मंगळवार, ६ डिसेंबर, २०११

मंतरलेले दिवस - ४८

शनिवार :
मागच्या शनिवारी मैत्रिणिसोबत एका वृध्दाश्रमात गेले होते.. ते माझ्यासाठी जरा लांब होतं.. शोधत शोधत जाईपर्यंत उशीर झाला.. मी पोहचेपर्यंत बाकी तिघी जणी आल्या होत्या.. मी आत गेले आणि तिथलं सगळं बघून एकदम शांत झाले.. त्या वयस्कर आज्जींपैकी काही जणी खूप आजारी होत्या.. काहीजणी अतिशय मानसिक त्रास झाल्याने की काय पण फारच हसत खेळत बोलत होत्या आणि बोलता बोलता एकदम त्यांची कहाणी सांगायला लागायच्या.. तिथे नॉर्मल व्हायला मला जरा वेळ लागला... आजपर्यंत कितीतरी NGO मध्ये गेले मी पण तिथे निरागस मुलांमध्ये रमुन जायचे.. इथे मात्र मन सुन्न झालं.. नंतर मी सुधा इतर मैत्रीणिंप्रमाणे त्यांच्याशी बोलू लागले.. कोणी गाणी म्हणली, कोणी नाच केला असं चालू होतं.. थोड्यावेळाने  त्यांची जेवायची वेळ झाली आणि आम्ही निघालो.. तिथून घरी परतल्यावर मनात खूप सारे विचार येत होते..
- स्वतहाच्या  जन्मदात्यांवर  अशी वेळ का आणली त्यांच्या मुलांनी?
- मी आजपर्यंत पाहिलेले सगळे आश्रम मग ते लहान मुलांचे असो वा वृद्धांचे ते सगळे ख्रिश्चन लोकांनी काढलेले आहेत.. अर्थात मी सगळ्या ठिकाणी नाही गेले अजुन पण जास्त संस्था ख्रिश्चन लोकांच्याच आहे.. हिंदू लोक या समाज कार्यात मागे का पडतात?
- मला वीकएंडला वेळ असतो तेव्हा  मी माझ्या सवडीने थोडावेळ अनाथ आश्रमात जाते.. माझ्यासारखे बरेचजण तिकडे भेट देतात.. थोडावेळ थांबतात,खाऊ किंवा काही गोष्टी त्याना देतात.. त्याचा कितपत उपयोग त्या मुलांना किंवा वृद्धांना होतो? काहीच न करण्यापेक्षा हे नक्कीच बरय पण तरीही आपण समाजकार्य करतो असा खोटा समज तर आपण उगाच करून घेत नाहीना?


सोमवार:
असंच विचार करता करता सोमवार उजाडला.. आज ओफिसमध्ये थोडं उशिरा चालले होते.. बसची वाट बघत असताना फुटपाथवर कडेला एक वयस्कर माणूस बसलेला दिसला.. फारच आजारी दिसत होता.. पटकन त्यांच्या हातात १०ची नोट ठेवून मी परत बसची वाट बघू लागले.. तरी लक्ष तिथेच जात होतं.. तेव्हा जाणवलं, तो इतका अशक्त होता की त्याला उठून त्या पैशाचं काही घेता येईल का नाही? मी खायला घेऊन द्यायला हवं होतं. आणि नंतर तर तो माणूस केविलवाणा होऊन रडताना दिसला .. ते पाहून मला अगदी अस्वस्थ वाटलं.. काय करावं विचार करेपर्यंत बस आली आणि मी तशीच निघून गेले..
नंतर ओफिस मधल्या वातावरणात सकाळची घटना विसरून गेले.. नेहमीप्रमाणे घरी आले.. त्या रात्री मात्र विचित्र घडले.. मला त्या माणसाचा रडतानचा चेहरा डोळ्यासमोर सारखा दिसू लागला.. आणि मग मला खूप रडू आलं.. कारण मी किती हृदयशून्य माणसासारखी वागले होते.. तो माणूस रडताना कदाचित देवाची करुणा भाकत असेल.. त्याच देवाची एक भक्त म्हणून मी त्याला मदत करायला हवी होती.. पण मी तशीच निघून गेले.. माझे तन मन धन सगळे मातीमोल ठरले.. आई बाबा घरी नव्हते.. मला फार कसंतरी होत होतं.. रात्रीच्या रात्री तिकडे जाउन मदत करावी वाटत होतं पण ते शक्य नव्हतं.. रात्री कितीतरी वेळ तळमळत होते.. शेवटी देवाला मनात एक वचन दिले आणि मग कधीतरी डोळा लागला..


