बुधवार, २४ ऑगस्ट, २०११

मंतरलेले दिवस - ३८

चित्र १ : अशीच एकदा मैत्रिणींसोबत भटकंती पोटपूजा चालू होती.. चांगल्या ठिकाणी चरत होतो.. चहा आला.. माझ्यासारख्या चहाभक्तांना कुठलाही कसाही चहा चालतो.. पण काहीजण फार चोखंदळ असतात.. ठराविक पाण्यात ठराविक दुधाचे प्रमाण असले तरच त्यांना चहा आवडतो.. आता बाहेर गेल्यावर अगदी तसाच चहा मिळेल असं काही सांगता येत नाही.. आमच्यासोबत अशीच एकजण होती.. तिच्या म्हणण्यानुसार चहा बिघडला होता.. तिला तसा पिववत नाही म्हणून तिने तो वाया घालवला.. चहाचे असे कितीसे रुपये असतातना..

चित्र २ :
चावंड हडसर ट्रेकला गेले होते तेव्हा आमचा मुक्काम घाटघर येथे होता.. मंदिरात राहायचं ठरलं होतं पण तिथे पावसाचं पाणी आत शिरलं होतं..  म्हणून बाळू असावालेंनी त्यांच्या घरी राहायची सोय केली.. दोन तीन खोल्या आणि छोटंसं स्वयपाक घर.. रात्री लवकर झोपल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी मी सगळ्यात आधी उठले होते.. त्या वाहिनी माझ्यावर भलत्याच खुश होत्या कारण  धाकट्या मुलीचा मी फोटो काढून  नंतर त्यांना पाठवणार होते.. त्यांची सकाळची कामं चालू होती आणि आमच्यापैकी विशेष कोणी उठलं नव्हतं अजून.. म्हणून त्यांनी मला त्यांच्या स्वयपाक घरात चहा घ्यायला बोलावलं.. मी नको म्हणलं पण त्यांनी फारच आग्रह केला.. चुलीवर चहाचं आधण ठेवलं होतं.. एका कपमध्ये चहा गळून देताना त्या मला म्हणल्या आम्ही असा  काळाच चहा घेतो,दुध परवडत नाही आम्हाला..  चालेल ना तुम्हाला? आयुष्यात पहिल्यांदा घेतलेल्या त्या black teaची चव फारच अप्रतिम होती.. तेव्हा मला चहा बोर आहे म्हणून वाया घालवणाऱ्या मैत्रिणीची, त्या प्रसंगाची आठवण झाली.. आणि माझ्या डोळ्यात चटकन पाणी आलं..


एकीकडे चांगल्या ठिकाणचा चहा ज्यात दुध साखर आलं वगैरे सगळं असून सुधा चहा टाकून देणारी ती मैत्रीण.. आणि दुसरीकडे चहात घालायला दुध नसून देखील समाधानाने चहा घेणारं ते कुटुंब..  कदाचित म्हणूनच तो भगवंत एखादी गोष्ट आपल्याला कमी देत असावा जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीची,भावनांची, आयुष्याची  खरी किंमत समजेल..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: