शुक्रवार, ९ डिसेंबर, २०११

मंतरलेले दिवस - ४९

मी ऐकलेले पहिले कीर्तन!  :-)

रविवारी रात्री काकून्चा फोन आला.. दत्त जयंती निम्मित्त उत्सव चालू आहे.. हा आठवडा रोज संध्याकाळी कीर्तन आहे.. तुला आवडत असेल आणि वेळ असेल तर तुही ये.. त्या काकू खूप खास व्यक्ती आहेत.. साहित्य, अध्यात्म, प्रवास आणि इतर कितीतरी कला याबद्दल मला त्यांच्याकडून बरच काही शिकायला मिळतं.. त्यांनी कुठे चल म्हणलं की ती गोष्ट बेष्ट असणार इतका माझा त्यांच्यावर विश्वास आहे.. मी त्यांना म्हणलं यापूर्वी मी कधीच किर्तनाला गेले नाही पण मला नक्कीच आवडेल यायला.. मग त्यानी किर्तना बद्दल थोडक्यात माहिती सांगितली.. पूर्वार्धात भक्तीगीत व निरुपण आणि उत्तरार्धात एक कथा असा साधारणपणे आराखडा असतो.. मला खूप उत्सुकता  वाटली..

काही कारणाने पुढे ढकलत शेवटी आज गुरुवारी किर्तनाला जायचा योग आला.. ओफीस मधून लवकर पळताना मी कोणाला भेटायला चालले असे वाटले असेल... पण आज खरच कारण विशेष होतं.. आश्रमात जरा आधी पोहचले.. तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम चालू होता.. "दिगंबरा दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ दिगंबरा" या नामाच्या गजरात वातावरण दुमदुमुन गेले होते.. ते सगळं ऐकून पाहून मी अगदी भारावून गेले..  कुठे ओफीस आणि कुठे ही प्रसन्न शांत जागा.. भजनी मंडळाचा कार्यक्रम संपला आणि कीर्तनाची तयारी सुरू झाली.. काकून्ची वाट बघत मी तिकडचे निरीक्षण करत होते.. काकू आल्यावर आम्ही दर्शन घेतलं आणि कीर्तन ऐकायला स्थानबद्ध झालो..

कीर्तनकार मकरंदबुवा करम्बळकर यांनी मधुर स्वरात भक्तीगीत गायला सुरुवाते केली.. तबला आणि पेटीवादक त्यांना त्याच तोडीची साथ देत होते.. आणि शेजारी एक आजीबाई वीणा घेऊन उभ्या होत्या.. हळू हळू गर्दी वाढत होती..

धन्य तो संसारी हरिभक्ति करी । जयाचा कैवारी देवराणा ॥

वर वर पाहता याचा अर्थ किती सोप वाटतो.. "संसार करता करता जो देवाची भक्ति करतो त्याला देव संभळतो"! वाचन करताना यासारखा किवा याहून थोडा जास्त अर्थ समजता येतो.. पण कीर्तनकार या शब्दांमधला आतला अर्थ उत्तमपणे मनात ठसवतात असे मला इथे कीर्तन ऐकताना जाणवले.. समर्थानी म्हणले आहे ग्रंथांचा वाचनापेक्षा श्रवण केल्यावर जास्त अर्थ कळतो...

तर निरुपणाचा विषय या अभंगातल्या ओव्या होत्या.. देवाची भक्ति करतो त्याला देव तारतो असं म्हणलं तर सगळे म्हणतील आम्ही रोज पूजा करतो,मंदिरात जातो, वगैरे.. आम्हीही देवाला रोज बोलावतो पण तो येत नाही इत्यादी.. पण भक्तीचा खरा अर्थ वेगळा आहे.. तुम्ही किती भक्ति करता यापेक्षा तुम्ही कशी भक्ति करता हे महत्वाचे.. हे समजण्यासाठी त्यानी प्रल्हाद,बीभीषण, द्रोपदी,ध्रुवाबाळ अशांची उदाहरणे समजावून सांगितली.. देव तुम्ही बाहेरून कसे दिसतात हे पाहत नाही तर तुमचे अंतरंग कसे आहे त्यावरून परीक्षा घेतो.. जो भक्त प्रेमाने अगदी मनापासून परमेश्वराची भक्ति करतो त्याला ईश्वरी कृपा लाभते असं निरुपणाचं तात्पर्य होतं..  शिवाय ज्याच्या मनात राग,वासना,आसक्ती वगैरे विकार नाही त्याच्या पाठीशी भगवंत असतात.. बापरे म्हणलं माझ्या मनात तर हे सगळं आहे.. कधी माझं मन स्वच्छ होणार, कधी मला भगवंत भेटणार!

त्यानंतर  उत्तरार्धात एकनाथांच्या आयुष्यावर आधारित कथा सांगितली.. आणि शेवटी आरती करून कीर्तनाची सांगता झाली. ते सगळं ऐकताना वेळ कसा गेला कळलही नाही.. "कीर्तन" म्हणलं की सहसा सगळे आजी आजोबा जमा होतात.. पण ते जे सांगत होते ते आयुष्य संपल्यावर ऐकलं तर त्याचा विशेष उपयोग होणार नाही असं मला वाटतं.. दैनंदिन जीवनात आवश्यक असणार्‍या कितीतरी गोष्टी त्यांनी सांगितल्या..



तू सागर करुणेचा देवा तुजलाची दु:ख सांगावे । तुज वाचून इतरांशी दिन मुख पसरोनी काय मागावे ॥


मला हे फार भावले.. आपलं दुखं फक्त परमेश्वरच समजू शकतो म्हणून त्याच्यापाशीच मन मोकळं करावं.. बाकीचे कोणीच काही करू शकत नाही,ज्याला त्याला आपले आपले व्याप असतात...

आजकालच्या धाकाधाकीच्या जीवनशैलीत मानसिक ताण मला काय सर्वांनाच आधून मधून येतो.. तेव्हा अधूनमधून अशी कीर्तने आणि भजने ऐकल्यावर भरकटलेल्या मनाला आवर घालणे थोडे सोपे होईल.. मी निश्चय करून टाकला जसा जितका जमेल तेव्हढा सत्संग वाढवायचा.. आणि काकून्चे आभार मानले कारण त्यांच्यामुळेच मी आज इथे आले होते आणि आता नेहमीच येत राहीन..

सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो । कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: