रविवार, ८ मे, २०११

वाट चुकलेलं वासरू..

निसर्गाच्या कुशीत राहणारं
फुलपानात सदा खेळणारं
भोळं भाबडं सरळ साधं 
चंचल असं एक वासरू होतं..


एकदा  कसंकाय  झालं  बरं 
काहीतरी  त्यास  दिसलं  खरं 
क्षणात  मन  मोहून  गेलं 
अन  त्या  दिशेस धावू  लागलं.. 

क्षणभर किंचित वाटून गेलं  
बरोबर का तिकडे जाणं   
अखेर मस्तीने पाऊल टाकलं
मन वेड्यागत वाहत गेलं.. 

तिकडे ते  सुखात  लोळलं 
मजेत  गुंतत  गुंतत गेलं 
आगळ्या धुंदीत रममाण झालं 
अन भान पार हरपून गेलं.. 

पण  एक  दिवस  असं  घडलं  
अचानक काही  दिसेनासं  झालं 
चुकीच्या  धरलेल्या त्या वळणाचं  
कूट कारस्थान लक्षात आलं.. 

मागे जेव्हा  फिरून  बघितलं 
जग तर कितीतरी  पुढे  गेलेलं 
आता क्षणिक खोट्या सुखाचं 
दुख  त्यास  बोचू  लागलं.. 

चहूकडे दाट अंधारून आलं 
एकटं एकटं वाटू  लागलं 
कुठे  जावं  सुचेनासं  झालं 
अन  दुखाने  ते  कण्हू  लागलं.. 

ते रडू शेवटी हरीने ऐकलं
दयेने वेणुतून गाणं वाजवलं
सूर ऐकताच रहस्य गवसलं    
अन चुकलेलं वासरू कळपात परतलं..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: