बुधवार, ६ जुलै, २०११

नुतनीकरण

मनाचं आता थोडं नुतनीकरण करायचं आहे..
जमल्यास जुनं देऊन नवं मन घ्यायचं आहे..

क्षणाक्षणांची वर्दी..  आठवणींची त्या गर्दी..
गतकाळाची रद्दी..  अन् भविष्याची यादी..
मनाचं गाठोडं आता थोडं आवरायचं आहे..
जमल्यास जुनं देऊन नवं घ्यायचं आहे..

उडत जाणारे रंग..  सुटत जाणारे संग..
आटत जाणारे गंध..  उसवत जाणारे बंध..
मनाचं आंगण आता थोडं सारवायचं आहे
जमल्यास जुनं देऊन नवं मन  घ्यायचं आहे..

सुखाच्या दीप माळा..  अश्रूंच्या निळ्या ज्वाळा..
प्रश्नांच्या गच्च जाळ्या..  मनाच्या वेड खेळ्या..
मनाचं घरटं आता थोडं सजवायचं आहे..
जमल्यास जुनं देऊन नवं मन घ्यायचं आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: