविवार, ८ मे, २०११

वाट चुकलेलं वासरू..

निसर्गाच्या कुशीत राहणारं
फुलपानात सदा खेळणारं
भोळं भाबडं सरळ साधं 
चंचल असं एक वासरू होतं..


एकदा  कसंकाय  झालं  बरं 
काहीतरी  त्यास  दिसलं  खरं 
क्षणात  मन  मोहून  गेलं 
अन  त्या  दिशेस धावू  लागलं.. 

क्षणभर किंचित वाटून गेलं  
बरोबर का तिकडे जाणं   
अखेर मस्तीने पाऊल टाकलं
मन वेड्यागत वाहत गेलं.. 

तिकडे ते  सुखात  लोळलं 
मजेत  गुंतत  गुंतत गेलं 
आगळ्या धुंदीत रममाण झालं 
अन भान पार हरपून गेलं.. 

पण  एक  दिवस  असं  घडलं  
अचानक काही  दिसेनासं  झालं 
चुकीच्या  धरलेल्या त्या वळणाचं  
कूट कारस्थान लक्षात आलं.. 

मागे जेव्हा  फिरून  बघितलं 
जग तर कितीतरी  पुढे  गेलेलं 
आता क्षणिक खोट्या सुखाचं 
दुख  त्यास  बोचू  लागलं.. 

चहूकडे दाट अंधारून आलं 
एकटं एकटं वाटू  लागलं 
कुठे  जावं  सुचेनासं  झालं 
अन  दुखाने  ते  कण्हू  लागलं.. 

ते रडू शेवटी हरीने ऐकलं
दयेने वेणुतून गाणं वाजवलं
सूर ऐकताच रहस्य गवसलं    
अन चुकलेलं वासरू कळपात परतलं..

मंगळवार, ३ मे, २०११

मंतरलेले दिवस - २७


पुष्करणी  भेळ : My weak point! :)


धूर  उडवीत  गाड्या  निघाल्या.. श्याम रंगात  वाटा  बुडाल्या.. लक्ष्मीरोडवर  असंच  काहीसं  चित्र  होतं.. तेव्हा  त्या  भर  गर्दीत  एका  जुन्या  काळ्या  रंगाच्या  दुचाकीवरून साधे  कपडे  घातलेला  एक  वयस्कर  माणूस  जाताना दिसला.. त्यांना  कुठेतरी पाहिल्या सारखं वाटत असताना लगेचच  ट्यूब पेटली  की  अरे  हे  तर  आपले  पुष्करणी  भेळवाले  काका..

लहानपणीपासून  माझं  गावात  जायचं  मुख्य  आकर्षण  म्हणजे  पुष्करणी  भेळ.. आजवर  माझ्यासोबत  जेव्हढ्या  जणींनी  खरेदी  केली  त्यांना हे  काही  वेगळं  सांगायला  नको.. ;) बाकी  मुलीना  कुठल्या  दुकानात  कोणती  चं  साडी/ड्रेस /सेल  लागलाय  याची  उत्सुकता  असायची  आणि  माझं  मात्र  पुष्करणी  भेळ  उघडलं  का  तिकडे  लक्ष.. आई - अपर्णा तर  मला  आधी  भेळ  खाऊ  घालतात  म्हणजे  मग  मी  त्यांच्यासोबत  कटकट न  करता  शांतपणे  फिरते.. मला  खरेदी  आवडत  नाही  असं  नाही  पण  माझं  काम झालं  की माझा उत्साह संपतो.. आणि खरंतर  मला  shopping एकटीला करायला  आवडतं..  त्यामुळे  कित्येकदा  आई  अपर्णा  त्यांचं  त्यांचं  खरेदीला  जातात  पण  येताना  माझ्यासाठी  पुष्करणी  भेळ  आवर्जून  आणतात.. तिथे भेळवाल्या  काकांचा  assistant जो  कायम  कांदे  चिरत  असतो  त्याला  आता  आमचं  एक  पार्सल  प्रकरण नीट माहिती  झालंय ..

आता  तुम्ही  म्हणाल  की  भेळेचं  कसलं  एव्हढं  कौतुक.. पुण्यात  कुठल्याही  गल्लीबोळात  चाट  मिळतं ,त्यात काय  विशेष.. पण  पुष्करणी  भेळेची  चव  न्यारीच.. त्यासारखी  भेळ  पुण्यात  कुठेच  मिळणार  नाही असा माझा आणि आणखीन कित्येकांचा दावा आहे.. अर्थात  भाववाढ सुधा  सगळ्यात  आधी  त्यांच्याकडेच  होते..

पुलंच्या  एका  पुस्तकात  पुष्करणी  भेळेचं  उल्लेख  आहे  त्यावरून  कल्पना  येते  की ते किती जुनं आहे..  चितळेंच्या  रांगेत  कोपऱ्यावर  अगदी  मोक्याच्या  ठिकाणी  असेलेल  हे  दुकान .. म्हणायला दोन अगदी छोट्या खोल्या.. वर्षोनवर्ष  त्याच खुर्च्या ,त्याच  प्लेट्स  ,सगळा गाडी जसंच्या तसं.. अलीकडे  त्यांनी  रंग  दिला/थोडे  बदल  केले.. तर  सांगायचा  हेतू हा  की  कितीही  वर्षे  उलटली ,कितीही  धंदा  वाढला  तरी  त्यांनी  स्वतःची  एक  खास  शैली  जपली.. Business च्या  मागे  पडले  नाही.. भेळ  खूप  खपायला  लागली  म्हणून  पाणीपुरीचा व्याप   वाढवला  नाही.. मराठी  लोक  हे  असेच  हा  बाबांचा  typical dialogue..
आणि  गम्मत  म्हणजे  ते  काका  मला  आठवतंय  तेव्हापासून  एका  छोट्या  चहाच्या  भांड्यातच  एकावेळेस  एकच  भेळ  तयार  करतात.. मग  बाहेर  कितीही  झुंबड  असो.. कित्येकदा  ती  गर्दी  वाढून  तो  रस्ता  ब्लॉक  होतो  पण  त्याची  तमा  ना  ते  काका  बाळगतात  ना  भेळ्प्रेमी.. :)

त्यांच्याकडून  खरंच  खूप  शिकण्यासारखं  आहे..  आपला  व्यवसाय/नोकरी  कोणत्याही  पद्धतीची  असो  पण  त्यामध्ये  ‘गुणवत्ता/ quality’ पाहिजे.. आपलं  वेगळेपण  टिकवलं  की  मग  या  स्पर्धेच्या  युगात  आपण  कधीच  मागे  पडणार  नाही..
आता  वेगळं  सांगायला  नको  की  कोणालाही  मला कधी  ट्रीट  द्यावी वाटली  तर  पुष्करणी  भेळ  हा  एक  चांगला  पर्याय  आहे!  ;)

सोमवार, २ मे, २०११

मंतरलेले दिवस - २६


बहुत शुक्रिया बड़ी मेहरबानी.. :)
उन्हाळा कितीही असह्य झाला तरी संध्याकाळी  जेव्हा एखाद्या मोगऱ्याचा सुगंध दरवळतो किवा जेवणात जेव्हा आमरस असतो तेव्हा तोच उन्हाळा कसा सुसह्य होतो हा अनुभव सर्वांनाच येत असेलना.. जीवनातही असं कितीदा होतं.. एखादं वळण रणरणत्या  उन्हासारखं लागतं.. आणि अशा उन्हातच कोणाकडून तरी आपणास प्रेमाची गर्द सावली मिळते,जगण्यासाठी एक नवीन उमेद मिळते.. 


माझ्या आयुष्यात अशीच एक व्यक्ती आहे.. त्या व्यक्तीशी माझं  कोणतही नाव नसलेलं असं नातं आहे.. या नात्यात वय, रंग, रूप इत्यादी अशा कोणत्याच गोष्टीचं बंधन नाहीये..  कोणताही भेदभाव नाही, कसलीच अपेक्षा नाही.. एका मनाचं एका मनाशी जुळलेलं शुद्ध, निखळ आणि खरं नातं..  मीच पूर्वी कधी लिहिलेल्या 'नातं' या कवितेचा प्रत्यय त्या व्यक्तीच्या सहवासात येतो.. "नातं असावं देवासामोरच्या समई सारखं,इवल्या ज्योतीने मन प्रसन्न करणारं.." 

मनाला कितीही समजावलं तरी ते एका सामान्य माणसाचं मन.. आपल्यकडे नाही ते पाहिजे असा त्याचा हट्ट कायमचा न संपणारा.. आजूबाजूच्या मुलींना बघते, त्यांचे bf किवा नवरे त्यांना खास भेटवस्तू देतात तेव्हा मला वाटत मला का कोणी नाही असं.. तेव्हा मला त्या व्यक्तीकडून बागेतली टपोरी सुंदर फुले मिळतात.. त्या मुलींना त्यांचे partners फिरायला घेऊन जातात, hotelsमध्ये जातात हे बघून मला एकटं  वाटतं  तेव्हा ती व्यक्ती माझ्यासाठी खास वेळ काढून मला फिरायला घेऊन जाते,ट्रीपला जावू  म्हणते.. खुपदा मला काही न काही प्रश्न छळतात ज्याची उत्तरे कोणाकडे नसतात.. पण ही व्यक्ती मी प्रश्न विचारले नसतानी माझी मनस्थिती जाणून घेऊन अप्रत्यक्षपणे उत्तरे देते, मनास थोड्या वेळापुरतं  का होईना शांत करते.. खुपदा आपल्याला जी व्यक्ती आवडते तिच्या मागे पडावं लागतं,तिचा सहवास मिळावा म्हणून, तिचे प्रेम मिळावे म्हणून.. पण ही जी खास व्यक्ती आहे तिच्या मागे नाही लागावं लागत मला.. कारण नातं 2way आहे.. दोन्हीकडे भेटायची, बोलायची ओढ आहे आणि  दोन्हीकडे समज आहे..

घरच्यान्शिवाय आपल्यावर मनापासून प्रेम करणारी एक व्यक्ती या जगात आहे या विचाराने फार बरं वाटतंना.. माणूस फक्त प्रेमाचा भुकेला असतो,नाहीका.. ती व्यक्ती माझ्यासाठी किती खास आहे याची कल्पना त्या व्यक्तीला नसेल कदाचित.. त्या व्यक्तीचे,त्या व्यक्तीला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल  देवाचे आणि त्या व्यक्तीशी ज्यांच्यामुळे माझा परिचय झाला अशा सर्वांची मी  ऋणी आहे.. आमचं नातं कायम असंच टिकावं अशी मनापासून प्रार्थना करते.. :)


खुशी तो बहुत है, मगर ये भी ग़म है
के ये साथ अपना कदम दो कदम है
मगर ये मुसाफ़िर दुआ माँगता है 
खुदा आपसे किसी दिन मिलाए..

रविवार, १ मे, २०११

मंतरलेले दिवस - २५

अध्यात्मावर बोलू काही..

कुठून कशी सुरुवात झाली माहिती नाही.. घरच्यांनी किवा बाहेरच्यांनी मला काही सांगितलं नव्हतं पण एक दिवस थेट  मी दासबोध ग्रंथ घरी घेऊन आले.. काही जण म्हणतात या वयात काय अध्यात्म-दासबोध.. पण ग्रंथांच्या अभ्यासामागे नुसतं देव देव करणे हा हेतू नसतो.. रोजच्या दैनंदिन जीवनात मार्गदर्शन देणारे बोधपर श्लोक अशा ग्रंथात कोरलेले असतात.. सहसा आपल्याकडे नोकरीतून निवृत्त झालं की आणि मुलांच्या जबाबदाऱ्या संपल्या की पुष्कळ वेळ असतो तेव्हा मग ग्रंथ पठण सुरु होतं.. खरं म्हणजे तेव्हा सगळं होऊन गेलेलं असतं त्यापेक्षा जरा आधी वाचलं तर जीवनाचा प्रवास थोडा तरी सुधारेल असं मला वाटतं.. ग्रंथातून  सगळ्यांना समजतील आणि लागू पडतील असे श्लोक मी बरेचदा सकाळच्या मेल्स मध्ये पाठवते.. हे खरंय की माझ्याकडे आता भरपूर वेळ असतो म्हणून मला जमतं पण उद्या जबाबदाऱ्या वाढल्या तरी दिवसातले १५/२० मिनिट्स याकरता नक्की काढू शकेन असा माझा विश्वास आहे.. जवळ जवळ दोन वर्षापासून मी दासबोध समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे.. झोपताना रोज एक पान वाचून मगच झोपते.. रोज तर वाचतेच पण कधी मूड नसतो,कधी खूप दमलेले असते, कधी बरं वाटत नसतं तेव्हाही हा नित्यक्रम मी बुडवत नाही..  अगदीच गावाला गेले तर मग पर्याय नसतो.. कारण दासबोध एव्हढा मोठा ग्रंथ घेऊन फिरणं शक्यच नसतं.. तर अशा रीतींनी ग्रंथ वाचण्याची मला सवय लागली.. 

खरंतर हा ग्रंथ खूप कठीण आहे.. रोज वाचताना त्या क्षणी मला अर्थ समजल्यासारखा वाटतो पण पुढे जाऊ तसं मागचं सपाट  झाल्यासारखं भासतं.. आणि वागताना वागायचं तसंच वागते.. म्हणजे राग आला की एखादा सदविचार आठवून त्यावर नियंत्रण करणं अजून जमत नाही.. किवा आसक्ती, संशय, शंका, वेदना यापासून मन लगेच काही मुक्त होत नाही.. तर मग काय उपयोग वाचायचा असं कधी कधी वाटतं.. पण याचंही उत्तर तिथूनच मिळतं.. चांगलं काही वाचून ऐकून सोडून दिलं तर काही अर्थ नसतो.. आणि लगेच आचरणात आणणं ही इतकं सोपं नसतं.. तर त्यासाठी जे वाचतो त्याचा मनात सतत विचार केला पाहिजे यालाच चिंतन-मनन असे म्हणतात.. 'विचार करणे' ही मनुष्य प्राण्याला मिळालेली मोठी गोष्ट आहे.. आपण सतत विचार करतो पण कशाचा? मला हे हवंय, तो असं म्हणाला, ती तसं वागली इत्यादी.. या विचारांसोबत संतवाणीचा थोडा विचार करायला सुरुवात केलीतर आज ना उद्या मनाला चांगलं वळण लागू शकेल,नाही का.. तर मला आतापर्यंत कळलेल्या अध्यामाच्या धड्यांचा विचार करायचे प्रयत्न मी करत आहे.. त्यानुसार अध्यात्माच्या पायऱ्या या अशा आहेत.. 

१) जे जे दिसतं ते सर्व खोटं आहे, नाशवंत आहे, क्षणिक आहे,मायेचा खेळ आहे याची जाणीव होणे..
२) हे जग भगवंतांची लीला आहे.. सगळं त्याच्या योजनेनुसार चालतं याची खात्री होणे.. 
३) तो भगवंत विश्वव्यापी आहे.. फुलपानात, निसर्गाच्या कानाकोपऱ्यात, जमिनीवर चालणाऱ्या मुंगीपासून आकाशात उडणाऱ्या पाखरांमध्ये ,आजूबाजूच्या सर्व जेष्ट - कनिष्ट , गरीब-श्रीमंत प्रत्येक माणसाच्या अंतकरणात भगवंत आहे ही समज येणं..
४) त्या भगवंताचा स्वतःच्या अंतकरणात शोध लागणं.. 'सोहम' या महाशाब्दाचा अर्थ कळणं..
५) अंतकरणातल्या भगवंताशी तदाकार होणं.. वृत्तीशुन्य होणं.. 
६) स्वस्वरूपाची जाणीव होणं.. शाश्वत, अनंत, सर्वत्र काठोकाठ भरलेल्या परब्रह्माचा प्रत्यय येणं.. 
७) परब्रह्माशी गाठ पडली की ब्रम्हज्ञानी माणसाचे जीवन प्रराब्धप्रमाणे चालते.. वासनेचे, देह्बुद्धीचे बीज गळते.. ईश्वरी कृपेने लाभलेल्या  उपासनेचे ऋण फेडण्यासाठी अशी ज्ञानी माणसे भक्ती आणि अध्यात्माचा प्रसार करतात.. साधकांना साधनेबद्दल उचित मार्गदर्शन करतात.. 

मी तर अवघ्या पहिल्या ३ पायऱ्यांवर घुटमळत आहे.. अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे.. असं ऐकलय की शेवटच्या पायरीपर्यंत पोचायला बरेच मनुष्य जन्म घ्यावे लागतात आणि प्रत्येक जन्मात मनुष्याची अध्यात्मिक पातळी हळू हळू वाढत असते.. पूर्ण ज्ञान असल्याशिवाय बोलू नये असं म्हणतात.. तरी मी एक स्वाध्याय म्हणून हा लेख लिहित आहे.. माझ्याकडून काही कमी जास्त झाले असल्यास समजून घावे.. तुमचे याबद्दलचे विचार ऐकायला मला खूप आवडेल आणि नक्कीच मला त्याचा फायदा होईल.. तरी वेळ मिळेल तेव्हा तुमचा अभ्यास, तुमची मते नक्की कळवा.. :)