सोमवार, ११ एप्रिल, २०११

मंतरलेले दिवस - २२


हम होंगे कामयाब एक दिन..

श्री अण्णा हजारेना पाठींबा देण्यासाठी पुण्यात शनिवारी 'candle march'  होणार होतं ते शुक्रवारी होणार असं कळलं.. ६ वाजता बालगंधर्व येथे पोहोचायचं होतं पण ऑफिस मध्ये बरंच काम होतं.. धावत पळत ६ च्या बसने निघाले.. चित्रा आणि तिच्या मैत्रिणी आधीच पुढे गेल्या होत्या.. त्यांना संपर्क केला आणि मंगला थिएटर  परिसरात पोहचले.. तर कॉर्पोरेशन च्या बाजूने मोठा घोळका येताना दिसला.. माझे पाय आपोआप त्या दिशेने धावू लागले.. तिथल्या एका कार्यकर्त्याने मला मेणबत्ती दिली आणि मी त्यांच्यात सामील झाले..  


मागे पुढे पाहिल्यावर कळलं की या उपक्रमात अगदी छोट्यांपासून जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा सहभाग होता.. काही कॉलेज मधले विद्यार्थी.. काही ठराविक संघटनेचे.. काही शाळा कॉलेज मधल्या  शिक्षिका.. आजी आजोबा.. काही तर अख्या  कुटुंबासोबत  आले होते.. काही मित्र मैत्रिणी घोळक्यामध्ये तर काही माझ्यासारखं परस्पर ऑफिस मधून आलेले दिसत होते.. IPL चालू असतानाही मुलांची गच्च गर्दी होती.. शेवटी क्रिकेट हे निव्वळ मनोरंजन आहे हे काही जणांना पटलं होतं तर.. पण जेव्हा मी माझ्यासमोरच्या माणसाला बघितलं  तेव्हा डोळ्यात टचकन पाणी आला.. त्याला एक पाय नव्हता तरी तो उत्स्फुर्तपणे सहभागी झाला होता.. तेथे माझे कर जुळती..

१००० पेक्षा जास्त लोक होते तरी कुठेही धक्काबुक्का नाही याचं आश्चर्य वाटलं.. एव्हढ्या गर्दीत Art of living चा घोळका दिसला आणि मला फार बरं वाटलं..  श्री श्री रविशंकर, किरण बेदी, बाबा  रामदेवजी आणि अशा थोर लोकांचा अण्णा हजारेंना खंबीर पाठींबा होता.. 

गली गली मै शोर है.. हमारे नेता चोर है..
अण्णा तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ हैं..
अरे बघताय काय.. सामील व्हा..

घोषणांच्या आवाजाने सगळा परिसर दुमदुमून जात होता.. जिकडे तिकडे नव चैतन्य दिसत होता.. देशप्रेम म्हणतात ते काय हे जाणवू लागलं आणि अभिमानाने उर भरून आला.. कधीतरी  वारा येई आणि मेणबत्ती विजून जाई.. मग एका कोणाच्या ज्योतीने बाकी सारे ज्योत पेटवत होते.. तेव्हा मला या पंक्तीचा अर्थ नीट उमजला.."ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो" !!!

शनिवार वाड्यापाशी पोहचल्यावर भारताच्या नकाशामध्ये सगळ्यांनी आपली आपली मेणबत्ती लावली.. त्या मंगल वातावरणात शनिवारवाडा परिसर किती फुलला होता.. नंतर सगळ्यांनी मिळून राष्ट्रगान केले तेव्हाचा क्षण अविस्मरणीय ठरला.. शाळे सारखं  ऑफिस मध्येही रोज राष्ट्रगीत झाले पाहिजे असं मला नेहमीच वाटतं.. त्यांनतर सगळ्यांनी मिळून  'हम होंगे कामयाब एक दिन' हे गाणं म्हणलं...

घरी आल्यावरही कितीतरी वेळ मी त्याच मूडमध्ये होते..  FB वर तिथले २ छायाचित्र टाकले तर त्याला इतक्या साऱ्या comments आणि like आले त्यावरून  प्रत्यक्ष अण्णा हजारेंना किती जणांचा पाठींबा होता याची कल्पना येत होती.. दुसऱ्या दिवशी मागण्या पूर्ण होऊन त्यांनी उपोषण सोडलं हे कळल्यावर लई भारी वाटलं.. आता पुढे लोकपाल विशेयक यशस्वी होऊन राजकीय कारभार सुरळीतपणे चालावा हीच ईश्वरापुढे प्रार्थना!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: