गुरुवार, २९ डिसेंबर, २०११

मंतरलेले दिवस - ५० :)

A memorable event in Infosys.. :)

त्या दिवशी अर्चना म्हणाली तिला आणि नम्रताला माझ्याशी काहीतरी बोलायचे आहे.. मी विचार करत होते की त्याना माझ्याकडे काय काम असेल बरे.. चहाला भेटलो तेव्हा नम्रता म्हणाली की वर्षाखेरानिमित्त आपण इन्फी मध्ये झाडपुसायचे काम करतात आणि बागेत दिवसभर जे राबतात त्यांना आपण पार्टी देऊया..  अर्चना म्हणाली की तू असं कहीना काही करत असतेस म्हणून तुला विचारला.. झालं मग चर्चा सुरू झाल्या..

मला ही कल्पना भयंकर आवडली.. नेहमीच जाणवतं की हे लोकं दिवसभर स्वच्छता, बागकाम् अविरतपणे करत असतात.. आपण मधे आधे किती टाइमपास करतो,चहाला जातो, गप्पा मारत बसतो.. पण हा स्टाफ मात्र पहावं तेव्हा कामच करत असतो.. आपल्यापेक्षा फार पटीने हे कष्ट करतात आणि पैसे मात्र आपण जास्त कमावतो.. शिवाय हे सगळे वयाने मोठे असूनही आपल्याशी फार आदराने बोलतात आणि गरज पडेल तेव्हा मदतीसाठी कायम हजर असतात.. मला आठवतय एकदा सकाळी अचानक खूप जोरात पाऊस सुरू झाला.. बस पासून बिल्डींग मध्ये जाईपर्यंत सगळे भिजत होते तेव्हा हाउसकीपिंग स्टाफ पैकी काहीजण प्रत्येकला पळत जाऊन छत्र्या देत होते. . असं करताना ते स्वताहा भिजत होते पण त्याना त्यांच्या तब्येतीची पर्वा नव्हती. . जरी पत वेगळी असली तर तेही माणसचना..


कार्यक्रमाचा आराखडा केला.. अजुन तिघी मुली आमच्या कटात सामील झाल्या..  फेज१ मधे साधारण १०० लोकं होते त्याप्रमाणे बजेट ठरवले.. फक्त आमच्या अकाउंट मधून पैसे गोळा करायचे ठरवले..  DM, HR ची परवानगी घेतली..  सगळ्याना मेल्स पाठवण्यात आले.. आमच्या पैकी प्रत्येकीनी एकेक फ्लोरची जबबदारी घेतली..  मेल गेल्यावर माझ्या टीम मधल्या लगेचच दोघांनी पैसे आणून दिले तेव्हा फार बरं वाटलं. कारण लोकांच्या प्रतिक्रिया काय असेल याची शंका होती.. आम्ही सगळ्याजणी आनंदाने एकमेकीना सांगू लागलो माझ्याकडे इतके इतके जमले म्हणून.. पैसे किती द्यायचे हे आम्ही देणर्यावर सोपवले होते.. प्रत्येकाने २०रुपये दिले तरी पुष्कळ होईल असा आमचा अंदाज होता.. अर्थातच आम्ही सहा जणी जास्तीत जास्त वर्गणी देणार होतो..

थोड्या लोकांनी दिल्यावर मात्र माझ्या इथे शांतता झाली.. बर्‍याच जणांना बराच काही करायचं असतं पण त्यासाठी जरा मागे लगावं लागतं असं मला नेहमीच अनुभव येतो.. मग काय रोज वेगवेगळे प्रेरणा देणारे सुविचार पाठवून सर्वाना एकदा आठवण करून द्यायची.. ते वाचून काहीजण पैसे द्यायला स्वतहुन येऊ लागले.. संगण्याजोगी एक गोष्ट की  टीम मधल्या १०० लोकांपैकी काहीजण कधी जास्त बोलत नाही असे लोकं वर्गणी आवर्जून द्यायला आले..  :)  इतर टीमनेही भरघोस प्रतिसाद दिला.. पुरेसे पैसे जमा झाले..

२८ डिसेंबर तारीख निश्चित केली.. डॉमीनोज पिझा आमच्या बिल्डिंगमध्ये खाली असल्याने तिथे ऑर्डर दिली.. बाकी केक शीतापेय बाहेरून मागवले.. खरतर मी गेले काही दिवस एकाच वेळेस बर्‍याच उद्योगात व्यस्त असल्याने पैसे गोळा करून दिल्यावर ऑर्डर देण्याच्या कामात माझी मदत झाली नाही त्यामुळे मला जरा अपराधी वाटत होते.. पण नंतर ती कसर भरून निघाली..

गेले बरेच दिवस वाट बघत होतो ती संध्याकाळ आली.. ११० जणांना एकदम बोलवलं  तर बसायला जागा मिळणार नाही म्हणून त्यांच्या सुपरवयजर सरांनी तीन गट केले.. ४ वाजता पहिल्या गटातले लोकं जमू लागले.. प्रत्येकाच्या चेहर्यवर उत्सुकता होती.. त्या सर्वाना आम्ही कुठेना कुठे पहिले होते त्यामुळे आम्हाला ते ओळखीचे वाटत होते..  खरतर आम्ही केक कापून पिझा वगैरे खायला द्यायचे ईतकेच ठरवले होते.. पण कार्यक्रम थोडा अनौपचरिकपणे व्हावा, सर्वा स्टाफ ने मोकळेपणाने सहभागी व्हावे म्हणून बाकीच्या जणांनी मला त्यांच्याशी बोलायला सांगितले कारण मराठीत संभाषण करणे महत्वाचे होते..

सग्लेजन जमल्यावर मी प्रथम  आपण कशासाठी जमलो आहोत हे सांगितले.. "तुम्हाला २४ तास काम करताना आम्ही नेहमीच पाहतो.. आमच्यापेक्षा जास्ती काम तुम्ही अगदी मनापासून करता याची सर्वाना जाणीव आहे.. "  असे मी म्हणल्यावर त्यांचे सुपरवयजार सर अक्षरशहा रडू लागले.. जे घडले ते लिहीत आहे,काहीही अतिशयोक्ती नाही.. आपल्या हाताखाली काम करणार्‍या लोकांसाठी डोळ्यात पाणी आलेले लीडर मी पहिल्यांदाच बघितले.. ते पाहून आम्ही भारावून गेलो.. नंतर मग मी प्रत्येकाला ओळख करून द्यायला सांगितले आणि आम्हीही आमची ओळख सांगितली.. ते सर्वजण ईन्फिमधे बरीच वर्ष काम करत आहेत हे समजले.. नंतर त्यांना त्यांचे अनुभव, मते सांगण्याची विनंती केली.. दोघातिघे त्यांच्या सारंबद्दल आणि इनफोसीस बद्दल फार कृतदनेंने बोलले.. सरांनी आम्हाला घडवलं असे प्रत्येकाचे म्हणणे होते.. शिवाय इन्फी मधे आम्हा प्रत्येकाला सन्मानाची वागणूक मिळते जी बाकी इतर ठिकाणी विशेष मिळत नाही,घरच्यासारखे वातावरणा आहे असं सगळा ऐकून माझा इन्फि बद्दलचा अभिमान दुणावाला..

नंतर ग्रूप फोटो काढले,त्यांनी फार एन्जॉय केले.. केक कपताना  ,पिझा खाताना प्रत्येकजण मनापासून सारे खूप खुशीत होते.. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन निरोप घेतला.. जाताना ते आम्हा सर्वांचे आभार मनात होते  तेव्हा आमचेहि डोळे भरून आले..  या उपक्रमासाठी ज्यानी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत केली यांचे आम्ही मनातून आभार मानले...  अशा प्रकारे तीन ग्रूप येऊन गेले, सगळं व्यवस्थित पार पाडलं आणि आम्ही निश्चिंत झालो.. एक वेगळेच समाधान आम्हाला लाभले..  :))

They say..
Life laughs at u when u r unhappy..
Life smiles at u when u r happy..
But life SALUTES u when u make others happy..

गुरुवार, २२ डिसेंबर, २०११

मनातल्या मनात..

मनातल्या मनात..
किती फुले उमलतात..
किती वेली पसरतात..
किती गंध दरवरळतात..
मनातल्या मनात..

मनातल्या मनात..
किती वादळे उठतात..
किती जहाजे बुडतात..
किती पूल तुटतात..
मनातल्या मनात..

मनातल्या मनात..
किती प्रश्न पडतात..
किती तर्क लागतात..
किती उत्तरे मिळतात..
मनातल्या मनात..

सोमवार, १२ डिसेंबर, २०११

मन..

जेव्हा मी माझे सुखं दाखविले,
तेव्हा ते म्हणले खोटं आहे..

जेव्हा मी माझे दुखं दाखविले,
तेव्हा ते म्हणले छोटं आहे..

जेव्हा मी माझे मन दाखविले,
तेव्हा मात्र ते म्हणले मोठं आहे!!!

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०११

मंतरलेले दिवस - ४९

मी ऐकलेले पहिले कीर्तन!  :-)

रविवारी रात्री काकून्चा फोन आला.. दत्त जयंती निम्मित्त उत्सव चालू आहे.. हा आठवडा रोज संध्याकाळी कीर्तन आहे.. तुला आवडत असेल आणि वेळ असेल तर तुही ये.. त्या काकू खूप खास व्यक्ती आहेत.. साहित्य, अध्यात्म, प्रवास आणि इतर कितीतरी कला याबद्दल मला त्यांच्याकडून बरच काही शिकायला मिळतं.. त्यांनी कुठे चल म्हणलं की ती गोष्ट बेष्ट असणार इतका माझा त्यांच्यावर विश्वास आहे.. मी त्यांना म्हणलं यापूर्वी मी कधीच किर्तनाला गेले नाही पण मला नक्कीच आवडेल यायला.. मग त्यानी किर्तना बद्दल थोडक्यात माहिती सांगितली.. पूर्वार्धात भक्तीगीत व निरुपण आणि उत्तरार्धात एक कथा असा साधारणपणे आराखडा असतो.. मला खूप उत्सुकता  वाटली..

काही कारणाने पुढे ढकलत शेवटी आज गुरुवारी किर्तनाला जायचा योग आला.. ओफीस मधून लवकर पळताना मी कोणाला भेटायला चालले असे वाटले असेल... पण आज खरच कारण विशेष होतं.. आश्रमात जरा आधी पोहचले.. तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम चालू होता.. "दिगंबरा दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ दिगंबरा" या नामाच्या गजरात वातावरण दुमदुमुन गेले होते.. ते सगळं ऐकून पाहून मी अगदी भारावून गेले..  कुठे ओफीस आणि कुठे ही प्रसन्न शांत जागा.. भजनी मंडळाचा कार्यक्रम संपला आणि कीर्तनाची तयारी सुरू झाली.. काकून्ची वाट बघत मी तिकडचे निरीक्षण करत होते.. काकू आल्यावर आम्ही दर्शन घेतलं आणि कीर्तन ऐकायला स्थानबद्ध झालो..

कीर्तनकार मकरंदबुवा करम्बळकर यांनी मधुर स्वरात भक्तीगीत गायला सुरुवाते केली.. तबला आणि पेटीवादक त्यांना त्याच तोडीची साथ देत होते.. आणि शेजारी एक आजीबाई वीणा घेऊन उभ्या होत्या.. हळू हळू गर्दी वाढत होती..

धन्य तो संसारी हरिभक्ति करी । जयाचा कैवारी देवराणा ॥

वर वर पाहता याचा अर्थ किती सोप वाटतो.. "संसार करता करता जो देवाची भक्ति करतो त्याला देव संभळतो"! वाचन करताना यासारखा किवा याहून थोडा जास्त अर्थ समजता येतो.. पण कीर्तनकार या शब्दांमधला आतला अर्थ उत्तमपणे मनात ठसवतात असे मला इथे कीर्तन ऐकताना जाणवले.. समर्थानी म्हणले आहे ग्रंथांचा वाचनापेक्षा श्रवण केल्यावर जास्त अर्थ कळतो...

तर निरुपणाचा विषय या अभंगातल्या ओव्या होत्या.. देवाची भक्ति करतो त्याला देव तारतो असं म्हणलं तर सगळे म्हणतील आम्ही रोज पूजा करतो,मंदिरात जातो, वगैरे.. आम्हीही देवाला रोज बोलावतो पण तो येत नाही इत्यादी.. पण भक्तीचा खरा अर्थ वेगळा आहे.. तुम्ही किती भक्ति करता यापेक्षा तुम्ही कशी भक्ति करता हे महत्वाचे.. हे समजण्यासाठी त्यानी प्रल्हाद,बीभीषण, द्रोपदी,ध्रुवाबाळ अशांची उदाहरणे समजावून सांगितली.. देव तुम्ही बाहेरून कसे दिसतात हे पाहत नाही तर तुमचे अंतरंग कसे आहे त्यावरून परीक्षा घेतो.. जो भक्त प्रेमाने अगदी मनापासून परमेश्वराची भक्ति करतो त्याला ईश्वरी कृपा लाभते असं निरुपणाचं तात्पर्य होतं..  शिवाय ज्याच्या मनात राग,वासना,आसक्ती वगैरे विकार नाही त्याच्या पाठीशी भगवंत असतात.. बापरे म्हणलं माझ्या मनात तर हे सगळं आहे.. कधी माझं मन स्वच्छ होणार, कधी मला भगवंत भेटणार!

त्यानंतर  उत्तरार्धात एकनाथांच्या आयुष्यावर आधारित कथा सांगितली.. आणि शेवटी आरती करून कीर्तनाची सांगता झाली. ते सगळं ऐकताना वेळ कसा गेला कळलही नाही.. "कीर्तन" म्हणलं की सहसा सगळे आजी आजोबा जमा होतात.. पण ते जे सांगत होते ते आयुष्य संपल्यावर ऐकलं तर त्याचा विशेष उपयोग होणार नाही असं मला वाटतं.. दैनंदिन जीवनात आवश्यक असणार्‍या कितीतरी गोष्टी त्यांनी सांगितल्या..



तू सागर करुणेचा देवा तुजलाची दु:ख सांगावे । तुज वाचून इतरांशी दिन मुख पसरोनी काय मागावे ॥


मला हे फार भावले.. आपलं दुखं फक्त परमेश्वरच समजू शकतो म्हणून त्याच्यापाशीच मन मोकळं करावं.. बाकीचे कोणीच काही करू शकत नाही,ज्याला त्याला आपले आपले व्याप असतात...

आजकालच्या धाकाधाकीच्या जीवनशैलीत मानसिक ताण मला काय सर्वांनाच आधून मधून येतो.. तेव्हा अधूनमधून अशी कीर्तने आणि भजने ऐकल्यावर भरकटलेल्या मनाला आवर घालणे थोडे सोपे होईल.. मी निश्चय करून टाकला जसा जितका जमेल तेव्हढा सत्संग वाढवायचा.. आणि काकून्चे आभार मानले कारण त्यांच्यामुळेच मी आज इथे आले होते आणि आता नेहमीच येत राहीन..

सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो । कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो ॥

मंगळवार, ६ डिसेंबर, २०११

मंतरलेले दिवस - ४८

शनिवार :
मागच्या शनिवारी मैत्रिणिसोबत एका वृध्दाश्रमात गेले होते.. ते माझ्यासाठी जरा लांब होतं.. शोधत शोधत जाईपर्यंत उशीर झाला.. मी पोहचेपर्यंत बाकी तिघी जणी आल्या होत्या.. मी आत गेले आणि तिथलं सगळं बघून एकदम शांत झाले.. त्या वयस्कर आज्जींपैकी काही जणी खूप आजारी होत्या.. काहीजणी अतिशय मानसिक त्रास झाल्याने की काय पण फारच हसत खेळत बोलत होत्या आणि बोलता बोलता एकदम त्यांची कहाणी सांगायला लागायच्या.. तिथे नॉर्मल व्हायला मला जरा वेळ लागला... आजपर्यंत कितीतरी NGO मध्ये गेले मी पण तिथे निरागस मुलांमध्ये रमुन जायचे.. इथे मात्र मन सुन्न झालं.. नंतर मी सुधा इतर मैत्रीणिंप्रमाणे त्यांच्याशी बोलू लागले.. कोणी गाणी म्हणली, कोणी नाच केला असं चालू होतं.. थोड्यावेळाने  त्यांची जेवायची वेळ झाली आणि आम्ही निघालो.. तिथून घरी परतल्यावर मनात खूप सारे विचार येत होते..
- स्वतहाच्या  जन्मदात्यांवर  अशी वेळ का आणली त्यांच्या मुलांनी?
- मी आजपर्यंत पाहिलेले सगळे आश्रम मग ते लहान मुलांचे असो वा वृद्धांचे ते सगळे ख्रिश्चन लोकांनी काढलेले आहेत.. अर्थात मी सगळ्या ठिकाणी नाही गेले अजुन पण जास्त संस्था ख्रिश्चन लोकांच्याच आहे.. हिंदू लोक या समाज कार्यात मागे का पडतात?
- मला वीकएंडला वेळ असतो तेव्हा  मी माझ्या सवडीने थोडावेळ अनाथ आश्रमात जाते.. माझ्यासारखे बरेचजण तिकडे भेट देतात.. थोडावेळ थांबतात,खाऊ किंवा काही गोष्टी त्याना देतात.. त्याचा कितपत उपयोग त्या मुलांना किंवा वृद्धांना होतो? काहीच न करण्यापेक्षा हे नक्कीच बरय पण तरीही आपण समाजकार्य करतो असा खोटा समज तर आपण उगाच करून घेत नाहीना?


सोमवार:
असंच विचार करता करता सोमवार उजाडला.. आज ओफिसमध्ये थोडं उशिरा चालले होते.. बसची वाट बघत असताना फुटपाथवर कडेला एक वयस्कर माणूस बसलेला दिसला.. फारच आजारी दिसत होता.. पटकन त्यांच्या हातात १०ची नोट ठेवून मी परत बसची वाट बघू लागले.. तरी लक्ष तिथेच जात होतं.. तेव्हा जाणवलं, तो इतका अशक्त होता की त्याला उठून त्या पैशाचं काही घेता येईल का नाही? मी खायला घेऊन द्यायला हवं होतं. आणि नंतर तर तो माणूस केविलवाणा होऊन रडताना दिसला .. ते पाहून मला अगदी अस्वस्थ वाटलं.. काय करावं विचार करेपर्यंत बस आली आणि मी तशीच निघून गेले..
नंतर ओफिस मधल्या वातावरणात सकाळची घटना विसरून गेले.. नेहमीप्रमाणे घरी आले.. त्या रात्री मात्र विचित्र घडले.. मला त्या माणसाचा रडतानचा चेहरा डोळ्यासमोर सारखा दिसू लागला.. आणि मग मला खूप रडू आलं.. कारण मी किती हृदयशून्य माणसासारखी वागले होते.. तो माणूस रडताना कदाचित देवाची करुणा भाकत असेल.. त्याच देवाची एक भक्त म्हणून मी त्याला मदत करायला हवी होती.. पण मी तशीच निघून गेले.. माझे तन मन धन सगळे मातीमोल ठरले.. आई बाबा घरी नव्हते.. मला फार कसंतरी होत होतं.. रात्रीच्या रात्री तिकडे जाउन मदत करावी वाटत होतं पण ते शक्य नव्हतं.. रात्री कितीतरी वेळ तळमळत होते.. शेवटी देवाला मनात एक वचन दिले आणि मग कधीतरी डोळा लागला..


मंगळवार:
सकाळी सकाळी बस स्टॉप वर आल्यावर पहिले,तो कालचा माणूस नव्हता.. तो झोपायला कुठतरी जात असावा त्यामुळे तो सकाळी कधी दिसत नसेल असा निष्कर्ष मी काढला.. ओफीस मधून परतल्यावर रस्त्याच्या त्या बाजूला तो माणूस दिसतोय का बघितलं  पण मध्ये इतकं ट्रॅफिक होतं की समोरचं  काही दिसत नव्ह्तं..  रस्ता ओलांडून त्या बाजूला गेले तर तो कालचा माणूस तसाच पडून होता.. मनात काही निश्चय करून मी जवळच्या एका दुकानात गेले.. एक नवीन बेडशीट घेतलं.. मग पारलेचा सगळ्यात मोठा पुडा घेतला, ब्रेड घेतला.. अजुन काय घ्यावं विचार करत होते.. सगळं घेऊन त्या माणसापाशी गेले.. बाबांच्या वयाचे ते.. त्यांना एकेक गोष्ट काढून दिली.. बेडशीट पाहून ते म्हणले थन्डीचं पांघरायला होईल.. मला कळत नव्हतं अजुन काय द्यावे म्हणून मग त्यांच्या हातात थोडे पैसे ठेवले.. सध्या काळ असा आहे की असे पैसे देताना कोणी पहिलं तर चोरी करणारे लोकं अशा गरीब लोकांकडूनही पैसे किवा बाकी काही हिसकावून घ्यायला कमी करणार नाही म्हणून मी त्यांना पैसे नीट ठेवायला सांगितले.. आणि लगेचच मी तिथून निघून गेले.. त्या गोष्टी त्या माणसाला कितपत उपयोगी ठरतील मला शंका येत होती.. कोणी सोबतीला असलं असतं तर त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात दाखल केलं असतं जिथे त्यांची काळजी घेतली गेली असती..  तेव्हा जाणवलं की अनाथ आश्रमात कमीतकमी अन्न निवार्‍याची सोय होते.. पण अशा रस्त्यावर पडलेल्या बेवरशी लोकांचे फार हाल होतात.. काहीजण सुट्टे पैसे टाकतात त्यावर त्यांचे भागत असेल तेव्हढेच.. आता यावर काहींचे मत असते की भीक मागण्यापेक्षा त्याना काम करायला काय झाले.. मान्य आहे हे.. पण काहींची हलत खरंच खुपच खराब असते त्याना आपण मदत करणे जरूरी आहे.. यासगळ्या प्रसन्गावरून मी ठरवले, अनाथ आश्रमात मदत करणारे बरेच जण असतात पण मी मात्र यापुढे रस्त्यावरच्या गरीब गरजू लोकाना अन्न वस्त्र, औषधे देऊन जमेल तेव्हढी मदत करणार.. अर्थात त्या मदतीने त्यांचे पूर्ण आयुष्या बदलणार नाही पण एखादा दिवस तरी बरा जाईल असे मला वाटते.. मी पूर्ण नाहीए पण मी कमीही  नाहीना. त्या रात्री मला जरा शांत झोप लागली..


विशेष सूचना - या लेखातून मला कोणत्याही प्रकारचा देखावा करायचा नाहीये..  ही गोष्ट मी अजुन  माझ्या घरच्यांना किवा कोणत्याही मैत्रिणीला सांगितली नाही.. पण ज्या ज्या प्रसंगातून मला नवीन काही शिकायला मिळते मग ते आनंदाचे क्षण असो वा दुखाचे ते सगळे मी "मंतरलेले दिवस" या मालिकेत नोंद करून ठेवते.. बाकी काही नाही.

सोमवार, ५ डिसेंबर, २०११

श्रीकृष्णमर्पणमस्तु!!!


तुझा प्रेमळ हस्तस्पर्श मस्तकी होऊदे..
सुखशांतीची झुळूक माझ्या मनात वाहुदे..

तुझ्या कांतीच्या प्रभेत तनमन न्हाऊदे..
प्रत्येक श्वास माझा पवित्र होऊदे..

तुझ्या चरणकमलांशी अढळ स्थान मिळूदे.
निरंतर स्थिरता माझ्या चित्तास लाभूदे..

तुझ्या शीतल छायेच्या सानिध्यात राहूदे..
विकार व्यसनांपासून माझे रक्षण होऊदे..

तुझी दिव्य कृपादुष्टी मजवर असूदे..
सत्कर्माची प्रेरणा मला सदैव मिळूदे..

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०११

मंतरलेले दिवस - ४७

Being emotional is not a weakness!

एका ट्रेकची गोष्ट.. गड उतरताना आम्ही थोडे जण संध्याकाळी सहा वाजता पायथ्याशी पोहचलो होतो.. ट्रेकचा एक आयोजक मित्र आम्हाला म्हणला
"तुम्ही गाडीपाशी जाऊन थांबा मी बाकीचे आले की तिथे येईन".. त्याप्रमाणे आम्ही ३ मुली , एक मुलगा आणि गाडीचा ड्रायवर गाडीपाशी येऊन थांबलो..  ६ वाजले, ७ वाजले अगदी ८ वाजत आले तरी गटापैकी बाकीचे कोणीही गाडीपाशी आले नाही.. आधी आम्ही शांतपणे वाट बघत होतो पण नंतर मात्र मला अस्वस्थ वाटू लागले.. इतका वेळ कसा झाला, नक्की काय झालंय तिकडे असे विचार मनात येऊ लागले..  मग मी बाकीच्यांना म्हणले, त्यांच्याकडे टोर्च असेल का,किती अंधार पडलाय, आपण कमीतकमी पायथ्याशी जिथे काहीजण थांबले आहेत तिथेपर्यंत तरी जाऊ म्हणजे काय झालंय ते समजेल.. शेवटी तो ड्रायवर आणि मी पायथ्यापाशी निघालो.. १५/२० मिनिटांचा रस्ता होता खरंतर.. पण पूर्ण झाडी अन कर्र काळोख होता.. दूरवर काजवे चमकताना दिसायचे तेव्हा तिथून कोणीतरी येतंय असं वाटायचं.. त्या छोट्या पायवाटेवर आमच्याशिवाय कोणीच नव्हतं..  ड्रायवर अनोळखी अन हि जगही अपरिचित,सुनसान या गोष्टीचं भान मला होतं..  म्हणून मी एका हातात ट्रेकची काठी आणि दुसर्या हातात टोर्च घेऊन अगदी काही झालंच तर प्रतिकार करायला सज्ज होते.. शिवाय ग्रुपमधल्या मित्रामैत्रीनिना मोठओमोठ्यांदा हाक मारत चालत होते.. अशारीतीने आम्ही पायथ्याशी पोहचलो आणि उशीर व्हायचं कारण समजलं.. सगळे सुखरूप खाली आल्यावर जीवात जीव आला..

दुसऱ्या दिवशी ट्रेकपैकी एका मैत्रिणीचा मेल आला,खास मला झापायला.. ती माझ्याबरोबर गाडीपाशी थांबली होती.. तिला मी ड्रायवर बरोबर गेलेले अजिबात पटले नाही.. तिने मला बरंच सुनावलं.. त्या ड्रायवरने काही केले असते तर वगैरे वगैरे.. त्या दिवशी मला वाटलं की माझ्या हातून फार मोठा गुन्हा घडलाय.. मान्य आहे की काळजी वाटली म्हणून ती मला असं बोलली.. पण ती वेळच अशी होती की मला ट्रेकच्या बाकी मंडळींचं काय झालं या विचाराने राहवलं गेलं नाही..  खरंतर ट्रेकचे अनुभवी आयोजक तिकडे होते त्यामुळे त्यांनी सगळी नीट काळजी घेतली असेल हे मला माहिती होतं पण तरीही त्यांची एक मैत्रीण म्हणून मी भावनावश झाले आणि पायथ्यापाशी एकटी ड्रायवर सोबत आले.. या गोष्टीवर ट्रेकर्स मित्र मला रागावले असतील अस वाटलं कारण त्यांच्यावर माझी जबाबदारी होती..   नंतर बरीच मेलामेली झाली.. मी तिची अन ट्रेकर्स मित्रांची माफी मागितली.. मग तिनेही मला वाईट वाटलं म्हणून माफी मागितली.. आणि नंतर ती गोष्ट आम्ही विसरून गेलो..


आता परवाच आम्ही मैत्रिणी गप्पा मारत असताना कशावरून तरी हिरकणीची गोष्टीबद्दल चर्चा केली.. उशीर झाला होता, तिचं बाळ वाट बघतंय म्हणून तिला घरी पटकन जायचं होतं पण गडाचे सगळे दरवाजे बंद झाले होते.. तिने विनवणी केली पण दार उघडायला कोणी तयार नव्हते..  घरीतर पोहचायचे होते.. मग ती त्या अंधारात स्वतः एका कड्यावरून पायवाटेने गड उतरून पायथ्याशी गेली.. खाली  एकटी जाताना काळोख होता, वाट असुरक्षित होती आणि तिचे सगळे कपडे फाटले जात होते.. पण तिचं त्याकडे कुठेही लक्ष नव्हतं, तीव्र ओढीने तिची पावले पुढे पुढे जात होती.. तिला तिच्या बाळाला कधी भेटतेय असं होत होतं..
त्या शूर हिरकरणीचा पराक्रम दुसर्या दिवशी शिवरायांच्या कानावर पडला.. तेव्हा "तिने जीव धोक्यात घालून नसते धाडस का केले,तिला कोणी काही केले असते तर" असं म्हणून राजे तिला रागावले नाही.. तर उलट तिला बक्षीस दिले आणि त्या कड्याला हिराकर्णीचे नाव दिले.. घरच्या ओढीने  ती emotional  झाली आणि  तिने धोका पत्करला याचा अर्थ तिला काही कळत नाही असा नव्हता.. भावनाप्रधान असणं म्हणजे दुर्बल असणं असं मुळीच नाहीये..  उलट त्या प्रामाणिक शुद्ध भावनांमधून एक प्रकारची शक्ती मिळते आणि त्या शक्तीच्या सहाय्याने आपण कोणत्याही संकटाला खंबीरपणे तोंड देऊ शकतो.. जर ती खाली जाता येत नाही म्हणून केवळ रडत बसली असती आणि तिला एकटीला काहीतरी होईल या भीतीने तिथेच बसून राहिली असती तर मग तिला दुर्बल म्हणता आले असते.. आता यावर कोणी म्हणेल की तिने तिच्या बाळासाठी जीव धोक्यात टाकला.. तू मित्रमैत्रिणींसाठी इतकं काही करायची गरज नाही.. पण मला असे भेद करता येत नाही.. एकदा मैत्र जुळले की मग ते आपलेच असतातना..

so  called  practical  लोकांना माझ्यासारखी emotional  मुलगी आवडत नाही.. त्यांना कदाचित साहित्यही आवडत नसेल कारण कविता ,लेख यामधून  लिहिणाऱ्याचे विचार, मते आणि भावना प्रकट होत असतात..या पार्श्वभूमीवर माझंही मन emotional , sensitive  असलं तरी  दुर्बल नाहीये हे मला जाणवत.. बाकी लोक जे बोलायच ते बोलतातच..

नही समझे है वो हमे तो क्या जाता है..
हारी बाज़ी को जीतना हमे आता है..  :-)

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०११

मला खावं वाटतं.. जरूर खा..

तुम्हाला मला खावं वाटतं? जरूर खा.. माझे मांस खाऊन तुम्हाला क्षणभर आनंद होत असेल तर नक्की खा.. होय, माझे प्रियजन वाट बघत असतील.. नुकतच जन्मलेलं आमचं पिल्लू एकटं पडेल.. पण त्याचं इतकं काही नाही,आज ना उद्या मला हे जग सोडायचच आहे..  मग जर आज कोणाच्या सुखासाठी माझा प्राण जात असेल तर मला खात्रीपूर्वक मुक्ती मिळेल किवा कमीत कमी पुढचा जन्म माझा वरच्या स्तरावर होईल..  मात्र  या क्षणिक सुखाने तुमचा प्रवास कुठवर जातोय याचा एकदा काळजीपूर्वक नक्की विचार करा..
- एक तळमळणारा जीव

रविवार, २० नोव्हेंबर, २०११

मंतरलेले दिवस - ४६

किस लिये जीते हैं हम किसके लिये जीते हैं..
बारहा ऐसे सवालात पे रोना आया..

अगदी अशीच काही माझी मनस्थिती झाली होती त्यादिवशी..  विचाराच्या भोवऱ्यात मन अस्वस्थ झालं होतं..  "एक मुलगी म्हणून संसार करावा वाटला तर तो योग आला नाही.. बर ते नाही तर अध्यात्मिक प्रगती करण्यात केंद्रित करू पाहावं म्हणलं तर 'समभाव', 'विरक्ती' ,'अलिप्तपणा' आचरणात आणता आला नाही.. ना प्रपंच ना परमार्थ अशी गत झाली आहे.. माझ्या आयुष्याला काही ध्येय नाही.."

सुट्टीचा दिवस.. मनाला अशक्तपणा आला होता.. काय करावं समजत नव्हतं.. अशावेळेस कोणाशी बोलावही वाटत नाही कारण एकतर माझं सगळं ते समजून घेऊ शकत नाही आणि त्यांनी दिलेले सल्ले मला पटतीलच असंही नाही.. शिवाय सगळ्यांना आपापले व्याप असतातचना.. आज घरी आरामच करायचा ठरवलं.. मला काही उद्योग नाही म्हणून असले भलतेसलते विचार मी करत बसते असा मीच माझ्यावर आरोप केला.. म्हणून मग आहेत नाहीत तेव्हढे सगळे कपडे धुवायला घेतले.. इतके कपडे धुतल्यावर हात पाय दुखू लागले पण मनावर काडीमात्र परिणाम झाला नाही..

सगळी कामं आटोपल्यावर पुस्तक वाचू म्हणालं.. पुस्तकांचं कपाट उघडलं आणि नकळत वीर सावरकरांचं 'माझी जन्मठेप' घेतलं.. एकेक पान उलगडू लागले अन मन त्या पुस्तकात खोल खोल शिरू लागलं.. सावरकरांचा प्रत्येक शब्द काळजात कोरला जात होता.. " ५० वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा.. अंधाऱ्या कोठडीत फक्त मी आणि माझी शिक्षा.. दिवस कसे काढायचे? वाचन करून ज्ञान मिळवावं तर इथे पुस्तके मिळणार नाही.. लेखन करून प्रचार करावा तर कागद पेन्सिल नाही.. कोणाशी चर्चा नाही,भेटीगाठी नाही.." खरोखर किती भयंकर परिस्थिती होती.. नुसतं वर्णन ऐकून अंगावर काटा येत होता.. पण ती व्यक्ती सर्वसाधारण व्यक्ती नव्हती.. विचारांती त्यांना त्या अंधाऱ्या खोलीतही प्रकाश दिसला.. त्यांचं एक लहानपणीपासूनचे स्वप्न होते महाकाव्य रचायचे.. "इतके दिवस सवड मिळाली नव्हती पण आता या वेळेचा सदुपयोग करता येईल.. मनातल्या मनात कविता रचायच्या आणि स्मृतीपत्रावर लिहून ठेवायचा.. सुटका झालीच कधी पुढे तर जगाला ते काव्य अर्पण करायचे!!!"   

आहा किती भव्य अन खंबीर त्यांचे मन.. इंग्रजांनी त्यांच्या देहाला शिक्षा दिली पण मनाला मात्र ते बंदिवासात अडकवू शकले नाही..  केव्हढी ती शक्ती सुमनाची.. हे वाचताना डोळे तर पाणावलेच पण मला माझीच लाज वाटली.. ते बंदिस्त असतानाही कार्यरत होते.. आणि मी पूर्णपणे स्वतंत्र असतानाही आयुष्याला काही ध्येय नाही अशी बडबड करत होते.. माझं मन पांगळं का असं वाटू लागलं.. जाग आली, डोळे उघडले आणि मनाची मरगळ निघून गेली.. आपणही काहीतरी चांगलं कार्य करू अशी एक नवीन उमेद आपोआप निर्माण झाली..

खरंतर हे पुस्तक मी केव्हाचं आणून ठेवलं होतं पण आजच का वाचायला घ्यावं हा मला योगायोग वाटला.. कदाचित भगवंतांपाशी  मी माझं गऱ्हाणं मांडल्याने हे पुस्तक वाचायची सदबुद्धी देऊन त्यांनी माझ्या मनाला टोनिक दिले..

ShreeKrishna says in the Bhagavad Gita..
'The mind can be the soul's best friend, or make one's life a hell.'

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०११

मंतरलेले दिवस - ४५

Day 1: पुणे - तारकर्ली
भटकंती बऱ्याच दिवसापासून चालूच होती पण या ट्रिपचे विशेष म्हणजे आईबाबान्सोबत चालले होते त्यामुळे मी एकदम निवांत.. सगळं बुकिंग आधीच झालं होतं.. बाबांनी नेहमीप्रमाणे आम्हाला बस स्थानकावर १ तास आधीच आणलं.. मग तासभर आम्ही स्वारगेट, तिथली गर्दी, सुव्यवस्था? याचं निरीक्षण आणि चर्चा करत बसलो.. दिवाळीमुळे प्रचंड गर्दी होती.. बऱ्याच ज्यादा बस सोडल्या जात होत्या.. शेवटी आमची बस आली आणि आम्ही त्या गर्दीच्या पुरात शिरलो.. आरक्षण केले असताना देखील सर्वाना चढायची घाई असतेच.. ती पण एक मज्जा असते म्हणा... :)
पुणे सातारा रोडवरून मी सलग सहाव्या वेळा जात होते.. तोच रस्ता, तीच फुले, तेच डोंगर आणि तेच टोलनाके.. :) आणि तरीही अगदी नव्याने मी सगळं खिडकीतून पाहत होते.. बस असो रेल्वे असो विमान असो मला हा प्रवास फार आवडतो.. पहाटे लवकर उठून दिवाळीचं अभ्यंगस्नान वगैरे करून निघालो होतो त्यामुळे एकदम उत्साह वाटत होता..  सोबतीला दिवाळीचा खाऊ होता.. असे ९ तास काढायचे होते.. ढगाळ हवामान होता त्यामुळे उन्हाचा त्रास झाला नाही..  सातारा कराड कोल्हापूर सगळीकडे थांबत थांबत, लोकांना घेत घेत बस आरामात चालली होती.. जवळपासच्या गावात जाण्यासाठी लोक उभं राहून येत होती.. लांबची गाडी असूनही असं का चाललं होतं काय माहिती.. कोल्हापूरच्या पुढे कोकण भागात समजू शकतो कि तिकडे बस कमी असतील पण इथे इतकी थांबवायला नको होती..असो.. तर अशा मंद वेगामुळे थोडावेळ प्रवास कंटाळवाणा झाला पण जेव्हा कोकण सुरु झाले तेव्हा बस अजून हळू चालली तरी हरकत नाही असे वाटू लागले.. ती मोठी नारळाची झाडं, कौलारू घरं, छोटे रस्ते, मध्ये अध्ये शेती, विहिरी,तळी आणि दूरवर सह्याद्रीच्या हिरव्यागार रांगा.. वाटेत  मोठा पाण्याचा तलाव लागला तिथे अर्धगोल सुरेख इंद्रधनुष्य दिसलं तेव्हा आपली गाडी असली असती तर इथे जरावेळ थांबलो असतो असं वाटून गेलं.. मालवणच्या आधी बरीच छोटी छोटी गावं लागत होती.. दिवाळीमुळे सगळीकडे पणत्या, आकाशकंदील आणि रांगोळ्या दिसत होत्या.. आणि गम्मत म्हणजे तिथल्या मुलांचे किल्ले.. आपल्याकडे सगळे किल्ले उंच गडावर असतात त्यामुळे लहान मुला तसाच प्रकारचे मातीचे किल्ले बधून मग पायऱ्या करतात.. पण इथली मुले सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढलेली.. त्यांनी केलेले किल्ले सपाट होते समुद्रातले जलदुर्ग.. आपण जिथे राहतो,वाढतो  तिथला किती प्रभाव असतोना आपल्यावर..बसमधून सूर्यदेवाला म्हणत होते जरा थांब मी येताच आहे, तारकर्लीला पोहचल्यावर लगेच सागरातून तुझं दर्शन घेते.. पण तो कोणासाठी थांबणार?
१० तासाच्या प्रवासानंतर शेवटी मालवणला पोहचलो.. तिथला पहिला रिक्षावाला पुण्याच्या रिक्षावाल्यान्सारखाच होतां.. :) आम्हीही पुण्यातले म्हणून मग दुसरी रिक्षा केली आणि  तारकर्लीला याहू रिसोर्टला गेलो.. मालवण तारकर्ली ७ कि मी.. अंधारात कुठल्यातरी जंगलातून चाललोय असं वाटत होतं.. मज्जा आली.. याहुचे काका बाहेर आधीच येऊन थांबले होते.. आत छान बाग होती पण बर्यापैकी अंधारच होता.. त्यांनी आम्हाला आमची कॉटेज दाखवली ती पाहून मी जाम खुश झाले.. तिथे समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता.. पण मग समुद्र कुठेय असं मी लगेचच विचारलं.. त्यांनी सांगितल इथेंच समोर आहे पण मोठी झाडे मध्ये असल्याने आता दिसत नाहीये.. सकाळी दिसेल.. मी म्हणलं आता जाता येईल का ते म्हणले हो जाऊन या, हि जागा सुरक्षित आहे.. मी लगेच बाबांना म्हणलं मला रात्री समुद्र कसा दिसतोय ते पहायचंय.. पण आई बाबा स्पष्ट नाही म्हणले.. :(  घरच्यांसोबत ही एक अडचण असते, पाहिजे ते करता येत नाही.. मैत्रिणीसोबत गेले असते तर नक्कीच आम्ही लगेच बीचवर पळालो असतो.. असो.. हा परिसर खूप सुंदर होता.. स्वतंत्र कॉटेज, अंगण, झाडाला बांधलेला झोका इतकंच रात्री दिसलं.. मी फार खुश होते पण बाबांना मात्र कुठल्यातरी जंगलात आल्यासारखे वाटत होते.. त्यांना गजबजलेल्या जागेत राहायला आवडतं म्हणून..  एक मोठा गट बाकीच्या तीन कॉटेज मध्ये राहायला आला होता.. तरीही इथे खूप शांतता होती.. मला फार आवडली.. त्या झोक्यावर आडवं पडून आकाशातले तारे बघताना मनाला खूप आराम मिळाला.. नंतर अस्सल मालवणी जेवण घेतलं.. इथली सोलकढी खऱ्या अर्थाने  नारळातल्या दुधातालीच होती.. आपल्याकडे पाणी जास्त घालतात पण इथली एकदम घट्ट अन चविष्ट होती.. आईला सोलकढी विशेष आवडत नसल्याने चार दिवस तिच्या नावाची सोलकढी पण मीच घेतली.. 
उद्या जवळपास काय काय पाहता येईल यावर आम्ही त्या काकांशी चर्चा केली.. मी स्नोर्कालिंग बद्दल खूप ऐकलं होतं आणि उत्सुक होते म्हणून  त्यांना विचारले.. त्यांनी माहिती दिली आणि आमचा उद्याचा प्लान ठरला. दिवसभर प्रवास झाला असल्याने लगेचच झोप आली.. कधी एकदा सकाळ होते आणि मी कधी समुद्रावर जाते असं मला होत होतं.. त्याच विचारात झोप कधी लागली कळलंच नाही.. 

 Day 2 : सिंधुदुर्ग - मालवण 
सकाळी लवकर जाग आली.. बाहेर आल्यवर कळलं की ही जागा फारच सुंदर आहे.. गेटच्या बाहेर गेलो तर समोर  अथांग पसरलेला समुद्र दिसू लागला.. मी पळत पळत गेले आणि.. आणि दार उघडल्यावर घरातलं लहान मुल कसं पळत पळत यावं तशा त्या लाटा माझ्यापाशी आल्या..  मीही त्यांना अलगदपणे जवळ घेतलं.. अहोटी चालू होती बहुदा.. हा पश्चिम किनारा, तरीही सूर्योदयाच्या छटा सर्वत्र दिसत होत्या..  समोर् दूरवर क्षितिजापर्यंत टेकलेला समुद्र अन आकाश.. आणि  इथे किनाऱ्याला उंच नारळाच्या अन सुरुच्या झाडांची सुरेख किनार.. स्वच्छतेमुळे हा सागरी किनारा जास्तच सुंदर भासत होता.. हातात हात घालून येणाऱ्या त्या फेसाळत्या लाटांना बघून मी वेडीच झाले होते.. कितीदाही समुद्र बघितला तरी दरवेळेस त्याचे नवीनच रूप दिसतेना..
आज आवरून नाश्ता करून सिंधुदुर्ग किल्ला पाहायला जायचा होतं त्यामुळे थोडावेळ सागर दर्शन घेऊन परतलो... आमची गाडी नसल्याने रिक्षेने जायचे ठरले होते.. इथे आसपास काहीच जवळ नसल्याने याहूच्या काकांनी फोने करून रिक्षा बोलावली.. आमच्या बरोबरच  ग्रुप आमच्या सोबतच त्यांच्या ग्गाद्यानी सिंधुदुर्गला पाहायला निघाला.. छोट्या छोट्या गल्ली बोळातून रिक्षावाल्याने मालवणला नेले आणि तिथे एकीकडे रिक्षा थांबवली.. येताना परत तोच रिक्षावाला आम्हाला घ्यायला येणार होता त्यामुळे त्याने तेव्हा पैसे घेतले नाही.. इथे ही गोष्ट प्रखरपणे जाणवली की सगळं काम झाल्याशिवाय पैसे कोणी घेत नव्हतं कारण हे सगळे एकमेकांच्या ओळखीचे होते.. आम्ही जर येताना त्या रिक्षावाल्याला भेटलो नसतो तर त्याने याहूच्या काकांशी संपर्क साधला असता..
पुढे आम्ही छोट्या वाटेतून चालत एका गल्ल्तीतून पुढे आलो तर काय हा पसरलेला समुद्र किनारा.. आणि दुरूवर दिसाराना जलदुर्ग, सिंधुदुर्ग.. किनाऱ्याला बऱ्याच बोटी होत्या.. जन्जीराला जाताना होडीतून जावं लागता तसंच इथेही आम्ही सगळे होडीतून सिंधुदुर्गाकडे निघालो.. मी अगदी पुढे टोकावर बसून निसर्ग अनुभवत होते पण माझे इवले डोळे कमी पडत होते.. पाहता पाहता सिंधुदुर्ग जवळ येऊ लागला.. बोटीतून उतरल्यावर बोटीवरच्या माणसाने त्याचा फोन नंबर दिला.. इथे सगळीकडे फोनची रेंज होती.. किल्ला बघून झाला की सांगा मग स्नोर्कलिंग पॉईन्टला जाऊ असे त्याने सांगितले..
दिवाळीच्या सुट्टी मुळे किल्ला पर्यटकांनी फुलला होता..  छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधताना खडकात शिसे टाकून त्यावर किल्ला उभारला असं वाचलं होतं.. आता प्रत्यक्ष पाहताना फार आनंद होत होता..  महाद्वारातून प्रवेश करून नगारखाना वगैरे पाहत आम्ही शिवराजेश्वर मंदिरापाशी आलो.. आजपर्यंत बघितलेल्या किल्ल्यांवर असं शिवरायांचं मंदिर कुठेच पाहिलं नव्हतं.. शिवराजेश्‍वर मंदिर हे राजाराम महाराजांनी बांधलेले आहे.. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ्या पाषाणात कोरलेली शिवछत्रपतींची मूर्ती आहे.. महाराजांचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदीर आहे.. तिथे पेटीमध्ये त्यांची एक मोठी तलवार ठेवली आहे.. ती इतकी भारदस्त आहे की आपल्याला उचलायलाच जड.. तर त्यांनी ती तलवार घेऊन लढाई कशी असेल हे त्यांनाच माहिती.. :)  पुढे मग तटबंदी, बुरुजे, काही अवशेष, राणीचा वेळा, विहिरी बघत बघत तटफेरी केली.. इथे काही कुटुंब पिढ्यान पिढ्या राहत आहेत.. किल्ल्यावर खाण्यापिण्याची सोय आहे.. 
किल्ला बघून झाल्यवर आम्ही द्वारापाशी आलो.. होडीतून आम्ही याहूची  सर्व मंडळी सिंधुदुर्गालाच लागून असलेल्या स्नोर्कलिंग पॉईन्टला गेलो.. प्रवाळ भागात सूर्यकिरणे डोक्यावर आल्यावर स्नोर्कलिंग केले जाते..  ढगाळ हवामानात स्नोर्कलिंग करता आले नसते त्यामुळे मी कधी नव्हे ते पाऊस नको अशी इच्छा करत होते..  सोबतचा ग्रुप मुंबईचा होता,ते जवळ जवळ सर्वजण स्नोर्कलिंग करणार होते..  माझे आईबाबा मात्र स्नोर्कलिंगकडे माझा एक नवीन हट्ट म्हणून बघत होते..  मी लहानपणी पोहायला शिकले होते पण त्यांनंतर आजगयात कधीही पोहले नव्हते.. त्यामुळे त्यांना जरा काळजी वाटत होती पण तिथे गेल्यावर ट्यूब वर सर्वाना तरंगताना पाहून मग  ते बिनधास्त झाले.. जिंदगी ना मिलेगी दुबारा मध्ये दाखवलंय तसं अगदी खाली जायचं नव्हतं इकडे.. तिथे गेल्यावर आम्हाला मास्क देण्यात आले आणि सगळी माहिती सांगण्यात आली.. मास्क लावून तोंडाने श्वास घ्यायचा होता आणि त्यासाठी पाण्याच्या वरती हवेत जाईल एव्हढी नळी लावली होती.. म्हणजे आपण मास्क लावून ट्युबवर तरंगत राहून पाण्यात खाली बघायचे आणि तोंडाने पाण्याबाहेर असलेल्या नळीतून श्वास घ्यायचा.. ओठ पूर्ण घट्ट बंद करणं महत्वाचं होतं कारण तोंडाने श्वास घ्यायचा होता..  मात्र सुरुवातीला माझ्या ओठांची पकड घट्ट होत नव्हती त्यामुळे पाण्यात उतरल्यावर माझ्या तोंडात पाणी गेलं आणि मी पुन्हा बाहेर आले..
थोडावेळ तोंडाने श्वास घायचा सराव  करून मी पुन्हा पाण्यात उतरले आणि गाईड सोबत सागर सफारीला निघाले.. खाली बघायला सुरुवात केली.. पाण्याच्या आतला एक वेगळंच राज्य.. कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे, रंगाचे  अन आकाराचे मासे दिसू लागले.. कुठे थोडे खडक होते.. वेगवेगळ्या वनस्पती होत्या.. तो गाईड ट्यूब ओढत पुढे पुढे नेत होता आणि माशांची नावे व माहिती सांगत होता.. पैकी एक मखमली निळ्या रंगाचा मासा (angel fish) दुर्मिळ दिसतो म्हणे.. पुढे एकीकडे खूप छोटे छोटे मासे होते ते पायाला चाटून जात होते  असं जाणवलं.. मध्ये एकीकडे मी डोकं जरा जास्तच पाण्याखाली घातला त्यामुळे ती नळी पायात गेली काही क्षण श्वास रोखला गेला पण लगेच सगळं सुरळीत झालं.. बोटीपाशी परत आलो तेव्हा मी म्हणलं झालंही  इतक्या लगेच.. तो गाईड म्हणे उद्या परत या.. बाबा म्हणले तुला त्यांनी बराच लांब नेलं होतं.. तिथले सगळे लोक नीट माहिती देत होते त्यामुळे कुठे कसलीच भीती वाटली नाही.. अगदी लहान पोरंही स्नोर्कलिंग करत होते.. सर्वांचा झाल्यावर बोटीने आम्ही किनारयापाशी आलो.. तिथे अंघोळीसाठी चांगली सोय होती.. खारट पाण्याने, समुद्राच्या रेतीने भिजलेले कपडे बदलल्यावर फ्रेश वाटले.. आता खूप भूक लागली होती.. मालवण मध्ये मालवणी पद्धतीचे आजचे जेवण ट्रीपमधले d best जेवण होते.. ट्रीपमध्ये खूप जणांनी  आम्हाला बसने कसे काय आला असे विचारले.. सहसा सगळे मुंबई पुणे वाले आपल्या गाड्या घेऊनच येतातना.
यानंतर आम्ही मालवण साईट सीइंग केले.. त्यामध्ये जय गणेश मंदिर, रॉक गार्डन आणि चीवला बीच बघितला.. यासाठी रिक्षा केली होती तो ड्रायवर फारच भारी होता.. त्याने जाता जाता आम्हाला मालवणची कचेरी, शाळा, कॉलेज, बाजार, कोणाकोणाचे बंगले यासगळ्या गोष्टी अगदी तप्शिलासोबत दाखवल्या.. मला रॉक गार्डन खूप आवडली.. खडकावरून तयार केलेली  बाग.. आणि तिथे पुढे दगडांवर बसून समुद्राचे चित्र फार सुंदर दिसत होते..  
तारकर्लीला परतल्यावर चहा घेऊन लगेच सूर्यास्त पाहायला जवळच्या तारकर्ली बीचवर गेलो.. पाहतो तर पाणी सगळं आत गेलं होतं.. खेकड्यांनी केलेलं सुंदर कोरीव नक्षीदार काम आपल्याला यंत्रानेही अवघड गेलं असतं.. गावातली मुळे निवांत क्रिकेट खेळत होती.. गायी अन पाखरे आपापल्या घरी परतत होती.. इथे एक प्रकारची आल्हाददायक शांतता जाणवत होती.. बाकी आमच्याशिवाय बीचवर कोणीच नव्हतं.. आईबाबा तर लांब बसून सुर्यास्ताचा देखावा बघत होते  त्यामुळे अख्खा समुद्र फक्त माझाच एकटीचा होता.. :))
तिथे किती फोटो काढून अन नको असं होत होतं आणि असं करता करता कॅमेअची ब्याटरी संपली.. आज आयुष्यात पहिल्यांदा मी सूर्याचा लाल लाल गोळा पूर्णपणे समुद्राच्या पाण्यात बुडताना पाहत होते.. आणि हे सुदंर दृश्य मी कॅमेरामध्ये टिपू शकले नाही.. उद्याचा दिवस होताच म्हणा..  त्यावेळेस इतका छान संधिप्रकाश पडला होता तेव्हा त्या मनमोहक छटा, ते निळे काळे पांढरे पाणी , ते विस्तीर्ण आकाश वगैरे बघून परमेश्वराच्या निर्मितीचे आश्चर्य वाटून मन थक्क झाले  आणि नकळत हात जोडले गेले.. 
येताना  मालवणचे  दैवत रामेश्वर (नारायण) यांचा पालखी सोहळा बघायला मिळाला.. लोक खूप नाथून थाटून उत्साहाने मनापासून सहभागी होते.. ढोलाच्या नादात वातावरण दुमदुमून गेले होते.. रिक्षावाल्याने आम्हाला त्याबद्दल बरीच माहिती सांगितली.. छान वाटलं ते सगळं पाहून.. 
सूर्यास्त झाले की इथे फार डास येतात.. संध्याकाळी साधारण ६ ते ७च्या वेळेमध्ये डासांनी आपण हैराण होऊन जातो.. आणि नंतर आपोआप ते डांस निघून जातात ,कुठे काय माहिती.. हा अनुभव तिथे रोज आला..  उद्या विजयदुर्ग अन कुणकेश्वर मंदिर पाहण्यासाठी गाडी ठरवली.. उद्या सकाळी लवकर निघायचं ठरवून रात्री आम्ही लवकर झोपून गेलो..

 Day 3 : किल्ले विजयदुर्ग - कुणकेश्वर मंदिर 
सकाळी लवकर आवरून आम्ही विजयदुर्ग किल्ला बघायला बाहेर पडलो.. साधारण ६० कि मी अंतर कापायचं होतं.. सकाळचा प्रवास फारच सुंदर होता.. वाटेत मोठ्या मोठ्या नद्या लागत होत्या तिथे आम्ही थांबत होतो, निसर्गाचा आनंद घेत होतो.. देवगडचा रस्ता असल्याने रस्त्याच्या दुहेरी बाजूला मोठमोठ्या आंब्याच्या बागा होत्या..  एकीकडे नाश्त्याला थांबलो तिथले पोहे उत्तम होते.. एरवी मला कांदा पोहे आवडेनासे झाले आहेत.. :P पण कोकणातल्या पोह्यांची चव न्यारीच.. वाटेत एकीकडे सिंधीविनायक मंदिरापाशी थांबलो.. त्या मंदिरातून जिन्याने खाली गेलो तर तिथे तळ्यामध्ये कासवाच्या पाठीवर असलेली महादेवाची पिंड होती.. ती जागा अन तिथलं तळं सुरेख होतं.. 
पूर्वी विजयदुर्ग समुद्रात आत होता तेव्हा तिथे जाण्यासाठी लकडी पुलावरून जावे लागे..  आता मात्र भर टाकून जमीन केली आहे.. किल्ल्यापाशी आलो तर हा अभेद्य जलदुर्ग आणि बाजूला विशाल समुद्र.. समुद्राचे निळसर पाणी  उन्हात सोन्यासारखे चमकत होते..
याहूच्या काकांनी आम्हाला सांगितलेच होते की किल्ला फार मोठा आहे, तुम्ही तुमचा बघायला गेला तर नीट कळणार नाही,गाईड करा.. प्रवेशद्वारापाशी एक गाईड एका वेगळ्या ग्रुपला माहिती सांगत होता,आम्ही त्यांच्यात सामील झालो.. त्यांनी आधी किल्ल्याचा इतिहास सांगितला.. मग पुढे जाऊ तशी माहिती सांगू लागले.. जीभीचा दरवाजा, तटबंदी, तोफ गोळा, कचेरी , खलबतखाना,सदर, धान्याचे  कोठार,   जखीणीची तोफ, बुरुज, खास राणीसाठी असलेली माडी, दगडात कोरलेली श्री भवानी मातेची मूर्ती अशा कित्येक गोष्टी पाहण्यासारख्या होत्या.. मला आवडलेली गोष्ट म्हणजे थेट समुद्रातून किल्ल्यावर येण्यासाठी तयार केलेला गुप्त भुयारी मार्ग.. आणि मुख्य भव्य दालनात एका एका बाजूने बोललेले शब्द दुसर्या बाजूला व्यवस्थित ऐकू येतील अशी योजना केली होती.. याचं प्रात्यक्षिक आम्हाला त्या गाईडने दाखवलं.. अफाट निर्मितीशक्ती होती त्याकाळी.. ते सगळं पाहून आम्ही सगळे भारावून जात होतो.. किल्ला बघताना आधीच खूप उन्ह जाणवत होतं.. आणि नंतर किल्ल्यावर एके ठिकाणी गेलो जिथून सूर्याचे अंतर खूप कमी आहे.. संपुर्ण जगात सुर्य आणि पृथ्वी यातील सर्वाधीत कमी अंतर असणारी ही जागा..  किल्ला पाहू तेव्हढा कमीच आहे.. भारावलेल्या अवस्थेत आम्ही किल्ल्याच निरोप घेतला आणि गाडी श्री क्षेत्र कुणकेश्वराच्या मार्गाला लागली..
पुढे गेल्यावर कळलं की आम्ही रस्ता चुकलो आहोत.. कोकणात त्या भागात ड्रायवर लोकांचीही कधी कधी गडबड होते.. विचारत विचारत पुढे जावं म्हणलं तर रस्त्यावर दुरदुरपर्यंत एक माणूसही दिसत नव्हता.. पण यामुळे आम्हाला अगदी आतलं कोकण पाहायला मिळालं..  :)) मस्त आंब्याच्या बागा, नारळाची उंच झाडं..शेतं.. तळी, त्यातली कमळं..विहिरी.. कौलारू घरं..वाटेतल्या लोकांची अस्सल कोकणी भाषा.. जवळ जवळ १०/१५ कि मी उलटा जाऊन आम्ही ३ वाजता कुणकेश्वरला पोहचलो.. विशेष गर्दी नव्हती, महादेवाचं दर्शन छान झालं.. मन्दिर सुंदर होतं आणि तिथला समुद्र किनाराही अप्रतिम होता.. दर्शन झाल्यावर  दुपारचं जेवण घेईपर्यंत फार उशीर झालं.. उनही फार लागलं होतं त्यामुळे जेवण जास्त गेलंच नाही.. आता मालवणच्या दिशेने निघालो.. रॉक गार्डनला गाडी सोडली आणि सूर्यास्त पाहायला गेलो.. निवांत खडकावर बसून सांज क्षण पाहत होतो.. खडकावर आपटणाऱ्या लाटांचा आवाज खतरनात होता.. इथे फारच गर्दी होती.. आणि लहान मुले खूप होती.. आम्हाला तर प्रत्येक बाळाकडे बघून अर्णवची , माझ्या भाच्याची फार आठवण येत होती.. नंतर मालवण बाजारात फिरलो.. पाणीपुरी अन आईसक्रीम खाल्लं.. :) दिवसभर बराच प्रवास झाला असल्याने रात्री लवकरच गुडूप झोपून गेलो..  


Day 4  : तारकर्ली - देवबाग - मालवण - कोल्हापूर
आज इथला कोकणातला शेवटचा दिवस.. सकाळी लवकरच आम्ही तारकर्लीच्या पुढे देवबागला निघालो.. बाबांना कुठेही गेल्यावर तिथल्या स्थानिक बस मधून प्रवास केल्याशिवाय समाधान वाटत नाही.. :) म्हणून देवबागला आम्ही बसने गेलो.. बसची सोय फारच चांगली आणि स्वस्त होती.. बसचालक छोट्या गल्लीबोळातून अगदी कुशलतेने बस चालवत होता.. डावीकडे कर्ली नदी आणि उजवीकडे समुद्र असा सुंदर प्रवास चालू होता..
देवबागला कर्ली नदीतून बोटीने संगम आणि डॉल्फिन सफारीसाठी निघालो.. बोटीत फक्त आम्हीच होतो.. सर्व प्रथम कर्ली नदी जेथे सागराला मिळते ते पहिले.. या बाजूने नदी आणि त्या बाजूने समुद्राच्या उसळत्या लाटा.. पाण्याच्या रंगावरून थोडाफार फरक जाणवत होता.. आणि त्यात सकाळचं कोवळं उन्ह.. मस्त वाटत होतं.. नंतर मग बोटवाले समोरचे बेट दाखवून म्हणले की श्वास सिनेमाचे शुटींग तेथे झाले होते म्हणून आता आम्ही नदीतून समुद्रात शिरलो होतो.. लाटा उलट्या दिशेने येत होत्या.. बोटवाला म्हणला लाटांमधून घ्यायची का कडेणून..  अर्थातच मी त्याला लाटांमधून घ्यायला सांगितला.. बोट पाण्यात हेलकावे खात होती.. मजा आली.. .. डॉल्फिन पोईन्टला आलो.. बोट थांबवली गेली.. दूरवर कुठेही एकही डॉल्फिन दिसला नाही.. चारीही दिशेने फक्त अन नुसता समुद्र बास.. मध्येच एखादा सीगल पक्षी दिसायचा.. पक्षी आकाशातून पाण्यातल्या माशाला अचूक टिपायचे आणि पटकन चोचीत घेऊन भुरकन उडून जायचे हे इतका जवळून पाहिल्यावर आम्ही थक्क झालो.. आजची सागरी सफर मला सर्वात प्रिय वाटली.. :)
नंतर मग आम्ही सुनामी बेट बघितले.. सुनामीच्या वेळेस आपोआप झालेले हे बेट सकळच्या कोवळ्या किरणांमध्ये खूप सुंदर दिसत होते..  कालच्या प्रवासाने, उन्हाने आणि उशिरा जेवल्याने बाबांना जरा बरं वाटत नव्हतं.. त्यामुळे तिथे जास्त वेळ न थांबता आम्ही तारकर्लीला परतलो.. आई बाबा थोडावेळ आराम करू म्हणले.. आणि मी बीचवर पळाले.. मला जरा वाईट वाटत होतं की आता परतायची वेळ आली म्हणून.. पुन्हा सागरदर्शन होईल काय माहिती.. आज जरा तिथे गर्दी वाटली.. पण माझं मी छान एन्जोय केले.. कितीतरी वेळ मी एकटीच लाटांमध्ये फिरले.. सागराशी, निसर्गाशी हितगुज केले..  बराच वेळ झाल्यावर जड पावलांनी परतायचं ठरवलं नाहीतर बाबा शोधात आले असते.. 
जेवण झाल्यावर सगळा समान आवरून मालवण बस स्थानकावर आलो.. बसची वाट बघत होतो तेव्हा पावसाची जोरात सर येऊन गेली.. तेव्हढीच एक कमी राहिली होती.. पावसाला म्हणलं आता पाहिजे तेव्हढा पड तू.. :) आता कोल्हापूरचा प्रवास सुरु झाला.. बस खूप थांबत थांबत चालली होती.. रात्री १० वाजले कोल्हापूरला पोहोचेपर्यंत.. कोल्हापूरला उतरल्या उतरल्या म्हशीचे ताजे धारोष्ण दुध प्यायले,अर्धा लिटर एकटीने!!! तिथली  मुले आपल्यासमोर दुध काढून देत होती आणि दुध प्यायला बरीच गर्दी होती.. उद्या सकाळी देवीचे दर्शन घ्यायला जायचे होते म्हणून हॉटेल मध्ये जाऊन लगेचच आडवे झालो..


Day 5 : कोल्हापूर - पुणे
सकाळी आवरून महालक्ष्मीच्या दर्शनाला निघालो.. आईच्या खूप दिवसापासून मनात होतं.. आज आईने मस्त साडी नेसली आणि मी बऱ्याच दिवसांनी पंजाबी ड्रेस घातला!!! गजरे वगैरे घालून रांगेत उभे राहिलो.. सकाळची वेळ असूनही मंदिराबाहेर २ रांगा होत्या.. पण पटपट पुढे सरकल्याने जास्त वेळ थांबावे लागले नाही.. महालक्ष्मी देवीचे दर्शन खूप छान झाले, एकदम प्रसन्न वाटले तिथे.. मंदिराबाहेर आपल्याकडे बटाटेवडे टाळून देतात तसं गरम गरम आप्पे करून देत होते ते खाल्ले.. आपल्याकडे वडापावच्या गाड्या तसं तिथे सगळीकडे फक्त मिसळ.. कोल्हापूरच्या मैत्रिणीनी तिथल्या प्रसिद्ध मिसळ मिळण्याच्या जागा सांगितल्या होत्या पण आमच्याकडे एव्हढा वेळ नव्हता.. जवळच्या एकेठिकाणी मिसळ खाल्ली, थोडं फिरलो आणि पुण्याच्या गाडीत बसलो..  मनात छान छान आठवणींची शिदोरी घेऊन परतीचा प्रवास सुखद झाला. 

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०११

वही मनाची..

कधीतरी तुझ्या मनाची वही  मागे उलटून पहा जरा..
कुठेतरी एखादे माझ्या नावचे पान  नक्की सापडेल तुला..!

थोडं मळलेलं, थोडं फाटलेलं.. चुरगाळलेलं असेल जरा..
तरीही त्या पानामध्ये सुगंध ताजा जाणवेल तुला..!

कुठे  पुसट.. कुठे अस्पष्ट.. जुनाट झालेले असेल जरा..
तरीही त्या पानामध्ये स्पर्श प्रेमाचा जाणवेल तुला..!

काही पाकळ्या.. काही जाळ्या.. आसवांची ओलही असेल जरा..
तरीही त्या पानामध्ये अस्तित्व माझे जाणवेल तुला..!

श्रींची इच्छा..

कुठे उंच उडणं..  कुठे खोल बुडणं..
कुठे शून्यात शिरणं.. सारं काही श्रींच्या इच्छेनं..

काही असं वाटणं.. काही तसं भासणं..
काही कसं निराळं..  सारं काही श्रींच्या इच्छेनं..

थोडं कोणाशी जुळणं..  थोडं काही सुटणं..
थोडं फार टिकणं..  सारं काही श्रींच्या इच्छेनं..

कोणास कौतुक तनाचं..  कोणास कौतुक धनाचं..
कोणास कौतुक मनाचं.. सारं काही श्रींच्या इच्छेनं..

कधी वाट मिळणं..  कधी वाट चुकणं..
कधी वाट संपणं.. सारं काही श्रींच्या इच्छेनं..

देवास त्या ओळखणं..  देवास त्या समजणं..
देवास त्या अनुभवणं.. सारं काही श्रींच्या इच्छेनं..

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०११

मनाच्या दिव्यात प्रेमाची तेलवात करू..
आनंदाच्या ज्योतिने आसमंत उजळवु...

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०११

मंतरलेले दिवस - ४४

सकाळची वेळ.. नेहमीप्रमाणे ऑफिसच्या बस मध्ये खिडकीची जागा शोधून बसले.. पावसाळी वातावरण होते,हवेत गारवा जाणवत होता.. माझ्या पुढच्या सीटवर बसलेल्या मुलीने तिची खिडकी पूर्ण उघडी ठेवली  होती.. गाडी express way ला लागल्यावर जोरात वारा वाहू लागला.. मला थंडी वाजायला लागली म्हणून तिला खिडकी बंद करतेस का विचारायला मी उठले.. पण तेव्हा पाहिलं तर त्या वाऱ्याचा ती मनसोक्त आनंद लुटत होती.. तिचे केस छान उडत होते आणि ती त्या वातावरणात हरवून गेली होती.. अशात तिचा विरस करावा हे मला ठीक वाटले नाही.. म्हणून मी स्कार्फ लावून तशीच बसले.. प्रश्न थोड्या वेळाचा तर होता.. ऑफिस आले की दोघींना उतरायचेच होते.. तिचा वाऱ्याचा आनंद फार काळ टिकणार नव्हता आणि मला वाऱ्याचा होणारा त्रास सुधा कायम टिकणार नव्हता..

जीवन यात्रेत बरेचदा असेच अनुभव येतात ना.. एखाद्यासाठी जी सुखाची गोष्ट आहे ती दुसर्या कोणासाठी दुखकारक ठरू शकते.. आणि एखाद्याच्या दुखाची गोष्ट कोणालातरी आनंद देत असते.. सगळेच एका वेळेस सुखी होऊ शकत नाही बहुधा.. आणि प्रत्येकाची ही सुख - दुखं क्षणिक असतात..  पण कधीतरी  स्वतःचं दुखं बाजूला ठेवून दुसर्यांच्या सुखात सहभागी व्हायला जमलं  तर त्यातून मिळणारं समाधान मात्र चिरंतन असेल..

अपना तो क्या जिये मरे चाहे कुछ हो..
तुझको तो जीना रास आ गया..
जाने तू या जाने ना, माने तू या माने
ना..

रविवार, २ ऑक्टोबर, २०११

मंतरलेले दिवस - ४३

स्कूल चले हम..

"Life is not only about achieving - it is about contributing.." हे वाक्य मनात नेहमीच घुटमळत असतं.. मी नशीबवान आहे कारण माझ्याकडे मला जे पाहिजे ते करायला साध्यातरी पुष्कळ वेळ असतो (touch-wood).. पण मग भटकंती, वाचन किवा अजून काही कार्यक्रमात भाग घेऊन मी फक्त स्वतःचं मनोरंजन करत असते.. ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी काहीतरी खास काम करून वेळेचा सदुपयोग करावा असे कायम वाटते.. तरी नक्की काय करावं हे मात्र समजत नाही..सहज बोलता बोलता प्रीती म्हणाली शनिवारी शालेय शिबिराला जात आहेस का.. आम्ही client बाजूला असल्याने इन्फी मध्ये काय चालू असतं हे बरेचदा काळतच नाही.. मग लगेचच मेल पहिला आणि शंतनुंना फोन लावला.. आपटे आडनाव वाचून मी मराठीतच सुरु केलं आणि आणि मी येतीये सांगून टाकलं..  फोननंतर मला समजलं  कि ते पूर्वी आमचे DM  होते म्हणून.. नंतर प्रीतिसुधा येणार म्हणाली मग आमच्या चर्चा आणि प्लानिंग सुरु झाले..

स्पार्क हा इन्फीचा एक गट आहे त्याद्वारे शहराबाहेरील गाव-खेडमध्ये शिबिरे घेतली जातात.. आतापर्यंत पुण्याजवळच्या आसपास असे उपक्रम चालू असे,यंदा सांगलीजवळ विटा या गावामध्ये जायचे ठरले होते..विटा मधील आदर्श अभियंता कॉलेज मध्ये आजूबाजूच्या परिसरातील वेगवेगळ्या शाळेमधून जवळ जवळ २८०० विद्यार्थी येणार होते.. अशा आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आम्ही संगणकाबद्दल माहिती देणार होतो.. अशा उपक्रमांना इन्फ़ोशिअनचा नेहमीच भरघोस प्रतिसाद मिळतो.. यंदाही आम्ही ८०जण चाललो होतो.. जायची यायची, खाण्या पिण्याची अशी सगळी सोय ऑफिसने केली होती.. भरीस भर म्हणजे आपण कॉम्पुटरचं काय काय शिकवायचं वगैरे यासाठी ppt  सुधा तयार केलं होतं.. आम्ही फक्त आपला वेळ आणि ज्ञान विद्यार्थ्यांना द्यायचा होता,बस..

पहाटे ५.३० वाजता आम्ही कोथरूडवासी चांदणी चौकात जमून बसची वाट पाहू लागलो.. शंतनूनी प्रताप  याच्याशी ओळख करून दिली तेही DM आहेत आणि स्पार्कचे सगळं ते अगदी उत्साहाने पाहतात असे सांगितलं.. आणि प्राजक्ता या एका नवीन मैत्रिणीशी ओळख झाली.. :) दोन बस ऑफिसमधून निघाल्या होत्या.. ८० लोकं जमेपर्यंत निघायला थोडा उशीर झालाच.. बसमध्येच सर्वाना नाश्ता देण्यात आला.. स्यांडविच+पोहे+उपमा असा तो नाश्ता नव्हताच मुळी,जेवण होतं खरंतर.. प्रीती आणि मी पहिल्यांदाच असं सोबत कुठेतरी चाललो होत.. गप्पा मारत प्रवास चालू होतं.. ढगाळ हवामान होतं आणि सर्वत्र हिरवेगार दिसत होते त्यामुळे बसचा प्रवास चांगला वाटत होता.. त्यासोबत tea ब्रेक - फोटो सेशन हे ओघानेच आले.. आज शाळेत कसं काय काय होणार म्हणून सगळे खूप उत्सुक होते..

ड्रायवर गाडी फार हळू चालवत होता.. शाळेत ११ वाजता उपक्रम सुरु होणार होता पण आम्ही पोहचेपर्यंत १२ वाजून गेले होते.. गेल्या गेल्या आदर्श अभियंता कॉलेजच्या विद्यार्थांनी आमचे फुले देऊन स्वागत केले.. आम्ही कोणी कणी कोणत्या वर्गात शिकवायचे हे आधीच ठरले होते.. पण एक बस काहीतरी अडचण आल्याने मागे पडली होती म्हणून आम्हाला कोणत्याही वर्गात जायला सांगितले... एका वर्ग दोघजण घेणार असे ठरले होते.. आम्ही वर्गापाशी गेलो.. प्रीती एका वर्गात शिरली,मी तिच्यासोबत तिकडे जाणार होते पण पहिला तर त्या वर्गात सगळी पोरं होती.. मागे एकदा शाळेत शिकवायला जायचे तेव्हा मुला किती गोंधळ करतात आणि मुली कशा शांतपणे सगळं ऐकतात याचा अनुभव मला होता.. म्हणून मग मी शेजारच्या वर्गात गेले जिथे सगळी कन्यारत्ने होती.. :)

सौ इंदिराबाई भिडे कान्याप्रशालाच्या ६० विद्यार्थिनी आणि त्यांच्या एक शिक्षिका वागत उपस्थित होत्या.. माझ्यासोबत पार्टनर कोणी नव्हतं आणि नंतर तशी गरजही वाटली नाही.. प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर बसवला होता पण माझ्या वर्गात फक्त एक कॉम्पुटर होता.. त्यामुळे मी काय काय सांगायचं ते पाहून माझं माझं सुरु केलं.. पहिल्यांदा विद्यार्थींना मोकळं वाटावं म्हणून थोड्या गप्पा मारल्या.. आपण का जमलो आहोत विचारलं..  सुरुवातीला मुली थोड्या लाजत होता पण नंतर त्या सहजपणे बोलू लागल्या.. त्या मुलीनी क़्वचित कुठेतरी संगणक दुरून बघितला होता.. आता त्यांच्याशी  संगणकाबद्दल बोलताना थेट data, software अशी भाषा वापरली असती तर नक्कीच त्यान ते डोक्यावरून गेले असते.. म्हणून मग मी माणसाच्या शरीराचे अवयव, वाहिन्या, मेंदू, निर्णयक्षमता, स्मरणशक्ती याबद्दल बोलून मग संगणकाचे peripherals , cpu , hardware ,software ,buses  असं समजवायचे प्रयत्न केले.. त्यांनी संगणक कुठे कुठे पाहिलंय मग तिकडे त्याचा काय उपयोग काय होता वगैरे विचारून संगणकाचे फायदे आणि विविध क्षेत्रात त्याचा वापर हे समजावले.. काही मुली छान उत्तरे देत होत्या.. आणि काही backbenchersचे लक्ष नव्हते हे मला समजत होते पण मी काही कोणाला रागावले नाही.. माझा आवाज मागेपर्यंत येतोय हे मधून अधून विचारात होते,मला त्याचीच काळजी होती.. पण वर्गात शांतता असल्याने काही अडचण आली नाही.. मध्येमध्ये प्रश्न विचारून,उजळणी करून मी मुलीना पूर्णपणे सहभागी करून घेतले होते.. माझा हा तास कोणी वेगल्यानी  ऐकला असता तर मी काय शिकवते असे वाटले असते पण त्या मुलींच्या उंचीवर जाऊन त्यांना समजेल अशी उदाहरणे देऊन सांगणे फार महत्वाचे होते.. असं नुसत सांगून सगळं समजणार नव्हतं पण कमीतकमी संगणकाबद्दल थोडी माहिती तरी मिळेल हा हेतू होता.. हे सगळं सांगेपर्यंत २ वाजता जेवायची सुट्टी झाली.. तेव्हा त्यांच्या शिक्षिका मला जेव्हा म्हणल्या छान सांगत आहात तुम्ही तेव्हा माझा उत्साह द्विगुणीत झाला..  :)

इंफिकडून सर्व मुलामुलींना खाऊ वाटण्यात आला होता.. आणि आमची जेवणाची सोय कॅन्टीन मध्ये करण्यात आली होती.. जेवण गुलाबजाम सोबत मस्त होतं फक्त तेलाचे तवंग जरा जास्तीच होते.. उपवास वाल्यांसाठी खिचडीचीपण सोय केली होती हे पाहून आम्ही थक्क  झालो..  तिथली लोकं आम्ही पुण्याहून आलो म्हणून फार आग्रह करून वाढत होते.. जेवणानंतर आईसक्रीम खाल्ल्यावर एकजण आला आणि म्हणला चहा तयार आहे आणू का..  मी नको म्हणला.. परत त्याने विचारले मग मी आईसक्रीमवर चहा घेतला.. बाकीचे म्हणले काय चालू आहे तुझे तर त्यांना म्हणला तो इतका प्रेमाने विचारात आहे , मला त्याचे मन मोडावे वाटले नाही.. :D काहीजण मला म्हणले तू एकटीच कशी घेत आहेस ,कोणालातरी पाठवतो तुझ्या वर्गात म्हणून..  पण मुलीना शिकवणं सोपं असता म्हणून  माझा नाजूक बारीक आवाज चालून गेला.. प्रीती आणि धनश्री मिळून मुलांचा वर्ग घेत होत्या त्या म्हणल्या मुलांना आवरणं खरंच कठीण असतं.. 

आता पुन्हा वर्गात आले.. मुली अजून मधल्या सुट्टीतून बाहेर आल्या नव्हत्या.. म्हणून मग त्यांना शांत करयला थोडे गमतीचे खेळ घेतले.. नंतर 'soft-skill' असा तास घायचा होतं ज्यामध्ये चांगल्या सवयी,संस्कार याबद्दल सांगायचे होते.. या विषयवार मी अफाट बोलू शकते असं तेव्हा जाणवलं.. नेहमी स्वतःची अन दुसर्यांच्या वेळेची किंमत ठेवावी हे सांगताना मी सहज विचारलं शाळेत तुम्ही वेळेवर येता का.. तर काहीजणी नाही म्हणल्या.. मी का विचारला तर म्हणला ST वेळेवर येतच नाही.. तेव्हा मला फार वाईट वाटलं.. या लहान मुलीना शिक्षणासाठी कुठून कुठून बस पकडून यावे लागते.. त्यांना पुढे कोण काय बनणार विचारलं तेव्हा त्यांची उत्तरे फार मजेशीर होती.. त्यांना म्हणले तुम्ही पुढे कोणीही बना,काहीही करा पण शिक्षण मात्र पूर्ण करा.. शिक्षण घेतल्यावर जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही स्वावलंबीपणे राहू शकाल..

नंतर क्रमाक्रमाने सर्वाना कॉम्पुटरवर प्रात्याक्षिके करून दाखवली आणि अशा रीतीने तास संपला.. पुढच्या शिक्षणासाठी आणि आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.. जाता जाता प्रत्येक मुलगी जवळ येऊन मला म्हणून गेली की "ताई तुम्ही छान शिकवलं.. bye.." हे ऐकून माझं मन भरून आलं.. इथे येताना आम्ही ppt  प्रमाणे सांगणार होतो त्यामुळे मी वेगळी काहीच तयारी केली नव्हती.. ऐनवेळेस जी उदाहरणे सुचली ती सांगून त्यांना संगणकाबद्दल थोडीफार माहिती द्यायचे मनापासून प्रयत्न केले.. त्यांना आवडलं हे पाहून मला फार बरं वाटलं.. 

नंतर मग फोटोस-चहा कार्यक्रम  आटपून परतीच्या प्रवासाला लागलो.. सगळेजण एका वेगळ्याच आनंदात होते.. प्रत्येकजण आपापले अनुभव सांगत होते. आज काहीतरी वेगळं केलं असं सर्वाना जाणवत होते..  Infosys Foundation च्या सुधा मूर्तींची पुस्तके वाचून मी फारच प्रभावित झाले होते.. त्यासाठी काम करायला मिळाव अशी माझी इच्छा होती.. या ना त्या मार्गाने अशा उपक्रमात सहभागी होता आलं म्हणून आज मी फार खुश होते.. :)

They say..
By doing service, one should not feel he has done some obligation to the society. Rather he should thank the society for giving him an opportunity to serve.

बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

मंतरलेले दिवस - ४२

अनुरूपता

एका संध्याकाळी आम्ही मैत्रिणी सहज चरायला गेलो होतो.. हॉटेल मध्ये बरीच गर्दी होती.. कोपऱ्यात एक जोडपं बसलं होतं तिकडे आम्हा सगळ्याजणींचा लक्ष गेलं.. मुलगी एकदम सुंदर गोरीपान नाजूक अशी होती.. आणि मुलगासुधा स्मार्ट, गोरा, उंच असा होता.. त्यांच्याकडे बघून सगळ्याजणी म्हणल्या अगदी जोडी अगदी 'अनुरूप' - made for each other अशी आहे.. तिथून परतल्यावर हा 'अनुरूप' शब्द काही केल्या माझ्या डोक्यातून जात नव्हता.. अनुरूपता कशात मोजतात? रंगावरून? श्रीमंतीवरून? काहीजण म्हणतात की मनाचं कायना ते कसंही जुळतं नंतर.. वयात अमकं अमकं अंतर पाहिजे, रंग असा हवा, उंची इतकी हवी अशा सगळ्या गोष्टी जुळल्या की ती जोडी अनुरूप बनते!!!  बापरे म्हणजे मी कोणाला अनुरूप असेन?

छे माझीतर व्याख्या वेगळी आहे.. अनुरूपता म्हणजे सहजीवनातून एकेमेकांना पूर्णत्व देणं आणि एकमेकांच व्यक्तिमत्व फुलणं.. कदाचित या माझ्या कविकल्पना आहेत.. वास्तवात कसं असतं ते मला अजूनतरी माहिती नाही.. तोपर्यंत स्वप्नं पहिला काय हरकत आहेना.. :)

सीमा मध्ये बलराज सहनी नूतनच्या अस्वस्थ मनाला कसा शांत करतो..
गाईड मध्ये देवानंद कसं वाहिदाचे आयुष्य बदलून टाकतो..
तारे जमीन पे मध्ये अमीर खान ईशानला कशी योग्य दिशा दाखवतो..
दामिनी मध्ये मीनाक्षीला सनी देओलचा कसा भक्कम आधार मिळतो

मलाही असाच कोणी हवा आहे जो सुखदुखात घट्ट हात धरून चालेल.. माझ्या हळव्या भावनाप्रधान मनाला सांभाळून घेईल, खंबीर आधार देईल, लागल्यास योग्य मार्गदर्शन करेल आणि माझा आहे तसा स्वीकार करेल.. असा कोण असेल तो माझ्यासाठी अनुरूप असेल.. त्याच्याही काही अपेक्षा असतील,स्वप्न असतील त्या मी पूर्ण करू शकले तरी मी सुधा अनुरूप होईल.. :) या जगाच्या पाठीवर कुठेतरी असा तो कोणी असेल,  कधीना कधी भेट घडेल आमची.. i hope so..

मंतरलेले दिवस - ४१

विश्लेषण 

गेले काही दिवस माझ्या मनात खूप गोंधळ चालू होता.. मी रोज GM MAIL का पाठवते? नक्की कोणाकोणाला पाठवले पाहिजे?  त्यात काय अन कसं लिहिल पाहिजे?  त्यामुळे मेल करायची इच्छाच होत नव्हती.. विचारांती मला उत्तर मिळाली जी उत्तरे मिळाली ती मी इथे मांडत आहे..

दररोज मेल पाठवण्याचे कारण शोधत मी होते.. कधीपासून नक्की सुरुवात झाली आठवत नाही.. खूप विचार केल्यावर जाणवलं की आजकालच्या जमान्यात सगळेजन काही क्षणांसाठी एकत्र येतात आणि नंतर काही कारणांनी वेगळे होतात.. असे असले तरी जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी इंटरनेट माध्यमातून संवाद साधणं सोपं होतं.. माझ्या आयुष्यात अशा खूप काही खास व्यक्ती आल्या त्या काही न काही कारणाने दूर गेल्या आहेत.. रोज काही विशेष बोलण्यासारख असतच असा नाही पण रोज gm mail गेला की मला आणि त्यांना आम्ही जवळ असल्यासारखेच वाटतो.. म्हणून मेल बंद करणं माझ्याकडून ठरवून सुधा होत नाही..

आता प्रश्न कोणाकोणाला पाठवायचा.. जे जसे माझ्या आयुष्यात आले तशी यादी वाढत गेली.. त्यातले काहीजण वाचून आवर्जून उत्तर देतात, काहीजणांना वेळ नसतो पण ते वाचतात, काहीजण attitude  दाखवतात अन काहीजणांना आवडत नसल्याने कदाचित ते सरळ delete  मारत असणार.. जे चांगले लोक आहेत फक्त त्यांनाच मेल पाठवायचा ठरवल तर मग प्रश्न पडतो की  नक्की चांगले कोण? कारण आज अगदी जवळचे वाटणारे उद्या  रंग बदलतात किवा  भूतकाळात हरवून जातात,दुरावतात... आणि आज परके वाटणारे उद्या जवळ येतात.. आणि चांगला वाईट याचा हिशोब करणारी मी तरी कुठे perfect  आहे..  मी सुधा  कधी चांगली तर कधी वाईट वागते.. त्यामुळे एखाद्याला वाईट ठरवून त्यांच्याशी संपर्क तोडणं मला खरच जमत नाही.. आणि म्हणून  कोणी कसा वागल तरी सहसा मी स्वताहून संबंध तोडत नाही.. अर्थात त्यांनी स्पष्टपणे सांगितल कि तू मला मेल पाठवत जाऊ नकोस तर मी  नक्कीच त्याना मेल पाठवायचे बंद करेन ..

सगळ्यात महत्वाच म्हणजे मेल मधला मजकूर.. मी जे सुविचार , श्लोक पाठावते तसे वागता येते असे बिलकुल नाहीय. पण दिवसाची सुरूवात चांगल्या विचारणे करायला काय हरकत अहेना.. कधी कधी माझे लिखाण हळवे होते ते कहीना आवडत नाही..पण रोज जेवणात सगळेच गोड पदार्थ वाढलए तर जेवण रुचकर लागेल का?  मी बरोबर लिहिते का चुकीच ते माहिती नाही  पण प्रामाणिकपणे लिहिते,मन मोकळे करते हे नक्की.. मग कहीना ते आवडते, काहीजण ते आपल्या अनुभवांशी जोडतात.. काहीजन त्यांचे तसेच अनुभव आणि त्यातून शिकलेल्या गोष्टी मला सांगतात.. तसच कहीना माझ्या लिखणातुन माझा आत्मविश्वास कमी आहे आहे असे वाटते, कहीना अस मनातले सारे मांडणे बिलकुल आवडत नाही..  कहीना quotes आवडतात, काहींना  फक्त कविता आवडतात, कहीना मन्तरलेले दिवस लेख आवडतात, कहीना अध्यात्माबद्दल आवडते, कहीना फक्ता प्रेमाच्या गोष्टी आवडतात इत्यादी.. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर व्यक्ती सापेक्ष आहे.. शेवटी काय ते म्हणतातना 'व्यक्ती तितक्या प्रकृती'.. त्यामुळे मला ज सुचेल ते मी पाठवते.. पुढे ते आवडणे  - न आवडणे हा सर्वस्वी ज्याचा त्याच्या प्रश्न..


थोडक्यात..

मी लिहिलं  नाही तर..  कोणाला फरक पडतो?
मग मी का लिहावं?
मी लिहिलं तरी..  फरक कोणाला पडतो?
मग मी का लिहु नये??  :)


Finally we all are here temporary..  so live and let live is the best policy..   :)

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०११

कोण मी.

कुठून आले.. कुठे चालले..
का चालले हेही माहिती नाही..
चालले आहे कुठेतरी हे मात्र नक्की आहे..

कोण मी.. मी कोणाची..
माझं कोण हेही माहिती नाही..
एकटी नाही मी तरीही हे मात्र नक्की आहे..

काय मिळवलं.. काय गमावलं..
शिल्लक किती हेही माहिती नाही..
हिशोब चालू कोण्याकाळाचा हे मात्र नक्की आहे..

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०११

मंतरलेले दिवस - ४०

एक छोटी पोरगी.. निसर्गाच्या कुशीत रमणारी.. रोज एका बागेत जायची.. तिथल्या रंगेबिरंगी फुलापानाचा, पाखरांच्या किलबिलाटाचा, झुळझुळ झऱ्याचा, वाऱ्याचा आनंद ओंजळीत वेचत मनसोक्त फिरायची..

त्या बागेत बरीच उंच उंच हिरवीगार वृक्षे होती.. कोपऱ्यात असणारे ते एक झाड तिला नेहमी आकर्षून घ्यायचे.. झाडाला वरती बहरलेला सुंदर फुलांचा  गुच्छ तिचं मन मोहवून टाकायचं.. तिला वाटायचं त्या फुलांना जवळून पाहावे, त्यांचा सुगंध घेऊन बघावा.. ती फांदी खाली ओढायचे खूप प्रयत्न करायची पण छे नाहीच, ती हाताला लागायचीच नाही.. कित्येकदा तिला खरचटायचं, लागायचं तरी ती उड्या मारून प्रयत्न करत राहायची.. शेवटी मग मन खट्टू होऊन तशीच परतायची.. जाता जाता देवाला म्हणायची, इतकी सुंदर निर्मिती आहे तुझी मग असं दूर का ठेवलंय माझ्यापासून..

असं बरेच दिवस चालू होतं.. पण एकेदिवशी त्या फुलांपाशी पोहचण्यात तिला यश आलं.. ती जाम खुश झाली.. पण फुलांना जवळून पाहताच तिच्या लक्षात आलं की वर वर दिसणारे हे झाड, ही फुले वेगळी आहेत आणि आतून तर झाडाला अन फुलांना कीड लागली आहे.. आता त्या फुलांना स्पर्श देखील करावा वाटला नाही तिला.. आपण त्या झाडावर किती प्रेम करत होतो आणि प्रत्यक्ष ते कसं निघालं हे पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं..

तिथून परतताना आज तिने देवाकडे मनापासून माफी मागितली.. ती फुलं आतून चांगली नाहीयेत म्हणून तिथपर्यंत जायचा रस्ता मला तो दाखवत नव्हता आणि मी मात्र त्यासाठी तक्रार करत होते.. आपली दृष्टी, विचार, कल्पनाशक्ती खूप संकुचित आहे.. आपण आपल्याला आवडतं ते मिळावं अशी इच्छा धरतो पण देव आपल्यासाठी जे योग्य आहे तेच आपल्याला देतो..  :)

सोमवार, २९ ऑगस्ट, २०११

मंतरलेले दिवस - ३९

वाऱ्याचा किल्ला.. रोहीडा..

या पावसाळ्यातली भटकंती पूर्ण झाली असं नुकतंच मी जाहीर केलं होतं.. पण सिमेंटच्या जंगलात कितीही व्यस्त असले तरी हा रिमझिम पाऊस मला बिलकुल स्वस्थ बसून देत नाही.. :) निमित्त होतं सह्यात्रीचं.. ट्रेकर्स मित्रांनी मिळून सह्याद्रीमध्ये भटकंतीचा, गिर्यारोहणाचा आनंद घेण्यासाठी एक नवीन संस्था सुरु केली ही बातमी माझ्या कानावर येऊन पडली.. नोकरी, घर संसार सांभाळून हा आगळा उपक्रम सुरु करत आहेत हे ऐकून मला त्यांचं (ध्रुव, सिद्धार्थ , सागर आणि पराग ) विशेष कौतुक वाटलं.. सह्याद्रीचा आणि हिमालयाचा दर्जेदार अनुभव पाठीशी असलेल्या या ट्रेकर्ससोबत मी याधीही ट्रेक्स केले असल्याने माझा पूर्ण विश्वास आहे.. सह्यात्रीचं पाहिलं लक्ष किल्ले रोहीडा हे होतं.. सिद्धार्थ आणि सागर यांनी या ट्रेकची जबाबदारी उचलली..

खरंतर रोहिड्याला पूर्वी मी गेले होते पण सह्याद्रीतले हे गड किल्ले १० वेळा जरी बघितले तरी पाहू तेव्हढे कमीच आहे, प्रत्येक वेळेसचा तिथला अनुभव हा नवीनच असतो.. आणि योगायोगाने माझ्या ट्रेकिंगच्या जुन्या मैत्रिणीही या ट्रेकसाठी उत्सुक होत्या.. मग काय मोका भी है दस्तूर भी है..

ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी ६ वाजता सगळे  स प महाविद्यालयाच्या दारापाशी जमा होऊ लागले.. गम्मत अशी की यंदा ट्रेकला मुलीच जास्त होत्या.. एरवी मैत्रीणीना पटवता पटवता नाकी नऊ येतात.. सिद्धार्थ मेधावी ज्युतिका आरती नेहा मी एका गाडीत तर सागर संध्या श्रुती विशाखा श्रीनिवास हे सगळे दुसर्या गाडीतून असा आमचा प्रवास सुरु झाला.. पुण्यातच पाऊस बराच चालू होता त्यामुळे तिकडे किल्ल्यावर किती भारी असेल याची कल्पना येत होती.. पुणे सातारा महामार्ग लागला आणि सभोवताली हिरवाई दिसू लागली.. लगेचच नाश्त्यासाठी एकेठिकाणी थांबलो.. सकाळी एकदा व्यवस्थित पोटपूजा केली की मग पुढे भटकायला मोकळे..

पावसाळ्यात कुठेही जाताना जो प्रवास असतो तो मला जास्त भावतो.. हिरव्या रंगाच्या विविध छटा किती पाहून अन नको असं आम्हा सर्वांनाच होत होतं.. नंतर भोर घाटात एका पॉईन्टला थांबलो तिथे नदीचे  नागमोडी वळण फार सुंदर दिसत होते.. थोडे फोटोसेशन करून प्रवास पुन्हा सुरु झाला.. जुन्या ट्रेक्सच्या गम्मतीजम्मती, काही खास आठवणी यावर चर्चा करत भोर गावात कधी पोहचलो समजलेच नाही..

तिथून ७ किमी पुढे जाऊन रोहिड्याच्या पायथ्याशी पोहचलो.. पावसाची रेलचेल चालू होती.. स्याकमधले  काही भिजणार नाही अशी खात्री करून आम्ही गाड्यातून उतरलो.. मग ट्रेकरसिडने आणि सागरने आम्हाला किल्ल्याची माहिती दिली.. हे फार महत्वाचं आहे.. ट्रेकिंग म्हणजे नुसतचं पावसात जाऊन भिजणं ,वडापाव खाणं असं नाहीये.. तर त्या गडकिल्ल्यांची माहिती, इतिहासपण समजून घेणं हा ट्रेकिंगचा एक अविभाज्य घटक आहे.. रोहीडा हा विचित्रगड, बिनीचा किल्ला, वाऱ्याचा किल्ला म्हणून ओळखला जातो.. या किल्ल्यावरून वेगवेगळ्या दिशेला  सिंहगड, पुरंदर, तोरणा, केंजळगड वगैरे किल्ल्यांचे दर्शन होते.. अर्थात आज तर समोर जवळच असलेला रोहीडा देखील स्पष्ट दिसत नव्हता एव्हढे ढग खाली आले होते.. वातावरण अतिशय उत्साहवर्धक होतं.. मन आपोआप प्रफुल्लीत होत होतं..

रोहीडा चढायला सोप्पा आहे असं अगदी खात्रीने मी मैत्रीणीना सांगितले होते आता नक्की काय ते कळेल असं म्हणत आम्ही गड चढू लागलो..  सर्वांनी शक्यतो एकत्र चला, ढगांमुळे वाट चुकण्याची दाट शक्यता आहे अशा सूचना आम्हाला देण्यात आल्या.. पुढे रस्ता दाखवायला सागर आणि सगळ्यात मागे सिद्धार्थ आणि मध्ये आम्ही.. जिथे पाहावं तिथे हिरवळ आणि खाली उतरलेले ढग.. नकळत मनात "झूमकर पर्बतों पे घटा छा रही है.." गाण्याची ओळ डोकावून गेली.. काही ठिकाणी पावसामुळे थोडा चिख्खल होता पण दगडांमुळे चढणे सोपे जात होते..

आता इथे खरी मज्जा होती.. :) पूर्वी इथे आल्यामुळे मला आकर्षण वाटत होते ते इथल्या विविध फुलांचे आणि भन्नाट वाऱ्याचे.. खालपासुनच पाऊस, गार वारा चालूच होतां.. पण किल्ला चढताना एका विशिष्ठ टप्प्यात वाऱ्याचे ते रूप काय सांगावे.. काहीवेळा वाऱ्याबरोबर  मी आता उडून जाईन असं वाटून अक्षरशः खाली बसत होते.. ही अतिशयोक्ती नव्हे बरं.. इथे कोण कसं पडतंय हे बघून आम्ही सगळे मनापासून हसत होतो..

मध्ये मध्ये थांबत, तिथून दिसणाऱ्या विहंगम दृश्याचा आनंद घेत, छायाचित्रे टिपत रमत गमत आमची चढाई चालू होती.. साधारण १०.३० वाजता आम्ही पहिल्या प्रवेशद्वारापाशी पोहचलो.. तिथे गणेशपट्टी आहे पण ठळकपणे दिसत नव्हती.. पुढे दुसऱ्या द्वारापाशी पाण्याची टाकी आहे,त्यामध्ये १२ महिने पाणी असतं म्हणे.. तिसर्या दगडी प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूना गजमुख आहेत आणि त्याखाली डावीकडे देवनागरी आणि उजवीकडे फारसी लिपीत शिलालेख आहेत.. त्याकाळात दळणवळणाच्या आणि इतर काही सोयी नसताना हे सगळं कसं केलं असेल हा प्रश्न मला प्रत्येक गडावरच पडतो..

इथे जवळच एक अर्धवर्तुळाकार बुरुज होतं.. सगळे जमल्यावर सागर आणि  सिद्धार्थने किल्ल्याचा नकाशा दाखवून कोणत्या दिशेला कुठे काय काय आहे याची माहिती सांगितली.. (मला जास्त आठवत नाहीये).. नंतर नेहमीप्रमाणे सिद्धार्थने घोषणा दिल्या आणि आम्ही त्याला प्रतिसाद दिला.. आमच्या \पैकी तिघी जणींना मराठी-संस्कृत समजत नव्हते.. त्यांनी कुतूहलाने घोषणांचा अर्थ विचारला तेव्हा या दोघांनी प्रत्येक ओळीचे स्पष्टीकरण दिले.. आम्हाला नुसता किल्ला चढून,घोषणा देऊन इतका आनंद होतो तर त्याकाळी शिवाजी महाराजांना, मावळ्यांना किल्ले जिंकून किती आनंद होत असेलना..

इथे वरती सुंदर फुलांचा गालीचा पसरला होतां आणि आम्ही ढगातून चालत होतो.. आता किल्ल्यावरचे वेगवेगळे बुरुज, टाकं वगैरे पाहत पाहत गड भ्रमंती चालू होती.. बुरुजांवरून खालची दरी अप्रतिम दिसत होती.. एकीकडे चुन्याच्या घाण्याचे एक मोठे चाक होते ते हलवण्याचे मुलांनी प्रयत्न केले.. पण ते जरा जास्तीच अवघड होते.. मध्ये एके ठिकाणी आमच्या साहसाची परीक्षा झाली.. दोन्हीकडे पाण्याची टाकं आणि मध्ये छोट्या दगडाच्या आधाराने पाय टाकायचा होतां.. अर्थात सह्यात्री मंडळीच्या आधाराने हे सहज शक्य झाला.. आणि ट्रेकचा आनंद द्विगुणीत झाला.. :)

सगळं बघून शेवटी मंदिरापाशी परतलो.. तिथे आडोशाला थोडी विश्रांती घेतली.. भटकंती करून भूक लागलीच होती मग घरून आणलेल्या डब्यांवर सर्वांनी ताव मारला..  साधारण दोन वाजता गड उतरायला लागलो.. आणि आता त्या वाऱ्याच्या टप्प्यावर तर सकाळपेक्षा  अजून जास्त वारा वाहात होतां.. तो इतका का वेडावला होतां कोणास ठाऊक.. वाऱ्याच्या दिशेने पाठ करून उभे राहिले तर आपोआप पुढे ढकललो जात होतो.. इथे फारच सही वाटत होते.. या वाऱ्याचा अनुभव शब्दात मांडणं खरंच कठीण आहे..

खाली उतरताना पळत पळत जावे असं वाटत होते.. पण माझी पावले मात्र जरा जड झाली होती... मागे फिरून पुन्हा पुन्हा मी शक्य तेव्हढे दृश्य मनात साठवायचा प्रयत्न करत होते.. तासाभरात आम्ही गाड्यांपाशी आलो..  आणि ट्रेकच्या सुंदर आठवणी घेऊन आम्ही पुण्याच्या रस्त्याला लागलो..

मला नेहमी जाणवतं की प्रवास भटकंती करण्यामागे केवळ मौजमजा हा हेतू नसतो.. उलट नवनवीन जागा पाहून, वेगवेगळ्या लोकांशी सवांद साधून दरवेळी आपल्याला खूप काही शिकायला मिळतं.. शेवटी अनुभवातूनच ज्ञानाचा वेल वाढत जातोना.. तसंच या एक दिवसाच्या ट्रेक मधून अन मित्रमैत्रिणींकडून मी ज्या गोष्टी शिकले त्याची इथे मनापासून नोंद करावी वाटते..
- हे ट्रेकर्स लोक निसर्गाचा आनंद घेताना आपल्यामुळे शोभा खराब होणार नाही याची नीट काळजी घेतात.. चोकलेट, चिप्स खाल्ल्यावर  त्याचा कागद,प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, पिशव्या तिथे किल्ल्यावर तशाच टाकून देणं हे म्हणजे आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड मारल्यासारखे आहे नाहीका..
- निखळ आनंद घेण्यासाठी नसते धाडस दाखवायची गरज नसते.. सरळ रस्ता असताना उगाच कोणी शॉट कट मारायला गेले तर अशांना ही ट्रेकर्स मंडळी वेळीच आवर घालतात.. दुर्गम भागात  अनुभवी लोकांचा ऐकलेलं कधीही चांगलं..


इतकं सगळं वाचून मला खात्री आहे की आता तुम्हालाही रोहिड्याला एकदा भेट द्यावी असे वाटू लागले असेल.. :) हा किल्ला सुंदर असूनही चढण्यास  सोपा आहे त्यामुळे कोणालाही  जाता येण्यासारखा आहे..  रोहिड्याला भेट देण्यासाठी जायचे असल्यास जून - फेब मध्ये बेत करावा..  गडावरचे द्वार, बुरुज आणि तिथून दिसणाऱ्या सह्याद्रीचे अफाट दर्शन आवर्जून घ्या.. तिथल्या वाऱ्याचा, फुलांचा अनुभव नक्की घ्यावा.. आकाश निरभ्र असल्यास तिथून दिसणारा सुंदर सूर्यास्त चुकवू नका.. वरती खाण्यापिण्याची काही सोय नसल्याने जेवायचे डबे आणि पुरेसे पाणी जवळ ठेवा.. आणि वारा सहन होत नसल्यास स्कार्फ , कापूस वगैरे गोष्टी जवळ ठेवा जेणेकरून तुम्हाला निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येईल..

बुधवार, २४ ऑगस्ट, २०११

मंतरलेले दिवस - ३८

चित्र १ : अशीच एकदा मैत्रिणींसोबत भटकंती पोटपूजा चालू होती.. चांगल्या ठिकाणी चरत होतो.. चहा आला.. माझ्यासारख्या चहाभक्तांना कुठलाही कसाही चहा चालतो.. पण काहीजण फार चोखंदळ असतात.. ठराविक पाण्यात ठराविक दुधाचे प्रमाण असले तरच त्यांना चहा आवडतो.. आता बाहेर गेल्यावर अगदी तसाच चहा मिळेल असं काही सांगता येत नाही.. आमच्यासोबत अशीच एकजण होती.. तिच्या म्हणण्यानुसार चहा बिघडला होता.. तिला तसा पिववत नाही म्हणून तिने तो वाया घालवला.. चहाचे असे कितीसे रुपये असतातना..

चित्र २ :
चावंड हडसर ट्रेकला गेले होते तेव्हा आमचा मुक्काम घाटघर येथे होता.. मंदिरात राहायचं ठरलं होतं पण तिथे पावसाचं पाणी आत शिरलं होतं..  म्हणून बाळू असावालेंनी त्यांच्या घरी राहायची सोय केली.. दोन तीन खोल्या आणि छोटंसं स्वयपाक घर.. रात्री लवकर झोपल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी मी सगळ्यात आधी उठले होते.. त्या वाहिनी माझ्यावर भलत्याच खुश होत्या कारण  धाकट्या मुलीचा मी फोटो काढून  नंतर त्यांना पाठवणार होते.. त्यांची सकाळची कामं चालू होती आणि आमच्यापैकी विशेष कोणी उठलं नव्हतं अजून.. म्हणून त्यांनी मला त्यांच्या स्वयपाक घरात चहा घ्यायला बोलावलं.. मी नको म्हणलं पण त्यांनी फारच आग्रह केला.. चुलीवर चहाचं आधण ठेवलं होतं.. एका कपमध्ये चहा गळून देताना त्या मला म्हणल्या आम्ही असा  काळाच चहा घेतो,दुध परवडत नाही आम्हाला..  चालेल ना तुम्हाला? आयुष्यात पहिल्यांदा घेतलेल्या त्या black teaची चव फारच अप्रतिम होती.. तेव्हा मला चहा बोर आहे म्हणून वाया घालवणाऱ्या मैत्रिणीची, त्या प्रसंगाची आठवण झाली.. आणि माझ्या डोळ्यात चटकन पाणी आलं..


एकीकडे चांगल्या ठिकाणचा चहा ज्यात दुध साखर आलं वगैरे सगळं असून सुधा चहा टाकून देणारी ती मैत्रीण.. आणि दुसरीकडे चहात घालायला दुध नसून देखील समाधानाने चहा घेणारं ते कुटुंब..  कदाचित म्हणूनच तो भगवंत एखादी गोष्ट आपल्याला कमी देत असावा जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीची,भावनांची, आयुष्याची  खरी किंमत समजेल..

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०११

मंतरलेले दिवस - ३७

नुकतंच सह्याद्रीमध्ये भटकून आले.. श्रावण महिन्यातला रिमझिम पाऊस आणि कोवळं उन्ह.. उंच कड्यावरून कोसळणाऱ्या शुभ्र जलधारा.. आणि मनाला ताजेपणा देणारा तो हिरवागार रंग.. निसर्गाच्या कुशीतून सुंदर प्रवास चालू होता..  तेव्हा लक्ष गेला ते भाताच्या शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांकडे..

पाणी भरपूर असल्याने काळ्या मातीतली पिके वार्यावर डोलत होती.. त्याभोवती निरुपयोगी वाढलेलं गवत ती लोकं काढत होते.. ते सुंदर शेत बघून मला क्षणभर त्या लोकांचा हेवा वाटला.. आहा.. किती सुखी आहेत ते लोक, त्यांच्या हिरव्यागार शेतात आनंदाने काम करत असतील.. पण मग लक्षात आलं कि ते शेत काही त्यांचंच असेल असं काही नाही.. दुरून आपल्याला वाटत त्या शेतात जे काम करत आहेत त्यांचंच ते शेत असावं.. खरंतर त्यांच्याकडून काम करून घेणारा मालक कोणी वेगळाच असतो.. मालकाने सगळी योजना आधीच आखून ठेवली असते.. कोण कधी कुठलं काम करणार.. कोणी नांगर फिरवायचा.. कोणी गवत काढायचं.. कोणी संरक्षण करायचं.. कोणी हिशोब ठेवायचा.. कोणी बाजाराचा काम करायचं.. इत्यादी.. काहीजण आपली कामे उत्तमरीत्या पार पडतात त्यांना पगारवाढ मिळते किवा पुढेमागे  वरच्या दर्जाचा काम मिळतं.. काहीजण कामचुकारपणा करतात किवा कोणी चुकीची कामं करतात.. त्यांना वाटतं मालकाचा आपल्याकडे काही लक्ष नाही पण मालक मात्र सगळं काही पहात असतो आणि त्याप्रमाणे पाऊले उचलत असतो.. आज एखाद्याला गवत काढायचं काम मिळालं असेल तर त्याने हिशोब करणाऱ्याकडे पाहून रडत बसण्यात किवा स्पर्धेत पुढे जाण्यासाठी चुकीचा मार्ग धरण्यात काहीच अर्थ नाही.. पदरात पडलंय ते काम आनंदाने आणि प्रामाणिकपणे केलं कि पुढे मालक त्याची बढती नक्कीच करतो..

ते शेत, तिथले शेतकरी आणि त्यांचा मालक.. ते सर्व पाहून मला जाणवलं कि हे जग  म्हणजे एक शेत आहे.. आपण सगळे शेतकरी, कामगार आहोत.. आणि तो एक भगवंत आपल्या सर्वांचा मालक आहे.. प्रत्येक  जीवाला त्याने काही ठराविक काम वाटून दिलं आहे.. प्रत्येकाची उंची वेगळी आहे ..  तो आपल्याकडून सगळं करून घेतो..  आपण फक्त निम्मित्तमात्र.. याचा अर्थ आपण चांगले प्रयत्न सोडून द्यायचे असा नाही..  पण प्रयत्नासोबत श्रद्धा  असणं जरुरी आहे..  कोणत्याही परिस्थितीत आपण स्वतःशी आणि जगाशी प्रामाणिक राहिलं तर आजउद्या तो भगवंत आपल्याला योग्य न्याय नक्कीच देतोना.. चला तर मग असं करून पाहूया..  :-)

शनिवार, ६ ऑगस्ट, २०११

मंतरलेले दिवस - ३६

कॅलेंडर प्रमाणे श्रावण महिना वर्षातून एकदाच येतो.. पण जीवनयात्रेत मात्र श्रावणाच्या उन्ह पावसाचा खेळ सतत अविरत चालू असतो.. आताही उन्हाची एक झळ लागली होती आणि मन कोरडं झालं होतं.. चालता चालता नेहमीच्या मंदिरात प्रवेश केला.. देवाची ती मूर्ती नेहमीसारखीच प्रसन्न दिसत होती.. हात जोडून प्रार्थना करायचे प्रयत्न केले पण मन शांत नव्हतं.. बाकी सगळे मनापासून प्रार्थना करत होते,देवाकडे काहीना काही मागत होते.. मी हसून म्हणलं.. आज काय मागू मी तुझ्याकडे? जे मला मनापासून पाहिजे ते मला कधीच मिळणार नाही.. आणि जे आहे त्यात मन तृप्त होत नाही, मनाला सारखं काहीतरी नवीन हवंच असतं.. आणि खरतरं मला नक्की काय हवंय हे मुळात माहितीच नाहीये.. तूच माझं अंतरंग जाणतोस.. तुला वेगळं काय सांगू मी पुन्हा?

विचारांच्या वादळात हरवले असता अशातच तिकडे एक छोटीशी गोड पोरगी तिच्या आईसोबत आली.. आईने सांगितल्यावर त्या मुलीने इवले नाजूक हात जोडले.. बोबड्या शब्दात ती म्हणली "देवा मला चांगली बुद्धी दे!!!"  आणि त्या क्षणी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.. :) खरंच पैसे, रूप, नाती, पत इत्यादी या गोष्टी येतात आणि जातात.. या सर्व गोष्टी असून जर चांगली बुद्धी आपल्याकडे नसेल तर सगळंच निरर्थक आहे..आणि हे काही आपल्याकडे नसेल पण चांगली बुद्धी असेल तर पुढे मागे या गोष्टी नक्कीच मिळवता येतातना..

लहानपणी चांगला अभ्यास करण्याची बुद्धी.. खेळ आणि कला कौशल्य आत्मसात करण्याची बुद्धी.. नंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे, कोणत्या क्षेत्रात आपला निभाव लागेल हे समजून त्याप्रमाणे निर्णय घ्यायची बुद्धी.. चांगले मित्रमैत्रिणी मिळवण्याची आणि टिकवण्याची बुद्धी.. इतरांना गरज पडेल तेव्हा मदत करण्याची बुद्धी.. शिक्षण झाल्यावर चांगली तयारी करून नोकरी धरायची बुद्धी.. नोकरीत प्रामाणिकपणे  १००% काम करण्याची बुद्धी..

सर्वात महत्वाचं म्हणजे कोण आपलं आणि कोण परकं हे अचूक ओळखण्याची बुद्धी.. मोहाला बळी पडून स्वतःचं नुकसान होऊ नये हे वेळेवर समजण्याची बुद्धी.. नाजूक हळुवार क्षणांना आवर घालण्याची बुद्धी.. आपल्या भविष्याचा विचार करून पाऊल उचलण्याची बुद्धी.. आई वडील सांगतील ते ऐकण्याची बुद्धी.. वेळेत लग्न करून संसार सुरु करण्याची बुद्धी.. वेळेवर सगळ्या जबाबदाऱ्या पार पडायची बुद्धी.. सगळ्यांची मने सांभाळून गुण्यागोविन्दात काळ घालवण्याची बुद्धी.. आपल्या परीने प्रयत्न करून शेवटी जे पदरात पडेल त्याचा मनापासून स्वीकार करण्याची बुद्धी.. आणि अजून असंच काही...

जेव्हा जेव्हा मी स्वतःचा विचार करते तेव्हा मला जाणवतं की मी डोक्यापेक्षा हृदयाचे जास्त ऐकते.. निर्णय घेताना मी बुद्धीपेक्षा भावनांचा जास्त विचार केला.. त्यामुळे कित्येकदा घसरले.. वेळ आणि जग तर केव्हाच पुढे निघून गेलं.. असे असले तरी मला माझ्या गत आयुष्याबद्दल खेद नाहीये.. आतापर्यंत मी प्रत्येक क्षण मनापासून जगले.. हसले अन रडलेही मनापासून.. आता फक्त एव्हढंच वाटतं की माझ्या हळव्या भावनांना चांगल्या बुद्धीचे सरंक्षण मिळावे म्हणजे पुढील उर्वरित आयुष्य सुखकर समाधानी जाईल..

आताशा मीसुद्धा बाप्पाला त्या लहान मुली कडून शिकलेली प्रार्थना करते की.. "आम्हा सर्वाना चांगली बुद्धी दे!!! "  special thanks to that little girl.. :)

शनिवार, ३० जुलै, २०११

मंतरलेले दिवस - ३५

Attitude Sickness..

तिची अन माझी ओळख एका कॉमन मैत्रिणीमार्फत झाली.. एकदा माझी मैत्रीण माझा GM मेल वाचत होती तेव्हा 'ती' मला म्हणाली मलाही पाठवत जा तुझे मेल्स.. तसं पाहायला गेलं तर टीम मध्ये बऱ्याच मुली आहेत.. आम्ही सगळ्याजणी वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करतो तरी सगळ्यांची चांगली मैत्री आहे.. पण त्यात 'ती' जरा शिष्ठ वाटल्याने मी स्वतः कधी तिच्याशी बोलायला गेले नाही.. आता तीच म्हणत होती  मेल्स पाठव म्हणून मग मी मग माझ्या यादीमध्ये तिचे नाव घातले.. सुरुवातीला तिचे छान म्हणून प्रतिक्रियादेखील यायची.. 

काही दिवसांनी टीममधल्या एकाचं तिच्याशी जमलंय असं ऐकण्यात आलं..  मला तर ही बातमी ऐकून छान वाटलं.. तो मुलगा चांगला आहे आहे अन हीपण दिसायला सुंदर,अनुरूप जोडा.. शिवाय आपलं आपलं लग्न ठरवणाऱ्यांच्या आई वडिलांना मुलांच्या लग्नासाठी चप्पला झीझवाव्या लागत नाही ही किती चांगली गोष्ट आहे हे मला हल्ली फार जाणवतं.. मला असं जमलं नाही याची खंत नेहमी वाटते.. असो.. तर त्यांच्या  प्रेमप्रकरणाच्या चर्चेचे वारे जोरात वाहू लागले.. अर्थात त्याला कारणीभूत तेच होते.. डोळे मिटून दुध पिणाऱ्या मांजरीला काहीही वाटलं तरी जग तिच्याकडे बघतच असतं.. ही बातमी खरी चांगली होती पण त्याला उगाच वेगळं वळण लागलं.. त्या दोघांचं त्यांच्या रोजच्या जेवणाच्या ग्रुप मधल्या जवळच्यांशी वागणं बदललं.. कितीही चांगला नवरा मिळाला तरी मैत्रीण ही जीवाभावाची मैत्रीण असते हे समजण्याइतपत तिची कुवत नव्हती बहुतेक,कदाचित वयाने लहान असल्याने.. यथावकाश तिचं काही कारणाने माझ्या मैत्रिणीशी, आमच्यातल्या कॉमन मैत्रिणीशी भांडण झालं.. तिने त्यांचा लंच ग्रुप सोडला.. नाश्ता, जेवण, चहा सगळं  त्याच्यासोबत.. गम्मत म्हणजे तिच्यासारखं त्यानेही बोलणं बंद केलं.. नंतर त्याने इन्फी सोडून दुसरीकडे नोकरी धरली... तेव्हा मग ती वेगळ्या मैत्रिणींसोबत जाऊ लागली पण थोड्या दिवसांनी तिचं त्यांच्याशीही पटेनासं झालं.. हळू हळू टीम मधल्या सगळ्या मुलींशी तिने बोलायचं पूर्णपणे बंद केलं.. ती एक सुंदर मुलगी.. फ्रेशर म्हणून लगेच पहिला जॉब इन्फी मध्ये मिळून एखादं वर्ष झालं असावं..  अशा मुलींच्या आसपास मुले नेहमीच घुटमळत असतात.. त्यामुळे आता ती त्या मुलांसोबतच असते पण आम्हा मुलीना मात्र ओळखही दाखवत नाही..

रोज सकाळी आम्ही एकाच वेळेस ऑफिस मध्ये येतो.. वॉशरूम मध्ये गेल्यावर नकळत मी अगदी रोज तिच्याकडे बघून एक स्माईल देत गुड मॉर्निंग म्हणते पण या madam च्या चेहऱ्यावर काहीच भाव नसतात, हास्य तर फार दूरची गोष्ट.. रोज असा अनुभव येऊनही पुन्हा तसंच घडतं..खूप सहजतेने एखाद्याकडे आपण हसून बघतो,शुभेच्छा देतोना.. they say "affection, openness and appreciation of qualities builds a long lasting relationship.."  पण ती मात्र काहीतरी खुन्नस असल्यासारखी वागते.. आमच्यापैकी एकीच नुकतच लग्न झालं म्हणून स्वीट्स आणले होते तर जवळच्या क्युबिकल मध्ये बसूनही 'तिने' ना तिला शुभेच्छा दिल्या ना स्वीट्स घेतले.. अगदी पर्वाची गोष्ट.. रविवारी वाढदिवस झाला तर सोमवारी सगळे मला  belated  happy  birthday  म्हणत होते पण ती काही एका शब्दानेही बोलली नाही.. मी तर रस्त्यावरचा कोणाचा आज वाढदिवस आहे कळलं तरी त्याला शुभेच्छा देते.. कोणी शुभेच्छा दिल्या तर माझा वाढदिवस चांगला आणि नाही दिल्यातर खराब असं काही नसतं.. पण वाढदिवसाला शुभेच्छा देणे हा एक संस्काराचा भाग आहे.. पण यातही लोकं attitude दाखवतात.. यामध्ये कमीपणा वाटतो की काय माहिती नाही..

खरंतर माझं तिच्याशी कधीच काही भांडण झालं नाही.. आणि मी तिला त्याच्यावरून कधी काही विचारलं नाही ना कधी चिडवलं.. तरी ती माझ्याशीही अशी का वागते हा मोठा  प्रश्न  होता.. बर काही चुकलं असेल आमचं तर बोलून दाखवावं.. समोरच्याला कळावं तरी नक्की काय झालंय ते..  त्यावर माझी मैत्रीण स्पष्टपणे  म्हणली की  "तिच्या डोक्यात हवा गेली आहे सध्या.. वेळेवर नोकरी,पैसा, boy  friend सगळं मिळालं आहे  त्यामुळे ती माज करत आहे.. तूही तिला मेल्स पाठवायचे बंद कर".. त्यावर मी मैत्रिणीला म्हणलं.. "माझ्या gm मेल्स मध्ये बरेचदा सुविचार,ओव्या असतात.. त्या तिला जास्त गरजेच्या आहेत त्यामुळे ती जोपर्यंत मला म्हणत नाही की मेल्स पाठवू नको तोपर्यंत मी तिला पाठवणार.. भले ती मेल बघून डिलीट मारत असेल किवा अजून काय.. 'attitude sickness ' झालाय तिला, येईल कधीतरी जमिनीवर.. ती कितीही भाव खाणारी असली तरी मी किती हट्टी आहे हे तिला माहिती नाही.. एक ना एक दिवस माझ्या मेलला ती नक्की उत्तर देईल.. देखते है किसमे है कितना दम.."

एकंदरीत अशा लोकांकडे पाहून मला वाटतं भले मी सुंदर गोरीपान नाही, भले मला कॉलेज झाल्याझाल्या लगेच नोकरी मिळाली नाही,संघर्ष करावा लागला, भले माझ्या नावावर घर गाडी नाहीये,  भले मला कोणी boy friend  नाही,माझं लग्न वेळेवर झालं नाही.. पण काही नाही तरी माझ्या चेहऱ्यावर स्माईल तरी आहे.. कोणाला वाढदिवसाला ,लग्नाला शुभेच्छा देऊन त्यांच्या आनंदात सामील व्हायचे माझ्यावर संस्कार तरी आहेत.. कोणाचं मोकळेपणाने कौतुक आणि आदर करण्याइतपत मोठं माझं मन आहे.. कोणाला गरज असेल तेव्हा शक्य तेव्हढी मदत करायला माझ्याकडे वेळ आणि इच्छा आहे.. am truly luckier than her..


माना अपनी जेब से फ़कीर हैं
फिर भी यारों दिल के हम अमीर हैं
मिटे जो प्यार के लिये वो ज़िन्दगी
जले बहार के लिये वो ज़िन्दगी
किसी को हो न हो हमें तो ऐतबार
जीना इसी का नाम है




बुधवार, २७ जुलै, २०११

मंतरलेले दिवस - ३४

Education makes a difference..


Infy campus! इथे येऊन आता मला जवळ जवळ एक वर्ष होईल पण अजूनही दररोज मला ती सुंदर फुलं पाने, हिरवळ ,पाखरे तेव्हढंच मोहवून टाकतात.. रोज सकळी ऑफिस मध्ये आले की किती अन काय पाहू असं होतं..  कधी कामाचा वा इतर गोष्टींचा ताण आला किवा कधी कंटाळा आला, झोप आली, ब्रेक हवा असेल किवा कधी  कधी काहीही कारण नसतानाही की या बागेत एक चक्कर मारल्यावर एकदम टवटवीत वाटते .. उन्हाळ्यात हिरवगार असलेल्या या परिसराचा रुबाब पावसाळ्यात तर विचारूच नका.. छान छान रंगेबिरंगी फुले उमलेली दिसतात.. हिरव्या गालिच्याची किनार लिलीच्या पांढर्या फुलांनी एकदम खुलून दिसते..  झाडांवर फुलांवर पावसाचे पाणी पडल्याने ते अजूनच सुंदर दिसतात.. आणि या सौदर्याचा उपभोग मी जास्तीत जास्त घेते..

परवा असंच फिरत होते तेव्हा पाऊस सुरु झाला.. मग मी माझ्या खाजगी जागेत म्हणजे अम्पी थेटरपाशी आले..  :) मी कुठे सापडले नाहीतर तिकडे असते असं मी माझ्या मैत्रिणींना सांगून ठेवलं आहे.. हे  थेटर अशी एक मोकळी जागा आहे जिथे इन्फीचे मोठे कार्यक्रम होतात.. पण एरवी दुपारी तिथे कोणी नसतं.. एक छोटं स्टेज आणि त्याभोवती प्रेक्षकांना बसण्यासाठी वर्तुळाकारात फरशीच्या पायऱ्या.. आणि सभोवताली कडेनी झाडे.. बरेचदा मी इथे येते तेव्हा क़्वचित एखादा कोणी फोनवर बोलत बसलेलं दिसतं.. बागेची कामं करणारे लोक कायम असतात.. आजही तिथे काही बायका गवत काढण्याचे काम करत होत्या.. झाडाखाली पायरीवर पाऊस लागत नव्हता म्हणून तिथे पावसाचा आनंद घेत बसले होते.. आणि बघता बघता पावसाचा जोर वाढला.. अन  मी भिजू लागले.. इन्फी मध्ये ठिकठिकाणी छत्र्या ठेवलेल्या असतात पण इथे पायऱ्यांवर छत्री कशी असेल.. त्या बायका लांब होत्या त्या लगेचच स्टेजमागच्या रूम जवळ गेल्या.. मी तिथे जाईपर्यंत पूर्ण भिजले असते असा पावसाचा जोर होता.. तेव्हढ्यात बागेतला एक माणूस छत्री घेऊन लांबून म्हणला, "madam ही छत्री घ्या.."  मी नको म्हणलं कारण ती छत्री ते मला द्यायला पुढे आले असते तर रूमपाशी जाईपर्यंत ते स्वतः भिजले असते.. ते जरी बागेतले कामगार असले तरी माणूसच आहेत, जसं पावसात भिजून माझे कपडे ओले झाले असते,मला सर्दी झाली असती तशी त्यानाही होण्याची शक्यता होती.. त्यांचं ते रुमपाशी जाऊन थांबले असते तरी त्यांना कोणी काही म्हणणार नव्हतं.. तरी ते त्यांच्या कामाचा एक भाग म्हणून मला छत्री द्यायला आले.. किती एकनिष्ठ होते ते त्यांच्या नोकरीशी.. त्याचा त्यांना पुरेसा मोबदला मिळत असेल का?

त्या दिवशी मला अगदी प्रकर्षाने  जाणवलं की हे बागेतले लोक सतत मन लावून  काहीना काही काम करत असतात,उन्ह असो वा पाऊस.. ऑफिसमध्ये काहीजण सतत फारश्या पुसत असतात, काचा पुसत असतात.. कॅन्टीन मधले लोक सकाळपासून रात्रीपर्यंत नाश्ता,जेवण ,साफसफाई यात गुंतलेले असतात.. आणि आम्ही संगणक अभियंता वातानुकुलीत ऑफिस मध्ये निवांत पणे काम करत असतो तेही खाणं पिणं अन गप्पा मारत.. तेही मनुष्य प्राणी आणि आपणही माणसंच.. मग ही फट कुठे तयार झाली?  याचं एकच उत्तर म्हणजे 'शिक्षण'.. नशिबाने आपल्याला योग्य शिक्षण मिळालं अन चांगली नोकरी मिळाली यामागे आपल्या पालकांचे आणि देवाचे आभार मानू  तेव्हढे  कमीच.. नाहीका..


They say.. "The purpose of education is to develop knowledge, skills and character. Knowledge makes all the difference. In this life everything perishes over a period of time. Whether it be beauty, diamond, gold or even land. Only one thing withstands destruction. It is Knowledge. The more you give, the more you get."

I'm not lonely, I'm just alone..

Solitude is the joy of being alone,it is being with urself.. while loneliness is getting bored with being alone..

मी कुठल्या समारंभाला गेले आणि तिथले विषय माझे नसतील  तर तिकडे मला एकटं वाटतं,बोर होतं.. म्हणजे गर्दीत असून एकटेपणा वाटणे..
आणि कधी मी एकटीच कुठेतरी भटकत असते तेव्हा मी मनापासून आनंद घेत असते.. म्हणजे एकटं  असून एकटं नसणं..

समर्थांनी दासबोधात  म्हणले आहे ..
जयास येकांत मानला| अवघ्या आधीं कळे त्याला |

सोमवार, २५ जुलै, २०११

मंतरलेले दिवस - ३३

"एकाच या जन्मी जणू.. फिरुनी नवी जन्मेन मी.." :)


नुकताच वाढदिवस झाला आणि पुन्हा एक नवीन आयुष्य सुरु झालं..  जाता जाता मन एकदा भूतकाळात फिरून आलं..  त्या गतकाळातील अनुभवांवरून मिळालेले धडे  इथे नमूद करत आहे..


कधी कधी आपण कोणाला जवळचं मानून त्यांच्यासाठी काही खास करतो..  आणि कालांतराने ते लोक सगळं विसरून जातात, आपल्यासाठी ते काहीही करत नाही.. आशावेळेस आपणच दुखी होतो.
खरतर आपण प्रेमाखातर त्यांच्यासाठी मनापासून काही केलं असतं इथेच आपलं कर्तव्य सपंतं.. ते किंमत ठेवत नाही ही अडचण त्यांची आहे.. याबाबतीत गंभीर त्यानी व्हायला पाहिजे.. आपण आपल्यापरीने सगळं करून पुन्हा आपणच वाईट वाटून का घ्यायचं..


बरेचदा असं जणवतं की काहीजण आपला ठराविक वेळेपुरता काही कारणासाठी एखाद्या वस्तुप्रमाणे वापर करतात आणि नंतर सोडून देतात.. मग आपणास वाईट वाटतं..
या बाबतीत आपण निश्चिंत राहायला पाहिजे.. आपला उपयोग केला गेला असेल तर आपण कोणाच्यातरी कामी आलो म्हणून आनंदी राहायला पाहिजे आणि  अशा व्यक्तीला गरज पडेल तेव्हा ती व्यक्ती आपल्या आयुष्यात पुन्हा येतेच.. आणि नाहीच आली तर ती व्यक्ती मजेत आहे हे समजून आपण शांत आनंदी व्हायला पाहिजे..


काही वेळा आपल्या आसपासचे लोक कोणत्या न  कोणत्या कारणांनी भेदभाव करून आपल्याला कमी लेखतात.. तेव्हा आपला आत्मविश्वास कमी होऊन आपण खचतो..
खरतर समोरचा आपल्याला कमी लेखणारा,आपल्याकडे दुर्लक्ष करणारा माणूस म्हणजे काही अख्ख जग नसतं.. अशा वेळेस आपल्या मनाची अन् बुद्धीची दृष्टी विशाल केली की समजतं की आपण जसे आहोत तसे खूप काही करू शकतो.. जगात कित्येकांना आपण हवे आहोत..


या व्यवहारी जगात सरळ साधेपणा.. प्रामाणिकपणा.. सवेंदनशीलता.. मोकळेपणा.. या गोष्टीना कमजोर समजले जाते..
परंतु याच मूल्यांमुळे माणुसकी नावाची गोष्ट जिवंत राहते.. आणि कुठेतरी तो सगळं पहात असतो त्यामुळे आज ना उद्या योग्य न्याय नक्कीच मिळतो..


आपण नेहमी दुसऱ्यांच्या चुकांवर रागावतो आणि स्वतःच्या चुकांनी हळहळतो..
खरतर कोणीच परिपूर्ण नसतं .. त्यामुळे मनात काही न ठेवता स्वतःला आणि इतरांना मोठ्या मनाने माफ केला तर मन हलकं होतं.. असे केल्यास आपण  खऱ्या अर्थाने स्वतंत्र अन् मोकळे होतो..


आणि सर्वात महत्वाची शिकवण.. भगवदगीतेत म्हणले आहे जसे..

उथ्धरेथ आत्मनात्मानं नात्मानम अवसाथयेत!
आत्मैव हय आत्मनॊ बन्धुर आत्मैव रिपुर आत्मनः!!

"One must deliver himself with the help of his mind and not degrade himself..  You are your Best Friend & You can become your Own Enemy too!!! "




गुरुवार, २१ जुलै, २०११

मंतरलेले दिवस - ३२

तुम आगये हो.. नूर आगया है.. :)

संध्याकाळची वेळ.. ऑफिसमधून घरी जायला अजून वेळ होता.. तेव्हढ्यात फोन आला आणि मी लगेचच घरी निघाले.. डयुटी लागली होती.. :) बाळाच्या आईला आणि आजीला थोडं बाहेर जाऊन यायचं होतं.. मग एकटे आजोबा कसे सांभाळणार म्हणून मावशीला इकडे तिकडे न जाता थेट घरी यायची आज्ञा झाली होती..
घरी गेल्यावर पिल्लूला म्हणलं "अब तुम मेरे कब्जे मै हो.."!!! तसं एरवी मी घेते त्याला पण आज फक्त आमचंच राज्य..  आणि त्याला आजोबांची खूप सवय आहे पण मी आपलं संधी मिळाली म्हणून चार्ज घेतला होता.. दुध झोप सगळे कार्यक्रम आधीच आटोपल्याने स्वारी खेळायच्या मूड मध्ये होती.. त्याला खाली त्याच्या छोट्या गाडीवर ठेवून मी आणि (माझे) बाबा आम्ही त्याच्याशी खेळत बसलो.. "तुझ्यासाठी आज आल्या आल्या pc  सुरु केला नाही बघ मावशीने, केव्हढा हा त्याग " असं म्हणून बाबा मला चिडवत होते..
संध्याकाळी बाळाला ताजातावाने वाटावे म्हणून त्याला आवरायचा कार्यक्रम.. एरवी त्याला चार लोकं सुधा पुरत नाही..  सतत इतके हात पाय मारून सायकल खेळत असतो कि कपडे बदलताना कोणी हात धरायचे, कोणी पाय असे प्रकार चालू असतात.. आज मात्र आम्ही दोघंच होतो.. टोपडं आणि सगळे कपडे काढल्यावर बाळराजे खुदुखुदू हसू लागतात, त्यांना लई भारी वाटतं.. :) कोमट पाण्यानी अंग पुसताना त्याचे भाव असे असतात ना कि काय करतात हे माझं..  Johnson's baby powder चा वास मला स्वतःला फार आवडतो.. त्या वासासाठी मी या वयात पण ती पावडर वापरते मधून अधून.. ;) तर आता मी त्याला कापसाच्या बोळ्याने हळुवारपणे पावडर लावत होते.. त्याला वास येत असेल का, पावडरने ताजे वाटत असेल का, त्याला समजत असेल का आपण काय करतोय ते  असे side by side माझे प्रश्न चालू होते.. तो मात्र नेहमीसारखा टकामका इकडे तिकडे कुतूहलाने पहात होता..
आता कसं छान फ्रेश वाटतंय म्हणे पर्यंत पठ्ठ्याने शुचा कार्यक्रम केला.. कारंज सगळीकडे उडवले.. माझं ड्रेस तर ओला झालाच पण तोही ओला झाला.. आताच त्याला पुसून काढलं होतं,पावडर लावली होती आणि लगेच चित्र बदलून टाकलं.. मावशीला कसं कामाला लावलं अशा नजरेने छोकरा गळ्यातल्या गालात हसत होता.. पुन्हा पुसून आवरलं.. आणि लगेच डायपर , कपडे घातले आणि म्हणलं आता पाहिजे तेव्हढ कर काय करायचं ते.. :) कपड्यांची मजा म्हणजे जे लगेच मिळालं ते घातलं.. matching वगैरे काही प्रकार नव्हता.. एका रंगाचा शर्ट, वेगळीच प्यान्ट आणि मोजे तिसर्या रंगाचे.. पिल्लूला म्हणलं याला multicolors म्हणतात! आता टीट लावायची..  बाळांना छान आवरून कपाळावर किवा गालावर टीट लावली कि किती गोड दिसतात ना ते.. आणि हे काम सगळ्यात अवघड असतं हे माझ्या आताशा लक्षात आलं... इतकी वळवळ चालू होती त्याची.. बाबांनी त्याला धरलं आणि मी टीट लावायचे प्रयत्न करू लागले.. त्याला धरल्यामुळे तो अजून जास्त हालचाल करत होता, डोकं हलवत होता.. अशात मी टीट लावल ते एका बाजूला कडेला लागला.. म्हणलं तुझी आई मला रागावेल बाबा, आमच्या बाळाला असं का आवरलं म्हणून.. ते पुसून पुन्हा एका प्रयत्न.. आता थोडातरी मध्ये लागलं पण हा पोरगा लगेचच ते फिसकटवतो म्हणून त्यावर थोडी पावडर  लावली.. आता आमचं पिल्लू एकदम वारकरी दिसू लागला.. थोडावेळ विठ्ठल विठ्ठल केलं.. या सगळ्या प्रकारात बाळाने एकदाही कुरकुर केली नाही हे विशेष .. :)
आता गप्पा.. आजी आजोबांनी नातवाला गप्पा मारायची जास्तच सवय लावली आहे.. जरा आम्ही इकडे तिकडे पाहिलेलं याला चालत नाही.. त्याच्या अवती भोवती सगळ्यांनी बसायचं अन त्याच्याशी बोलायचं.. मध्येच बाबांना मी काहीतरी ऑफिस मधलं सांगत होते तर याला वाटलं मी त्याच्याशीच बोलत आहे.. माझं सगळं लक्ष देऊन ऐकणारा तो एकमेव पोरगा असावा या पृथ्वीतलावर.. :) सेलमध्ये "कोणास ठाऊक कसा" गाणं लावला तर याला वाटलं मीच गात आहे,किती निरागस भाव दिसले मला त्याच्या डोळ्यात.. त्याने मध्येच हसायचं, मध्येच रडायचं आणि आपण कारणं शोधायची..
नंतर तर त्याच्या गप्पा सुरु झाल्या.. 'ओ, उ' असं काहीतरी बोलून तो खरच काही सांगत होतं.. मीपण त्याला प्रतिसाद देत होते.. बागेत जायचं, थोडा मोठा हो तू, मग जाऊ आपण.. आई आजी भूर गेली म्हणून तक्रार  करतोयस का, आपण त्यांच्याशी कट्टी घेऊया.. बाबा भेटायला आले नाही ना,आले कि आपण रागवू या वगैरे.. बालक आताच हुशार झाले आहेत.. मध्येच लाडीगोडी लावतो तो घे म्हणून.. आणि त्याला मांडीवर चालत नाही.. त्याला घेऊन घरभर फिरायचं.. हे काम मात्र आजी आजोबाना आणि त्याच्या बाबांनाच जमतं.. :)
आई आल्यावर घडल्यात पहिले तर २ तास होऊन गेले होते.. हा वेळ भूरकन उडून गेला मला अजिबात कळले नाही.. बाळ लीलांमध्ये बाकीच्या गोष्टींचा कसा विसर पडतो याचा प्रत्यय मला आज आला.. मी तर रोज थोडाच वेळ भेटते त्याला तरी मी इतके भारावले आहे.. तर बाळाच्या प्रत्यक्ष आईची मनस्थिती कशी होत असेलना.. प्रत्येक स्त्रीला मिळालेली हि एक अमोल देणगी आहेना.. या जन्मात मलाही हे सुख मिळावं हीच माझी ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना..

