शनिवार, ३१ मार्च, २०१२

मंतरलेले दिवस - ५९ : भाग ४

ताजमहल!!!  :)

सकाळी ६.३०लाच ताजमहल् बघायला निघालो.. माझ्या दोन्ही पायाना फोड आले होते त्यामुळे अख्खा दिवस लगंडत होते.. ताजच्या कॅम्पसमध्येच आम्ही राहत असल्याने चालत जाण्यासारखे अंतर होते.. भारतीयांसाठी ३०रुपये तर फोरेनर्ससाठी २०० रुपये प्रवेश फी होती.. तिकीट काउंटरपासून साधारण १किमी ताज उभा होता.. त्या परिसरात बाहेरील गाड्यांना परवानगी नव्हती म्हणून अंतर्गत शटल्स ठेवल्या होत्या.. इतक्या सकाळीही ताजमहल् पाहण्यासाठी बरीच गर्दी होती,विशेष करून फोरेनर्स लोकं जास्त होते.. मुख्य द्वरापाशी येताच समोर ताजमहल्चे अतिशय सुंदर दर्शन झाले.. पुर्वीपासून त्याचे इतके फोटो पहिले होते की आपण पहिल्यांदाच ताज महल् पाहतोय असे मला बिलकुल वाटले नाही.. पण सोनेरी कोवळ्या किरणांमध्ये तो महल् खरच फार सुंदर दिसत होता.. समोरच्या तळ्यामध्ये उमटलेले प्रतिबिंब मनाला मोहवून टाकत होते.. सभोवतालची बाग अजुन शोभा वाढवत होती..  कारंजे मात्र बंद होते, ते चालू असते तर अजुन  सुरेख दिसले असते कदाचित.. फोटो किती काढू अन् नको असे प्रत्येकालाच होत होते.. या बाजूने त्या बाजूने, मधून, जवळून, लांबून अश्या किती असंख्य दिशेने क्‍लिकक्लिकाट चालू होता.. बाकी त्या मार्बेल नक्षीकामाबद्दल, तिथल्या कोरीव कामाबद्दल वेगळे काय सांगायचे.. ती खरच किती नशिबवान होती जिच्या प्रेमाखातर हा महल् बांधला गेले होता.. या व्यवहारी जगात खरच कोणी कोणावर इतके प्रेम करते तर..

मुख्य महालात चप्पल शूजला परवानगी नव्हती.. आणि आतमध्ये फोटोस सुधा काढून देत नव्हते.. तेजोमहालय बद्दल नुकातच माझ्या लंचग्रूप मध्ये खूप चर्चा झाली होती.. त्यामुळे तिथे पुर्वी महादेवाची पिंड होती आणि नंतर त्याला ताज महालात रुपांतर केले गेले अशी काही माहिती मिळाली होती..आत गेल्यावर मी पाहत होते कुठे पिंड दिसत आहेका पण खाली जायचा रस्ता बंद केला होता.. बाकी काही असो, एक गोष्ट फार खटकली.. जगातले सातवे आश्चर्य म्हणल्या जाणार्‍या या महालात अगदी मुख्य दालनातसुद्धा कचरा पडलेला दिसला तेव्हा फार कसेतरी झाले.. निदान ही जागा तरी स्वच्छ ठेवायला जमात नाही का आपल्या सरकारला.. देशविदेशातून लोकं येतात त्यांच्या मनात भारताविषयी काय मत होत असेल हे बघून.. असो.

ताजमहाल पाहून झाल्यावर आमची ट्रिप संपली.. आता परतीचा प्रवास सुरू झाला होता.. जाता जाता आग्र्याची प्रसिद्ध लस्सी ड्रायवरने आवर्जून  घ्यायला लावली.. ३/४ दिवसाच्या या छोट्या कालावधीत बरेच काही मिळवाल्याचा आनंद मनातून ओसंडून वाहत होता!!!

मंतरलेले दिवस - ५९ : भाग ३

व्रजभुमी : मथुरा - गोवर्धन - वृंदावन

सकाळी ६ वाजता आम्ही मथुरेला निघालो.. वातावरण एकदम प्रसन्न होते.. :) इथे यायच्या आधी कितीतरी दिवस मी गुगलवर या भागात काय काय पाहावायाचे याबद्दल माहिती वाचत होते आता आज एका दिवसात त्यापैकी किती आणि कसं पाहायला मिळेल याची उत्सुकता शिगेला पोहचली होती.. आग्रा मथुरा अंतर साधारण ५०किमी आहे.. ७.३०ला आम्ही मथुरेमधील श्रीकृष्ण जन्मस्थानापाशी पोहचलो.. ते जन्मस्थान म्हणजे पुर्वीचे कारागृह होते जिथे वासुदेव-देवकीला कंसाने कैद करून ठेवले होते.. बाहेरून मोठे मंदिर बांधून आतील भाग तसाच अगदी कारागृहसारखाच ठेवला आहे.. मंदिरात जाताना सेक्यूरिटी अगदी कडक आहे.. कॅमरा फोन सोडाच पण कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू तिथे चालत नाही.. ते लोक ब्याग अगदी नीट तपासूनच मग आत सोडत होते.. मुख्य गाभार्‍यात जाताना मोठे बुलण्द दरवाजे त्यावेळच्या कारागृहाची कल्पना देत होते.. एकाच्या एक असे आम्ही बरंच आत जात होतो.. त्याकाळी वासुदेव बाळकृष्णाला गोकुळात सोडण्यासाठी निघतात तेव्हा हे दरवजे आपोआप उघडतात हे सगळं मी तिथून आत जाताना कल्पनेत बांधत होते.. सगळीकडे पोलिस बंदुका घेऊन सज्ज होते.. अगदी आत जन्मस्थानाच्या पवित्र ठिकाणी आम्ही पोहचलो आणि मी भारावून गेले.. त्या खोलीमध्ये त्या जागेवर श्रीकृष्णाचा स्पर्श झाला होता तिथे मी नतमस्तक झाले.. देवकी-वासुदेव आणि बाळकृष्णाचा फोटो तिथे ठेवला होता.. 'श्री कृष्णाय नमः' या जपाच्या रेकॉर्डिंगने तिथले वातावरण मन्त्रमुग्ध झाले होते.. आणि आम्ही सकाळी सकाळी आल्याने इथे विशेष गर्दी नव्हती त्यामुळे खूप शांतपणे आम्हाला दर्शनाचा लाभ घेता आला.. मला ही जागा फार आवडली.. इथेही आत पोलीस होतेच.. कदाचित अयोध्याप्रकरणामुळे इथे कडक सुरक्षितता ठेवत असतील.. तिथून बाहेर पडलो आणि मग त्या आवरता मोठ्या,भगवदभक्तान्ची मंदिरे होती.. तो परिसर स्वच्छ आणि पवित्र जाणवत होता.. तिथे कृष्णाच्या बाललिलांचा देखावा अतिशय सुंदररित्या मांडला होता..

तिथून मग आम्ही पुढे द्वारकधिश या मथुरेतील प्रसिध्द मंदिरात गेलो.. बाबा म्हणले कृष्ण जन्म सोहळा आणि इतर कार्यक्रम सगळे या मंदिरात मोठ्या प्रमाणात साजरा केले जातात,त्यानी टीव्हीवर बरेचदा पहिले आहे असे ते म्हणाले.. या मंदिरात जाताना अगदी छोटी गल्ली होती त्यामुळे गाडी नेता आली नाही.. मग आम्ही तिथले लोकल वाहन म्हणजे सायकल रिक्षा केली.. पण आम्ही जेव्हा बसलो आणि तो माणूस सायकल चालवू लागला तेव्हा मला आणि बाबांना वाटले उगाच आपले ओझे हा मनुष्य वाहत आहे,आम्हाला अजिबात बरोबर वाटले नाही.. उतरल्यावर बाबांनी त्या माणसाला त्याने मागितले त्यापेक्षा जास्त पैसे दिले.. हा गल्लीतला प्रवास म्हणजे मथुरा दर्शन होते.. छोटे गाव आणि सगळीकडे गायी,वासरे.. मला बर्‍याच लोकांनी सांगितला होतं की मथुरा वृंदावन अजिबात स्वच्छ नाहीए पण मला ठीकठाक वाटले.. कदाचित मी यापूर्वी अशी तीर्थक्षेत्र पहिली आहेत त्यामुळे मला विशेष काही फरक वाटला नाही.. आता द्वारकधिश मंदिरात अतिशय गर्दी होती.. श्रीकृष्णाची ही मूर्ती अगदी द्वारकेतल्या मुर्तीसारखी हुबेहुब होती,द्वारका ट्रिपची मला आठवण झाली.. मुर्तीच्या पुढे फुलांनी छान पायघड्या घातल्या होत्या आणि त्यामुळे दर्शन सगळ्यांनी कडेने लांबून घायचे होते त्यामुळे दर्शन लगेच आणि छान झाले.. त्या आवारात एकीकडे मधे गोटे ठेवले होते आणि सगळे त्याला प्रदक्षिणा मारत होते.. एका बाईला विचारले तर त्या म्हणल्या गोवर्धन पर्वताचे गोटे आहेत,त्याला प्रदक्षिणा घालतात परीक्रमा केल्यासारखे..  मग मी त्यांना गोवर्धन बद्दल थोडी माहिती विचारली.. मीतर इथे येताना बरीच माहिती काढून आले होते आणि परीक्रमा करायचे ठरवूनच आले होते पण तरी बाबांच्या समाधानासाठी पुन्हा त्यांना विचारले.. बाबांनी त्यांना विचारले,एकटी मुलगी करू शकेल ना तिथे बाकी लोकं असतातका? त्या बाई म्हणल्या खूप गर्दी असते तिथे,काळजीचे काही कारण नाही.. :)

आता नाश्ता करून गोवर्धनला जायचे होते.. इथे नष्त्याला गरम काचोरी + जिलेबी + दही / लस्सि याची सर्वत्र दुकाने होती.. आम्ही कचोरी खाल्ली.. बाबांनी मला जूस प्यायला लावला कारण आता मी २१किमी चालणार होते.. मथुरा गोवर्धन साधारण १५कमी अंतर आहे.. हा प्रवास छान होता.. श्रीकृष्णाची व्रजभुमी ती हीच..  आम्ही १०च्या सुमारास गोवर्धन येथे पोहचलो.. खरतर आधी आमचा प्लान असा होता की सकाळी सकाळी गोवर्धनला जायचे आणि उन्ह व्हायच्या आत परीक्रमा करायची आणि मग मथुरा वृंदावन पाहायचे.. पण तिथले सर्व मंदिर दुपारी १२ ते ४ बंद असतात असे कळले मग ४ नंतर अमचं सगळं पाहून झालं नसतं म्हणून सकाळी आधी मथुरा पाहून मग परीक्रमा आणि त्यानंतर मग वृंदावन असे ठरले.

आमच्या ड्रायवरने परीक्रमा सुरू होते तिथे सोडले.. बाबा तिथले मुख अरविंद मंदिर बघून परत गाडीमध्ये येणार होते.. तोपर्यंत मी काही बोलले नव्हते पण आता वेळ आली होती.. मी म्हणले माझी चप्पल गाडीतच ठेवते कारण ही परीक्रमा अन्वाणी करतात हे मी वाचले होते / ऐकले होते.. आता बाबा रागवले,म्हणले उन्हात असं चप्पल ना घालता चालत नसतात,काहीतरी उगाच काढू नकोस.. पण मग ड्रायावर सुधा म्हणाला की इथली गोवर्धन पर्वताची परीक्रमा अशी चप्पल न घालूनच करतात अशीच प्रथा आहे इथे.. बाबा खरतर तयार नव्हते पण मी निश्चय केला होता.. मला कोणी सांगितले नव्हते,माझं मला मनातून वाटत होते त्यामुळे मला चप्पल न घालून चालायचे,उन्हात चालायचे किवा २१ किमी या अंतरचे काहीच कष्ट वाटत नव्हते.. रस्ता तर अगदी सपाट होता,कुठेही चढ उतार नव्हते त्यामुळे दमायचा प्रश्न नव्हतं.. उन्हाची वेळ होती पण आता काही साध्य करायचे असेल तर थोडे कष्ट घायवेच लागणारना आणि मगच त्याचे फळ गोड लागते.. शिवाय हेच माझे वय आहे चालायचे,आज नाहीतर कधी करणार मी हे सगळे? नाही म्हणायला बाबांना माझी काळजी वाटत होती,एकटी २१किमी चालणार,हा रस्ता किती सुरक्षित आहे कोण जाणे.. मला यासाठीच घरच्यांसोबत येथे यायचे नव्हते,उगाच ते काळजी करत बसणार.. असो.. बाबांनी मला बिसलरि बॉटल घेऊन दिली.. ५ तासात होती ही परीक्रमा आणि मध्ये अध्ये वाटले तर रिक्षाही करता येते अशी तिथे माहिती मिळाली..  रस्ता कसा आहे ते पाहायला ते थोडं पुढे आले.. त्यांना काही लोकं चालताना दिसले ते सगळे अन्वाणीच चालत होते हे त्यांनी बघितले.. तेव्हड्यात एक गाडीवाला गाडीने परीक्रमा करायची आहे का विचारात होता.. हेपण मी वाचले होते की बरेच लोक गाडीने परीक्रमा करतात.. बाबा मग त्या गाडीत बसले.. त्यांना कदाचित मी एकटी कुठल्या रस्त्याने चालणार आहे,लोकं किती आहेत हे पाहायचे होते..  मी त्यांना म्हणले मी हळुहळू चालत,तुम्ही गाडीपाशी थांबा नंतर..

परीक्रमा सुरू..
आताशा उजवीकडे श्री गिरिराज - गोवर्धन पर्वताचे दर्शन होऊ लागले.. हा पर्वत उंच नाहीए पण लांब पर्यंत (२१किमी) पसरलेला आहे.. संपूर्ण व्राजवासींना या पर्वताखाली आश्रय मिळाला होता तर.. या पर्वताला श्रीकृष्णाचा स्पर्श झाला असल्याने मलाही त्या पर्वताला स्पर्श करून नमस्कार करायचा होता पण आता तरी पर्वत थोडा लांब होता..  त्यावर छोटे मोठे गोटे आणि उन्हळ्यामुळे वळलेली झाडे दिसत होती.. 

रस्ता सरळ साधा होता.. दोन्ही बाजूला दुकाने,मंदिरे अन् घरे मंदिरे होती.. मध्ये डांबरी रस्ता आणि उजवीकडे मातीचा कच्चा रस्ता किवा कुठे फारश्या टाकून केलेला फूटपाथ होता.. ठिकठीकाणी किती अंतर झाले याच्या पाट्या लावल्या होत्या.. ठीकठिकाणी पाणी, टॉयलेट इत्यादींची सोय होती.. लहान पोरं बाळं, कॉलेजची मुले, तरुण लोकं, नवरा बायकोंच्या जोड्या, वयस्कर लोकं अशी गरीबपासून श्रीमंत वर्गातली आबालवृद्ध मंडळी वीना चप्पल चालत होती.. प्रत्येकाच्या चालण्याच्या गातीप्रमाणे सगळे पुढे मागे चालत होते त्यामुळे मी एकटी अशी नव्हती.. बाबांनी हे पाहून निश्चिंत असावेत असे मनात वाटून गेले.. अर्थात एकटी मुलगी अशी मीच चालत होते.. बाकी बर्‍यापैकी सगळे ग्रुपमध्ये चालत होते.. मी सावकाश काही घाई न करता सगळीकडचे निरीक्षण करत फोटो काढत चालत होते.. उन्ह वाढल्यावर डांबरी रस्त्याला चटके बसू लागले मग मातीतून चालायला सुरूवात केली.. उजवीकडे गिरिराजाचे दर्शन घेत डोळ्यात जितके मावेल तेव्हढे साठवत पुढे जात होते.. मन कुठेतरी जायला लागले की मग राधेकृष्णाच्या नामात मनाला अडकवायचे प्रयत्न करत होते. वैष्णवीदेवीच्या इथे जाताना सर्व लोकं एकेमकांना 'जय मातादी' असे म्हणतात.. कैलास परीक्रमेच्या वेळेस 'ओम नमः शिवाय' आणि आता इथे सगळेजण 'राधे राधे' म्हणत होते... फोरेनर्स तर चक्क साड्या /धोतर नेसून हातात जपमाळ घेऊन जप करत चालताना दिसले तेव्हा मला फार नवल वाटले.. इस्कोन मुळे श्रीकृष्णाची भक्ति जगभर पसरली आहे तर..  रस्त्याच्या एका बाजूला पूर्ण वेळे माकडान्च्या टोळक्या होत्या, पण सुदैवाने ते आम्हाला काही करत नव्हते.. त्यांच्या इतक्या जवळून बिनधास्तपणे मी पहिल्यांदा अशी चालत होते.. गायी वासरे तर ठीकठिकाणी होती,चारा विकत घेऊन त्यांना खायला घाला अशी बरीच दुकाने होती.. खूपजन असे करत होते पण मी नाही केलं ते काही.. बरेच लोकं पैसे मागायला देखील बसले होते.. आणि चालणार्‍यांपैकी काहीजण त्यांना प्रत्येकाला पैसे देत दानधर्म करत चालत होते.. काहीजण पूर्ण लोटांगण घालत परीक्रमा करत होते ते पाहून मला घामच आला.. पुढे एकीकडे मला गिरिधर पर्वत अगदी जवळ आहे असा दिसला.. मग मी त्याच्या पायथ्याशी गेले,हात लावून नमस्कार केला आणि तिथला छोटासा गोटा पर्समधे ठेवला.. एक इच्छा पूर्ण झाली याचा आनंद झाला..
चालताना विचार आला,माझ्या पायांचे सुंदर म्हणून कधी कौतुक झाले नाही.. तरीही परमेश्वरसाठी या पायांचे चालणे झाले ही किती मोठे भाग्य..

१० किमी होईपर्यंत मी पाणी किवा अजुन काहीच घेतले नव्हते.. आता १२ वाजले होते,२ तास न थांबता न बसता चालत होते.. समोर उसचे गुर्हाळं दिसलं मग मला रस प्यायचा मोह झाला.. मी तिथे पटकन रस पिऊन लगेच निघाले.. माझ्यासोबतचे बरेचजन जोरात चालायचे आणि पुढे जाऊन बसायचे मग पुन्हा चालायला लागायचे.. मी मात्र कुठेही न बसता पण हळूहळू चालत होते.. आतापर्यंत निम्म अंतर वेळेत होते पण यापुढे जरा माझा वेग कमी झाला.. नंतर जाणवले की मला मातीतून चालताना पायाला काहीतरी टोचले आहे त्यामुळे पाय मी सावकाश टेकवत चालत होते.. रक्त वगैरे काही नव्हते कदाचित काहीतरी टोचून गेले असावे.. पण आता माझ्या मागून येणारे सगळे माझ्या पुढे जात होते आणि मी मात्र मंदपणे चालत होते.. मी दमले नव्हते बिलकुल  पण पाय नीट टेकवता येत नसल्याने जोरात चालता येत नव्हते.. चालताना मध्ये मध्ये वेगवेगळी छोटी छोटी गावे लागत होती.. कधी कधी रस्ता अगदी त्या गावच्या बाजारातून जायचा.. परीक्रमा करताना बोर होऊ नये म्हणून कदाचित बाजाराची ही करमणूक होती.. पण तिथे डांबरी रस्ता असल्याने पायाला चटके बसत होते,तिथून थोडं पळत जावे लागायचे..
एकीकडे एक गरीब माणूस बसला होता,तो माझ्या हातातील पाण्याची बॉटल पाहून मला पाणी मागू लागला.. मला वाटले पाणी तर इथे सगळीकडे उपलब्ध आहे आणि त्याच्या बॉटल मध्ये थोडे पाणी होतेच तरी का मागत आहे.. पाण्याला नाही म्हणू नये म्हणून मी माझ्याकडचे थोडे पाणी त्याच्या बॉटलमध्ये दिले पण मी माझ्याकडचे सगळे पाणी त्याला नाही दिले,मला लागेल अजुन बरच चालायचय म्हणून.. पुढे गेल्यावर मला वाटले की मी त्याला सगळे पाणी द्यायला हवे होते का,मला घेता आली असती नवीन बिसलरि बॉटल,मी स्वार्थीपणे वागले.. पण आता ती वेळ गेली होती,विचार करून काय उपयोग.. असं नेहमीच का होतं, सगळं घडून गेल्यावर का वाटतं की आपण असं वागायला हवं होतं.. असो..  

आता काउंटडाउन सुरू झाला होता.. शेवटचे ५किमी चालायचे म्हणल्यावर बरंच बरं वाटले.. :) पायाला आता जराही खडे किवा गरम जमीन सोसवत नव्हती.. लगेचच राधा कुंड लागले.. मी ते दिसताच त्या कुंडातल्या पाण्यात पाय घातले खूप बरं वाटलं पण तिथेही बसले नाही कारण जर कुठे बसले असते तर पुढे चालणे अवघड होते.. पुढे गेल्यावर पाटि दिसली की राधा कुंडच्या पाण्यात पाय घालू नका,आंघोळी करा किवा पाणी अंगावर घ्या पण पाय घालू नका.. आता ही पाटी आधी लिहायला हवी होती,मला हे वाचून फार वाईट वाटले.. जाऊदे आता म्हणून मी पुढे चालायला लागले.. पूर्ण २१किमी मध्ये मध्ये सायकल रिक्षावाले रीक्षेतून यायचे आहे का विचारायचे.. आता तर माझा वेग बघून बरेचजन विचारात होते पण मी चालत परीक्रमा करायची ठरवली होती तर कुठल्याही परिस्थितीत रिक्षा करणे अशक्य होते.. पायांना होणार्‍या वेदनेमध्ये एक प्रकारचा आनंद होता..
पुढे मग कुसुम सरोवर लागले आणि शेवटी मानसी कुंड.. शेवटचे १ किमी अंतर मला अतिशय मोठे वाटले.. मानसी कुंड मी लांबूनच पहिले आणि परीक्रमा समाप्त या पाटी पाशी शेवटी मी ३.४५च्या दरम्यान पोहचले.. मला परीक्रमेला ५.३० तास लागले होते तर..

बाबा वाट बघत असतील म्हणून मी मानसी कुंड लांबूनच पहिले आणि परीक्रमा समाप्ती झाल्यावर ड्रायवरच्या मोबाईलवर फोन केला.. गाडी थोडी पुढे लावली होती.. त्या दिशेने मी चालू लागले तर बाबा मला घ्यायला आले.. ते खूप खुश दिसत होते,मला म्हणले झाली का मनासारखी परीक्रमा.. :) कुठेही ना बसता थांबता परीक्रमा पूर्ण केली असं मी त्यांना अभिमानाने सांगितले.. बाबांना मी लवकर जास्तीत जास्त ४ तासात येई असे वाटले होते,त्यांनी ड्रायवरला सांगितले होते तिला सवय आहे ती येईल लवकर.. पण मी मात्र पायला काहीतरी टोचल्यामुळे फार हळू आले होते..  चालताना मला भूक अजिबात लागली नव्हती.. पण इथे बाबाही मी एकटी कुठे चालत आहे म्हणून जेवले नाही, मी येईपर्यंत त्यांना शांती नव्हती.. मला वाईट वाटले,मी किती त्रास देते माझ्या आईबाबांना.. मी म्हणले त्यांना तुम्ही जेवून घ्यायचेना..  मग आम्ही जूस घेतला.. आणि लगेच गाडी वृंदावनच्या दिशेन धावू लागली..

वृंदावनची पाटी दिसताच मला रस्त्याच्या डावीकडे थोडं आत एक सुंदरसा मोर दिसला.. त्याला पाहून मी आनंदाने बाबांना म्हणले तो पहा मोर.. पण तोपर्यंत आमची गाडी पुढे गेली होती.. वृंदावनातच्या अगदी सुरुवातीला मोर दिसला ही गोष्ट मला फारच योगायोगाची वाटली.. पुर्वी हेच वृंदावन सृष्टीसौंदर्याने, फुले वेलींनी, मोर आणि विविध पक्षांनी, गायी वासारांनी, तुळशीने, कृष्णाच्या मुरलीने,  राधा कृष्ण अन् गोप्यान्च्या रासक्रिडेने दिव्य फुललेले असायचे असे वाचले होते..मी अतिशय खुश होते आज.. 
तब्बल ६ तासानंतर गाडीमध्ये बसल्यावर आता उठताना त्रास होत होता.. वृंदावनात खरेतर खूप काही बघायचे होते पण आता मी अक्षरशः लन्गडत चालत होते.. तिथे एक पुजारी माणूस इथली मंदिरे आणि माहिती सांगतो म्हणाला.. बाबा आणि ते पुजारी पुढे होते आणि मागून मी हळू येत होते.. पहिल्यांदा आम्ही श्री रंगनाथ मंदिर पहिले,अतिशय भव्य अन् सुंदर.. नंतर श्री ठाकूरजी मंदिरात दर्शन घेतले.. या गावात लोकं पैशासाठी खूप मागे लागतात असं ऐकले होते आणि तसेच काही अनुभव आले.. आता ६ वाजून गेले होते.. मला सेवाकुंज , प्रेम सरोवर ,यमुनेची आरती बघायची होती पण मला चालता येत नव्हते.. आणि त्याहून महत्वाचे म्हणजे बाबा कन्टाळले होते, ते म्हणले आता बास,आता अजुन आग्र्यला जाईपर्यंत उशीर होईल.. मी मग हट्ट केला नाही कारण बाबा माझ्यासाठी आले होते त्यांचे ऐकणे मला भाग होते.. मग आम्ही तिथली मशहूर लास्सी प्यायली आणि आग्र्याला परतलो.

श्रीकृष्णमर्पणमस्तु!!! :)

मंतरलेले दिवस - ५९ : भाग 2

आग्रा,सिटी ऑफ ताज.. :)

काल अख्खा दिवस प्रवास करून आम्ही  आज सकाळी १० वाजता आग्रा छावणी स्टेशनला पोहचलो.. आधी मुलीमुलींचा प्लान होता त्यामुळे सुरक्षित म्हणून केळ्कर काकान्च्या तर्फे गाडी- हॉटेल सगळे आधीच नीट बुक करून ठेवले होते.. त्यामुळे यावेळेस प्रथमच माझ्या नावाची पाटी घेऊन कोणी उभे होते, तो आमचा तीन दिवसाचा ड्रायवर होता..  :)

ड्रायवरला तीन दिवसाचा प्लान सांगितला.. परीक्रमा चालत करणार म्हनला तर तो फार आश्चर्यचकित झाला, 'आपसे नाही होगा,गाडीसे करलो' असा तो मला सारखा म्हणत होता.. मला हा मागेही असा अनुभव आला होता..
गाडीमधून आग्रा दर्शन करत हॉटेलपाशी आलो.. ताज माहालच्या परिसरात (३००मी) असलेले ताज खिमा हॉटेल यूपी गाव्हरमेन्टचे आहे.. कॅम्पस अतिशय सुंदर.. चेकीनला जरा वेळ होता तेव्हा मी थोडं फिरून आले.. तेव्हा तिथून ताजचे अतिशय सुंदर दूरदर्शन झाले..

सगळं अवरून आम्ही लगेचच बाहेर पडलो.. आज शुक्रवार असल्याने ताजमहाल बंद असतो..  शुक्रवारी तिकडे आतमध्ये लोकं नमाज पडायचे म्हणून कोर्टाने हा निर्णय घेतला.. म्हणून आज आम्ही आग्रा किल्ला आणि फतेहपुर सिकरी पाहायचे ठरले.. दुपारचे उन्ह होते पण पुण्यात आता जितका उन्हाळा वाढला आहे तितकी तीव्रता इथे भासली नाही.. सकल संध्याकाळ तर एकदम आल्हाददायक हवा होती..  प्रथम आम्ही आग्र्याहून ५०किमी वर असनाराया फतेहपुर सिकरीला गेलो, अकबरची राजधानी पाहायला... इथे पाण्याची कमतरता होती म्हणून आग्रा किल्ल्याला स्थलांतर झाले होते म्हणे.. तिथेले वसतुशिल्प अप्रतिम आहे..  त्याकाळाच्या भव्या प्रसदांचे अवशेष अजूनही आहे.. तेथील बुलंद दरवाजा , दर्गा वगैरे अजूनही चांगल्या स्थितीत ठेवले आहे.. आणि सगळ्यात भारी म्हणजे बाहेर उन्ह असले तरी आत इतके थंड वाटत होते.. तिथे मुसलमान लोकं जास्त होती..

पण तिथे गाइड आणि काहीतरी विकणारे लोकं फारच त्रास देतात असा अनुभव आला.. अगदी मागेच लागत होते,लहान मुले तर इतकी होती त्यांना धड ओरडानेही नको वाटत होते तरी शेवटी जरा मोठ्या आवाजात सांगवेच लागायचे.. या प्रकारामुळे थोडे वैतागून गेलो होतो..

नंतर आम्ही आग्रा फोर्ट पाहायला गेलो.. तिथे जाताच किल्ल्याच्या बाहेर मोठ्या चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा पाहून मराठी मन भरून आले.. त्या पुतळ्याच्या इथे मराठीमधे महाराजांची आग्र्याहून सुटका याबद्दल माहिती लिहिली होती.. मला वाटले ते हिंदी इंग्रजी मध्ये लिहायला पाहिजे होते म्हणजे तिथे येणार्‍या सर्व लोकांना माहिती समजली असती.. असो.

आम्हाला हा आग्रा किल्ला फारच आवडला.. दिल्लीच्या लाल किल्ल्यापेक्षा कितीतरी पटीने भव्य.. इतक्या मोठ्या किल्ल्यातून महाराजांनी कशी काय सुटका करून घेतली असेल याचे नवल वाटले..  दिवाणे आम -खास मस्त आहेत.. जोधा-अकबरचे शूटिंग तिथेच झाले असावे असे वाटले.. तिथले नक्षीदार पेण्टिण्ग्स सुंदर आहेत.. आणि इथे एका पॉइण्टअरुण यमुना नदीच्या काठावर असलेल्या ताजमहालचे विहंगाम दृष्य दिसते.. संध्याकाळी येथे आल्यामुळे अधिकच आनंद घेता आला. . इथे माकडान्चा मात्र सुळसुळाट होता..

नंतर आग्रा मार्केट मध्ये जरावेळ फिरलो तिथले लेतर  प्रसिद्ध आहे म्हणून  मग थोडीफार शॉपिंग केली.. आता मथुरा वृंदावन गोवर्धनला जायचे वेध लागले होते,म्हणून उद्या सकाळी लवकर निघायचे ठरले..

मंतरलेले दिवस - ५९ : भाग १

पुणे - आग्रा  :)

माझे बाबा आणि मी सकाळी ८च्या बसने पनवेलला निघालो.. एक्सप्रेसवेचा प्रवास सुंदर होता.. एरवी हिरव्यागार असणार्या  डोंगर रांगा आता वळलेल्या गवतात सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकत होत्या.. आमचा अंदाज थोडा चुकाला आणि आम्ही थोडं  आधीच पनवेल स्टेशनला जाऊन बसलो.. तास एखाद्या प्लॅटफॉर्म वर टाइमपास करणे जरा कंटाळवाणे आहे.. पण सुदैवाने ते प्लॅटफॉर्म बरेच स्वच्छ होते.. आणि चक्क तिथल्या कॅण्टीनमध्ये चहा चक्क ३रूपायला चांगला मिळत होता, सगळ्याच किंमती कमी होत्या.. J पुण्यात खायचा प्यायचा खर्च जरा जास्तच आहे,मुंबई स्वस्त आहे असा आम्ही निष्कर्ष काढला.. केरळहून निघालेली सुपरफास्ट रेल्वे ठरलेल्या वेळेच्या आधी आली आणि आमचा रेल्वे प्रवास सुरू झाला.. पण यावेळेस प्रवास शांतपणे होणार नव्हता,बरेच घोळ झाले होते.. फार पुर्वीपासून मला मथुरा वृंदावनला जायची इच्छा होती.. मैत्रिणी मैत्रिणी आग्रा मथुरा वृंदावन अशी छोटी ट्रिप करूया हा विचार मनात येताच क्षणी मेल टाकला.. कोणाला तिथे जायची इच्छा नव्हती  तर  कोणाला इच्छा असून वेळ नव्हता.. शेवटी एका मैत्रिणीचे आणि माझे जायचे ठरले.. सगळं बुकिंग झाले.. मी तर अगदी दिवस मोजत होते.. पण ट्रिपला जायच्या / दिवस आधी त्या मैत्रिणिने काही कारणाने विचार बदलला आणि ट्रिपमधून नाव रद्द केले.. मला मात्र मनातून फार इच्छा होती तिथे जायची आणि इतके प्लॅनिंग करून अशी ऐनवेळेस ट्रिप रद्द करावी बिलकुल वाटत नव्हते.. पण एकटीला घरचे सोडणे शक्यच नव्हते त्यामुळे बाबांनी माझ्यासोबत यायचे ठरले.. येतानाचे विमानाचे तिकीट बदलले, पण जातानाचे रेल्वे तिकीट बदलणे अशक्य होते.. मैत्रिणीच्या तिकिटावर जायचे आणि नंतर टीसी कडून तडजोड करू असे ठरले.. आता होईल ते होईल ,बघुया असा मनाशी निश्चय करून आमचा प्रवास सुरू केला होता.. आपल्यासोबत आपली घरची मंडळी कायम सोबत असतात,बाकीचे कितीही जवळचे म्हणले तरी ते शेवटी त्यांच्या सोईने साथ देतात ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली.. बाबा म्हणले,यापुढे कोणावर विसंबून राहत जाउ नकोस,एकतर आमच्यासोबत प्लान कर,नाहीतर मग पॅकेज टूरस सोबत..
टीसी आल्यावर आम्ही त्यांना सगळी गोष्ट समजावून सांगितली.. सुदैवाने तो एक चांगला माणूस होता.. त्याने आमच्यावर विश्वास ठेवला.. काहीतरी मार्ग  काढू असे म्हणून तो विचार करू लागला..  निघायच्या आदल्या दिवशी बाबांच्या नावाचे तिकीट मी ऑनलाइन काढले होते पण ते वेटिंग लिस्टमध्ये असल्याने कॅन्सल झाले होते.. टीसी म्हणाला ते स्टेशन वर जाऊन काढले असते तर कन्सेल झाले नसते आणि मग मी लगेच मैत्रिणीच्या नावावर आड्ज्स्ट केले असते.. आता हा प्रकार आम्हाला अगदी नवीन होता.. आमच्या समोर एक रेल्वे अधिकारी बसला होता.. त्याने आमची सगळी गोष्ट ऐकली होती,तो टीसीला स्पष्टपणे म्हणले बाकी काही असो,यांचे नीट अड्जस्ट करा..  नंतर टीसी म्हणाला पुढच्या स्टेशनवर रेल्वे जास्त वेळ थांबेल तिथे खाली उतरून तिकीट काढता येईल.. बाबांना उतरणे शक्य नव्हते कारण त्यांच्याकडे तिकीट नव्हते.. मी म्हणले मी उतरते तर टीसीने मला खाली उतरून दिले नाही.. तो म्हनला माझी मुलगी तुझया एव्हढी आहे, मी एका वडिलांचे मन समजू शकतो.. त्याने तिसर्या माणसाला ज्याच्याशी आमचा काही संबंध नव्हता त्याला तिकीट आणायला पाठवले आणि तो चक्क तिकीट काढून आला.. त्याची बायको म्हणली आमची मुलगी तुझ्या एव्हढीच आहे.. सर्वांना माझ्यात त्यांच्या मुली दिसत होत्या बहुतेक.. J
टीसीने मग लगेच तिकीट बाबांच्या नावावर केले.. मला काय चालले आहे समजत नव्हते.. कोण कुठली ही माणसे ,आमच्यासाठी त्यांनी एवढे का करावे.. आभार कसे मानू कळेनासे झाले होते.. आमच्या इथे अजुन एक बाबांच्या वयाचे काका काकू होते ते नैनीतालला अध्यात्मिक शिबिराला चालले होते.. ते म्हणले श्रोकृष्णाची इच्छा आहे,तो सगळी व्यवस्था करतो.. तुमचा योग आहे त्यामुळे सगळे सुरळीत होत आहे..आम्हा सर्वांना हे मनोमनी पटले..
एकंदर या प्रकरणामुळे आमच्या डब्यातल्या बर्याचजणांची करमणूक झाली आणि प्रवास मस्त झाला.. :-)

गुरुवार, ८ मार्च, २०१२

मंतरलेले दिवस - ५८

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे - श्री स्वामी समर्थ

असंच गप्पा मारता मारता एक मैत्रीण सांगत होती "हल्ली माझे ग्रह बदलले आहेत.. माझं काही चांगले व्हायला लागले की काहीतरी गडबड होत आहे आणि मग काही भलतच काही घडते.. कोणाची तरी वाईट नजर लागली आहे.. दोन तीन ठिकाणी पत्रिका दाखवली तर ते तसंच म्हणले की कोणीतरी ब्लॅक मॅजिक केली आहे.. मला तर वाटते माझ्या काही नातलगांची अशी नजर लागली असणार.. त्यांना मी जेव्हा काही सांगते तेव्हा लगेच दुसर्या दिवशी विपरीत घडते.. बर आता पुढे काय करावे समजत नाही.. ज्योतिशींनी अघोरी उपाय सांगितले जसे की मध्यरात्री कुठेतरी जाऊन काहीतरी करायचे जे खरेतर शक्य नाही.. मी काय करू.. "

खरतर अशावेळी ज्यांचे सगळे सुरळीत चालू आहे त्यांनी सल्ले द्यावेत.. मी तर पामर आहे, मी काय तिला सांगणार.. पण कसे काय माहिती नाही पण अगदी सहजपणे मी तिला म्हणले "अगं तू रोज एका चांगल्या ग्रंथाचे वाचन सुरू कर.. मी दासबोध वाचलाय  म्हणून तो ग्रंथ ,किवा सध्या जे ग्रंथ मी वाचत आहे तेच वाच असे मी नाही म्हणत.. तुझी ज्यांच्यावर श्रद्धा असेल त्यांचा ग्रंथ वाच.. रोज एक पान का होईना वेळ काढून वाच.. त्यामुळे आपले आपल्या नकळत वाईट गोष्टींपासून सरंक्षण होते.. त्या ग्रंथामधून येणार्‍या शुभस्पंदनांचा आपणास लाभ होतो.. "    तिला ते फार मनापासून पटले आणि तिने ग्रंथ वाचण्याचा निश्चय केला.

खरंच आयुष्याचा प्रवास किती बिकट आहे.. चालता चालता कुठे चाललोय हे समजत नाही आणि कधी कधी कुठे जायचय हेही कळेनासे होते.. मला वाटते त्यांना सगळे मिळाले,त्यांना वाटते मी नशीबवान आहे..  एक मिळाले की सुखी होऊ असे आधी वाटते, मग ते मिळाल्यावर अजुन दुसरे काही मिळण्यावर आपले सुख अवलंबुन राहते.. या सगळ्या खेळात कधी कधी बास,आता थांबावे असे वाटू लागते.. तेव्हा या ग्रंथांचा फार आधार मिळतो.. मी जवळ जवळ २००९ पासून ग्रंथ वाचन सुरू केले.. किती खुश असले किंवा दुखी असले तरी रोज एकेक पान किंवा श्लोक वाचत गेले.. त्यातले किती समजले किंवा आचरणात आणता आले हा भाग वेगळा.. पण कमीतकमी चांगल्या दिशेने प्रयत्न तरी सुरू केले.. व्यावहारिक दृष्ट्या पहिले तर ग्रंथ वाचल्याने माझ्या आयुष्यात काही भारी गोष्टी घडल्या नाही पण कितीतरी वाईट गोष्टींपासून माझा  नक्कीच बचाव झाला असणार हे शंभर टक्के खरे..  आपण सुदैवाने इतक्या चांगल्या संस्कृतीत जन्माला आलोय की आयुष्यभर वाचत राहिलो तरी पुढे कधी 'आता काय वाचायचे' असा प्रश्न मुळी पडणारच नाही इतकी ग्रंथ संपदा उपलब्ध आहे.. चांगल्या ग्रंथाचे वाचन आपण नियमीत केले तर कोणाच्याही वाईट नजरेची आपल्यापर्यंत पोहचायची हिंमतसुद्धा होणार नाही असा माझा दृढ विश्वास आहे!

असे म्हणतातना  'स्वल्पमस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्!'  If you follow this knowledge even to a small extent you will be free of the greatest of fears. No fear will touch you. :)

बुधवार, ७ मार्च, २०१२

मंतरलेले दिवस - ५७

पाटीसह झालीच पाहिजे! :)
३ मार्च, २०१२
वीकेंडला चित्राच्या घराजवळ इनऑरबिट  मध्ये सिनेमाचा प्लान ठरला..बर्‍याच दिवसांनी मी हिंदी चित्रपट पहिला आणि फारच आवडला,मी पानसिंग तोमारच्या प्रेमातच पडले.. शिवाय मॉर्निंग शो पहिल्याने पूर्वीच्या दिवसांची आठवण झाली,तिकीट कमी म्हणून आम्ही नेहमी मॉर्नीग शोलाच जायचो.. आणि आता तर अजुन महागाई वाढली आहे तर सकाळचा शो पहाणेच परवडते! सिनेमा संपल्यावर आम्हाला काही कामानिम्मित्त गावात जायचे होते.. ओफिसमधून परस्पर चित्रकडे गेल्याने माझ्याकडे गाडी नव्हती.. आणि चित्राला तिची गाडी घेणे  काही कारणाने जमत नव्हते.. भर उन्हात आम्ही बसथांब्यावर आलो.. बस स्टॉप,बसायला बाकडे,छत वगैरे तर सोडाच पण बस थांब्याची साधी पाटी देखील कुठेही नव्हती.. आपल्यकडे इथेच गडबड आहे.. मागे तो भला मोठा इनऑरबिट मॉल,  तिथे कार मधून येणारे लोक, तिथल्या उंची सुखसोयी, एसी हॉटेल्स, दुकाने  आणि इथे रस्त्यावर सामान्य जनतेसाठी असणार्‍या स्टॉपची ही अशी दुर्दशा.. किती मोठी तफावत!

एक माणूस थांबला होता त्याला विचारलं तर तो म्हणाला इथेच थांबते बस.. एक मोकळी बस आली ती मात्र तिथे थांबली नाही,थोडी पुढे थांबली.. मग आम्ही पुढे गेलो तिथल्या मुलाला विचारले तर तो म्हणाला बस स्टॉप येथे आहे.. तिथे बसची वाट पाहत उभे असताना बस आधी जिथे थांबलो होतो तिथे थांबली.. आम्ही पळत पळत त्या ठिकाणी जायला लागलो.. अजुन दोघी मुली तिसरीकडे उभ्या होत्या त्याही बसच्या दिशेने धावू लागल्या.. बसचा वेग कमी होता म्हणून मी मध्येच बस मधे चढायला लागले तर कंडक्टर साहेब दारात उभे राहून म्हणतात कसे - बस जात नाही, चढू नका..
मी चढत म्हणले - जात नाही म्हणजे.. बस बंद पडली आहे का? थांबवत आहात का बस पुढे? पाटी तर आहे 'मनप' ची..
साहेब - असे मध्येच चढलेलं चालणार नाही.. स्टोपवर थांबा, पुढच्या बसने या..
मी अर्धवट आत बाहेर अशी - स्टॉप कुठे आहे सांगा तर.. एक बस मागे थांबते.. तर एक बस पुढे..  आणि आम्ही वेड्यासारखं इकडेतिकडे धावायचं?
साहेब मोठ्या आवाजात - मागे पाटी असेल,तुम्हाला दिसली नसेल..
मी - अहो शंभर लोकांना विचारले,पाटीचा पत्ता नाही.. आम्ही सुशिक्षित आहोत.. उगाच वाद घालत नाहियोत..
एव्हाना बस मध्ये मी चढले होते.. बस चालू झाली होती आणि चित्रा व इतर लोकं खाली मागेच राहिली होती..
मी - माझी मैत्रीण मागे राहिली आहे.. बस थांबवा..
थोडे पुढे गेल्यावर ड्रायवर साहेबांनी बस थांबवली.. तोपर्यंत चित्रा पळत आली होती,तिला म्हणले पटकन बसमध्ये चढ.. पुढे त्या साहेबाचा पट्टा चालू होता, कुठेही चढलेले चालणार नाही.. मग मी पण शांत बसले नाही..
मी - बस थांब्याची पाटी नाही,प्रवाशांचे हाल होत आहेत.. शिवाय बस गच्च भरली असली असती तर समजू शकलो असतो.. पण बसमधे इनमिन ४/५ लोकं.. काय बिघडले असते तुमचे सर्वांना बसमध्ये चढून दिले असते तर? आजकाल pmt बस ड्रायवर आणि कंडक्टर यांचे काम म्हणजे एका ठिकाणहून दुसरी कडे बस वाहून नेणे ईतकेच आहे वाटते, त्या बस मधुन प्रवाशांना घेऊन जाणे याचा विसर पडलाय.. ही बस सेवा सार्वजनिक सोय आहे, खाजगी नव्हे.. एखादा रिक्षावाला कुठेही न थांबता रिकामा चालला असेल तर हरकत नाही,त्याची मर्जी.. पण pmt सेवा लोकांसाठी आहे.. आणि फुकट नाहीतर पैसे देऊनच ही सेवा वापरतो ना..
माझी इतकी बडबड ऐकून ड्रायवर कंडक्टरची पुढे काही बोलायची हिंमत झाली नाही.. बस मध्ये चित्रा म्हणली तुझे हे रूप मी प्रथमच पहात आहे.. :) बस मधून उतरल्यावर चित्रा मोठ्या ठसक्यात म्हणली,बसचा नंबर घेऊ..
कॉर्पोरेशनला उतरलो होतो, तेव्हा चित्रा म्हणली आपण पाटी बद्दल सांगायचे का इथे ओफिसमध्ये.. आम्ही तिथे विचारपूस केल तर ते लोक म्हणले स्वारगेटला pmtचे कार्यालय आहे तिथे जा..

गावातले काम उरकून आमचा मोर्चा स्वारगेट कडे वळला.. ते कार्यालय म्हणजे अगदी टिपिकल सरकारी ओफीस.. विचारत विचारत तिसर्या मजल्यावर गेलो.. प्रत्येकजण काय काम आहे विचारायचे आणि पुढे जायला सांगायचे.. शेवटी एका माणसाने आमचे म्हणणे ऐकून घेतले.. लगेच माझा नाव आणि सेल नंबर लिहून घेतला.. पण त्यांचे साहेब समोरच होते.. ते काही ऐकायला तयार नाही.. कोणी मुली काही तक्रार घेऊन आल्या आहेत,त्यांच्याशी बोलायची एक पद्धत असते पण नाही ते बडे लोग होतेना.. ते म्हणे ही तक्रार नाहीच मुळी.. आम्ही पण आमची बाजू सोडत नव्हतो.. नंतर त्याने एक माणसाला बोलावून आमची तक्रार सांगितली..
तर तो माणूस म्हणतो कसा - ही तक्रार २ महिन्याधीच नोंदवली गेली आहे,तुम्ही पहिले नाही..  रस्त्याचे काम चालू आहे.. त्यामुळे पाटी लावता येत नाहीए..
आम्ही - दोन महिन्यापासून हे असेच आहे? प्रवाशांचे हाल होत आहेत.. काहीतरी टेम्पररी मार्ग काढा यावर.. कागद तरी लावा साधा तिथे.. नाहीतर त्या मार्गावरून जाणारया कंडक्टर ड्रायवरला कटकट न करता बस थांबावायला सांगा..
तो - टेम्पररी कशाला, कायमचा उपाय करणार.. माझे आमदाराशी बोलणे झाले आहे!!!
आम्ही मनात म्हणलो आता आमदराचा एक पाटी लावण्याशी संबंध येतोच कुठे? इलेक्शनच्या आधी आलो असतो तर हे काम लगेच झाले असते..
शेवटी आमच्या समाधानासाठी त्याने कुठेतरी फोन लावला आणि त्या कामाबद्दल बोलला.. मग आम्हाला म्हणाला होईल ५ दिवसात काम पूर्ण!

चित्रा आणि मी ठरवले ५ दिवस वाट बघू नाहीतर सरळ आपणच कागदाची पाटी लिहून तिथे लावूया..  वाटले तर सकाळमध्ये " नगर रस्त्यावर बसची पाटी नसल्याने प्रवाशांचे  हाल" अशी बातमी देऊ.. ही रेस आपण सोडायची नाही!!! पानसिंग तोमारचा कदाचित हा प्रभाव असेल.. पण खरच तिथे जेव्हा पाटी लागेल तेव्हा आमच्या दोघीनएव्हढे खुश या जगात कोणी नसेल.. चित्रा खास त्या पाटिचा फोटो काढणार आहे.. बघुया,लवकरच यावा तो दिवस! :)


६ मार्च, २०१२
सकाळी चित्राचा फोन आला.. त्या बसथांब्यावर नवीन पाटी लागली आहे!!! :)