सोमवार, १७ सप्टेंबर, २०१२

मंतरलेले दिवस - ७१

Together We Can Do It! :)

या गोष्टीची सुरुवात तसं  म्हणायला ऑगस्टमध्ये घाटघर ट्रीपपासून झाली.. आणि त्यास दुजोरा मिळाला ते एकांश संस्थेच्या बक्षीस वितरण सोहळ्यामुळे..  तेव्हा मला अगदी भरघोस प्रतिसाद मिळाला होता.. बरेच जण  आम्हालाही असे काही करायचे आहे, पुढच्या वेळेस नक्की सांग असे मला बजावून ठेवत होते..

एकेक म्हणत यादी वाढतच गेली कि शेवटी मला एक संघ का तयार करू नये असे वाटू लागले..   माझ्या नशिबाने मला खूप चांगले मित्र मैत्रिणी लाभले आहेत.. सगळे विविध क्षेत्रात उंचीवर असेलेले..  जो तो आपल्यापरीने इतरांना मदत करतच असतो पण असे आपण सगळे एकत्र आलो  तर नक्कीच काहीतरी चांगले मोठे कार्य घडले जाईल यात काहीच शंका नव्हती, मग वाट  कसली बघायची..  जास्त विचार न करताच  'Together We Can Do It!' हा ग्रुप  सुरु केला.. प्रत्येकाला आपले आपले व्याप असतात त्यामुळे यामध्ये अजिबात बांधिलकी ठेवायची नाही असे ठरवले.. ज्यांना मनापासून वाटतं त्यांनी यावे असं सोपं गणित..  एकाच ठिकाणी अडकून न राहता वेगवेळ्या जागांना भेट देऊन आपल्याला शक्य आहे तेव्हढी मदत करायची.. त्यातून  खूप काही शिकायला मिळणार हे तर निश्चितच..

मग काय मेलामेली सुरु झाली, चर्चा चालू लागल्या..  नुकतच कोथरूड अंध शाळेबद्दल समजले होते तर पहिला उपक्रम तिकडेच करावा वाटले.. म्हणून मग ७ सप्टेंबरला आमच्यापैकी थोडे जण शाळेत जाऊन आलो, माहिती काढून तिथे काय काय करता येईल हे पाहिले.. त्या दिवशी आम्ही खरच भारावून गेलो.. ती शाळा इतकी व्यवस्थित शिस्तीत अन खेळी मेळीत चालवतात हे अगदी जवळून पहिले.. मुलीपण खुश दिसल्या तिकडे..

१५ सप्टेंबर , पुढचा शनिवार निश्चित केला, त्यावेळेस कोणाकोणाला वेळ आहे वगैरे चर्चा सुरु झाल्या.. असे आम्ही लगेच ७/८जण जमलोही.. फेसबुकवर तर अशक्य भारी प्रतिसाद मिळत होता.. अगदी  वेगवेगळ्या देशात असलेले मित्रमैत्रीनीही शुभेच्छा देऊन एक प्रकारचा मानसिक आधार देते होते..

आमच्या पैकी सगळे वेगवेगळीकडे राहणारे, वेगवेगळ्या ऑफिसमध्ये काम करणारे.. त्यामुळे मेलवरच आराखडा ठरला.. काय काय करायचे, कितीवेळ, कसे.. :) हे सगळे ठरवताना खूप मजा आली हे वेगळे सांगायला नकोच.. एक नवा उत्साह संचारला आहे अशी जाणीव होत होती.. काहींना अगदी मनापासून वाटत होते पण काही कारणाने त्यांना जमत नव्हते त्यामुळे त्यांना हळहळ वाटत होती पण आता हि सुरुवात होती, असे काहीना काही आपण नेहमीच करत राहणार असं विश्वास आम्ही त्यांना देत होतो..

शेवटी ज्या क्षणाची अतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आला.. आज शनिवारची सकाळची शाळा असते.. शाळा सुटल्यावर दुपारी अडीच वाजता आमचा कार्यक्रम सुरु होणार होता.. यावेळेस ग्रुपमध्ये सगळ्या माझ्या मैत्रिणी होत्या, त्यांची एकेमेकिंशी ओळख व्हावी आणि कार्यक्रमाची रूपरेषा प्रत्यक्ष भेटून ठरवावी याकरिता आम्ही सगळ्याजणी तासभर आधीच भेटलो..  तळेगाववरून सोनिया, निगडीवरून स्मिता आणि हडपसरवरून येणाऱ्या शिल्पाचे मला फार फार आश्चर्य वाटले.. त्यांच्या जागेवर दुसरे कोणी असले असते तर  'शाळा लांब आहे' हे कारण सांगून टाळले असते.. आपल्या छोट्या लेकीला झोपवून आलेल्या सुचित्राचेपण कौतुक करू तितके कमीच.. आणि सतत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, ऑफिसमध्ये , घरी पाहुण्या मंडळींमध्ये व्यस्त असणारे दीपाली आणि मुकुंद यावेळेस खास वेळ काढून आले होते, मला खूप आनंद झाला होता..  शाळेच्या शांत सुंदर आवारात ओळखी अन गप्पा झाल्या.. मुलींचा नाश्ता चालू होता.. या शाळेत बाहेरून खायचे घेऊन जायला परवानगी नाही म्हणून आजच्या नाश्तायचे पैसे आम्ही दिले होते.. २.३०च्या आधीच आम्ही शाळेच्या हॉलमध्ये मुलींची वाट पाहत बसलो.. आता पुढे कसे कसे होणार याबद्दलची उत्सुकता सर्वांच वाटत होती..

पाऊणे तीन वाजले तरी मुलींचा पत्ता नव्हता म्हणून मी अन स्मिता खाली बघायला गेलो.. शाळा सुटली म्हणून खाऊ खाऊन मुली त्यांच्या झोपायच्या खोलीत रेंगाळत होत्या.. मी सर्वांना म्हणले, चला चला आम्ही वाट पाहतोय.. तर मुली माझ्या जवळ येऊन हात धरून म्हणाल्या तिकडे परीक्षा नाहीना, काय आहे तिकडे वगैरे.. मी म्हणले गम्मत आहे,चला तर पाहूया.. हळू हळू घोळक्या घोळक्यात मुली हॉलमध्ये जाऊ लागल्या.. मी दुसर्या खोलीत गेले, मुलींना प्रेमाने चला म्हणले.. तर सगळ्या छोट्या छोट्या मुली माझ्या भोवती जमा झाल्या, काहींनी माझे  हात घट्ट धरले अन जणू काही  त्याच मला  हॉलमध्ये घेऊन जात होत्या.. एक गोष्ट इथे आवर्जून सांगावी वाटते कि त्यांच्या हालचाली इतक्या सहज होत्या कि त्यांच्यात काही कमी आहे असे मुळीच जाणवत नव्हते.. 

आता हॉल भरला होता, मुलींना ओळीने आम्ही बसवत होतो.. मुली काय गम्मत आहे यासाठी उत्सुक होत्या अन त्यांचा गोंधळ चालू होता.. आम्ही ६/७ जण होतो.. मुलींच्या कोणत्याही बाई सोबत नव्हत्या.. खरेतर आम्ही दीपालीच्या प्रर्थानेपासून कार्यक्रम सुरु करणार होतो.. मुलींचा असा हा कलका जरा अनपेक्षितच होता.. पण तेव्हढ्यात  सुचित्राने एक खेळ सुरु केला, शिवाजी म्हणले डोक्यावर हात ठेवा तर सर्व मुलीनी शांत होऊन डोक्यावर हात ठेवला, असंच मग टाळी वाजवा वगैरे करायला सांगून सगळ्यांना खेळत सामील करून घेतले.. ही एक खास कला आहे, आम्ही सर्वांनी सुचीत्राला मानले.. नंतर तिच्याकडून अशा खेळांचे प्रशिक्षण आधी आपण घेऊ असे ठरवले..  आता दीपालीने तिच्या गोड आवाजात अन सुरात रामाची प्रार्थना  सुरु केली,सुचित्राही तिच्यासोबत होती.. त्या दोघींच्या मागे आम्ही सर्व मुली एकेक ओळ म्हणत होतो.. काही मुली खरच हात जोडून डोळे बंद करून मनापासून गात होत्या,सुरुवात छान झाली.. नंतर प्रत्येकीची ओळख करून घेतली..

त्यांनतर महाराष्ट्र राज्य स्तरावर कथा लेखनाच्या स्पर्धे मध्ये बक्षीस मिळवलेल्या कौशल्याची गोष्ट सर्वांना वाचून दाखवायची होती.. खरतर इथे सर्व वयोगटातल्या म्हणजे अगदी छोट्या छोट्या मुलींपासून कॉलेजच्या मुलींपर्यंत सर्व मुली होत्या.. ती गोष्ट बरीच  मोठी होती, ती सर्वांना कळेल का अशी शंका आम्हाला वाटत होती पण कौशल्याच्या कौतुकासाठी दीपालीने ती गोष्ट सर्वांना वाचून दाखवली.. आणि विशेष म्हणजे मुलींनी ती मन लावून ऐकली.. काही छोट्या मुलींची चुळ बुळ चालू होती पण इतरांनी मात्र शांतपणे ऐकली.. त्या मुलींना असं ऐकूनच अभ्यास करायची सवय असतेना.. शिवाय  ती गोष्ट अतिशय उत्तम लिहिली होती,आम्ही पण ऐकतच राहिलो..

आता २ गट करण्यात आले.. ज्यांना चित्र कलेत रस आहे त्यांना कागत आणि रंगीत खडू दिले.. स्मिता अन शिल्पा सर्वांना लागेल ते साहित्य देत होत्या.. दुसर्या गटात ज्यांना चित्र काढायचे नव्हते त्यांच्यासाठी सुचित्रा आणि दीपाली खेळ घेत होत्या.. हा आमच्या योजनेतला भाग नव्हता, ऐन वेळेस खेळ घायचे ठरले ते सुचित्रा दिपालीने छान घेतले.. स्मिता, मुकुंद दोन्ही ग्रुपमध्ये लागेल ती मदत करत होते..  सोनिया आणि मी चित्रकलेच्या इथे सर्वांना काय हवंय नकोय ते पाहत होतो.. काही मुलींनी शिस्तीत स्टूल आणून त्यावर ठेवून चित्र काढायला सुरुवात केली.. आम्ही त्यांना पाहिजे ते आवडेल ते काढायला सांगत होतो.. बर्यापैकी मुली  निसर्गाचे चित्र, डोंगर,सूर्य, पक्षी, घर, नदी, झाड, फुले  वगैरे काढत होत्या.. काहींना थोडसं दिसत होता त्या अगदी वाकून जवळ जाऊन चित्र काढत होत्या.. पाचवीच्या पुढच्या मुलींना शाळेत चित्र कादाह्यचे शिकवले जाते असे त्या मुली सांगत होत्या.. काही जणींची चित्रे इतकी सुंदर होती कि मला दोन डोळ्यांनी दिसूनही तसे आयुष्यात कधी काढता येणार नाही, अतिशयोक्ती नाही.. काही मुली सांगायच्या ताई, मला निळा  रंग दे, मग आपण त्यांना निळ्या  रंगाचा खडू काढून द्यायचा मग त्या त्याने पाणी किंवा आकाश काढायच्या.. प्रत्येकीच्या जवळ जाऊन आम्ही सगळे त्या काय काढत आहेत वगैरे गप्पा मारत होतो तेव्हा आमचे त्यांच्याशी छान सुत जमले..  एक गम्मत झाली.. माझ्या सारख्या चित्रकलेचा गंध नसलेल्या मुलीला एकीने  फुल काढायला  शिकवायला सांगितले, बापरे आता मी काय करू असे मला झाले.. तिचे बोट धरून मी माझ्या बोटांनी एक फुल काढले, साधे सोपे.. :) ती म्हणली ती सराव करेल म्हणून.. तिथे दुसरीकडून गाण्यांचा , टाळ्यांचा आवाज येत होता.. पासिंग द पार्सल वगैरे खेळ चालू होते.. आम्ही या सगळ्यात  इतके व्यस्त होतो कि कधी ४ वाजले कळलेच नाही.. आता हळू हळू चित्रे गोळा करायला लागलो.. तेव्हा त्या प्रामाणिक मुली चित्रांसोबत खडूची पेटीसुधा परत देत होत्या,आम्हाला भरून आले.. किती हा निरागसपणा.. ते रंग, कागद त्यांच्यासाठीच सगळे आणले आहे हे ऐकून त्या खुश झालेल्या दिसत होत्या..

आता परीक्षकाचे काम सोनिया करत होती.. ती म्हणली कि बरीच चित्र इतकी सुंदर आहेत कि यातील फक्त ३ क्रमांक काढणे अवघड  आहे.. म्हणून मग आम्ही जास्त बक्षिसे द्याची ठरवले.. पण पाकिटे कमी होती मग स्मिताने कागदाची पाकिटे करायला सुरुवात केली.. दीपालीने कात्री सेलोटेप आणलं होतं.. मी म्हणले ट्रेकिंगला कसे आम्ही मेडिकल कीट घेतो तसे अशा कार्यक्रमांना कात्री, सेलोटेप वगैरे घेणे महत्वाचे कसे आहे हे आज समजले.. यातूनच आम्ही खूप काही शिकत होतो.. सोनिआने नंतर सुचवले कि पाकिटे तशीही आपण बाईंना देणार आहोत तर एकच रक्कम देऊ,  बाई मुलींच्या खात्यात जमा करतील.. आता ऐनवेळेस हे सुचणेपण भारीच होते.. म्हणजे पहाना सगळ्या जणींची विविध कौशल्ये मिळून आमचा हा उपक्रम चांगल्या रीतीने पार पडत होता!!! :)

नंबर काढेपर्यंत मुलींना दम नव्हता, कोणी जवळ येऊन म्हणयचे काय बक्षीस देणार आहात..  शेवटी आम्ही १५ मुलींना चित्रकलेत आणि ६ जणींना इतर खेळासाठी  - गाण्यासाठी बक्षिसे जाहीर केले.. नंतर नावांची यादी अन पैसे बाईंकडे सुपूर्त केले.. निघताना मुली अगदी स्वतहून येऊन आवडलं, thanks म्हणून जात होत्या.. काहीजणी बर्याच गप्पा मारत होत्या.. एकंदर कार्यक्रम व्यवस्थित पार पडला असे आम्हा सर्वांना वाटत होते..  

मुलींचा निरोप घेऊन ५नन्तर आम्ही ग्रुपवाले चहा घ्यायला गेलो.. आज काय  काय झाले , पुढे अजून कशी कुठे सुधारणा करता येईल आणि पुढचे  कार्यक्रम याबद्दल चर्चा केली.. आम्ही सगळेच एका वेगळ्या आनंदात अन समाधानात दिसत होते.. ही तर सुरुवात आहे,  खूप काही करायचे आहे!!! :)

मंगळवार, ११ सप्टेंबर, २०१२

मंतरलेले दिवस - ७०

हल्ली रोज सकाळी घरातून बाहेर पडते तेव्हा हिरवीगार झाडे शुभ्र धवल फुलांनी बहरलेली दिसतात.. नाजूक पानेफुले पावसांच्या पाण्यामध्ये चिंब भिजलेली दिसतात.. जाई, जुई, सायली यांचा सुगंध हवेत दरवळत असतो..  फुले किती प्रकारची असतात ना..  किती विविध रंगाच्या छटा पहावयास मिळतात.. आपल्यासारखेच तेही जन्म घेताना नशीब घेऊन येतात.. कोणी सुंदर असते, कोणी सुवासिक असते.. कोणाला शोभेसाठी वापरले जाते.. कोणाला स्त्रीच्या केशरचनेत बसायचे भाग्य मिळते.. कोणी प्रेमाचे प्रतिक बनते.. काहीना नेत्यांच्या अन वीरांचा सहवास मिळतो.. तर काही दोन जीवांच्या विवाहाचे  साक्षी ठरतात..  कोणी भून्ग्यासोबत खेळते.. कोणी झाडे वेलीन्वरच  डोलतात..  तर काही खास फुले देवांच्या, संतांच्या गळ्यामध्ये अन चरणकमलांवर विराजित होतात आणि त्यामुळे त्यांचा जन्म सार्थकी लागत असेल..

काही फुले मात्र एखाद्या सरीने किंवा वाऱ्याच्या धक्याने गळून पडतात.. अशा फुलांना कोणीच वाली नसतं..  कोणीतरी येऊन धक्का देतं आणि त्यांचं आयुष्य बदलतं..  मी रोज पाहते, लोकं चढून वाकून पूजेसाठी किंवा गजरयासाठी चांगली चांगली फुले निवडतात.. पण मग खाली पडलेल्या फुलांना किती वाईट वाटत असेल.. त्यांना कोण उचलणार? त्यांनाही आतून ओढ लागतच असेलना परमेश्वर भेटीची..

असाच विचार करता करता रस्त्यावरच्या एका पुष्पाने मला आकर्षून घेतले.. मी सहज हातात घेतले अन पहिले.. किती ती कोमलता, नाजूकता.. पावसाच्या पाण्याने अन रस्त्यावरच्या चिखलाने ते एका चिखलात खेळणाऱ्या अल्लड बालकाप्रमाणे दिसत होते..

पुढे काय होत असेल अशा फुलांचे.. मातीत विरघळून जात असतील का? एखादी गाडी किंवा मनुष्याचा पाय त्यास चीरडवून जात असेल का?  विचार करवतच नव्हतं.. चालत चालत मी गणपतीच्या मंदिरापाशी आले.. अन त्या फुलाला देवापाशी अर्पण केले.. शेवटी सर्वांना तिकडेच जायचे आहे पण हा अंत काळ तरी चांगला जावा असे वाटले..

अशा प्रकारे या सृष्टीत नाना तर्हेने मलीन झालेल्या जीवांना भगवंताचे सानिध्य सदगुरूंकडून लाभत असेल.. असेच भाग्य तुम्हा आम्हाला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!

श्यामवर्णी तू मेघराजा तू..

श्यामवर्णी तू मेघराजा तू..  अंगणात माझ्या बरस रे..
असंच अविरत अन वेड्यागत.. सरींवर सर कोसळ रे ..

लडिवाळपणे नाचत वाजत..  चिंब चिंब भिजव रे..
जड देहाचे जड वस्तूचे.. विस्मरण मला घडव रे..

शुभ्र मोती तव बिंदूंचे..  खोल खोल रुजव रे ..
विरघळवूनी विचार सारे.. मनात अत्तर  शिंपड  रे..

कणकण सारे निर्मळ करुनी..  आसमंत हा सजव  रे..
क्षणक्षण नवचैतन्याने भरुनी..  अंतरंग हे फुलव रे..

रविवार, २ सप्टेंबर, २०१२

मंतरलेले दिवस - ६९

आज पर्यंत मी मोठमोठ्या साहित्यिकांचे वाचन केले.. मी स्वतः मला आलेले कितीतरी अनुभव लिहिले,इतरांना दाखवले.. पण याहून मौल्यवान असलेल्या खास अशा साहित्याचा मला नुकताच शोध लागला.. त्यावर आधारित हा लेख लिहित आहे. 

त्यादिवशी अंजली ताईंचे  (गीतांजली जोशी) फेसबुकवर इन्व्हाईट आले होते..  साहित्यातील - कवितेतील  त्यांची उंची  आणि प्रेम या गोष्टींनी त्या सुप्रसिद्ध आहेतच पण मला विशेष भावते ते त्यांचे आदरणीय व्यक्तिमत्व.. ना सी फडके यांच्या कन्या असून अहंकाराचा किंचितही स्पर्श जाणवत  नाही.. आणि त्यांचे सामाजिक कार्य मला नेहमीच त्यांच्याकडे आकर्षून घेते.. मी उत्सुकतेने पाहिले ,कसले आमंत्रण आहे ते.. "दृष्टिहीन बांधवांच्या  लघुकथा स्पर्धेचा  पारितोषिक वितरण सोहळा.."  मी लगेचच अंजली ताईंना फोन केला,माहिती विचारली.. त्या म्हणल्या तू ये,तुला आवडेल.. आणि तू आलीस तर आम्हालाही आवडेल.. बास मग मी लगेचच जायचे निश्चित केले.. घरून जरा आरडाओरड झाली.. म्हणजे मी सारखी कुठेतरी भटकत असते म्हणून.. पण या कार्यक्रमाची माहिती दिल्यावर ते ठीक आहे म्हणले..

कार्यक्रम गणेशखिंड येथील  बालशिक्षण संस्थेत होता.  तिकडे गेल्या गेल्या अंजली ताई म्हणल्या, माझी छोटी मैत्रीण अजून कशी आली नाही असा विचार करत होते मी..  :)  लगेचच कार्यक्रम सुरु झाला.. पुढे पहिल्या रांगेत विजेते बसले होते.. व्यासपीठावर  एकांश संस्थेच्या अनिता अय्यर, विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक संजय जैन, बालकल्याण संस्थेच्या मिनिता  पाटील आणि गीतांजली जोशी असे मान्यवर उपस्थित होते.  सर्वप्रथम अनिता म्याडम यांनी लघुकथा स्पर्धेबद्दल थोडक्यात माहिती सांगितली.. लेखनातून आपण आपले विचार अनुभव मांडत असतो.. आतापर्यंत दृष्टिहीन व्यक्तींनी पण लेखन केले पण ते कल्पनेतून साकार झालेले किंवा इतरांकडून ऐकलेल्या वर्णनावर आधारित होते.. या स्पर्धेची कल्पना थोडी वेगळी होती.. दृष्टिहीन व्यक्तींनी त्यांना आलेले खरे अनुभव , त्यांचे विचार मांडायचे असा आशय होता.. त्यांचेही एक जग आहे, तेही सुंदर आहे याची सर्वाना जाणीव व्हावी, माहिती व्हावी हा हेतू होता.. संपूर्ण  महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला होता अन त्यातून प्रथम ३ क्रमांक आणि २ उत्तेजनार्थ निवडले गेले.. त्यासाठी परीक्षक मंडळींमध्ये लेखक राजन खान, सकाळचे मल्हार अरणकल्ले आणि प्राध्यापक जैन हे होते.  यास्पर्धेसाठी गीतांजली जोशी यांची खूप मदत झाली असे अनिता म्याडमने आवर्जून सांगितले.. त्यानंतर अंजली ताई त्यांच्या मधुर  वाणीतून बोलल्या.. त्या  हा उपक्रम पुढे जाण्यासाठी खास कार्यशाळा घेणार आहेत असे म्हणल्यावर सारेजण खुश झाले..  मीपण माज्या परीने जी काही मदत करता येईल ती करेन असे मनोमनी ठरवून टाकले..

आता प्राध्यापक संजय जैन यांनी बोलायला सुरुवात केली आणि कार्यक्रम एका उंचीवर गेला.. ते विधी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत आणि ते स्वतः दृष्टिहीन आहेत हे मला तेव्हाच कळले.. त्यांनी स्पर्धकांच्या कथा वाचताना आलेले विचार मांडले  कथा उत्तम आहेत, सर्व स्पर्धकांमध्ये लेखनाची आवड आणि गुणवत्ता आहे.. अंजली ताई म्हणल्याप्रमाणे कार्यशाळा घेऊन यांना लिहिण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास हे सगळेजण पुढे जातील यात तीळमात्र शंका नाही.. नंतर त्यांनी त्यांचे वैयक्तिक अनुभव सांगितले..  आपली भाषाच कशी विचित्र आहे, एखाद्याला आपण किती सहजतेने 'आंधळा आहेस का ' अशी शिवी देतो अशी कित्येक  वास्तववादी उदाहरणे ऐकून माझ्या डोळ्यातून अचानक घळाघळा पाणी वाहू लागले.. एखाद्या व्यक्तीमध्ये काही कमी असेल तर त्यांना लोकं हसतात का हे समजत नाही..  मला स्वतःला कानाचा थोडा त्रास आहे, लहानपणी खूप सर्दी व्हायची तेव्हापासून.. त्यामुळे टीव्ही मालिकांमध्ये जेव्हा ऐकू कमी येणाऱ्याबद्दल जोक्स केले जातात तेव्हा मला खूप वाईट वाटते.. आंधळ्याप्रमाणे बहिरा हापण शब्द शिवी किंवा चेष्टा मस्करी करण्यासाठी वापरले जाते.. ते जे बोलत होते ते मला अगदी नीट समजत होते.. कारण मलाही असे थोडेफार अनुभव आलेले आहेत.. ज्याने आयुष्यात काही सोसले आहे तोच इतरांचे दुख हाल समजू शकतो,बाकीच्या लोकांना काय समजणार!  रडू आल्यावर मला वाटले हे काय मला काय होतंय असं पण मग आजूबाजूला सगळ्यांचेच डोळे ओले आहेत ,अगदी व्यासपीठावरील सर्वांचे देखील असे दिसले.. सत्य कटू असते,पचवायला अवघड असते..  बोलता बोलता त्यांनी एक हृदयाला भिडणारा अनुभव सांगितला.. एकदा ते त्यांच्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेले होते.. त्यांना डोसा आवडूनही ते कधीच घेत नाही हि गोष्ट मित्रांना समजली होती म्हणून मित्रांनी मुद्दाउन सर्वांसाठी डोसा मागवला.. तर जैन सर म्हणले मला कट्या चमच्याने खाता येणार नाही अन मला डोसा हाताने खायचा नाही.. हे ऐकून त्यांच्या सर्व मित्रांनी डोसा हाताने खायला सुरुवात केली.. या उदाहरणातून त्यांना असे सांगायचे होते कि दृष्टिहीन व्यक्तींना अशा चांगल्या मित्रमंडळींची आवश्यकता आहे..

नंतर पारितोषक वितरण झाले.. सर्व विजेतांच्या घरची मंडळी अन स्नेही त्यांच्या कौतुकासाठी उपस्थित होते. त्यानंतर प्रत्येक विजेत्यांनी आपले आपले मनोगत मांडले.. मला आश्चर्य वाटले कि उद्या मला पुढे जाऊन सर्वांसोबत बोलायला सांगितले तर मी इतकी सुंदर व्यवस्थित बोलू शकणार नाही जितके हि सर्व मंडळी उत्तम पणे बोलली.. त्यांच्यातल्या आत्मविश्वासाला मी मनातून मनाचा मुजरा केला.. आपण जे क्षण भोगतो, अनुभवतो ते आपल्या पद्धतीने आपल्या विचारून मांडायला मिळाल्याने आणि त्याची दाखल घेऊन इतके कौतुक झाल्याने सर्व जण खूप खुश आणि समाधानी वाटत होते. प्रत्येकजणच  आपल्या आपल्या कथेबद्दल, त्यासाठी सहकार्य केलेल्या त्यांच्या सोबत्यांबद्दल अन या स्पर्धेबद्दल भरभरून बोलले.. ते ऐकता ऐकता पुन्हा पुन्हा डोळे भरून येत होते.. त्या सर्वांचे वाचन , अभ्यास , माहिती, गंमती जंमती  हे सर्व एकून मी स्तिमित होत होते..

एकांश संस्था नुसते पारितोषिक देऊन थांबणार नाही तर या कथांचे  करून  रेकॉर्डिंग  करायचा त्यांचा मानस आहे.. त्यासाठी एका ग्रुपच्या वतीने रेकॉर्ड केलेली एक कथा सर्वांना ऐकवली गेली.. ते ऐकताना चित्र जसेच्या तसे समोर उभा राहत होते.. ते ऐकून हा उपक्रम पुढे छान होणार आहे याची सर्वांना कल्पना आली..

कार्यक्रमानंतर अंजली ताई म्हणल्या कसा वाटला, मी म्हणले मला फार बरं वाटतंय आज मी इथे आले, खूप प्रेरणा मिळाली,मलाही तुमच्या सोबत काम करायला खूप आवडेल.. मग त्यांनी लगेच अनिता म्याडमशी माझी ओळख करून दिली.. बघूया आता पुढे माझ्या बाजूने मी करता येईल तेव्हढे काम नक्की करेन..  कोथरूड मधील अंधशाळेतील कौशल्या या कन्येला  उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले म्हणून तिच्यासोबत तिच्या शाळेतील बाई आणि काही विद्यार्थिनी आल्या होत्या. मी त्यांच्याशी थोडे बोलले.. त्या बाईंना म्हणले माझ्याकडून काही करता येण्यासारखे असेल तर मला सांगा.. त्या म्हणले आमच्या शाळेत येना कधीही मग आपण सविस्तरपणे बोलू. मी ठीक आहे म्हणले.. आता एका शनिवारी मी शाळेत जाऊन येईन, पाहूया चांगली संधी मिळणे हाही एक नशिबाचा भाग असतोना.. असे चांगले काम मिळण्याची प्रेरणा मिळावी, संधी लाभावी, हा जन्म सत्कर्मासाठी कारणी लागावा  अशी परमेश्वराकडे मनापासून प्रार्थना!!






सोमवार, २० ऑगस्ट, २०१२

मंतरलेले दिवस - ६८


बऱ्याच दिवसांनी जोडून सुट्ट्या आल्या  होत्या.. प्रत्येकाचे काहीना काही आपले आपले कार्यक्रम होते.. माझा मात्र यावेळेस काहीच बेत नव्हता.. एक दिवस कुठेतरी जाऊन येणार हे नक्की होतं माझं पण कुठे कोणासोबत कशासाठी हे मलाच माहिती नव्हतं.. कारण त्यामागची योजना काही वेगळीच आखून ठेवली गेली होती.. :)
शुक्रवारी सहजच मनात आले कि नेहमी मी स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी किती भटकते.. यावेळेस काहीतरी वेगळं करावे.. कालच घाटघरच्या आसवल्यांचा फोन आला होता, कधी येणार इकडे,मुले वाट पाहत आहेत म्हणून.. जाऊयाका तिकडे? त्या गावातल्या मुलांसाठी वह्या पेन वगैरे शालेय साहित्य अन खाऊ घेऊन जाऊया,छान वाटेल..

बऱ्याचजणांचे प्लान आधीच ठरले होते त्यामुळे त्यांना विचारण्यात अर्थ नव्हता.. शिवाय काही लोकांना अशा उपक्रमांमध्ये विशेष रस नसतो म्हणून मग त्यांनाही नाही विचारले..  असं करून ४ मैत्रिणींना sms केले..  रात्री एकीचे उत्तर 'नाही' आले.. तिच्याकडून मला जास्त आशा होत्या.. दुसरी नंतर कळवते म्हणली आणि तिसरीचाही शनिवारी सकाळी नकार आला.. चालायचंच, प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगवेगळ्या असतात..  मला सावरकरांच्या ओळी आठवू लागल्या..

जो साथ देगा, उसे साथ लेकर चलेंगे,
जो साथ नहीं देगा उसे छोडकर चलेंगे
और जो राह मे बाधा बनेगा उसे ठोकर मार कर चलेंगे
लेकिन चलना हमारी नियति है।

हे धोरण स्वीकारून मी धीर धरला.. जास्तीत जास्त काय होईल,कोणीच सोबत नाही आलं तर आपण एकटे  जायचे पण आता मनात आलंय तर जाऊनच यायचं,माघार घ्यायची नाही.. अनायसा सुट्ट्या आहेत आणि वेळ आहे.. उद्याचे कोणाला काय माहिती? शिवाय बसने सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत जायचे अन तिकडे आसवले कुटुंबीय माझ्या चांगल्या परिचयाचे.. प्रश्न फक्त घरी काय सांगायचा हा होता.. भगवंताने माझे मन ओळखले अन अर्चनाचा फोन आला कि ती येत आहे म्हणून, मला खूप बरं वाटलं.. तिला म्हणले बसने जाऊ, शाळेला उपयोगी पडतील अशा गोष्टी अन खाऊ घेऊन जाऊया.. अजून तुला वेगळी कल्पना सुचत असेल तर सांग तेव्हा ती म्हणाली माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.. हा विश्वासच महत्वाचा असतो नाही?  ग्रुप मोठा असला असता तर सरळ गाडी करून गेलो असतो पण आता दोघीच म्हणजे मग बस बरी.. ट्रेकिंगचे सगळे मित्र मंडळी बाहेरगावी फिरायला गेले होते त्यामुळे घाटघर बद्दल आता कोणाला विचारू असा प्रश्न पडला.. मग काय गुगल हैना..  इथून जुन्नर बस आणि पुढे दुसरी बस असा प्रवास.. पाहूया जसे जे मिळेल तसे जाऊ असे मनाशी ठरवले..

शनिवारी दुपारी दीपालीच्या कार्यक्रमाला गेले होते, तिथे अळूची भाजी, पुरण पोळी असे मस्त जेवण झाले होते.. खरतर आता छान  वामकुक्षी घ्यावी असे मनात होते पण म्हणतात ना 'निजला तो संपला'.. म्हणून मग लगेचच अप्पाबाल्वंत चौकाकडे मोर्चा वळवला.. किती दिवसांनी मी शालेय खरेदी करण्यासाठी तिथे गेले होते.. सगळ्याच दुकानात पण ठेवायलाही जागा मिळणार नाही इतकी गर्दी.. वह्या घ्यायला गेले तर होलसेलचा भाव पण माझ्या अपेक्ष्पेक्षा खूप जास्ती होता.. आपण जुने झालो, काळ बदलला याची जाणीव झाली.. घाटघर मध्ये किती मुले आहेत याची नक्की माहिती मला नव्हती.. अधिक महिन्यात ३३ या संख्येला खूप महत्व असते म्हणे.. म्हणून मग मी ३३ वह्या, ३३ पेन्सिल्स, ३३ पेन्स, ३३ खोडरबर वगैरे घेतले.. ही खरेदी करताना मला जाम मजा आली.. दुकानदाराने खास डिसकाऊन्ट सुधा दिला..  मात्र नंतर गाडीपर्यंत त्या ३३ वह्यांचे ओझे भयंकर वाटले..विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे हा विषय इतका चर्चेचा का असतो हे समजले.. :) नंतर चितळे बंधून कडून खाऊ घेतला.. आई म्हणली अगं किती दमली आहेस.. पण चेहरा मात्र नव चैतन्याने फुलला होता!!!

रात्री एका ब्याग मध्ये एक वही, पेन्सील, रबर, पेन असे ३३ संच तयार केले.. हे करतानाही फार भारी वाटत होतं.. अर्चानाशी उद्या सकाळी कधी निघायचे वगैरे फोनवर बोलल्यावर बाबा म्हणले तिला नक्की यायचं ना, तू उगाच मैत्रिणींच्या मागे लागत जाऊ नकोस कारण अशा गोष्टींमध्ये फारसा कोणाला रस नसतो.. तेव्हा मी बाबांना म्हणले मी कोणाच्याही मागे लागले नाही.. :(  फक्त एकदा विचारले.. अर्चना जमतंय म्हणून ती येते म्हणली.. शिवाय तिला आवड आहे, मागे आम्ही ऑफिसमध्ये इतर स्टाफची पार्टी आयोजित केली होती तेव्हा ती  सोबत होतीच..

सकाळी सकाळी ७.१५च्या बसने आम्ही जुन्नरला निघालो.. दोन मैत्रिणी भेटल्या की गप्पांमध्ये वेळ कसा जातो समजतही नाही.. मी काल इतर सगळी खरेदी केली होतीपण ते करता करता आज आमच्यासाठी खाऊ घ्यायला जमले नव्हते.. अर्चनाने आणलेला  खास ब्रेडज्याम खाऊन तृप्त झाले.. दोघीही आज तिकडे गावात काय काय घडतंय याबद्दल उत्सुक होतो.. अर्चनाला आसवले यांच्याबद्दल माहिती सांगितली.. १ वर्षपूर्वी मागच्या १५ ऑगस्टला मी अमोलसोबत चावंड-हडसर-नाणेघाट ट्रेकला गेले होते तेव्हा आम्ही यांच्याकडे मुक्काम केला होतं.. त्यांनी दिलेल्या काळ्या चहाबद्दल मी लेख लिहिला होता तो अर्चनाला आठवत होता.. तेव्हापासून त्यांचा नेहमी मला फोन येतो आणि आता आमचा चांगला परिचय झालाय असे तिला मी सांगितले..

आमच्या पुढे बसलेल्यांनी आम्ही घाटघरला जाणार आहोत असे ऐकले आणि म्हणले असवल्यांकडे जात आहात का.. यांना कसे काय ते माहिती याचे आम्हास आश्चर्य वाटले.. लाल डब्बा डूगु डूगु  चालत शेवटी १० वाजता जुन्नेरला पोहचली..  तिथूनच पुढे घाटघरला जाणारी बस आमची अगदी २ मिनिटाकरिता थोडक्यात चुकली.. आणि आता पुढची बस थेट १२.३०वजता होती.. इतका वेळ थांबून इथे काय करायचा आणि त्या बसने घाटघरला पोहोचायलाच फार वेळ लागेल मग रात्री उशीर होईल.. उद्या मला सुट्टी आहे पण अर्चनाला ऑफिस आहे..  ती ब्याग घेऊन फिरणे मुश्कील झाले होते, वह्यांचे वजन फार होते.. आता आधी नाश्ता करूया मग बघू पर्यायी जीप/रिक्षा मिळतेय का असे आम्ही ठरवले.. असवल्यांना जेवून आलोय सांगायचे होते म्हणून आम्ही हेवी नाश्ता केला,म्हणजे नंतर जेवायला उशीर झाला तरी चालेल असा..

नंतर चौकशी केल्यावर जीपवाले म्हणले घाटघरला इतक्या लांब जीप जात नाही.. रिक्षावाले तर काहीही पैसे सांगत होते.. शेवटी एकाने गावात थोड्या आतल्या बाजूला एकीकडे जीप मिळेल असे सांगितले.. शोधत शोधत शेवटी घाटघर जीपचा पत्ता लागला.. चालताना अर्चनाला म्हणले तुला असं तर नाही वाटत न वृन्दासोबत मी इथे कशाला आले.. ती हसत नाही म्हणली.. असं जाण्यात गम्मत आहेना.. मी हो म्हणले , प्रवास म्हणला कि बस चुकणार,  टायर पंक्चर होणार वगैरे वगैरे.. आपण त्या गोष्टींकडे कसे बघतो हे महत्वाचे.. जीप तर आता मिळाली होतीपण तो ड्रायवर सगळी सीट  भरल्याशिवाय न्हेणार नव्हता.. त्याचेही बरोबर होते म्हणा.. शेवटी आम्ही त्याला थोडे ज्यादा पैसे देऊन  निघायला सांगितले कारण आम्हाला शक्य तितके लवकर जाऊन यायचे होते..

जुन्नर - घाटघर प्रवास १ नंबर होता.. तिथे बराच पाऊस झालेला दिसत होता अन आज रिमझिम चालू होता.. सगळीकडे हिरवीगार भाताची शेतं,  सह्याद्रीच्या रांगा,  उन फेसाळते शुभ्र धबधबे.. किल्ले शिवनेरी, किल्ले चावंड, कुकडेश्वर मंदिर हे सगळे मी अर्चनाला दाखवत होते,जणू कि मी तिथलीच आहे.. ती जीप भारी होती, सगळीकडून उघडी आणि रस्ते तर त्याहून  भारी होते त्यामुळे निसर्गाचा आनंद मन मुराद  लुटता आला.. त्या ड्रायवर चे विशेष वाटले.. जाता येता  स्वताहून थांबून सर्वांशी बोलत होता.. गाववाले पण कुठून कुठे कशासाठी चालले आहेत हे अगदी मोकळेपणाने सांगत होते.. नाहीतर इथे शहरात प्रत्येकला आपलं सगळं गुप्त ठेवण्यात फार आनंद वाटत असतो..

तो जीपचा ड्रायवर अन गाडीतली इतर मंडळी सर्वजण आसवले यांना ओळखत होती.. घाटघरला पोहचल्यावर आसवले काका आम्हाला बाहेरच भेटले, त्यांनी लगेचच त्यांच्या घरी आम्हाला नेले.. ताईंना आम्हाला अचानक पाहून सुखद धक्का बसला.. काय करू अन काय नको असे त्यांना झाले.. आम्ही त्यांना लगेचच सांगितले कि इथल्या गावाल्तल्या सर्व मुलांना बोलावून  आणा,त्यांच्यासाठी आम्ही गम्मत आणली आहे.. त्यांनी त्यांच्या मुलांना इतरांना बोलावयाला पाठवले.. तोपर्यंत जेवून घ्या असा आग्रह ते करत होते पण आम्ही जेवून आलोय असे त्यांना सांगितले.. मग त्यांनी चहा केला.. यावेळेस दुध घातलेला चहा घेताना त्यांनाही मागच्या काळ्या चहाची आठवण झाली..   थोड्या गप्पा मारल्या.. तोपर्यंत सगळी मुले जमा झाली.. त्यांना एकत्र बसवले.. आधी त्यांची तोंडओळख घेतली अन आमचीपण ओळख सांगितले.. सगळे शाळेत जाताना विचारले.. मग सर्वांना वही पेनाचे एकेक संच दिले अन खूप खूप अभ्यास करून मोठे व्हा असे आम्ही म्हणले.. त्यातले त्यांना किती समजले माहिती नाही पण सगळे उत्सुकतेने ब्यागमध्ये काय आहे ते पाहत होते.. नंतर खाऊ दिला, तो घेऊन मग पोरं लगेचच पसार झाली.. चला महत्वाचे काम झाले असे म्हणून आम्ही शांत बसलो.. ३/३.१५ला परतीची बस गाठायची होती.. तोपर्यंत आसवले ताईंशी गप्पा मारल्या.. ताईंनी मोठ्या मनाने त्यांच्या शेतातला आंबेमोहोर तांदूळ घरी वापरायला  दिला..  गावात दवाखाना  नाही,जुन्नरला जावे लागते हे कळल्यावर वाईट वाटले.. भारत किती सुधारला आहे याचे हे एक उदाहरण.. अशाच गप्पा मारून शेवटी आम्ही बस स्टोपवर आलो..

बसला वेळ होता तोपर्यंत मी तिथे यथेच्च फोटोस काढले.. सगळीकडे हिरवीगार शेतं, त्यात काम करणारी लोकं,  चहूकडे ढगात लपलेले सह्याद्रीची  शिखरं.. कुठेतरी दूरवरून खळ खळत येणारं पाणी..  मधेच धुक्यात ढगात हरवणारा आसमंत.. मी खरच वेडी झाले होते.. नंतर जीप आल मग त्यातूनच जुन्नरला निघालो.. आता कडकडून भूक लागली होती.. बिस्किट्स खात जुन्नरला आधी छान काहीतरी खाऊ असे बेत आम्ही रचत होतो.. पण जुन्नरला ५ल पोहचलो तेव्हा पुण्याची ५ ची शेवटची बस होती असे कळले.. बरं झालं ती तरी बस आमची चुकली नाही.. आता ब्यागचे ओझे नव्हते..  गर्दीत चढून  जागा पकडायची मला सवय आहे त्यामुळे मी तिकडे गेले तोवर अर्चान्ने वडापाव पार्सल आणला..  बसमध्ये अर्चना झोपली तेव्हा मला वाटले किती दमवले मी हिला.. माझ्यासोबत असणार्यांना नेहमी असे कष्ट घ्यावे लागतात बहुतेक म्हणून मला कोणी लाईफ पार्टनर मिळत नसावा..  :)

आणि अशा रीतीने आम्ही पुण्यात ८ वाजता पोहचलो.. घरी येताना जरो दमलो असलो तरी सुट्टी सत्कारणी लागली याचा एक वेगळा आनंद वाटत होता.. आई बाबांनादेखील सगळं वृतांत ऐकून छान वाटले.. भगवंताने या कार्याची प्रेरणा दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानले!







बुधवार, ८ ऑगस्ट, २०१२

मंतरलेले दिवस - ६७

त्या मावशी..
त्या दिवशी जरा हळू हळू सावकाश कोणाला काही समजणार नाही अशा पद्धतीने मी चालत होते.. पण शेवटी बागेत काम करणाऱ्या मावशींनी विचारले.. काय हो म्याडम, काय झालं.. मी हसून पहिले त्यांच्याकडे आणि मान हलवून काही नाही असे म्हणले.. कोण कुठल्या त्या पण किती लक्ष त्यांचं माझ्याकडे.. आम्ही मागे एकदा या बागेतल्या आणि हाउसकीपिंग स्टाफला पार्टी दिली होती बास, तेव्हापासून रोज इकडे तिकडे जाता येता हे लोक आवर्जून विचारपूस करतात.. आणि आज मला कळले कि ते मनापासून विचारतात, औपचरिकता मुळीच नसते त्यात..  कालच वाढदिवस झाला अन आज लगेच वय वाढल्याच्या खुणा दिसू लागल्या कि काय असे वाटू लागले.. एरवी कॅम्पस  मध्ये फुलपाखरासारखी बागडणारी मी आज एका बिल्डींगमधून दुसऱ्या ठिकाणी जायलाही आढेवेढे घेत होते पण मिटींग्स साठी जाणे अपरिहार्य होते.. आणि आणि शेवटी जे नको व्हायला हवे होते.. मला असं काही झालंय हे कोणाला सांगायचं नव्हते कारण शेवटी माझ्या इमेजचा प्रश्न होता.. :)

ती काठी..
मार्च मधे आम्ही कात्रज - सिंहगड ट्रेक केला होता तेव्हा माझी काठी एका मैत्रिनीकडे राहिली होती.. त्याला आता किती दिवस झाले.. पण आजच नेमकी तिने मला आणून दिली.. आणि संध्याकाळी त्या काठीचा मला खरा खरा उपयोग झाला कारण मला एकेक पाऊल टाकताना आधराची गरज वाटत होती.. हातात काठी बघून सिक्यूरिटीवाल्यांनी आवर्जून चौकशी केली.. मला मात्र अवघडल्यासारखे वाटत होते..

ती मैत्रीण..
दिवसभर दुर्लक्ष केलं, अंगावर काढलं.. संध्याकाळी कॉलसाठी थांबावं लागलं..  माझी बिल्डींग बस थांब्यापासून थोडी लांब.. हातात काठी त्यात पाऊस.. तेव्हा ती  सोबत आली.. तिची आणि माझी तशी नवीन ओळख.. तरीही तिने मदत केली.. गरज लागेल तिथे आधार दिला.. हल्ली कोण कोणासाठी करतं इतकं.. ज्याला त्याला आपापले व्याप असतातना.. बस येईपर्यंत ती माझ्यासाठी थांबली होती..


तो रिक्षावाला..
ट्राफिक मुळे घरी जायला बराच उशीर झाला.. स्टोप  आल्यावर उतरण्यासाठी उठले तर काय मला चालताच येत नव्हते.. बाजूला धरत कशीबशी उतरले अन घरी फोन केला.. बाबा घरी नव्हते त्यामुळे घायला कोणी येऊ शकणार नाही असे कळले.. मग कधी नव्हे ते मी  मोर्चा रिक्षावाल्यांकडे फिरवला. ते स्त्याण्ड वरचे रिक्षावाले खूप आगाऊपने वागतात त्यामुळे मी एरवी त्यांच्याकडे चुकूनही बघत नाही.. पण आज त्यांनाही माझी हालत बघून दया आली.. कारण माझ्यात  एकेक पाऊल टाकण्याइतकाही आत्मविश्वास राहिला नव्हता..  रिक्षेत बसून रडत आईला सांगितले.. वृंदाने रिक्षा केली यावरूनच आईला प्रकरण गंभीर आहे याची कल्पना आली..  मी घरापाशी  उतरताना आई म्हणली मी कुलूप लावून येते, आपण त्याच रिक्षेने डॉक्टर कडे जाऊ.. मला त्या रिक्षावाल्यांची नाटके माहिती आहे त्यामुळे आईला म्हणले नको त्यांना थांबावे लागेल, बाबा आल्यावर मी जाईन नंतर.. तर तो रिक्षावाला चक्क म्हणला काही हरकत नाही, मी थांबतो.. त्याने डॉक्टरकडे सोडले तेही वेगळे पैसे न घेता.. शेवटी माणुसकी म्हणतात ती हीच..


ते डॉक्टर..
डॉक्टर मात्र कुल होते.. काहीतरी जड वस्तू विचित्र पद्धतीने उचलल्यामुळे किंवा अशाच काही कारणाने तुझी कंबर दुखत आहे असे ते म्हणले.. थोडे व्यायाम सांगितले आणि औषधे दिली.. मी म्हणले आईला सांगा हे ट्रेकिंग मुळे नाही झाले नाहीतर माझा ट्रेकिंग बंद करतील ते.. कारण आमच्याकडे मला काही झाले कि बाबा माझ्या भटकंतीवर आणि पाणीपुरीवर येतात..
डॉक्टर हसत म्हणले नाही नाही त्यांचा काही संबंध नाही.. उलट तुझी बॉडी एकदम  फ्लेक्जीबल आहे ट्रेकिंग मुळे.. मग मी म्हणले माझ्यासारख्या इतक्या फिरणाऱ्या मुलीला असे का व्हावे.. ते म्हणले काहीतरी चुकीच्या पद्धतीने उचललं असेल, वाकली असशील  किवा विटामिनची कमतरता झाली असेल,काळजीचे कारण नाही..



ती रात्र..

त्या रात्री मला जाणवले कि आपण किती पराधीन आहोत.. आज धडधाकट असलो तरी उद्याचे कोणाला माहिती.. शरीराच्या कोणत्याही एका अवयवात साधी कळ आली तरी आपले आयुष्य बदलून जाऊ शकते.. त्या रात्री मला माझ्याकडे आहे त्याची खऱ्या अर्थाने किंमत समजली.. देवाकडे प्रार्थना करत होते मी कि हे काय चालू आहे सगळे, आज भटकंतीमधेच काय तो मला आनंद वाटतो, तो माझ्याकडून हिरावून घेऊ नकोस.. मी आजपर्यंत शुल्लक गोष्टींसाठी रडले त्याबद्दल मला माफ कर.. त्या रात्री मला खूप रडू आले.. कदाचित काहीवेळे तो भगवंत आपल्याला रडायला लावून आपले गच्च भरलेले मन मोकळे करून घेतो कारण तेही महत्वाचे असते..

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मला आजच्या या दिवसात कितीजणांनी मदत केली त्यांचे मी मनातल्या मनात आभार मानले.. म्हणतातना अशावेळेसच लोकांची पारख होत असते.. मी नशीबवान आहे या बाबतीत.. भगवंताने साऱ्या सृष्टीवर माझा भार सोपवलाय असा विचार मनाला स्पर्शून गेला!!!

रविवार, २९ जुलै, २०१२

सुदाम्याचे पोहे - ९

हा लेख मी खास अश्विनी आणि ध्रुव यांच्यासाठी लिहित आहे.. बऱ्याच दिवसापासून मनात  होतं म्हणलं आता लिहूनच काढावं.. :) या दोघांची ओळख साधारण ३ वर्षापूर्वी एका ट्रेकला झाली.. त्यावेळेस  अगदीच नवीन ओळख होती, तेव्हा खरंच वाटलं नव्हतं  कि पुढे आम्ही कधी असे एकत्र येऊ..

अश्वीनीवर तर मी त्यादिवशीच इम्प्रेस झाले.. कारण ती संस्कृतची शिक्षिका.. टीमवी, स प आणि स्वतःचे खाजगी वर्ग..  शाळेत माझे पूर्ण संस्कृत होते तेव्हा मला फार मनापासून हा विषय आवडायचा.. आवड असल्यामुळे तेव्हा  माझं व्याकरण आणि अभ्यास चांगला होतं.. शिवाय स्कोरिंग विषय होता.. नंतर अभियंता क्षेत्र निवडले आणि संस्कृतचा संबंध तुटला.. अजूनही मला बरेचदा वाटते कि मी तेव्हा संस्कृत विषय घेऊन त्यात प्राविण्य मिळवायला हवे होते वगैरे.. तर सांगायचा मुद्दा कि संस्कृतच्या धाग्याने आम्ही जोडले गेलो.. माझ्या रोजच्या मेल्स मध्ये ती सहभागी झाली.. आपल्या कामात कितीही व्यस्त असली तरी ती आवर्जून मेल्स वाचते आणि आवडल्यावर कळवते देखील.. अशातच मागच्या ऑगस्ट मध्ये तिने तिच्या 'संस्कुतमित्र' या उपक्रमाबद्दल सांगितले.. याद्वारे दर महिन्यात संस्कुत संबंधित विषयांवर चर्चा, अभ्यास होईल असे तिने सांगितले.. मुख्य म्हणजे माझ्यासारख्या संस्कृतची आवड असलेल्या पण सध्या  संस्कृतच्या संपर्कात नसलेल्या लोकांसाठी या कार्यक्रमाचा फायदा होईल असे कळल्यावर मी लगेचच संस्कृतमित्र ची सभासद झाले.. कधी  कधी अश्विनी स्वतः एखादा विषय समजावून सांगते आणि कधी कधी संस्कृत मधील मान्यवरांना बोलावून त्यांचे भाषण आयोजित करते.. खूप वेगवेगळे विषय ऐकायला मिळतात.. कालीदासांची सविस्तर माहिती मला इथे नीट समजली आणि त्यामुळे त्यात रस वाटू लागला.. वेगवेगळी सुभाषिते ऐकायला मिळाली.. मला अगदी दर महिन्यात जायला जमले नाही पण तरीही जितके काही ऐकले ते खरंच कायम लक्षात राहील असे होते.. आता या उपक्रमाला एक वर्ष होतंय म्हणून अश्विनीने थोडा वेगळ्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला.. तिने तीन सभासदांची निवड केली आणि संस्कुत संबंधित कोणत्याही विषयावर बोलायला सांगितले.. त्यात माझे नाव होते.. मला आश्चर्य वाटले तिने मला कशी काय ही संधी दिली.. मी तर आपली साधी सुधी.. तिने एवढ्या विश्वासाने मला तिच्या उपक्रमात सहभागी करून घेतले यामुळे भारावून गेले.. मी 'आदि शंकराचार्य - कृष्णाष्टकाम' यावर थोडेफार बोलले.. पण खरंच तिथे मोठी मोठी लोकं होते कि मी यांना काय वेगळे खास सांगणार असे मला वाटले.. तो कार्यक्रम सुंदर झाला , बाकीच्या दोघांकडून खूप छान माहिती ऐकायला मिळाली.. खूप प्रसन्न वाटले त्या कार्यक्रमानंतर..

आता ध्रुवबद्दल.. ट्रेकला आम्ही भेटलो त्याधीपासूनच ध्रुवच्या फोटोग्राफी आणि भटकंतीबद्दल ऐकले होते..  त्या ट्रेकला जेव्हा माझी त्या दोघांशी ओळख झाली तेव्हा त्याची फोटोग्राफी प्रत्यक्ष जवळून बघायला मिळाली.. खास करून पक्षांचे फोटो अचूक अन सुंदर कसे टिपतात हे त्याच्याकडून कळले.. नंतर त्याचे फ्लिकर वर फोटो आवर्जून बघायचे मी.. गाड्यांची माहिती आणि कौशल्य ध्रुवाकडे विशेष आहे.. नंतर ट्रेकिंग अन माझ्या रोजच्या मेल्स मुळे ओळख वाढली.. मागच्या वर्षी जेव्हा त्याने सांगितले कि तो आणि इतर मित्र  मिळून ट्रेकिंग ग्रुप सुरु करत आहेत तेव्हा मला मनापासून आनंद झाला.. कारण मी मित्रांना,त्यांच्या ट्रेकिंग बद्दलच्या प्रेमाला आणि अभ्यासाला जवळून पहिले आहे.. शिवाय आता मला यांच्यासोबत दर महिन्यातून एक ट्रेक करायला मिळेल या कारणाने मला दुहेरी आनंद झाला होता.. पण तरीही पुढे कधी मी त्या सह्यात्री ग्रुपची मेंबर होईन असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते.. मागच्या महिन्यात धृवने मला सह्यात्रीमध्ये सहभागी होण्यात रस आहे का विचारले तेव्हा मला फार भारी वाटले.. नवीन मेम्बर्स म्हणून आम्हा सर्वांची एक मिटिंग झाली तेव्हा मला कळले कि एक ट्रेक आयोजित करताना किती काय काय करावे लागते.. त्यांची कामाची पद्धत अगदी cmmi  level  5 म्हणता येईल अशी.. planning , implementing , documentation  सगळे कसे अगदी व्यवस्थित, शिस्तीत.. मी फार प्रभावित झाले.. मला यातून खूप काही शिकायला मिळेल असे वाटू लागले.. धृवचे आभार कसे मानू समजेनासे झाले..

इतके सगळे सांगण्यामागचा हेतू हा कि या दोघा नवरा बायोकोंनी आपापल्या उपक्रमात मला सहभागी करून घेतले यासाठी मी दोघांची खरंच ऋणी आहे.. खरतर ते दोघंही त्यांच्याकडे असलेल्या गोष्टीनी माज करू शकतात पण तसे न करता ते दोघंही खूप चांगले वागतात याचे मला आश्चर्ययुक्त कौतुक वाटते.. अवघड वळणावर साथ देणारे खरे सोबती असे म्हणतात तसे हे दोघ माझ्या आयुष्यातल्या कठीण काळात त्याच्या उपक्रमामध्ये सहभागी करून मला साथ देत आहेत हे माझ्यासाठी खूप आहे..  कारण कित्येकजण ज्यांना मी जवळचे मानले होते ते आता मला विचारात सुद्धा नाही, मी सर्वांच्या मागे पडले म्हणून त्यांच्यात मला घेत नाहीत,बोलावीत नाहीत असे अनुभव मला आलेले आहेत.. काहीजण आपापल्या संसारात व्यस्त आहेतकी त्यांना वाटून सुद्धा बोलायला भेटायला वेळ त्यांच्याकडे बिलकुल नाहीये.. या पार्श्वभूमीवर अश्विनी आणि ध्रुव यांचा मला खूप आधार वाटतो.. पूर्वीची ओळख नसली तरी मी दोघांशी खूप मोकळेपणाने बोलू शकते आणि ते मला वेळोवेळी समजून घेतात त्याबद्दल मी त्यांचे आभार कोणत्या शब्दात मानू? सह्यात्री आणि संस्कृतमित्र या दोन्ही उपक्रमांसाठी  मी माझ्या बाजूने पूर्णपणे काम करेन,बस अजून काय म्हणू  मी!!!