सोमवार, २० ऑगस्ट, २०१२

मंतरलेले दिवस - ६८


बऱ्याच दिवसांनी जोडून सुट्ट्या आल्या  होत्या.. प्रत्येकाचे काहीना काही आपले आपले कार्यक्रम होते.. माझा मात्र यावेळेस काहीच बेत नव्हता.. एक दिवस कुठेतरी जाऊन येणार हे नक्की होतं माझं पण कुठे कोणासोबत कशासाठी हे मलाच माहिती नव्हतं.. कारण त्यामागची योजना काही वेगळीच आखून ठेवली गेली होती.. :)
शुक्रवारी सहजच मनात आले कि नेहमी मी स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी किती भटकते.. यावेळेस काहीतरी वेगळं करावे.. कालच घाटघरच्या आसवल्यांचा फोन आला होता, कधी येणार इकडे,मुले वाट पाहत आहेत म्हणून.. जाऊयाका तिकडे? त्या गावातल्या मुलांसाठी वह्या पेन वगैरे शालेय साहित्य अन खाऊ घेऊन जाऊया,छान वाटेल..

बऱ्याचजणांचे प्लान आधीच ठरले होते त्यामुळे त्यांना विचारण्यात अर्थ नव्हता.. शिवाय काही लोकांना अशा उपक्रमांमध्ये विशेष रस नसतो म्हणून मग त्यांनाही नाही विचारले..  असं करून ४ मैत्रिणींना sms केले..  रात्री एकीचे उत्तर 'नाही' आले.. तिच्याकडून मला जास्त आशा होत्या.. दुसरी नंतर कळवते म्हणली आणि तिसरीचाही शनिवारी सकाळी नकार आला.. चालायचंच, प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगवेगळ्या असतात..  मला सावरकरांच्या ओळी आठवू लागल्या..

जो साथ देगा, उसे साथ लेकर चलेंगे,
जो साथ नहीं देगा उसे छोडकर चलेंगे
और जो राह मे बाधा बनेगा उसे ठोकर मार कर चलेंगे
लेकिन चलना हमारी नियति है।

हे धोरण स्वीकारून मी धीर धरला.. जास्तीत जास्त काय होईल,कोणीच सोबत नाही आलं तर आपण एकटे  जायचे पण आता मनात आलंय तर जाऊनच यायचं,माघार घ्यायची नाही.. अनायसा सुट्ट्या आहेत आणि वेळ आहे.. उद्याचे कोणाला काय माहिती? शिवाय बसने सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत जायचे अन तिकडे आसवले कुटुंबीय माझ्या चांगल्या परिचयाचे.. प्रश्न फक्त घरी काय सांगायचा हा होता.. भगवंताने माझे मन ओळखले अन अर्चनाचा फोन आला कि ती येत आहे म्हणून, मला खूप बरं वाटलं.. तिला म्हणले बसने जाऊ, शाळेला उपयोगी पडतील अशा गोष्टी अन खाऊ घेऊन जाऊया.. अजून तुला वेगळी कल्पना सुचत असेल तर सांग तेव्हा ती म्हणाली माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.. हा विश्वासच महत्वाचा असतो नाही?  ग्रुप मोठा असला असता तर सरळ गाडी करून गेलो असतो पण आता दोघीच म्हणजे मग बस बरी.. ट्रेकिंगचे सगळे मित्र मंडळी बाहेरगावी फिरायला गेले होते त्यामुळे घाटघर बद्दल आता कोणाला विचारू असा प्रश्न पडला.. मग काय गुगल हैना..  इथून जुन्नर बस आणि पुढे दुसरी बस असा प्रवास.. पाहूया जसे जे मिळेल तसे जाऊ असे मनाशी ठरवले..

शनिवारी दुपारी दीपालीच्या कार्यक्रमाला गेले होते, तिथे अळूची भाजी, पुरण पोळी असे मस्त जेवण झाले होते.. खरतर आता छान  वामकुक्षी घ्यावी असे मनात होते पण म्हणतात ना 'निजला तो संपला'.. म्हणून मग लगेचच अप्पाबाल्वंत चौकाकडे मोर्चा वळवला.. किती दिवसांनी मी शालेय खरेदी करण्यासाठी तिथे गेले होते.. सगळ्याच दुकानात पण ठेवायलाही जागा मिळणार नाही इतकी गर्दी.. वह्या घ्यायला गेले तर होलसेलचा भाव पण माझ्या अपेक्ष्पेक्षा खूप जास्ती होता.. आपण जुने झालो, काळ बदलला याची जाणीव झाली.. घाटघर मध्ये किती मुले आहेत याची नक्की माहिती मला नव्हती.. अधिक महिन्यात ३३ या संख्येला खूप महत्व असते म्हणे.. म्हणून मग मी ३३ वह्या, ३३ पेन्सिल्स, ३३ पेन्स, ३३ खोडरबर वगैरे घेतले.. ही खरेदी करताना मला जाम मजा आली.. दुकानदाराने खास डिसकाऊन्ट सुधा दिला..  मात्र नंतर गाडीपर्यंत त्या ३३ वह्यांचे ओझे भयंकर वाटले..विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे हा विषय इतका चर्चेचा का असतो हे समजले.. :) नंतर चितळे बंधून कडून खाऊ घेतला.. आई म्हणली अगं किती दमली आहेस.. पण चेहरा मात्र नव चैतन्याने फुलला होता!!!

रात्री एका ब्याग मध्ये एक वही, पेन्सील, रबर, पेन असे ३३ संच तयार केले.. हे करतानाही फार भारी वाटत होतं.. अर्चानाशी उद्या सकाळी कधी निघायचे वगैरे फोनवर बोलल्यावर बाबा म्हणले तिला नक्की यायचं ना, तू उगाच मैत्रिणींच्या मागे लागत जाऊ नकोस कारण अशा गोष्टींमध्ये फारसा कोणाला रस नसतो.. तेव्हा मी बाबांना म्हणले मी कोणाच्याही मागे लागले नाही.. :(  फक्त एकदा विचारले.. अर्चना जमतंय म्हणून ती येते म्हणली.. शिवाय तिला आवड आहे, मागे आम्ही ऑफिसमध्ये इतर स्टाफची पार्टी आयोजित केली होती तेव्हा ती  सोबत होतीच..

सकाळी सकाळी ७.१५च्या बसने आम्ही जुन्नरला निघालो.. दोन मैत्रिणी भेटल्या की गप्पांमध्ये वेळ कसा जातो समजतही नाही.. मी काल इतर सगळी खरेदी केली होतीपण ते करता करता आज आमच्यासाठी खाऊ घ्यायला जमले नव्हते.. अर्चनाने आणलेला  खास ब्रेडज्याम खाऊन तृप्त झाले.. दोघीही आज तिकडे गावात काय काय घडतंय याबद्दल उत्सुक होतो.. अर्चनाला आसवले यांच्याबद्दल माहिती सांगितली.. १ वर्षपूर्वी मागच्या १५ ऑगस्टला मी अमोलसोबत चावंड-हडसर-नाणेघाट ट्रेकला गेले होते तेव्हा आम्ही यांच्याकडे मुक्काम केला होतं.. त्यांनी दिलेल्या काळ्या चहाबद्दल मी लेख लिहिला होता तो अर्चनाला आठवत होता.. तेव्हापासून त्यांचा नेहमी मला फोन येतो आणि आता आमचा चांगला परिचय झालाय असे तिला मी सांगितले..

आमच्या पुढे बसलेल्यांनी आम्ही घाटघरला जाणार आहोत असे ऐकले आणि म्हणले असवल्यांकडे जात आहात का.. यांना कसे काय ते माहिती याचे आम्हास आश्चर्य वाटले.. लाल डब्बा डूगु डूगु  चालत शेवटी १० वाजता जुन्नेरला पोहचली..  तिथूनच पुढे घाटघरला जाणारी बस आमची अगदी २ मिनिटाकरिता थोडक्यात चुकली.. आणि आता पुढची बस थेट १२.३०वजता होती.. इतका वेळ थांबून इथे काय करायचा आणि त्या बसने घाटघरला पोहोचायलाच फार वेळ लागेल मग रात्री उशीर होईल.. उद्या मला सुट्टी आहे पण अर्चनाला ऑफिस आहे..  ती ब्याग घेऊन फिरणे मुश्कील झाले होते, वह्यांचे वजन फार होते.. आता आधी नाश्ता करूया मग बघू पर्यायी जीप/रिक्षा मिळतेय का असे आम्ही ठरवले.. असवल्यांना जेवून आलोय सांगायचे होते म्हणून आम्ही हेवी नाश्ता केला,म्हणजे नंतर जेवायला उशीर झाला तरी चालेल असा..

