रविवार, २० नोव्हेंबर, २०११

मंतरलेले दिवस - ४६

किस लिये जीते हैं हम किसके लिये जीते हैं..
बारहा ऐसे सवालात पे रोना आया..

अगदी अशीच काही माझी मनस्थिती झाली होती त्यादिवशी..  विचाराच्या भोवऱ्यात मन अस्वस्थ झालं होतं..  "एक मुलगी म्हणून संसार करावा वाटला तर तो योग आला नाही.. बर ते नाही तर अध्यात्मिक प्रगती करण्यात केंद्रित करू पाहावं म्हणलं तर 'समभाव', 'विरक्ती' ,'अलिप्तपणा' आचरणात आणता आला नाही.. ना प्रपंच ना परमार्थ अशी गत झाली आहे.. माझ्या आयुष्याला काही ध्येय नाही.."

सुट्टीचा दिवस.. मनाला अशक्तपणा आला होता.. काय करावं समजत नव्हतं.. अशावेळेस कोणाशी बोलावही वाटत नाही कारण एकतर माझं सगळं ते समजून घेऊ शकत नाही आणि त्यांनी दिलेले सल्ले मला पटतीलच असंही नाही.. शिवाय सगळ्यांना आपापले व्याप असतातचना.. आज घरी आरामच करायचा ठरवलं.. मला काही उद्योग नाही म्हणून असले भलतेसलते विचार मी करत बसते असा मीच माझ्यावर आरोप केला.. म्हणून मग आहेत नाहीत तेव्हढे सगळे कपडे धुवायला घेतले.. इतके कपडे धुतल्यावर हात पाय दुखू लागले पण मनावर काडीमात्र परिणाम झाला नाही..

सगळी कामं आटोपल्यावर पुस्तक वाचू म्हणालं.. पुस्तकांचं कपाट उघडलं आणि नकळत वीर सावरकरांचं 'माझी जन्मठेप' घेतलं.. एकेक पान उलगडू लागले अन मन त्या पुस्तकात खोल खोल शिरू लागलं.. सावरकरांचा प्रत्येक शब्द काळजात कोरला जात होता.. " ५० वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा.. अंधाऱ्या कोठडीत फक्त मी आणि माझी शिक्षा.. दिवस कसे काढायचे? वाचन करून ज्ञान मिळवावं तर इथे पुस्तके मिळणार नाही.. लेखन करून प्रचार करावा तर कागद पेन्सिल नाही.. कोणाशी चर्चा नाही,भेटीगाठी नाही.." खरोखर किती भयंकर परिस्थिती होती.. नुसतं वर्णन ऐकून अंगावर काटा येत होता.. पण ती व्यक्ती सर्वसाधारण व्यक्ती नव्हती.. विचारांती त्यांना त्या अंधाऱ्या खोलीतही प्रकाश दिसला.. त्यांचं एक लहानपणीपासूनचे स्वप्न होते महाकाव्य रचायचे.. "इतके दिवस सवड मिळाली नव्हती पण आता या वेळेचा सदुपयोग करता येईल.. मनातल्या मनात कविता रचायच्या आणि स्मृतीपत्रावर लिहून ठेवायचा.. सुटका झालीच कधी पुढे तर जगाला ते काव्य अर्पण करायचे!!!"   

आहा किती भव्य अन खंबीर त्यांचे मन.. इंग्रजांनी त्यांच्या देहाला शिक्षा दिली पण मनाला मात्र ते बंदिवासात अडकवू शकले नाही..  केव्हढी ती शक्ती सुमनाची.. हे वाचताना डोळे तर पाणावलेच पण मला माझीच लाज वाटली.. ते बंदिस्त असतानाही कार्यरत होते.. आणि मी पूर्णपणे स्वतंत्र असतानाही आयुष्याला काही ध्येय नाही अशी बडबड करत होते.. माझं मन पांगळं का असं वाटू लागलं.. जाग आली, डोळे उघडले आणि मनाची मरगळ निघून गेली.. आपणही काहीतरी चांगलं कार्य करू अशी एक नवीन उमेद आपोआप निर्माण झाली..

खरंतर हे पुस्तक मी केव्हाचं आणून ठेवलं होतं पण आजच का वाचायला घ्यावं हा मला योगायोग वाटला.. कदाचित भगवंतांपाशी  मी माझं गऱ्हाणं मांडल्याने हे पुस्तक वाचायची सदबुद्धी देऊन त्यांनी माझ्या मनाला टोनिक दिले..

ShreeKrishna says in the Bhagavad Gita..
'The mind can be the soul's best friend, or make one's life a hell.'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: