लेबल

कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ११ सप्टेंबर, २०१२

श्यामवर्णी तू मेघराजा तू..

श्यामवर्णी तू मेघराजा तू..  अंगणात माझ्या बरस रे..
असंच अविरत अन वेड्यागत.. सरींवर सर कोसळ रे ..

लडिवाळपणे नाचत वाजत..  चिंब चिंब भिजव रे..
जड देहाचे जड वस्तूचे.. विस्मरण मला घडव रे..

शुभ्र मोती तव बिंदूंचे..  खोल खोल रुजव रे ..
विरघळवूनी विचार सारे.. मनात अत्तर  शिंपड  रे..

कणकण सारे निर्मळ करुनी..  आसमंत हा सजव  रे..
क्षणक्षण नवचैतन्याने भरुनी..  अंतरंग हे फुलव रे..

सोमवार, २३ एप्रिल, २०१२

वर आभाळाचे छप्पर.. खाली मातीचा आधार..
कसे अन किती देवा, मानू मी तुझे आभार..

गतकाल विस्मृतीसाठी येते ती अंधारी रात्र..
नवसंधी देण्यासाठी उगवतो तो रोज सूर्य..
रंगलेल्या क्षणांची साक्ष देते ती सजून सांज..
कसे अन किती देवा, फेडू मी तुझे ऋण..

आसवास साथ देण्यासाठी पडे त्या जलधारा..
पुढे पुढे जाण्यासाठी वाहे तो उत्साही वारा..
प्रितीच्या गोडीसाठी  तो चांदण्याचा शिडकावा..
कसे अन किती देवा, जाणू मी तुझ्या लीला..

नवी स्वप्ने ओवण्यासाठी उमलतात ती फुले..
मनोरथ आवरण्यासाठी रुततात ते काटे..
निळा आनंद देण्यासाठी ते पाणी निळे निळे..
कसे अन किती देवा, रचू मी तुझे गाणे..

मंगळवार, ३ एप्रिल, २०१२

आनंद वेदनेतील..

कधीतरी अचानक विचारांचे वादळ उठते..
आठवणींची वीज कडाडू लागते..
आसवांचा पाऊस कोसळू लागतो..
अन् मनाचा बांध तुटून जातो..

पण अशा उध्वस्त स्थितीतही एक सुगंध वाहू लागतो..
त्या वेदनेतही एक आनंद जाणवू लागतो..
कारण तेव्हा एक जाणीव जीवाला स्पर्शून जाते..
व्यवहाराच्या आगीत होरपळलेल्या त्या  भावनाफुलाच्या, जिवंतपणाची ..
तेवढीच तर एक साक्ष शिल्लक असते..

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१२

श्रीकृष्णमर्पणमस्तु!!!

सोळा हजार एकशे आठ, भार्या तुझ्या आहेतना..
एक भर माझी पड़ता, हरकत तुझी नसेलना..

उँची नसेल माझी जरी, कृपा तुझी लाभेलना..
सेवा तुझी करण्याकरता, पात्र मी होइलना..

इथे सारे क्षणाचे सोबती, आजचे उद्या नसेलना..
तूच शाश्वत सखा माझा, अखंड सौभाग्य देशीलना..

हिशोबी जगाच्या मेंदूमध्ये, अडचण माझी होइलना..
प्रेमळ तुझ्या  हृदयामध्ये,  जागा  मला मिळेलना..

भोळे भाबडे मन माझे, कोणास उमजत नसेलना..
जिंकूनी पण तू माझा, स्वीकार तू करशीलना..

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१२

अर्णवा

आत बाहेर.. वर खाली..
कसली गडबड चालू आहे?
क्षणभरही उसंत नाही..
किती खळबळ माजली आहे?

कुठे गडद.. कुठे फिके..
रंग खरा  कोणता आहे?
जिथे तिथे व्याप तुझे
अंत तुझा कुठेशी आहे?

अतर्क्य असे रूप तुझे
तरी हवे हवेसे  आहे
चंचल तू वरवर भासे
अंतरी परी अमृत आहे!!!

रविवार, १५ जानेवारी, २०१२

ठरवलय आता मी..

ठरवलय आता मी मागे नाही पाहणार..
पुढे पुढे फक्त चालतच राहणार..

ठेच लागता पुन्हा नाही कुरवळणार
सावली मिळता फार नाही गुन्तणार
ठरवलय आता मी कुठे नाही थांबणार
पुढे पुढे फक्त चालतच राहणार..

उंची बघुनी कधीही नाही घाबरणार
खोली पाहुनी एकाकी नाही दचकणार
ठरवलय आता माझं कुठे नाही आडणार
पुढे पुढे फक्त चालतच राहणार..

कोमजलेल्या स्वप्नांना उगा नाही जपणार
धेयांच्या पंखांना कधी नाही मिटवणार
ठरवलय आता मी कुठे नाही हरणार
पुढे पुढे फक्त चालतच राहणार..

गुरुवार, २२ डिसेंबर, २०११

मनातल्या मनात..

मनातल्या मनात..
किती फुले उमलतात..
किती वेली पसरतात..
किती गंध दरवरळतात..
मनातल्या मनात..

मनातल्या मनात..
किती वादळे उठतात..
किती जहाजे बुडतात..
किती पूल तुटतात..
मनातल्या मनात..

मनातल्या मनात..
किती प्रश्न पडतात..
किती तर्क लागतात..
किती उत्तरे मिळतात..
मनातल्या मनात..

सोमवार, १२ डिसेंबर, २०११

मन..

जेव्हा मी माझे सुखं दाखविले,
तेव्हा ते म्हणले खोटं आहे..

जेव्हा मी माझे दुखं दाखविले,
तेव्हा ते म्हणले छोटं आहे..

जेव्हा मी माझे मन दाखविले,
तेव्हा मात्र ते म्हणले मोठं आहे!!!

सोमवार, ५ डिसेंबर, २०११

श्रीकृष्णमर्पणमस्तु!!!


तुझा प्रेमळ हस्तस्पर्श मस्तकी होऊदे..
सुखशांतीची झुळूक माझ्या मनात वाहुदे..

तुझ्या कांतीच्या प्रभेत तनमन न्हाऊदे..
प्रत्येक श्वास माझा पवित्र होऊदे..

तुझ्या चरणकमलांशी अढळ स्थान मिळूदे.
निरंतर स्थिरता माझ्या चित्तास लाभूदे..

तुझ्या शीतल छायेच्या सानिध्यात राहूदे..
विकार व्यसनांपासून माझे रक्षण होऊदे..

तुझी दिव्य कृपादुष्टी मजवर असूदे..
सत्कर्माची प्रेरणा मला सदैव मिळूदे..

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०११

वही मनाची..

कधीतरी तुझ्या मनाची वही  मागे उलटून पहा जरा..
कुठेतरी एखादे माझ्या नावचे पान  नक्की सापडेल तुला..!

थोडं मळलेलं, थोडं फाटलेलं.. चुरगाळलेलं असेल जरा..
तरीही त्या पानामध्ये सुगंध ताजा जाणवेल तुला..!

कुठे  पुसट.. कुठे अस्पष्ट.. जुनाट झालेले असेल जरा..
तरीही त्या पानामध्ये स्पर्श प्रेमाचा जाणवेल तुला..!

काही पाकळ्या.. काही जाळ्या.. आसवांची ओलही असेल जरा..
तरीही त्या पानामध्ये अस्तित्व माझे जाणवेल तुला..!

श्रींची इच्छा..

कुठे उंच उडणं..  कुठे खोल बुडणं..
कुठे शून्यात शिरणं.. सारं काही श्रींच्या इच्छेनं..

काही असं वाटणं.. काही तसं भासणं..
काही कसं निराळं..  सारं काही श्रींच्या इच्छेनं..

थोडं कोणाशी जुळणं..  थोडं काही सुटणं..
थोडं फार टिकणं..  सारं काही श्रींच्या इच्छेनं..

कोणास कौतुक तनाचं..  कोणास कौतुक धनाचं..
कोणास कौतुक मनाचं.. सारं काही श्रींच्या इच्छेनं..

कधी वाट मिळणं..  कधी वाट चुकणं..
कधी वाट संपणं.. सारं काही श्रींच्या इच्छेनं..

देवास त्या ओळखणं..  देवास त्या समजणं..
देवास त्या अनुभवणं.. सारं काही श्रींच्या इच्छेनं..

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०११

कोण मी.

कुठून आले.. कुठे चालले..
का चालले हेही माहिती नाही..
चालले आहे कुठेतरी हे मात्र नक्की आहे..

कोण मी.. मी कोणाची..
माझं कोण हेही माहिती नाही..
एकटी नाही मी तरीही हे मात्र नक्की आहे..

काय मिळवलं.. काय गमावलं..
शिल्लक किती हेही माहिती नाही..
हिशोब चालू कोण्याकाळाचा हे मात्र नक्की आहे..

सोमवार, ११ जुलै, २०११

पहिले पाढे चार...

एक दिवस प्रेमाचा..  दोन दिवस वादाचे..  तीन दिवस विरहाचे..  अन चार दिवस आठवणींचे..

एक दिवस स्वप्नांचा..  दोन दिवस भावनांचे..  तीन दिवस विचारांचे..  अन  चार दिवस वास्तवाचे..

एक दिवस मोहाचा..  दोन दिवस भोगाचे..  तीन दिवस जाणिवेचे..  अन चार दिवस पश्चातापाचे..

एक दिवस तृप्तीचा..  दोन दिवस सुखाचे..  तीन दिवस आसवांचे..  अन चार दिवस कंटाळ्याचे..

एक दिवस जगाचा..  दोन दिवस सोयरयांचे..  तीन दिवस स्वतःचे..  अन चार दिवस ईश्वराचे..

बुधवार, ६ जुलै, २०११

नुतनीकरण

मनाचं आता थोडं नुतनीकरण करायचं आहे..
जमल्यास जुनं देऊन नवं मन घ्यायचं आहे..

क्षणाक्षणांची वर्दी..  आठवणींची त्या गर्दी..
गतकाळाची रद्दी..  अन् भविष्याची यादी..
मनाचं गाठोडं आता थोडं आवरायचं आहे..
जमल्यास जुनं देऊन नवं घ्यायचं आहे..

उडत जाणारे रंग..  सुटत जाणारे संग..
आटत जाणारे गंध..  उसवत जाणारे बंध..
मनाचं आंगण आता थोडं सारवायचं आहे
जमल्यास जुनं देऊन नवं मन  घ्यायचं आहे..

सुखाच्या दीप माळा..  अश्रूंच्या निळ्या ज्वाळा..
प्रश्नांच्या गच्च जाळ्या..  मनाच्या वेड खेळ्या..
मनाचं घरटं आता थोडं सजवायचं आहे..
जमल्यास जुनं देऊन नवं मन घ्यायचं आहे..

आहे ना रे माझ्या सोबत तू

तुझ्या  नावाने मी नेहमीच थोडा थोडा भाव खाते
तू  आहेस पाठीशी हे जगास कायम ठासून सांगते
पाहतोयस ना रे तू हे सारं दुरून कुठून तरी
आहे ना रे माझ्या सोबत तू सदा सर्व काळी..

तुझ्याशी मनमोकळेपणाने मी  सारं काही बोलते
भल्या बुर्या गोष्टींचे गणित रोज तुझ्यापाशी मांडते
ऐकतोयस  ना रे तू हे सारं दुरून कुठून तरी
आहे ना रे माझ्या सोबत तू सदा सर्व काळी..

तुझे लक्ष आहे म्हणून सरळ मार्गाने मी  चालते
तोटा सहन करावा लागलातरी प्रामाणिकपने  वागते
पाहतोयस ना रे तू हे सारं दुरून कुठून तरी
आहे ना रे माझ्या सोबत तू सदा सर्व काळी..

जिथे तिथे जेव्हा जेव्हा शोध तुझाच घेते
सुखदुखात  माझ्या  मी तुझीच करुणा भाकते
ऐकतोयस  ना रे तू हे सारं दुरून कुठून तरी
आहे ना रे माझ्या सोबत तू सदा सर्व काळी..

शनिवार, २८ मे, २०११

बाळा तुला या लीला.. कोण बरं शिकवतं..!

कधी खुदकन हसतं..  मध्येच रडू लागतं..

बाळा तुला या लीला..  कोण बरं शिकवतं..!


उठ म्हणलं की झोपतं..  झोप म्हणलं की उठतं..

बाळा तुला या लीला..  कोण बरं शिकवतं..!


स्पर्शाने स्पर्श ओळखतं..  अन डोळ्याने किती बोलतं..

बाळा तुला या लीला..  कोण बरं शिकवतं..!


स्वतः शून्यात हरवतं..  अन इतरांची नजर खिळवतं..

बाळा तुला या लीला..  कोण बरं शिकवतं..!


सर्वाना लळा लावतं..  सर्वास बांधून ठेवतं..

बाळा तुला या लीला..  कोण बरं शिकवतं..!

मंगळवार, १० मे, २०११

हेवा वाटतो खरच मला त्या सर्वजणांचा..

हेवा वाटतो खरच मला त्या सर्वजणांचा..
ज्याना कधी काही प्रश्नच मुळी पडत नाही
पडले तरी ते कोणाला विचारत नाही
विचारले तरी त्याना बरी उत्तरे मिळतात
आणि त्या उत्तरानी ते समाधानी होतात !!!

हेवा वाटतो खरच मला त्या सर्वजणांचा..
ज्यांच्याकडून कधी काही चुका होत नाही
झाल्या तरी ते तसं मान्य करत नाही
मान्य करताना ते बरीच कारणे सांगतात
आणि त्यांच्या चुका पदरात घेतल्या जातात !!!

हेवा वाटतो खरच मला त्या सर्वजणांचा..
ज्याना कधी काही लिहावे वाटत नाही
लिहिल तरी ते कोणाला दाखवत नाही
दाखवल तर ते फक्त जवळच्यानच दाखवतात
आणि सर्वांकडून त्याना प्रतिक्रिया मिळतात !!!

हेवा वाटतो खरच मला त्या सर्वजणांचा..
ज्यांच्या हृदयामधे थोडही मन नाही
मन असल तरी ते चंचल बिलकुल नाही
चंचल असल तरी ते त्याला काबूत ठेवतात
आणि त्या मनासकट ते शांतपणे जगतात !!!

रविवार, ८ मे, २०११

वाट चुकलेलं वासरू..

निसर्गाच्या कुशीत राहणारं
फुलपानात सदा खेळणारं
भोळं भाबडं सरळ साधं 
चंचल असं एक वासरू होतं..


एकदा  कसंकाय  झालं  बरं 
काहीतरी  त्यास  दिसलं  खरं 
क्षणात  मन  मोहून  गेलं 
अन  त्या  दिशेस धावू  लागलं.. 

क्षणभर किंचित वाटून गेलं  
बरोबर का तिकडे जाणं   
अखेर मस्तीने पाऊल टाकलं
मन वेड्यागत वाहत गेलं.. 

तिकडे ते  सुखात  लोळलं 
मजेत  गुंतत  गुंतत गेलं 
आगळ्या धुंदीत रममाण झालं 
अन भान पार हरपून गेलं.. 

पण  एक  दिवस  असं  घडलं  
अचानक काही  दिसेनासं  झालं 
चुकीच्या  धरलेल्या त्या वळणाचं  
कूट कारस्थान लक्षात आलं.. 

मागे जेव्हा  फिरून  बघितलं 
जग तर कितीतरी  पुढे  गेलेलं 
आता क्षणिक खोट्या सुखाचं 
दुख  त्यास  बोचू  लागलं.. 

चहूकडे दाट अंधारून आलं 
एकटं एकटं वाटू  लागलं 
कुठे  जावं  सुचेनासं  झालं 
अन  दुखाने  ते  कण्हू  लागलं.. 

ते रडू शेवटी हरीने ऐकलं
दयेने वेणुतून गाणं वाजवलं
सूर ऐकताच रहस्य गवसलं    
अन चुकलेलं वासरू कळपात परतलं..

शुक्रवार, २९ एप्रिल, २०११

आता कसं वाटतय? ;)

उन्हात उन्ह जेव्हा चांदणं वाटतं..  तेव्हा माणूस प्रेमात असतो..
उन्हात उन्ह जेव्हा भकास वाटतं..  तेव्हा माणूस दुखात असतो..
उन्हात उन्ह जेव्हा उन्ह वाटतं..  तेव्हा माणूस जगात असतो..

पावसात पाऊस जेव्हा चिंब वाटतो..  तेव्हा माणूस प्रेमात असतो..
पावसात पाऊस जेव्हा कोरडा वाटतो.. तेव्हा माणूस दुखात असतो..
पावसात पाऊस जेव्हा पाऊस वाटतो.. तेव्हा माणूस जगात असतो..

थंडीत थंडी जेव्हा गुलाबी वाटते..  तेव्हा माणूस प्रेमात असतो..
थंडीत थंडी जेव्हा बोचरी वाटते..  तेव्हा माणूस दुखात असतो..
थंडीत थंडी जेव्हा थंडी वाटते..  तेव्हा माणूस जगात असतो..

बुधवार, २७ एप्रिल, २०११

ज्योत आशेची..



पावसात उन्हाची..
उन्हात गारव्याची..
गारव्यात उबेची..
सदा तेवत रहावी.. ज्योत आशेची..

प्रवासात दिशेची..
दिशेत प्रवाहाची..
प्रवाहात काठाची..
सदा तेवत रहावी.. ज्योत आशेची..

डोळ्यात ध्येयाची.. 
ध्येयात कष्टांची..
कष्टात यशाची..
सदा तेवत रहावी.. ज्योत आशेची..

मनात जाणिवेची..
जाणीवेत प्रेमाची..
प्रेमात विश्वासाची..
सदा तेवत रहावी.. ज्योत आशेची..

शब्दात अर्थाची..
अर्थात बोधाची..
बोधात प्रत्ययाची.. 
सदा तेवत रहावी.. ज्योत आशेची.!