नंतर चौकशी केल्यावर जीपवाले म्हणले घाटघरला इतक्या लांब जीप जात नाही.. रिक्षावाले तर काहीही पैसे सांगत होते.. शेवटी एकाने गावात थोड्या आतल्या बाजूला एकीकडे जीप मिळेल असे सांगितले.. शोधत शोधत शेवटी घाटघर जीपचा पत्ता लागला.. चालताना अर्चनाला म्हणले तुला असं तर नाही वाटत न वृन्दासोबत मी इथे कशाला आले.. ती हसत नाही म्हणली.. असं जाण्यात गम्मत आहेना.. मी हो म्हणले , प्रवास म्हणला कि बस चुकणार,  टायर पंक्चर होणार वगैरे वगैरे.. आपण त्या गोष्टींकडे कसे बघतो हे महत्वाचे.. जीप तर आता मिळाली होतीपण तो ड्रायवर सगळी सीट  भरल्याशिवाय न्हेणार नव्हता.. त्याचेही बरोबर होते म्हणा.. शेवटी आम्ही त्याला थोडे ज्यादा पैसे देऊन  निघायला सांगितले कारण आम्हाला शक्य तितके लवकर जाऊन यायचे होते..

जुन्नर - घाटघर प्रवास १ नंबर होता.. तिथे बराच पाऊस झालेला दिसत होता अन आज रिमझिम चालू होता.. सगळीकडे हिरवीगार भाताची शेतं,  सह्याद्रीच्या रांगा,  उन फेसाळते शुभ्र धबधबे.. किल्ले शिवनेरी, किल्ले चावंड, कुकडेश्वर मंदिर हे सगळे मी अर्चनाला दाखवत होते,जणू कि मी तिथलीच आहे.. ती जीप भारी होती, सगळीकडून उघडी आणि रस्ते तर त्याहून  भारी होते त्यामुळे निसर्गाचा आनंद मन मुराद  लुटता आला.. त्या ड्रायवर चे विशेष वाटले.. जाता येता  स्वताहून थांबून सर्वांशी बोलत होता.. गाववाले पण कुठून कुठे कशासाठी चालले आहेत हे अगदी मोकळेपणाने सांगत होते.. नाहीतर इथे शहरात प्रत्येकला आपलं सगळं गुप्त ठेवण्यात फार आनंद वाटत असतो..

तो जीपचा ड्रायवर अन गाडीतली इतर मंडळी सर्वजण आसवले यांना ओळखत होती.. घाटघरला पोहचल्यावर आसवले काका आम्हाला बाहेरच भेटले, त्यांनी लगेचच त्यांच्या घरी आम्हाला नेले.. ताईंना आम्हाला अचानक पाहून सुखद धक्का बसला.. काय करू अन काय नको असे त्यांना झाले.. आम्ही त्यांना लगेचच सांगितले कि इथल्या गावाल्तल्या सर्व मुलांना बोलावून  आणा,त्यांच्यासाठी आम्ही गम्मत आणली आहे.. त्यांनी त्यांच्या मुलांना इतरांना बोलावयाला पाठवले.. तोपर्यंत जेवून घ्या असा आग्रह ते करत होते पण आम्ही जेवून आलोय असे त्यांना सांगितले.. मग त्यांनी चहा केला.. यावेळेस दुध घातलेला चहा घेताना त्यांनाही मागच्या काळ्या चहाची आठवण झाली..   थोड्या गप्पा मारल्या.. तोपर्यंत सगळी मुले जमा झाली.. त्यांना एकत्र बसवले.. आधी त्यांची तोंडओळख घेतली अन आमचीपण ओळख सांगितले.. सगळे शाळेत जाताना विचारले.. मग सर्वांना वही पेनाचे एकेक संच दिले अन खूप खूप अभ्यास करून मोठे व्हा असे आम्ही म्हणले.. त्यातले त्यांना किती समजले माहिती नाही पण सगळे उत्सुकतेने ब्यागमध्ये काय आहे ते पाहत होते.. नंतर खाऊ दिला, तो घेऊन मग पोरं लगेचच पसार झाली.. चला महत्वाचे काम झाले असे म्हणून आम्ही शांत बसलो.. ३/३.१५ला परतीची बस गाठायची होती.. तोपर्यंत आसवले ताईंशी गप्पा मारल्या.. ताईंनी मोठ्या मनाने त्यांच्या शेतातला आंबेमोहोर तांदूळ घरी वापरायला  दिला..  गावात दवाखाना  नाही,जुन्नरला जावे लागते हे कळल्यावर वाईट वाटले.. भारत किती सुधारला आहे याचे हे एक उदाहरण.. अशाच गप्पा मारून शेवटी आम्ही बस स्टोपवर आलो..

बसला वेळ होता तोपर्यंत मी तिथे यथेच्च फोटोस काढले.. सगळीकडे हिरवीगार शेतं, त्यात काम करणारी लोकं,  चहूकडे ढगात लपलेले सह्याद्रीची  शिखरं.. कुठेतरी दूरवरून खळ खळत येणारं पाणी..  मधेच धुक्यात ढगात हरवणारा आसमंत.. मी खरच वेडी झाले होते.. नंतर जीप आल मग त्यातूनच जुन्नरला निघालो.. आता कडकडून भूक लागली होती.. बिस्किट्स खात जुन्नरला आधी छान काहीतरी खाऊ असे बेत आम्ही रचत होतो.. पण जुन्नरला ५ल पोहचलो तेव्हा पुण्याची ५ ची शेवटची बस होती असे कळले.. बरं झालं ती तरी बस आमची चुकली नाही.. आता ब्यागचे ओझे नव्हते..  गर्दीत चढून  जागा पकडायची मला सवय आहे त्यामुळे मी तिकडे गेले तोवर अर्चान्ने वडापाव पार्सल आणला..  बसमध्ये अर्चना झोपली तेव्हा मला वाटले किती दमवले मी हिला.. माझ्यासोबत असणार्यांना नेहमी असे कष्ट घ्यावे लागतात बहुतेक म्हणून मला कोणी लाईफ पार्टनर मिळत नसावा..  :)

आणि अशा रीतीने आम्ही पुण्यात ८ वाजता पोहचलो.. घरी येताना जरो दमलो असलो तरी सुट्टी सत्कारणी लागली याचा एक वेगळा आनंद वाटत होता.. आई बाबांनादेखील सगळं वृतांत ऐकून छान वाटले.. भगवंताने या कार्याची प्रेरणा दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानले!







बुधवार, ८ ऑगस्ट, २०१२

मंतरलेले दिवस - ६७

त्या मावशी..
त्या दिवशी जरा हळू हळू सावकाश कोणाला काही समजणार नाही अशा पद्धतीने मी चालत होते.. पण शेवटी बागेत काम करणाऱ्या मावशींनी विचारले.. काय हो म्याडम, काय झालं.. मी हसून पहिले त्यांच्याकडे आणि मान हलवून काही नाही असे म्हणले.. कोण कुठल्या त्या पण किती लक्ष त्यांचं माझ्याकडे.. आम्ही मागे एकदा या बागेतल्या आणि हाउसकीपिंग स्टाफला पार्टी दिली होती बास, तेव्हापासून रोज इकडे तिकडे जाता येता हे लोक आवर्जून विचारपूस करतात.. आणि आज मला कळले कि ते मनापासून विचारतात, औपचरिकता मुळीच नसते त्यात..  कालच वाढदिवस झाला अन आज लगेच वय वाढल्याच्या खुणा दिसू लागल्या कि काय असे वाटू लागले.. एरवी कॅम्पस  मध्ये फुलपाखरासारखी बागडणारी मी आज एका बिल्डींगमधून दुसऱ्या ठिकाणी जायलाही आढेवेढे घेत होते पण मिटींग्स साठी जाणे अपरिहार्य होते.. आणि आणि शेवटी जे नको व्हायला हवे होते.. मला असं काही झालंय हे कोणाला सांगायचं नव्हते कारण शेवटी माझ्या इमेजचा प्रश्न होता.. :)

ती काठी..
मार्च मधे आम्ही कात्रज - सिंहगड ट्रेक केला होता तेव्हा माझी काठी एका मैत्रिनीकडे राहिली होती.. त्याला आता किती दिवस झाले.. पण आजच नेमकी तिने मला आणून दिली.. आणि संध्याकाळी त्या काठीचा मला खरा खरा उपयोग झाला कारण मला एकेक पाऊल टाकताना आधराची गरज वाटत होती.. हातात काठी बघून सिक्यूरिटीवाल्यांनी आवर्जून चौकशी केली.. मला मात्र अवघडल्यासारखे वाटत होते..

ती मैत्रीण..
दिवसभर दुर्लक्ष केलं, अंगावर काढलं.. संध्याकाळी कॉलसाठी थांबावं लागलं..  माझी बिल्डींग बस थांब्यापासून थोडी लांब.. हातात काठी त्यात पाऊस.. तेव्हा ती  सोबत आली.. तिची आणि माझी तशी नवीन ओळख.. तरीही तिने मदत केली.. गरज लागेल तिथे आधार दिला.. हल्ली कोण कोणासाठी करतं इतकं.. ज्याला त्याला आपापले व्याप असतातना.. बस येईपर्यंत ती माझ्यासाठी थांबली होती..


तो रिक्षावाला..
ट्राफिक मुळे घरी जायला बराच उशीर झाला.. स्टोप  आल्यावर उतरण्यासाठी उठले तर काय मला चालताच येत नव्हते.. बाजूला धरत कशीबशी उतरले अन घरी फोन केला.. बाबा घरी नव्हते त्यामुळे घायला कोणी येऊ शकणार नाही असे कळले.. मग कधी नव्हे ते मी  मोर्चा रिक्षावाल्यांकडे फिरवला. ते स्त्याण्ड वरचे रिक्षावाले खूप आगाऊपने वागतात त्यामुळे मी एरवी त्यांच्याकडे चुकूनही बघत नाही.. पण आज त्यांनाही माझी हालत बघून दया आली.. कारण माझ्यात  एकेक पाऊल टाकण्याइतकाही आत्मविश्वास राहिला नव्हता..  रिक्षेत बसून रडत आईला सांगितले.. वृंदाने रिक्षा केली यावरूनच आईला प्रकरण गंभीर आहे याची कल्पना आली..  मी घरापाशी  उतरताना आई म्हणली मी कुलूप लावून येते, आपण त्याच रिक्षेने डॉक्टर कडे जाऊ.. मला त्या रिक्षावाल्यांची नाटके माहिती आहे त्यामुळे आईला म्हणले नको त्यांना थांबावे लागेल, बाबा आल्यावर मी जाईन नंतर.. तर तो रिक्षावाला चक्क म्हणला काही हरकत नाही, मी थांबतो.. त्याने डॉक्टरकडे सोडले तेही वेगळे पैसे न घेता.. शेवटी माणुसकी म्हणतात ती हीच..


ते डॉक्टर..
डॉक्टर मात्र कुल होते.. काहीतरी जड वस्तू विचित्र पद्धतीने उचलल्यामुळे किंवा अशाच काही कारणाने तुझी कंबर दुखत आहे असे ते म्हणले.. थोडे व्यायाम सांगितले आणि औषधे दिली.. मी म्हणले आईला सांगा हे ट्रेकिंग मुळे नाही झाले नाहीतर माझा ट्रेकिंग बंद करतील ते.. कारण आमच्याकडे मला काही झाले कि बाबा माझ्या भटकंतीवर आणि पाणीपुरीवर येतात..
डॉक्टर हसत म्हणले नाही नाही त्यांचा काही संबंध नाही.. उलट तुझी बॉडी एकदम  फ्लेक्जीबल आहे ट्रेकिंग मुळे.. मग मी म्हणले माझ्यासारख्या इतक्या फिरणाऱ्या मुलीला असे का व्हावे.. ते म्हणले काहीतरी चुकीच्या पद्धतीने उचललं असेल, वाकली असशील  किवा विटामिनची कमतरता झाली असेल,काळजीचे कारण नाही..



ती रात्र..

त्या रात्री मला जाणवले कि आपण किती पराधीन आहोत.. आज धडधाकट असलो तरी उद्याचे कोणाला माहिती.. शरीराच्या कोणत्याही एका अवयवात साधी कळ आली तरी आपले आयुष्य बदलून जाऊ शकते.. त्या रात्री मला माझ्याकडे आहे त्याची खऱ्या अर्थाने किंमत समजली.. देवाकडे प्रार्थना करत होते मी कि हे काय चालू आहे सगळे, आज भटकंतीमधेच काय तो मला आनंद वाटतो, तो माझ्याकडून हिरावून घेऊ नकोस.. मी आजपर्यंत शुल्लक गोष्टींसाठी रडले त्याबद्दल मला माफ कर.. त्या रात्री मला खूप रडू आले.. कदाचित काहीवेळे तो भगवंत आपल्याला रडायला लावून आपले गच्च भरलेले मन मोकळे करून घेतो कारण तेही महत्वाचे असते..

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मला आजच्या या दिवसात कितीजणांनी मदत केली त्यांचे मी मनातल्या मनात आभार मानले.. म्हणतातना अशावेळेसच लोकांची पारख होत असते.. मी नशीबवान आहे या बाबतीत.. भगवंताने साऱ्या सृष्टीवर माझा भार सोपवलाय असा विचार मनाला स्पर्शून गेला!!!