मंगळवार:
सकाळी सकाळी बस स्टॉप वर आल्यावर पहिले,तो कालचा माणूस नव्हता.. तो झोपायला कुठतरी जात असावा त्यामुळे तो सकाळी कधी दिसत नसेल असा निष्कर्ष मी काढला.. ओफीस मधून परतल्यावर रस्त्याच्या त्या बाजूला तो माणूस दिसतोय का बघितलं  पण मध्ये इतकं ट्रॅफिक होतं की समोरचं  काही दिसत नव्ह्तं..  रस्ता ओलांडून त्या बाजूला गेले तर तो कालचा माणूस तसाच पडून होता.. मनात काही निश्चय करून मी जवळच्या एका दुकानात गेले.. एक नवीन बेडशीट घेतलं.. मग पारलेचा सगळ्यात मोठा पुडा घेतला, ब्रेड घेतला.. अजुन काय घ्यावं विचार करत होते.. सगळं घेऊन त्या माणसापाशी गेले.. बाबांच्या वयाचे ते.. त्यांना एकेक गोष्ट काढून दिली.. बेडशीट पाहून ते म्हणले थन्डीचं पांघरायला होईल.. मला कळत नव्हतं अजुन काय द्यावे म्हणून मग त्यांच्या हातात थोडे पैसे ठेवले.. सध्या काळ असा आहे की असे पैसे देताना कोणी पहिलं तर चोरी करणारे लोकं अशा गरीब लोकांकडूनही पैसे किवा बाकी काही हिसकावून घ्यायला कमी करणार नाही म्हणून मी त्यांना पैसे नीट ठेवायला सांगितले.. आणि लगेचच मी तिथून निघून गेले.. त्या गोष्टी त्या माणसाला कितपत उपयोगी ठरतील मला शंका येत होती.. कोणी सोबतीला असलं असतं तर त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात दाखल केलं असतं जिथे त्यांची काळजी घेतली गेली असती..  तेव्हा जाणवलं की अनाथ आश्रमात कमीतकमी अन्न निवार्‍याची सोय होते.. पण अशा रस्त्यावर पडलेल्या बेवरशी लोकांचे फार हाल होतात.. काहीजण सुट्टे पैसे टाकतात त्यावर त्यांचे भागत असेल तेव्हढेच.. आता यावर काहींचे मत असते की भीक मागण्यापेक्षा त्याना काम करायला काय झाले.. मान्य आहे हे.. पण काहींची हलत खरंच खुपच खराब असते त्याना आपण मदत करणे जरूरी आहे.. यासगळ्या प्रसन्गावरून मी ठरवले, अनाथ आश्रमात मदत करणारे बरेच जण असतात पण मी मात्र यापुढे रस्त्यावरच्या गरीब गरजू लोकाना अन्न वस्त्र, औषधे देऊन जमेल तेव्हढी मदत करणार.. अर्थात त्या मदतीने त्यांचे पूर्ण आयुष्या बदलणार नाही पण एखादा दिवस तरी बरा जाईल असे मला वाटते.. मी पूर्ण नाहीए पण मी कमीही  नाहीना. त्या रात्री मला जरा शांत झोप लागली..


विशेष सूचना - या लेखातून मला कोणत्याही प्रकारचा देखावा करायचा नाहीये..  ही गोष्ट मी अजुन  माझ्या घरच्यांना किवा कोणत्याही मैत्रिणीला सांगितली नाही.. पण ज्या ज्या प्रसंगातून मला नवीन काही शिकायला मिळते मग ते आनंदाचे क्षण असो वा दुखाचे ते सगळे मी "मंतरलेले दिवस" या मालिकेत नोंद करून ठेवते.. बाकी काही नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: