रविवार, २९ जुलै, २०१२

सुदाम्याचे पोहे - ९

हा लेख मी खास अश्विनी आणि ध्रुव यांच्यासाठी लिहित आहे.. बऱ्याच दिवसापासून मनात  होतं म्हणलं आता लिहूनच काढावं.. :) या दोघांची ओळख साधारण ३ वर्षापूर्वी एका ट्रेकला झाली.. त्यावेळेस  अगदीच नवीन ओळख होती, तेव्हा खरंच वाटलं नव्हतं  कि पुढे आम्ही कधी असे एकत्र येऊ..

अश्वीनीवर तर मी त्यादिवशीच इम्प्रेस झाले.. कारण ती संस्कृतची शिक्षिका.. टीमवी, स प आणि स्वतःचे खाजगी वर्ग..  शाळेत माझे पूर्ण संस्कृत होते तेव्हा मला फार मनापासून हा विषय आवडायचा.. आवड असल्यामुळे तेव्हा  माझं व्याकरण आणि अभ्यास चांगला होतं.. शिवाय स्कोरिंग विषय होता.. नंतर अभियंता क्षेत्र निवडले आणि संस्कृतचा संबंध तुटला.. अजूनही मला बरेचदा वाटते कि मी तेव्हा संस्कृत विषय घेऊन त्यात प्राविण्य मिळवायला हवे होते वगैरे.. तर सांगायचा मुद्दा कि संस्कृतच्या धाग्याने आम्ही जोडले गेलो.. माझ्या रोजच्या मेल्स मध्ये ती सहभागी झाली.. आपल्या कामात कितीही व्यस्त असली तरी ती आवर्जून मेल्स वाचते आणि आवडल्यावर कळवते देखील.. अशातच मागच्या ऑगस्ट मध्ये तिने तिच्या 'संस्कुतमित्र' या उपक्रमाबद्दल सांगितले.. याद्वारे दर महिन्यात संस्कुत संबंधित विषयांवर चर्चा, अभ्यास होईल असे तिने सांगितले.. मुख्य म्हणजे माझ्यासारख्या संस्कृतची आवड असलेल्या पण सध्या  संस्कृतच्या संपर्कात नसलेल्या लोकांसाठी या कार्यक्रमाचा फायदा होईल असे कळल्यावर मी लगेचच संस्कृतमित्र ची सभासद झाले.. कधी  कधी अश्विनी स्वतः एखादा विषय समजावून सांगते आणि कधी कधी संस्कृत मधील मान्यवरांना बोलावून त्यांचे भाषण आयोजित करते.. खूप वेगवेगळे विषय ऐकायला मिळतात.. कालीदासांची सविस्तर माहिती मला इथे नीट समजली आणि त्यामुळे त्यात रस वाटू लागला.. वेगवेगळी सुभाषिते ऐकायला मिळाली.. मला अगदी दर महिन्यात जायला जमले नाही पण तरीही जितके काही ऐकले ते खरंच कायम लक्षात राहील असे होते.. आता या उपक्रमाला एक वर्ष होतंय म्हणून अश्विनीने थोडा वेगळ्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला.. तिने तीन सभासदांची निवड केली आणि संस्कुत संबंधित कोणत्याही विषयावर बोलायला सांगितले.. त्यात माझे नाव होते.. मला आश्चर्य वाटले तिने मला कशी काय ही संधी दिली.. मी तर आपली साधी सुधी.. तिने एवढ्या विश्वासाने मला तिच्या उपक्रमात सहभागी करून घेतले यामुळे भारावून गेले.. मी 'आदि शंकराचार्य - कृष्णाष्टकाम' यावर थोडेफार बोलले.. पण खरंच तिथे मोठी मोठी लोकं होते कि मी यांना काय वेगळे खास सांगणार असे मला वाटले.. तो कार्यक्रम सुंदर झाला , बाकीच्या दोघांकडून खूप छान माहिती ऐकायला मिळाली.. खूप प्रसन्न वाटले त्या कार्यक्रमानंतर..

आता ध्रुवबद्दल.. ट्रेकला आम्ही भेटलो त्याधीपासूनच ध्रुवच्या फोटोग्राफी आणि भटकंतीबद्दल ऐकले होते..  त्या ट्रेकला जेव्हा माझी त्या दोघांशी ओळख झाली तेव्हा त्याची फोटोग्राफी प्रत्यक्ष जवळून बघायला मिळाली.. खास करून पक्षांचे फोटो अचूक अन सुंदर कसे टिपतात हे त्याच्याकडून कळले.. नंतर त्याचे फ्लिकर वर फोटो आवर्जून बघायचे मी.. गाड्यांची माहिती आणि कौशल्य ध्रुवाकडे विशेष आहे.. नंतर ट्रेकिंग अन माझ्या रोजच्या मेल्स मुळे ओळख वाढली.. मागच्या वर्षी जेव्हा त्याने सांगितले कि तो आणि इतर मित्र  मिळून ट्रेकिंग ग्रुप सुरु करत आहेत तेव्हा मला मनापासून आनंद झाला.. कारण मी मित्रांना,त्यांच्या ट्रेकिंग बद्दलच्या प्रेमाला आणि अभ्यासाला जवळून पहिले आहे.. शिवाय आता मला यांच्यासोबत दर महिन्यातून एक ट्रेक करायला मिळेल या कारणाने मला दुहेरी आनंद झाला होता.. पण तरीही पुढे कधी मी त्या सह्यात्री ग्रुपची मेंबर होईन असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते.. मागच्या महिन्यात धृवने मला सह्यात्रीमध्ये सहभागी होण्यात रस आहे का विचारले तेव्हा मला फार भारी वाटले.. नवीन मेम्बर्स म्हणून आम्हा सर्वांची एक मिटिंग झाली तेव्हा मला कळले कि एक ट्रेक आयोजित करताना किती काय काय करावे लागते.. त्यांची कामाची पद्धत अगदी cmmi  level  5 म्हणता येईल अशी.. planning , implementing , documentation  सगळे कसे अगदी व्यवस्थित, शिस्तीत.. मी फार प्रभावित झाले.. मला यातून खूप काही शिकायला मिळेल असे वाटू लागले.. धृवचे आभार कसे मानू समजेनासे झाले..

इतके सगळे सांगण्यामागचा हेतू हा कि या दोघा नवरा बायोकोंनी आपापल्या उपक्रमात मला सहभागी करून घेतले यासाठी मी दोघांची खरंच ऋणी आहे.. खरतर ते दोघंही त्यांच्याकडे असलेल्या गोष्टीनी माज करू शकतात पण तसे न करता ते दोघंही खूप चांगले वागतात याचे मला आश्चर्ययुक्त कौतुक वाटते.. अवघड वळणावर साथ देणारे खरे सोबती असे म्हणतात तसे हे दोघ माझ्या आयुष्यातल्या कठीण काळात त्याच्या उपक्रमामध्ये सहभागी करून मला साथ देत आहेत हे माझ्यासाठी खूप आहे..  कारण कित्येकजण ज्यांना मी जवळचे मानले होते ते आता मला विचारात सुद्धा नाही, मी सर्वांच्या मागे पडले म्हणून त्यांच्यात मला घेत नाहीत,बोलावीत नाहीत असे अनुभव मला आलेले आहेत.. काहीजण आपापल्या संसारात व्यस्त आहेतकी त्यांना वाटून सुद्धा बोलायला भेटायला वेळ त्यांच्याकडे बिलकुल नाहीये.. या पार्श्वभूमीवर अश्विनी आणि ध्रुव यांचा मला खूप आधार वाटतो.. पूर्वीची ओळख नसली तरी मी दोघांशी खूप मोकळेपणाने बोलू शकते आणि ते मला वेळोवेळी समजून घेतात त्याबद्दल मी त्यांचे आभार कोणत्या शब्दात मानू? सह्यात्री आणि संस्कृतमित्र या दोन्ही उपक्रमांसाठी  मी माझ्या बाजूने पूर्णपणे काम करेन,बस अजून काय म्हणू  मी!!!


२ टिप्पण्या:

Pankaj - भटकंती Unlimited म्हणाले...

मीही माझी फोटोग्राफी धुरड्यापासूनच सुरु केली. अश्विनीला अजून भेटलो नाही, पण तिच्या ज्ञानाबद्दल बरंच ऐकून आहे.

वृंदाली.. म्हणाले...

Hmm.. :)