तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी..
सरडा कसा रंग बदलतो, तुम्ही पाहिलंय का कधी.. कधी तो भगवा होतो, कधी हिरवा, कधी नीळा तर कधी अजून काही वेगळा.. तो त्याचा गुणधर्म आहे त्यात काही विशेष नाही.. पण जेव्हा नात्यांचा रंग बदलताना दिसतो तेव्हा मात्र आ वासून बघण्याची वेळ येते.. निसर्गचक्रापुढे कोणाचं काही चालत नाहीना..
कालपरवा पर्यंत आपण चांगले जवळचे असतो.. आणि कधीतरी वाटा वेगळ्या होतात.. धकाधाकीच्या आयुष्यात प्रत्यक्ष भेटून गप्पा होणं मुश्कील होतं.. मग sms, फोनाफोनी आणि मेल्स.. कधीतरी आठवण येणार आणि मग मी मेल्स करून काहीतरी सांगणार,काहीतरी विचारणार.. आणि त्यावर reply नाही येणार.. मग मी विचार करत बसणार काय झालं.. सगळ्यात आधी मी मागे घडलेल्या घटनांचा आढावा घेणार.. त्यात माझं कळत नकळत काही चुकलं का तपासून बघणार.. उत्तर न मिळाल्यावर त्यांना विचारणार की माझं काही चुकलं का,रागावला आहात का.. ते 'नाही' म्हणणार.. मग मी त्यांच्या बाजूने विचार करणार कि ते काही वेगळ्या अडचणीत आहेत का.. मग खोदून विचारणार.. पण ते त्यावरही काही नाही बोलणार.. ते म्हणणार की कामात व्यस्त आहे वगैरे .. मग मी ठीक आहे म्हणून अजून थोडा वेळ देणार.. पण पुन्हा तसंच घडणार.. मग माझ्या मनात विचारांचं वादळ उठणार.. कालपर्यंत जवळची व्यक्ती आज अशी तुटकपणे का वागत आहे? २४ तास मेल्स बघत असताना एक reply करण्यास वेळ मिळू नये हे नक्की कारण आहे का? का मला टाळलं जातंय? का बरं असं? काय कारण असेल? नुसते प्रश्न आणि प्रश्न..
मग मी चिडून विचारणार.. पण ते माझ्यावर उलटे चिडणार.. तू चुकीचा विचार करतेस.. असं काही नाहीये वगैरे वगैरे.. आता याउपर मी अजून काहीही बोलले तरी दोष मलाच दिला जाणार.. कारण माझ्याकडे excuses नाहीयेत.. मी single आहे.. संसाराचा व्याप नाही माझ्या मागे.. सासू सासरे, सण, इतर नातेवाईक, घरातलं सामान,भाजीपाला, बाजार, स्वयंपाक अशा जबाबदाऱ्या नाही माझ्या मागे.. मला काय समजणार त्यांच्या अडचणी..
मग 'आहे तसं आयुष्य आनंदाने जगायचं' असा ध्यास घेतलेलं मन कोलमडून पडतं.. आपण एकटे आहोत याची जाणीव तीव्रतेने होऊ लागते.. आपणास काही उद्योगधंदे नाही म्हणून दुसर्यांना उगाच त्रास देत बसतो असं वाटून अपराधीपणा येतो.. मन सुन्न होतं.. दोन शब्दांचीही अपेक्षा ठेवू नये का कोणाकडून असा प्रश्न पडतो.. अर्थात अख्या जगाकडून अशी अपेक्षा नक्कीच ठेवली जात नाही.. ज्यांना इतके दिवस जवळचं मानलं असतं त्यांच्याकडेच आपले पाय वळत असतात.. त्यांच्या दृष्टीने पूर्वीच्या गोष्टी भूतकाळात जमा झाल्या असतात.. आणि मी तिथेच भूतकाळातच वावरत असते.. कारण माझ्या आयुष्यात मोठे बदल झालेले नसतात.. खरंतर तर आता मला त्यांची जास्त गरज भासत असते आणि ते उलट अजून दूरवर जात असतात.. सगळे आपल्या आपल्या जागेवर बरोबर असतात,चूक कोणाची नसते.. त्यांनी काळाप्रमाणे रंग बदललेला असतो आणि मला मात्र रंग बदलण्याची संधीच मिळाली नसते.. दोन जवळच्या व्यक्तींमध्ये उगाच एक अंतर पडते.. this is a phase of life असं मनाला वारंवार समजावते,बास अजून काय..
आज अगर भर आई हैं, बूँदें बरस जायेंगी
कल क्या पता इनके लिये आँखें तरस जायेंगी
जाने कहाँ गुम कहाँ खोया, एक आँसू छुपाके रखा था
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा