रविवार, २ सप्टेंबर, २०१२

मंतरलेले दिवस - ६९

आज पर्यंत मी मोठमोठ्या साहित्यिकांचे वाचन केले.. मी स्वतः मला आलेले कितीतरी अनुभव लिहिले,इतरांना दाखवले.. पण याहून मौल्यवान असलेल्या खास अशा साहित्याचा मला नुकताच शोध लागला.. त्यावर आधारित हा लेख लिहित आहे. 

त्यादिवशी अंजली ताईंचे  (गीतांजली जोशी) फेसबुकवर इन्व्हाईट आले होते..  साहित्यातील - कवितेतील  त्यांची उंची  आणि प्रेम या गोष्टींनी त्या सुप्रसिद्ध आहेतच पण मला विशेष भावते ते त्यांचे आदरणीय व्यक्तिमत्व.. ना सी फडके यांच्या कन्या असून अहंकाराचा किंचितही स्पर्श जाणवत  नाही.. आणि त्यांचे सामाजिक कार्य मला नेहमीच त्यांच्याकडे आकर्षून घेते.. मी उत्सुकतेने पाहिले ,कसले आमंत्रण आहे ते.. "दृष्टिहीन बांधवांच्या  लघुकथा स्पर्धेचा  पारितोषिक वितरण सोहळा.."  मी लगेचच अंजली ताईंना फोन केला,माहिती विचारली.. त्या म्हणल्या तू ये,तुला आवडेल.. आणि तू आलीस तर आम्हालाही आवडेल.. बास मग मी लगेचच जायचे निश्चित केले.. घरून जरा आरडाओरड झाली.. म्हणजे मी सारखी कुठेतरी भटकत असते म्हणून.. पण या कार्यक्रमाची माहिती दिल्यावर ते ठीक आहे म्हणले..

कार्यक्रम गणेशखिंड येथील  बालशिक्षण संस्थेत होता.  तिकडे गेल्या गेल्या अंजली ताई म्हणल्या, माझी छोटी मैत्रीण अजून कशी आली नाही असा विचार करत होते मी..  :)  लगेचच कार्यक्रम सुरु झाला.. पुढे पहिल्या रांगेत विजेते बसले होते.. व्यासपीठावर  एकांश संस्थेच्या अनिता अय्यर, विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक संजय जैन, बालकल्याण संस्थेच्या मिनिता  पाटील आणि गीतांजली जोशी असे मान्यवर उपस्थित होते.  सर्वप्रथम अनिता म्याडम यांनी लघुकथा स्पर्धेबद्दल थोडक्यात माहिती सांगितली.. लेखनातून आपण आपले विचार अनुभव मांडत असतो.. आतापर्यंत दृष्टिहीन व्यक्तींनी पण लेखन केले पण ते कल्पनेतून साकार झालेले किंवा इतरांकडून ऐकलेल्या वर्णनावर आधारित होते.. या स्पर्धेची कल्पना थोडी वेगळी होती.. दृष्टिहीन व्यक्तींनी त्यांना आलेले खरे अनुभव , त्यांचे विचार मांडायचे असा आशय होता.. त्यांचेही एक जग आहे, तेही सुंदर आहे याची सर्वाना जाणीव व्हावी, माहिती व्हावी हा हेतू होता.. संपूर्ण  महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला होता अन त्यातून प्रथम ३ क्रमांक आणि २ उत्तेजनार्थ निवडले गेले.. त्यासाठी परीक्षक मंडळींमध्ये लेखक राजन खान, सकाळचे मल्हार अरणकल्ले आणि प्राध्यापक जैन हे होते.  यास्पर्धेसाठी गीतांजली जोशी यांची खूप मदत झाली असे अनिता म्याडमने आवर्जून सांगितले.. त्यानंतर अंजली ताई त्यांच्या मधुर  वाणीतून बोलल्या.. त्या  हा उपक्रम पुढे जाण्यासाठी खास कार्यशाळा घेणार आहेत असे म्हणल्यावर सारेजण खुश झाले..  मीपण माज्या परीने जी काही मदत करता येईल ती करेन असे मनोमनी ठरवून टाकले..

आता प्राध्यापक संजय जैन यांनी बोलायला सुरुवात केली आणि कार्यक्रम एका उंचीवर गेला.. ते विधी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत आणि ते स्वतः दृष्टिहीन आहेत हे मला तेव्हाच कळले.. त्यांनी स्पर्धकांच्या कथा वाचताना आलेले विचार मांडले  कथा उत्तम आहेत, सर्व स्पर्धकांमध्ये लेखनाची आवड आणि गुणवत्ता आहे.. अंजली ताई म्हणल्याप्रमाणे कार्यशाळा घेऊन यांना लिहिण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास हे सगळेजण पुढे जातील यात तीळमात्र शंका नाही.. नंतर त्यांनी त्यांचे वैयक्तिक अनुभव सांगितले..  आपली भाषाच कशी विचित्र आहे, एखाद्याला आपण किती सहजतेने 'आंधळा आहेस का ' अशी शिवी देतो अशी कित्येक  वास्तववादी उदाहरणे ऐकून माझ्या डोळ्यातून अचानक घळाघळा पाणी वाहू लागले.. एखाद्या व्यक्तीमध्ये काही कमी असेल तर त्यांना लोकं हसतात का हे समजत नाही..  मला स्वतःला कानाचा थोडा त्रास आहे, लहानपणी खूप सर्दी व्हायची तेव्हापासून.. त्यामुळे टीव्ही मालिकांमध्ये जेव्हा ऐकू कमी येणाऱ्याबद्दल जोक्स केले जातात तेव्हा मला खूप वाईट वाटते.. आंधळ्याप्रमाणे बहिरा हापण शब्द शिवी किंवा चेष्टा मस्करी करण्यासाठी वापरले जाते.. ते जे बोलत होते ते मला अगदी नीट समजत होते.. कारण मलाही असे थोडेफार अनुभव आलेले आहेत.. ज्याने आयुष्यात काही सोसले आहे तोच इतरांचे दुख हाल समजू शकतो,बाकीच्या लोकांना काय समजणार!  रडू आल्यावर मला वाटले हे काय मला काय होतंय असं पण मग आजूबाजूला सगळ्यांचेच डोळे ओले आहेत ,अगदी व्यासपीठावरील सर्वांचे देखील असे दिसले.. सत्य कटू असते,पचवायला अवघड असते..  बोलता बोलता त्यांनी एक हृदयाला भिडणारा अनुभव सांगितला.. एकदा ते त्यांच्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेले होते.. त्यांना डोसा आवडूनही ते कधीच घेत नाही हि गोष्ट मित्रांना समजली होती म्हणून मित्रांनी मुद्दाउन सर्वांसाठी डोसा मागवला.. तर जैन सर म्हणले मला कट्या चमच्याने खाता येणार नाही अन मला डोसा हाताने खायचा नाही.. हे ऐकून त्यांच्या सर्व मित्रांनी डोसा हाताने खायला सुरुवात केली.. या उदाहरणातून त्यांना असे सांगायचे होते कि दृष्टिहीन व्यक्तींना अशा चांगल्या मित्रमंडळींची आवश्यकता आहे..

नंतर पारितोषक वितरण झाले.. सर्व विजेतांच्या घरची मंडळी अन स्नेही त्यांच्या कौतुकासाठी उपस्थित होते. त्यानंतर प्रत्येक विजेत्यांनी आपले आपले मनोगत मांडले.. मला आश्चर्य वाटले कि उद्या मला पुढे जाऊन सर्वांसोबत बोलायला सांगितले तर मी इतकी सुंदर व्यवस्थित बोलू शकणार नाही जितके हि सर्व मंडळी उत्तम पणे बोलली.. त्यांच्यातल्या आत्मविश्वासाला मी मनातून मनाचा मुजरा केला.. आपण जे क्षण भोगतो, अनुभवतो ते आपल्या पद्धतीने आपल्या विचारून मांडायला मिळाल्याने आणि त्याची दाखल घेऊन इतके कौतुक झाल्याने सर्व जण खूप खुश आणि समाधानी वाटत होते. प्रत्येकजणच  आपल्या आपल्या कथेबद्दल, त्यासाठी सहकार्य केलेल्या त्यांच्या सोबत्यांबद्दल अन या स्पर्धेबद्दल भरभरून बोलले.. ते ऐकता ऐकता पुन्हा पुन्हा डोळे भरून येत होते.. त्या सर्वांचे वाचन , अभ्यास , माहिती, गंमती जंमती  हे सर्व एकून मी स्तिमित होत होते..

एकांश संस्था नुसते पारितोषिक देऊन थांबणार नाही तर या कथांचे  करून  रेकॉर्डिंग  करायचा त्यांचा मानस आहे.. त्यासाठी एका ग्रुपच्या वतीने रेकॉर्ड केलेली एक कथा सर्वांना ऐकवली गेली.. ते ऐकताना चित्र जसेच्या तसे समोर उभा राहत होते.. ते ऐकून हा उपक्रम पुढे छान होणार आहे याची सर्वांना कल्पना आली..

कार्यक्रमानंतर अंजली ताई म्हणल्या कसा वाटला, मी म्हणले मला फार बरं वाटतंय आज मी इथे आले, खूप प्रेरणा मिळाली,मलाही तुमच्या सोबत काम करायला खूप आवडेल.. मग त्यांनी लगेच अनिता म्याडमशी माझी ओळख करून दिली.. बघूया आता पुढे माझ्या बाजूने मी करता येईल तेव्हढे काम नक्की करेन..  कोथरूड मधील अंधशाळेतील कौशल्या या कन्येला  उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले म्हणून तिच्यासोबत तिच्या शाळेतील बाई आणि काही विद्यार्थिनी आल्या होत्या. मी त्यांच्याशी थोडे बोलले.. त्या बाईंना म्हणले माझ्याकडून काही करता येण्यासारखे असेल तर मला सांगा.. त्या म्हणले आमच्या शाळेत येना कधीही मग आपण सविस्तरपणे बोलू. मी ठीक आहे म्हणले.. आता एका शनिवारी मी शाळेत जाऊन येईन, पाहूया चांगली संधी मिळणे हाही एक नशिबाचा भाग असतोना.. असे चांगले काम मिळण्याची प्रेरणा मिळावी, संधी लाभावी, हा जन्म सत्कर्मासाठी कारणी लागावा  अशी परमेश्वराकडे मनापासून प्रार्थना!!