मंगळवार, ११ सप्टेंबर, २०१२

मंतरलेले दिवस - ७०

हल्ली रोज सकाळी घरातून बाहेर पडते तेव्हा हिरवीगार झाडे शुभ्र धवल फुलांनी बहरलेली दिसतात.. नाजूक पानेफुले पावसांच्या पाण्यामध्ये चिंब भिजलेली दिसतात.. जाई, जुई, सायली यांचा सुगंध हवेत दरवळत असतो..  फुले किती प्रकारची असतात ना..  किती विविध रंगाच्या छटा पहावयास मिळतात.. आपल्यासारखेच तेही जन्म घेताना नशीब घेऊन येतात.. कोणी सुंदर असते, कोणी सुवासिक असते.. कोणाला शोभेसाठी वापरले जाते.. कोणाला स्त्रीच्या केशरचनेत बसायचे भाग्य मिळते.. कोणी प्रेमाचे प्रतिक बनते.. काहीना नेत्यांच्या अन वीरांचा सहवास मिळतो.. तर काही दोन जीवांच्या विवाहाचे  साक्षी ठरतात..  कोणी भून्ग्यासोबत खेळते.. कोणी झाडे वेलीन्वरच  डोलतात..  तर काही खास फुले देवांच्या, संतांच्या गळ्यामध्ये अन चरणकमलांवर विराजित होतात आणि त्यामुळे त्यांचा जन्म सार्थकी लागत असेल..

काही फुले मात्र एखाद्या सरीने किंवा वाऱ्याच्या धक्याने गळून पडतात.. अशा फुलांना कोणीच वाली नसतं..  कोणीतरी येऊन धक्का देतं आणि त्यांचं आयुष्य बदलतं..  मी रोज पाहते, लोकं चढून वाकून पूजेसाठी किंवा गजरयासाठी चांगली चांगली फुले निवडतात.. पण मग खाली पडलेल्या फुलांना किती वाईट वाटत असेल.. त्यांना कोण उचलणार? त्यांनाही आतून ओढ लागतच असेलना परमेश्वर भेटीची..

असाच विचार करता करता रस्त्यावरच्या एका पुष्पाने मला आकर्षून घेतले.. मी सहज हातात घेतले अन पहिले.. किती ती कोमलता, नाजूकता.. पावसाच्या पाण्याने अन रस्त्यावरच्या चिखलाने ते एका चिखलात खेळणाऱ्या अल्लड बालकाप्रमाणे दिसत होते..

पुढे काय होत असेल अशा फुलांचे.. मातीत विरघळून जात असतील का? एखादी गाडी किंवा मनुष्याचा पाय त्यास चीरडवून जात असेल का?  विचार करवतच नव्हतं.. चालत चालत मी गणपतीच्या मंदिरापाशी आले.. अन त्या फुलाला देवापाशी अर्पण केले.. शेवटी सर्वांना तिकडेच जायचे आहे पण हा अंत काळ तरी चांगला जावा असे वाटले..

अशा प्रकारे या सृष्टीत नाना तर्हेने मलीन झालेल्या जीवांना भगवंताचे सानिध्य सदगुरूंकडून लाभत असेल.. असेच भाग्य तुम्हा आम्हाला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: