सोमवार, १६ जानेवारी, २०१२

मंतरलेले दिवस - ५२

सुट्टीचा दिवस.. सह्याद्रीतली नसली तरी पुण्यातली भटकंती चालूच होती.. लाडक्या भाच्याला भेटायला गेले होते.. तिकडे जाताना नेहमीप्रमाणे सोबत भरपूर खाऊ आणि त्याच्यासाठी घेतलेल्या वस्तू होत्या.. त्याच्यासोबत मनसोक्त खेळून परत निघाले.. गाडीवर असताना मैत्रिणीचा फोन आला तो घेणे महत्वाचे होते म्हणून गाडी  बाजूला घेऊन थांबले.. फोनवर बोलता बोलता माझ लक्ष रस्त्याच्याकडेला गेले.. रस्ता खोदून काम चालू होते ही काही नवीन गोष्ट नव्हती.. पण उन्हात घाम गाळुन केबल टाकायचे काम करत असलेल्या लोकांमधे एक छोटा मुलगा त्याच्या आई वडिलंसोबत काम करताना दिसला..

आई वडील खोदकाम करत होते आणि त्या मुलाने केबल धरली होती.. माझं लक्ष गेलं कारण त्या बारक्याला त्याचे वडील कशावरून तरी रागावत होते.. एकतर त्याचे वय काय आणि त्यात उन्हाची वेळ.. या वयात इतर मुले खेळ खेळण्यात दंग असतात आणि हा बिचारा कष्टाचे काम करत होता.. ही विषमता मला नेहमीच अस्वस्थ करून टाकते.. आपल्याकडे लहान मुलांचे पालक किती लाड करतात.. मी मोठी होऊनही माझे आईबाबा मला किती जपतात... आणि  नुकतच मी तर भाच्याचे कौतुक करून आले होते..  त्याप्रमाणे या मुलाच्या आईवडिलांनाही तसंच काही वाटत असेल पण कदाचित परिस्थितीमुळे त्यांना मुलाला काम करायला लावण्यास भाग पडले असेल..

नुसता विचार करण्यात काही अर्थ नाही  म्हणून मी लगेचच गाडी मागे फिरवली.. कोपर्‍यावर दुकाने होती तिथे गेले.. खरंतर मला त्या छोट्यासाठी छान टोपी घ्यावी वाटली.. पण तिथे तसे दुकान नव्हते.. आणि लांब जाऊन टोपी घेऊन परत येईपर्यंत कोण जाणे हे लोकं कुठे असतील.. मग मोठा रुमाल विकत घेतला.. बिसकिट्स आणि चोकोलेट्स घेऊन पुन्हा त्याठिकाणी गेले.. द्यायचे कसे,सुरूवात कशी करावी ,त्यांना आवडेल का असं दिलेले,ते स्वीकार करतील का वगैरे मनात विचार चालू होते..

शेवटी थेट त्या मुलाजवळ गेले आणि नाव विचारले.. ते लोक मराठी नव्हते,त्याने काहीतरी नाव सांगितले ते मला कळले नाही.. मग मी त्याच्या हातात पिशवी दिली.. त्याने घेऊन त्यात काय काय आहे ते पहिले आणि त्याच्या चेहरयाची कळी एकदम खुलली.. त्याने लगेच त्याच्या आई वडिलांकडे पहिले.. ते सुधा अतिशय खुश झाले.. आणि त्या सर्वांचे हसरे चेहरे पाहून मला फार आनंद झाला जो मी शब्दात सांगू नाही शकत..

काही जणांना वाटते हिला काही जबाबादार्‍या नाही,भरपूर रिकामा वेळ असतो म्हणून असले करायला सुचते.. :) कदाचित असं  काही खास करण्यासाठी माझा जन्म असेल म्हणून देवाने मला बाकीच्या कशात अजुन अडकवले नसावे..  :) God knows..  देवाची लीला अगाध आहे..

रविवार, १५ जानेवारी, २०१२

मंतरलेले दिवस - ५१

मोठ्या बंगल्यामध्ये मालकाने पाळलेल्या मोतीकडे पाहून रस्त्यावरच्या टिपुला वाटले..
- किती नशिबवान आहे मोती.. ऐशोआरामात राहायचे.. मस्त मस्त पदार्थ खायचे.. सगळयांचे लाड करून घ्यायचे.. शिवाय मग मालकसोबत फिरायला जायचे.. आणि कोणी अनोळखी आले की जोरात भू भू करून मालकाला सांगायचे.. बास..

रस्त्यावर मुक्तपणे संचार करणार्‍या टिपुकडे पाहून बंगल्यातल्या मोतीला वाटले..
- आयुष्य असावं तर टिपुसारखं.. पाहिजे तेव्हा पाहिजे तिकडे भटकावं.. वाट्टेल ते शोधून खावं.. कुठे काही गडबड दिसल्यास पाठलाग करून पकडावं.. अजुन काय पाहिजे..

त्या दोघांकडे बघून मला वाटले..
- देवाने प्रत्येकाला काही जास्त आणि काही कमी दिले आहे.. परीक्षा तो सर्वांचीच घेत आहे तर.. संत तुकारामांनी म्हणले आहे..  "आलिया भोगासी असावें सादर । देवावरी भार घालूनियां ।।"

ठरवलय आता मी..

ठरवलय आता मी मागे नाही पाहणार..
पुढे पुढे फक्त चालतच राहणार..

ठेच लागता पुन्हा नाही कुरवळणार
सावली मिळता फार नाही गुन्तणार
ठरवलय आता मी कुठे नाही थांबणार
पुढे पुढे फक्त चालतच राहणार..

उंची बघुनी कधीही नाही घाबरणार
खोली पाहुनी एकाकी नाही दचकणार
ठरवलय आता माझं कुठे नाही आडणार
पुढे पुढे फक्त चालतच राहणार..

कोमजलेल्या स्वप्नांना उगा नाही जपणार
धेयांच्या पंखांना कधी नाही मिटवणार
ठरवलय आता मी कुठे नाही हरणार
पुढे पुढे फक्त चालतच राहणार..

मंगळवार, १० जानेवारी, २०१२

सुदाम्याचे पोहे - ८

HSBC मध्ये भरत जोशी सरांच नाव ऐकलं नसेल असा कोणी सापडणार नाही.. त्यांच्या बद्दल मी बोलणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास..  IT मध्ये उच्च पदावर असलेले हुशार आणि उत्साही हे सर असणारे कायम नवीन नवीन उपक्रमात व्यस्त असतात..  नुकतच त्यांच ४०० वेळा सिंहगड चढून यायचं रेकॉर्ड झाले आहे.. त्या निमित्ताने हा लेख लिहीत आहे..  :)

पुर्वी HSBC मध्ये असताना मी सरांचे नाव ऐकून होते मात्र आमची चांगली ओळख हरिश्‍चंद्रगड ट्रेकच्या वेळेस झाली..  हा ट्रेक माझ्या सर्व ट्रेक्सपैकी सगळ्यात भारी ट्रेक.. सर SPM असूनही ट्रेकला पूर्णवेळ आमच्याशी मोकळेपणाने बोलत होते.. त्यांच्या वागण्यात कुठेच 'मी' अहंकार नव्हता.. ट्रेकला  आम्हाला लाजवेल असा सरांचा उत्साह आणि स्टॅमिना होता.. त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत गड कधी चढून आलो समजलेही नव्हते.. आणि पहाटे ३ वाजेपर्यंत थंडगार वार्‍यात  शेकोटी करून बसलेलो असताना त्यांनी सांगितलेल्या भुताच्या गोष्टी मला अजूनही ठळकपणे आठवतात.. :)

त्यानंतर HSBC मध्ये जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा ट्रेक्सच्या  गप्पा चालायच्या..  खास सांगायचे म्हणजे आम्हा ट्रेक ग्रुपला नेहमी दिवाळी किवा न्यू इयरला मेल्स शुभेच्छा देण्यासाठी सर स्वताहा मेल करायचे..  कायम व्यस्त असूनही ते वेळ काढून आमची आठवण ठेवून मेल करायचे याबद्दल आम्हाला फारच विशेष वाटायचे..

HSBC सोडताना मी सरांना भेटायला गेले होते पण तेव्हा ते बाहेर होते त्यामुळे भेट झाली नव्हती.. नंतर मेलवरून मधून आधून संपर्क व्हायचा.. मागच्या वर्षी एका मित्राचे लग्न होते तेव्हा आम्ही त्याच्यासाठी भेट म्हणून फोटोस- विडीओसचे पिपिटि बनवले होते तेव्हा सरांच्या उत्साहाची, मदत करण्याच्या स्वभावाची आणि इतके मोठे असून साधेपणाची मला खूप जवळून प्रचीती आली होती.. हे सर म्हणजे कोणी साधी व्यक्ती नव्हे हे तेव्हा मनोमनी पटले..

त्यादरम्यान कशामुळे तरी सरांना माझ्या ब्लॉगबद्दल समजले तेव्हा त्यानी छान अभिप्राय दिला.. त्यांनी लिहिले की माझ्या कविता ते आणि मॅडम (त्यांच्या पत्नी) दोघेही वाचतात आणि त्यांना आवडतात हे ऐकल्यावर मी भारावून गेले होते.. नंतर मग मी माझ्या मेलिंग लिस्ट मध्ये त्यांचे नाव घातले.. अजूनही सर आणि मॅडम वेळ काढून मेल वाचतात आणि मध्येअध्ये उत्तर देतात तेव्हा मला खूप आनंद मिळतो..

कैलास मानसला जायचे ठरल्यावर त्यांना हे सांगायला मी फोन केला होता तेव्हा ते भारताच्या बाहेर होते.. खरतर ते असच सांगू शकले असते की ते भारताबाहेर असल्याने फोन नाही घेतला.. पण ते भरत जोशी सर होते.. फोन कट करून स्वतः त्यांनी फोन केला आणि विचारपूस केली.. आणि कैलास मानस वरुन आल्यावर सरांनी आणि मॅडमने मला त्यांच्या घरी खास जेवायला बोलावले.. मला आठवतय त्यावेळेस सर कायम बाहेर असायचे.. पण तरीही वेळ काढून त्यांनी आवर्जून घरी बोलावले होते.. सर इतके मोठे असूनही त्यांच्या घरी खूप साधेपणाने बोलले.. त्यांची मुलेही खूप हुशार आहेत आणि तरीही एकदम नम्रपणे बोलताना जाणवत होते.. मॅडमने माझ्यासाठी अगदी पूर्ण स्वयपाक केला होता हे पाहून तर मी फरच भावनावश झाले..    कैलास मानस वरुन आले म्हणून माझ्या कुठल्याही मित्रमैत्रिणिने इतके कौतुक केले  नसेल तेव्हढे सरांच्या कुटुंबीयांनी केले.. मॅडमने माझ्या कवितांचे खूप  कौतुक केले की मला मनातून लाज वाटली की खरच इतक्या कौतुकस पात्र आहेत का त्या कविता.. नव्हे तर त्या सर्वांचे मन खूप मोठे आहे हेच खरे.. माणसाचा मोठेपणा त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीतून दिसत असतो,त्यासाठी कोणतेही मोठे पराक्रम करावे लागत नाहीना.. :)

इतकं सगळं सविस्तरपणे सांगायचे कारण की काही लोकं काही नसताना उगाच माज करतात.. थोडं काही मिळवलं की काहीजणांची वागणूक बदलते.. कितीतरी लोक बारीकसारीक गोष्टींवरून  दुसर्याना कमी  सिद्ध करून स्वतः बढाया मारतात.. आणि वेळ नाही हे कारण सर्रास सांगून बरेचजण फार मोठे असल्याचा देखावा करतात.. किती उदाहरणे आहेत अशी माझ्या डोळ्यासमोर.. मात्र हे सर कर्तुत्वाने आणि प्रसिद्धीने मोठे असूनही  सर्वांशी खूप साधेपणाने मोकळेपणाने बोलतात याचे मला फार आश्चर्य वाटते.. जगात  अशा व्यक्ती खूप कमी आहेत.. 'ground to earth' याचा अर्थ मला सरांकडून नीट कळला.. उंच उंच भरारी घेऊनही पाय जमिनीवर ठेवायचे ही सरांची शिकवण माझ्या कायम लक्षात राहील..  Thank you Sir! :)