गुरुवार, १४ जुलै, २०११

मंतरलेले दिवस - ३१

 कल हो ना हो..

"मुंबई पुन्हा हादरली, तीन स्फोटांची मालिका.. संपूर्ण महाराष्ट्र हादरलं.." मन सुन्न झालं.. निष्पाप जीवांच्या उरावर का बसतात हे लोक समजत नाही.. अतेरिकी , राजकारण हा भाग वेगळा पण त्रास कोणाला झाला.. सफर कोण झालं.. किती गेले, किती जखमी झाले अन कितीजण थोडक्यात वाचले?  त्यातले कित्येकजण खरेदीला गेले असतील, कोणी ऑफिस मधून परतत असतील, कोणी काही कामासाठी बाहेर पडले असतील तेव्हा ते परत कधी येणार नाही अशी शंका त्याच्या घरच्यांच्या किवा स्वतः त्यांच्या मनात चुकूनतरी आली असेल का? त्यांच्यातले कोणी कोणाला भेटून निघाले असतील ती भेट शेवटची याची कल्पना त्यांना असेल का? काहीजण  कोणाला भेटायला निघाले असतील तेव्हा वाट बघणाऱ्याची हालत काय झाली असेल?

बॉम्ब स्फोट ही एक घटना.. तसं भूकंप, पूर, साथीचे रोग (स्वायिन फ्लू), अपघात अशा अचानक उद्भवणाऱ्या अनेक आपत्तींना मनुष्याला तोंड द्यावे लागते.. एक ना एक दिवस प्रत्येकाची वेळ येते.. मरण अटळ आहे.. हे असं इतकं माहिती असताना आपण आपल्या हाताने नाती का तोडायची?  वेळ नाही म्हणून आपल्या सख्यासोयारयाना टाळायचं.. ज्यांच्याशी आता संबंध आहे त्यांच्याशीच बोलायचं अन बाकीच्यांना अजिबात भाव द्यायचा नाही..  'मी का म्हणून' असा खोटा अभिमान धरून संपर्क तोडायचा..  वर्ण, धन संपत्ती, पद, जात अशा हजारो गोष्टीनी आपापसात भेदभाव करायचा.. स्वतः कडे सगळं आहे म्हणून माज करयचा आणि दुसर्यांना कमी लेखून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं.. मनात कोणाबद्दल कशाबद्दल तरी राग धरायचा आणि बोलायचं नाही.. कोणाशीतरी वैर धरायचं..  स्वतःचे हित पाहिचे, बाकीचे गेले उडत..

दोन घडीच आयुष्य आपलं..  आज आहे उद्या नाही, कसलाच भरवसा नाही.. मग कोणाशी असं का तोडून वागायचं? एखाद्याचा काही चुकत असेल किवा त्याच्याबद्दल  काही शंका/संशय असतील  तर ते मनात ठेवण्यापेक्षा स्पष्ट बोलून दाखवलं तर सुधारणा होऊ शकते ना.. वेळ नसेल मिळत तर तसा नीट पद्धतीने सांगू शकतोना..  आणि तुम्ही सुंदर गोरेपान, हुशार असताल, पैसेवाले असताल, तुमचं नशीब बलवत्तर असेल त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना यश येत असेल, तुमचं वेळेवर सगळं होत असेल पण या गोष्टी क्षणिक आहेत.. काळाप्रमाणे बदलणाऱ्या आहेत.. त्यामुळे उन्ह असो वा  पाऊस, आपण एक माणूस म्हणून नेहमी जमिनीवर राहिलं पाहिजे आणि समोरच्याचा एक माणूस म्हणून नेहमी आदर ठेवला पाहिजे भले तो कोणी का असेना..

प्रत्येक दिवस हा शेवटचा आहे आहे असा समजून वागला तर जीवन प्रवासाला खूप वेगळे वळण मिळते.. आज आपण या व्यक्तीशी शेवटचं बोलणार आहोत असं समजायचं.. मग समोरच्यासाठी आपोआप आपलं मन मोठं होतं.. मी हे अनुभवलं आहे.. कैलास मानसला जाताना मी परत येणार नाही अशा भावनेने तयारी केली होती.. सगळ्यांचा निरोप घेतला होता..  अगदी माझ्या खाजगी गोष्टींचं पुढे काय करायचं याची सोय लावून गेले होते म्हणूनच मी त्या अनोळखी लोकांबरोबर यात्रा मस्त एन्जोय करून येऊ शकले.. सरळ शुद्ध मनाने केलेल्या सगळ्या गोष्टीना यश मिळतं, होना..

म्हणून माझी मनापासून नम्र विनंती आहे की ज्यांना तुम्ही हवे आहात त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यांना तुमचा वेळ द्या.. तुम्हाला त्या व्यक्ती आवडत नसतील तरी त्यांच्याशी नातं तोडू नका.. कारण थोड्याच दिवसांचा प्रश्न असतो हा.. और फिर क्या पता कल हो ना हो..

चाहे जो तुम्हें पूरे दिल से
मिलता है वह मुश्किल से
ऐसा जो कोई कहीं है
बस वही सबसे हसीं है
उस हाथ को तुम थाम लो
वह मेहरबाँ कल हो न हो

लहान तोंडी मोठं घास झाला असल्यास माफी असावी..

सोमवार, ११ जुलै, २०११

पहिले पाढे चार...

एक दिवस प्रेमाचा..  दोन दिवस वादाचे..  तीन दिवस विरहाचे..  अन चार दिवस आठवणींचे..

एक दिवस स्वप्नांचा..  दोन दिवस भावनांचे..  तीन दिवस विचारांचे..  अन  चार दिवस वास्तवाचे..

एक दिवस मोहाचा..  दोन दिवस भोगाचे..  तीन दिवस जाणिवेचे..  अन चार दिवस पश्चातापाचे..

एक दिवस तृप्तीचा..  दोन दिवस सुखाचे..  तीन दिवस आसवांचे..  अन चार दिवस कंटाळ्याचे..

एक दिवस जगाचा..  दोन दिवस सोयरयांचे..  तीन दिवस स्वतःचे..  अन चार दिवस ईश्वराचे..

बुधवार, ६ जुलै, २०११

नुतनीकरण

मनाचं आता थोडं नुतनीकरण करायचं आहे..
जमल्यास जुनं देऊन नवं मन घ्यायचं आहे..

क्षणाक्षणांची वर्दी..  आठवणींची त्या गर्दी..
गतकाळाची रद्दी..  अन् भविष्याची यादी..
मनाचं गाठोडं आता थोडं आवरायचं आहे..
जमल्यास जुनं देऊन नवं घ्यायचं आहे..

उडत जाणारे रंग..  सुटत जाणारे संग..
आटत जाणारे गंध..  उसवत जाणारे बंध..
मनाचं आंगण आता थोडं सारवायचं आहे
जमल्यास जुनं देऊन नवं मन  घ्यायचं आहे..

सुखाच्या दीप माळा..  अश्रूंच्या निळ्या ज्वाळा..
प्रश्नांच्या गच्च जाळ्या..  मनाच्या वेड खेळ्या..
मनाचं घरटं आता थोडं सजवायचं आहे..
जमल्यास जुनं देऊन नवं मन घ्यायचं आहे..

आहे ना रे माझ्या सोबत तू

तुझ्या  नावाने मी नेहमीच थोडा थोडा भाव खाते
तू  आहेस पाठीशी हे जगास कायम ठासून सांगते
पाहतोयस ना रे तू हे सारं दुरून कुठून तरी
आहे ना रे माझ्या सोबत तू सदा सर्व काळी..

तुझ्याशी मनमोकळेपणाने मी  सारं काही बोलते
भल्या बुर्या गोष्टींचे गणित रोज तुझ्यापाशी मांडते
ऐकतोयस  ना रे तू हे सारं दुरून कुठून तरी
आहे ना रे माझ्या सोबत तू सदा सर्व काळी..

तुझे लक्ष आहे म्हणून सरळ मार्गाने मी  चालते
तोटा सहन करावा लागलातरी प्रामाणिकपने  वागते
पाहतोयस ना रे तू हे सारं दुरून कुठून तरी
आहे ना रे माझ्या सोबत तू सदा सर्व काळी..

जिथे तिथे जेव्हा जेव्हा शोध तुझाच घेते
सुखदुखात  माझ्या  मी तुझीच करुणा भाकते
ऐकतोयस  ना रे तू हे सारं दुरून कुठून तरी
आहे ना रे माझ्या सोबत तू सदा सर्व काळी..

रविवार, ३ जुलै, २०११

मंतरलेले दिवस - ३० : १६

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 16: 20th June,11


Kathmandu -> Mumbai -> Pune


आता चेहरा ओळखूयेण्या इतपत सुधारला होता..थोडी सर्दी - कफ होता ती तर मला पुण्यातही होतेच..  बाकी काही त्रास झाला नाही..
सकाळी नाश्ता करून काठमांडू विमानतळ गाठले.. 'ने मजसी ने परत मातृभूमीला' अशी अवस्था झाली होती आता.. विमानात खिडकीची जागा मिळाली नाही आणि शिक्षा दिल्यासारखे मी बसले होते तिथे खिडकी नव्हती.. गाणी आणि सिनेमा बघत, खात पीत विमान प्रवास झाला.. कितीतरी आठवणी मनात रेंगाळत होत्या..
दुपारी मुंबईला पोहचल्यावर जाम खुश झाले.. एव्हढे दिवस बाहेर मी पहिल्यांदाच एकटी राहिले होते त्यामुळे घरी कधी जाईन असे झाले होते..
मुंबई विमानतळावर मुंबईकरांचे नातेवाईक त्यांना भेटायला आणि घरी घेऊन जायला आले होते.. मी मुंबईत का राहत नाही मग माझे आई बाबापण आले असते असं उगाच  माझ्या बालमनाला वाटून गेलं.. एका कुटुंबाने आम्हा सर्व यात्रेकरूंचे फुले देऊन स्वागत केले.. आता कोणालाही थांबायचं नव्हतं.. लगेचच सगळे वेगळ्या दिशेत पसार झाले..
येताना गाडीचा प्रकार झाला होता त्यामुळे आता पुण्यात जाण्यासाठी बाबांनी शिस्तीत के के चे बुकिंग केले होते.. लोहगावकर काका काकू , करवा काका आणि मी असे पुण्याच्या प्रवासाला एका गाडीतून निघालो.. नाही नाही अजून ट्रीप संपली नव्हती.. आता express  way लगतचे धबधबे, ढगात बुडलेला लोणावळा खंडाळ्याचा घाट.. आणि मध्येच थांबून खाल्लेला गरम गरम वडापाव आणि चहा.. आहा,ये हुई ना बात.. :) गाडीमध्ये पूर्णवेळ ट्रीप मधल्या गप्पाटप्पा, आठवणी.. अशा रीतीने रानजाई रेसिडन्सी कधी आलं समजलंच नाही!!!


मंतरलेले दिवस - ३० : १५

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 15: 19th June,11


Kathmandu

आजचा पूर्ण दिवस आराम करण्यासाठी मोकळा ठेवला होता.. काहीच कार्यक्रम नव्हता.. सिमास चे सगळे मंडळी आज काठमांडू -> दिल्ली -> पुणे असे जाणार होते.. मी काल केळकर काकांना म्हणलं मलाही आज यायचं पुण्यात.. पण आता ऐनवेळेस बदल करणं फार महागात पडलं असतं म्हणून तो विचार डोक्यातून काढून टाकला..
आज  निवांत उठलो.. चहा घेताना कळला कि केसरीची एक तुकडी आमच्या नंतर आली होती त्यांना पहिल्या दिवसानंतर परतावे लागले.. हिमवर्षावामुळे डोलमा पासला जाता नाही आले आणि परिक्रमा पूर्ण झाली नाही.. हे ऐकून मी भूतकाळात शिरले.. माझ्या ओळखीच्या सर्वांनी ही यात्रा केसारीसोबत केली असल्याने मी सर्वात प्रथम केसरीकडे चौकशीला फोन केला होता.. तेव्हा तिकडची एक मुलगी जूनच्या ग्रुपमध्ये एकच जागा शिल्लक आहे ,लवकरात लवकर बुकिंग करा म्हणली मग मी त्याच संध्याकाळी फर्गुसन रस्त्यावर त्यांच्या ऑफिस मध्ये गेले.. आणि तिथे गेल्यावर या madam  म्हणतात की जून मध्ये नाहीतर जुलै मध्ये जागा आहे.. मला म्हणे तुम्ही जुलै मध्ये जा.. आता ती कोण ठरवणारी मी कधी जायचं ते.. बर जागा नसू शकते जून च्या ब्याच मध्ये पण मग फोनवर खोटं कशाला बोलली.. तिला वाटलं असेल एकदा ऑफिसमध्ये समोरासमोर बोलू आणि जुलै च्या ग्रुपमध्ये नाव टाकू..  पण हे असं खोटं बोललाना कोणी कि माझ्या डोक्यात शॉट जातो.. मी म्हणलं मी काम करते ,मला सुट्टीच पाहावा लागता.. जूनमध्ये  सुट्टी मिळेल.. फोनवरच तुम्ही सांगितला असतं जून ची ब्याच भरली आहे तर मी आलेच नसते ना  अशी धावत.. तर ती म्हणायला लागली  आमच्या ब्याचेस २/३ महिन्याआधीच भरतात वगैरे.. मी म्हणलं  बघा जून मध्ये जागा असेल तर ठीक आहे नाहीतर राहूदे.. तर ती नाहीच म्हणली.. मग मी तिला म्हणलं  फोनवर चुकीची माहिती देत जाऊ नका आणि निघून आले... खाली आल्यवर माझ्या डोळ्यात पाणी आले होते की आता मला जाता येणार नाहीका.. मला पुढे अजिबात ढकलायचे नव्हते.. त्यावेळेस माझे आईबाबा पूर्ण तयार झाले नव्हते त्यामुळे मला पाठींबा कोणाचाच नव्हता.. मनातून देवाला म्हणलं मला ही यात्रा आताच करायची आहे.. थोडी निराश झाले होते पण लगेचच सचिन trv कडे जाऊन विचारपूस करायची ठरवले आणि थेट सचिनचे जंगली महाराज रस्त्यावरचे ऑफिस गाठले.. सचिनची ब्याच ५ जून ला आहे आणि त्यात भरपूर जागा आहेत हे कळल्यावर मला फार आनंद झाला.. सचिनचं तसं चांगलं नाव आहे म्हणलं जाऊ आता,पुढे होईल तसं होईल..  नंतर मला केसरीचा १० वेळा तरी कमीतकमी फोन आला कि जूनच्या ग्रुपमध्ये एक जागा आहे म्हणून.. मला त्यांचं असं वागणं काही झेपलं नाही.. मी त्यांना दाद दिली नाही आणि सचिन कडे बुकिंग केले.. आणि आज समजतय की मला केसरीच्या जून च्या ग्रुपमध्ये जागा नाही मिळाली किती चांगली गोष्ट होती.. आज देवाने मला पुन्हा दाखवून दिले कि 'प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असते.. आणि जे होते ते आपल्या चांगल्यासाठीच..'
नंतर आम्हाला खरेदीसाठी एकीकडे नेले गेले तिथे एक मोठा mall  होता.. आता पुण्या मुंबईत काही malls  नाहीयेत का.. आणि या mall  मध्ये इथलं काही खास वेगळं नव्हतं किवा काही स्वस्तही नव्हतं.. तरीही सर्वांनी तिकडे भरभरून खरेदी केली याचं मला फार आश्चर्य वाटलं.. लोकांकडे खूप पैसे आहेत,अजून काय.. मी मात्र एक पैसाही त्या mall  मध्ये खर्च केला नाही.. खरंतर आमच्या हॉटेलच्या परिसरात चांगलं मार्केट होतं.. त्या mall  मधून आल्यावर मी इथे फिरले आणि थोडी खरेदी केली.. :) आता इथे चांगलाच पाऊस चालू होतं.. महेश म्हणला आपण mountain  flight  आधीच केले बरे झाले,आता ते सगळं पावसामुळे बंद झालं आहे..
जरा थकलो होतो म्हणून आणि पावसामुळे आज काठमांडू मध्ये विशेष कुठे फिरलो नाही.. संध्याकाळी गेटटुगेदर होते तेव्हा आम्हा सर्वाना यात्रा पूर्ण केल्याचे abc adventure कडून प्रशस्तीपत्रक देण्यात आले.. :) ते देताना महेश सर्वांबद्दल बोलत होता.. माझ्याबद्दल म्हणला कि डोलमा पास झाल्यावर हिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो अवर्णनीय आहे,मी भीम भय्या , केळकर काका आम्ही त्या आनंदाचे साक्षीदार आहोत!!!
रात्री bag  packing  चे मोठे काम केले...