गुरुवार, ३० जून, २०११

मंतरलेले दिवस - ३० : ११

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 11: 15th June,11

Driaphuk ->
Zuthulphuk (4790 Mt.)

पहाटे ३ वाजता wake-up call.. परीक्रमेताला आजचा टप्पा महत्वाचा..  टेंट मध्ये रात्रभर थोडी थंडी वाजून आल्या सारखं मला होत होतं.. पण उठल्यावर एकदम ताजेतवाने वाटले.. टेंट बाहेर आल्या आल्या कैलासाचे दर्शन.. थोडे ढग जमा झाला होते तिथे,फार सुंदर दिसत होते ते शिखर.. लगेचच नाश्ता.. दुपारच्या जेवण पार्सल दिली गेले.. त्यात सफरचंद, फ्रुटी, बिस्किट्स, चॉंकलेट असे होते.. परिक्रमेच्या मध्ये बाकी जेवण्याची व्यवस्था नव्हती..
काल रात्री झोपायच्या आधी भीम भय्या पुन्हा घोड्याचे बोलायला आला होता.. म्हणला उद्याचा दोलामा पास खूप कठीण आहे.. बरेचजण आज चाललेले उद्या घोडा करणार आहेत,बघ उद्या सकाळपर्यंत विचार कर आणि घोड्याने जा.. बघ तुझ्यामुळे बाकी ग्रुपला त्रास  नको वगैरे वगैरे.. पण मी घोड्याला नाहीच म्हणले..
काल रात्रीपर्यंत आम्ही पुढे जाऊ शकू कि नाही हे निश्चित नव्हते.. हिमवर्षावामुळे पुढे रस्ता मिळेलना शंका होती.. त्यामुळे कदाचित इथून परतावेही लागले असते.. पण आता आभाळ स्वच्छ होते..
लोहगावकर काका, करवा काका, मुन्ना भाई असे आम्ही सगळे ५ वाजता चालायला सुरुवात केली.. निघताना भीम भय्या घोड्याचं विचारायला आला आणि मी परत नाही म्हणले.. तो जरा रागावूनच मला all d best  म्हणला.. आणि म्हणला एकटी पुढे पुढे पळू नकोस,कोणी उचलून नेले तर.. मी बर म्हणले.. :)
सकाळचं उत्साही वातावरण होतं.. पण बोचरं थंड वारं जाणवत होतं.. आता इथून पुढे बराच चढ होतं.. आणि उन्चीपण जास्त होती त्यामुळे दम लवकर लागत होता..  नदीचे खळखळत वहाणे चालू होते.. ही कुठली नदी होती माहिती नाही पण कैलास पर्वतातून ४ नद्या उगम पावतात.. ब्रम्हपुत्रा, सतलज, इंडस(सिंधू) आणि  कर्णाली नदी..  कैलास पर्वत मध्यवर्ती आहे आणि या चार नद्या जगाच्या ४ विभागात वाहतात.. असं  म्हणतात कि कैलास पर्वत crystal, gold , ruby  यापासून बनलेला आहे..
कुठे चढ, कुठे उतार.. कुठे दगडातून रस्ता काढावा लागे कुठे सपाट होता.. कुठे नदीवर छोटी लाकडी फळी ठेवलेली असायची त्यावरून सावकाश जावे लागे तर कुठे नदीतून मोठ्या दगडांवर पाय ठेवून शूज मोजे न भिजवता जावे लागायचे.. कुठे उन्ह तर कुठे सावली.. चालता चलता मला वाटलं आपलं आयुष्यही एक परिक्रमाच आहे जणू.. कधी सोपी कुठे बिकट वाट.. पण आयुष्याचे अंतिम ध्येय तो परमेश्वर.. तो सतत समोर असतो.. त्याच्याकडे पाहत गेले,त्याचे नाम घेत गेले कि परिक्रमेचा त्रास जाणवत नाही..  त्याच्यावर शुद्ध निर्मळ मनाने श्रद्धा ठेवली की तो योग्य रस्ता दाखवतो.. :)
घोड्यांवरून आमच्या ग्रुप मधली मंडळी जाताना हात दाखवून 'ओम नमः शिवाय' म्हणून जायची.. तिथे गेल्यापासून कोणाशीही  hi /hello  न म्हणता 'ओम नमः शिवाय' म्हणून संभाषण सुरु होत असे.. कुठे कुठे वाट अगदी छोटी होती,एकावेळेस एकच जाऊ शकेल अशी.. या ठिकाणी आम्ही दोन तीन जणींना घोड्यावरून पडताना पहिले.. खाली दगडं असल्याने त्यांना बरंच लागलं.. मलातर चालण्यापेक्षा घोडा प्रकरण अवघड वाटले..
बरेच तिबेटीयन लोक जाताना दिसत होते.. ते फारच जोरात चालत होते,त्यांना उंचीचा त्रास बिलकुल होत नव्हता.. त्यांच्यात बराच young  crowd  असायचा अगदी कॉलेजचा ग्रुप वगैरेही दिसायचा.. काहीजण लहान मुलांना पाठीवर घेऊन चालायचे.. त्या सर्वांच्या चेहऱ्यावर सतत हास्य असायचे आणि सर्वांच्या हातात जपमाळा.. त्यांच्यापैकी कधीच कोणीच दमलेला दिसलं नाही.. 'hello ' म्हणून ते झटपट चालत पुढे निघून जायचे.. त्यांच्यापैकी काहीतर चक्क लोटांगण घालत परिक्रमा करत होते हे पाहून आम्ही आवक झालो.. या लोकांकडे फक्त पाणी जवळ होते,बास..
माझा स्पीड आता बराच हळू होता.. लगेचच थांबावे लागत होते.. मुन्ना भय्या सतत उत्साह येईल असं बोलून प्रेरणा देत होते.. अशा रीतीने आम्ही ३ डोंगर पार पाडले.. आम्हाला वाटलं होत आलं आजचं तर आताशा डोलमा पासचा चढ दिसू लागला.. इथे सर्वत्र बर्फ होता.. बर्फाच्या डोंगरावरून चढत चढत उंचीवर जायचे होते.. इकडे अक्षरशः २ पावले चालले की दम लागत होता.. मी तर ५ ५ मिनिटाला बसत होते.. या चढावर खुपदा घसा कोरडा झाला आणि बरंच ग्लुकोज/इलेक्ट्रोल ढासावे लागले.. इतके दिवस डोलमा बद्दल बरंच वाचलं आणि ऐकलं होता ते खरं कसं अन  काय आहे ते आता जाणवत होते.. हळू हळू चालत देवाचे नाव घेत शेवटी आम्ही डोलमा पासला वरती पोहचलो.. 
तिबेटी भाषेत या स्थानाला डोलमा, तर हिंदू धर्मात तारादेवी शक्तीपीठ म्हणतात.  येथून कैलासाचे पूर्वमुखाचे दर्शन होते.. हे समुद्रसपाटीपासून १९०००  कि.मी. उंचीवर आहे.. अति उंचीमुळे प्राणवायूचे प्रमाण इथे कमी असते त्यामुळे वरती जास्तवेळ थांबता येत नाही.. आणि अति थंडी.. म्हणून आम्ही लगेचच खाली उतरायला सुरुवात केली..  आता ७km  उतरण होती..  या उतारावर घोडे जात नाही, हे ७ किमी सर्वाना चालतच जावे लागते.. उतरताना  उजव्या बाजूला दरीत पवित्र गौरीकुंड दिसू लागले.. पार्वती देवीचे ते कुंड अप्रतिम आहे.. तिथे गणपती बाप्पाचा जन्म झाला असे म्हणतात..
सह्याद्रीत धो धो पावसात ट्रेकिंग केले असल्याने चढ उताराची किवा चिखल, पाणी, निसरड्या वाटेतून चालायची भीती मला कधीच वाटली नाही... अर्थात त्यासाठी शूजपण चांगले हवे.. आणि वजन कमी असल्याने जवळ जवळ पळत पळत उतरता आले.. बऱ्याच जेष्ठ नागरिकांना ही उतरण फार अवघड गेली.. थोडा पुढे गेल्यावर कैलास पर्वत दिसेनासा झाला.. म्हणजे तो उजव्या बाजूलाच होता पण त्याच्या पुढे आमच्या मध्ये एक पर्वतांची रांग सुरु झाली होती..
खाली उतरल्यावर पुन्हा बर्फाचा समतल रस्ता लागला.. आणि तिथे चालता चालता snowfall सुरु झाला.. पोचू काढण्या इतका नव्हता, आम्ही मस्त बर्फात एन्जोय करत गेलो.. मग  पुढे एक टेंट वजा हॉटेल लागले.. तिथे पोहचल्यावर केळकर काका स्वागत करायला थांबले होते,त्यांनी सर्वांचा अभिनंदन केले.. तेव्हा भयानक आनंद झाला होता आम्हा सर्वाना.. डोलमा पास झालं,मोहीम फत्ते झाली.. बरयापिकी परिक्रमा पूर्ण झाल्यासारखी होती इथे.. थोडं खाऊन पिऊन आम्ही लगेचच पुढे निघालो.. आता केळकर काका, अनिकेत, श्रोत्री काका, कुलकर्णी काका अशी बरीच मंडळी सोबत होती.. इथून पुढे सगळा रस्ता सपाट  होता.. पण खुपदा दगडांमधून आणि पाण्यातून चालत जावे लागत होते.. आता मध्येच पाऊस आणि मध्ये उन्ह असा खेळ चालू होता.. शेर्पाने निघताना सांगितले होते नदीला follow  करत जा पुढे आपले टेंट दिसतीलच तुम्हाला.. पण किती चालूनही ते टेंट काही दिसेना.. नंतर नंतर थंड वाऱ्याचे प्रमाण वाढले.. आणि patience  कमी होत गेला..  डोलमा पास नंतर एव्हढ का चालायचं..टेंट जवळच का उभारल्या नाही असे वाटत होते.. प्रत्येक ठिकाणी वाटायचं या वळणाच्या पुढे गेला कि टेंट दिसतील पण छे.. सभोवताली पर्वत.. शेजारी डावीकडून नदीचा प्रवाह बास बाकी काही दिसत नव्हतं..  मुन्ना भाई कंटाळा जावा म्हनून गमतीजमती सांगत होते.. या  दिवसात मला जाणवले कि मुन्ना भाई आणि केळकर काका यांना देवाने माझ्यासाठी खास या यात्रेमध्ये पाठवले होते.. दोघांनी माझी खूप काळजी घेतली,त्याबद्दल मी खरच त्यांची ऋणी आहे.. शेवटी मग दूरवर आम्हाला टेंट दिसल्या आणि आमचा आनंद गगनात मावेनासा झाला.. अशा रीतीने आम्ही सकाळी ५ला निघालेलो संध्याकाळी ६.४५ वाजता टेंट पाशी zuthulphuk येथे पोहचलो.. आज आम्ही एकूण २४ किमी  चाललो होतो..
इथे टेंट अगदीच नदीच्या काठी होत्या आणि आमचा टेंट तर नदीशेजारीच.. रात्रभर नदीचा खळ खळ आवाज कानात घुमला..  तिथे गेल्यावर बाहेर अति थंडीमुळे कोणीच नव्हते,सगळे टेंट मध्ये आराम करत होते.. मीपण थोडे फोटो काढून लगेच टेंट मध्ये गेले.. आल्या आल्या शेर्पाने  गरम गरम चहा आणि नंतर लगेच सूप दिले.. स्मृती काकू आधीच घोड्यावरून आल्या होत्या फारच दमल्या होत्या.. शेजारच्या टेंट मधून काही काकुनी आलीसकाग असे विचारले.. मी मात्र जाम खुश होते आणि ताजीतवानी होते,डोलमा पास झाल्यामुळे.. :) नंतर भीम भय्या,महेश वगैरे खास माझे अभिनंदन करायला आले..
आजही जेवण टेंट मध्ये केले.. एकतर टेंट नदीशेजारी असल्याने जास्तच वारे येत होते.. त्यातून आमच्या टेंटला एक मोठं छिद्र आहे हे दिसले.. पण त्या शेरपा लोकांना तरी काय करणार म्हणून आम्ही त्यावर आतून आणि बाहेरून एक कापड टाकले.. जेवण करून diamox घेऊन लगेच स्लीपिंग ब्याग मध्ये शिरलो.. पाय दुखत नव्ह्तेपण आज  इतकं चालल्याने लगेचच गाढ झोप लागली.. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: