शुक्रवार, २९ एप्रिल, २०११

आता कसं वाटतय? ;)

उन्हात उन्ह जेव्हा चांदणं वाटतं..  तेव्हा माणूस प्रेमात असतो..
उन्हात उन्ह जेव्हा भकास वाटतं..  तेव्हा माणूस दुखात असतो..
उन्हात उन्ह जेव्हा उन्ह वाटतं..  तेव्हा माणूस जगात असतो..

पावसात पाऊस जेव्हा चिंब वाटतो..  तेव्हा माणूस प्रेमात असतो..
पावसात पाऊस जेव्हा कोरडा वाटतो.. तेव्हा माणूस दुखात असतो..
पावसात पाऊस जेव्हा पाऊस वाटतो.. तेव्हा माणूस जगात असतो..

थंडीत थंडी जेव्हा गुलाबी वाटते..  तेव्हा माणूस प्रेमात असतो..
थंडीत थंडी जेव्हा बोचरी वाटते..  तेव्हा माणूस दुखात असतो..
थंडीत थंडी जेव्हा थंडी वाटते..  तेव्हा माणूस जगात असतो..

बुधवार, २७ एप्रिल, २०११

ज्योत आशेची..



पावसात उन्हाची..
उन्हात गारव्याची..
गारव्यात उबेची..
सदा तेवत रहावी.. ज्योत आशेची..

प्रवासात दिशेची..
दिशेत प्रवाहाची..
प्रवाहात काठाची..
सदा तेवत रहावी.. ज्योत आशेची..

डोळ्यात ध्येयाची.. 
ध्येयात कष्टांची..
कष्टात यशाची..
सदा तेवत रहावी.. ज्योत आशेची..

मनात जाणिवेची..
जाणीवेत प्रेमाची..
प्रेमात विश्वासाची..
सदा तेवत रहावी.. ज्योत आशेची..

शब्दात अर्थाची..
अर्थात बोधाची..
बोधात प्रत्ययाची.. 
सदा तेवत रहावी.. ज्योत आशेची.!

बुधवार, २० एप्रिल, २०११

मंतरलेले दिवस - २४

दिल तो बच्चा है जी.. :)


सध्या रात्री फार छान वारं वाहतं.. उन्हाळ्यातली खरी मजा संध्याकाळ नंतर सुरु होते.. अशीच झुळूक घेत मी बहिणीबरोबर घराजवळ फिरत होते.. अपर्णा मला काहीतरी सांगत होती आणि एकदम तिकडून सायकलवर छोटा अथर्व येताना दिसला.. त्याची सायकल बघून मला मोह झाला.. मी एकदम त्याला म्हणल,मला एक फेरी मारायची आहे.. तुझी सायकल देतोस? :) तो लगेच हो म्हणला.. अपर्णा म्हणाली, अगं मी तुला सांगतीये काय आणि तुझं लक्ष कुठे आहे..  मी म्हणलं आलेच मी मग बोलू.. आणि एक फेरी मारून आले.. गार वारं,चांदणं आणि सायकल.. आहा.. लई भारी.. माझा सायकलचा उत्साह बघून अथर्वही खुश झाला,म्हणला ताई gears बदलून पहिले का? मी म्हणलं नाहीरे बाबा.. gearsचा अनुभव नाही.. आमच्या लहानपणी साध्या सायकली असायच्या.. आमची मरुन रंगाची BSA सायकल नीट आठवते मला.. दादाची जास्त भारी होती पण gears नव्हते तेव्हा.. या सगळ्या प्रकारानंतर बहिण म्हणली तू लहान आहेस का आता.. काहीतरी चालू असतं तुझं..


नुकताच 'ताऱ्यांचे बेट' मराठी सिनेमा बघितला.. आई बाबांसोबत प्रभात किवा नीलायमला असा हलका फुलका चित्रपट बघणं म्हणजे एक पर्वणीच ठरते.. तर त्यामध्ये छोट्या मुलाचा निरागस हट्ट आणि त्याच्या घरच्यांना त्यापासून होणारा त्रास बघून मला वाटलं की मी अजून त्या बारक्या एव्हढीच आहे का.. कारण मी अजूनही त्याच्यासारखेच हट्ट करते.. :P  आई नेहमी म्हणते की तू एखाद्या ड्रेस साठी किवा दागिन्यासाठी हट्ट कर पण तुझे काहीतरी भलतेच हट्ट असतात..


अजूनही पाऊस आला की ऑफिस असो वा घर मी आहे तिथून रस्त्यावर येऊन पावसात भिजते.. पाऊस दरवर्षीच येतो आणि हल्ली तर कधीही येतो पण लहान  मुलांसारखा पावसात भिजायचं आणि मग सर्दीने आजारी पडायचं हा नेम मी चुकवत नाही..

अजूनही कुठे  ट्रिपला जायाच ठरलं की जम खुश होते मी..  मग  जाईपर्यंत अगदी डोक्यात तेव्हाढ च लहान मुलांसारखं..  :))

परीक्षा म्हणलं की अजूनही तसाच पोटात गोळा..

नातेवाईकांकडे गेले की मी माझ्या भाच्यांमध्येच जास्त रमते.. त्यांच्यासोबत कोणतही खेळ खेळते..

घरी मला सारखं काहीतरी कुठेतरी  लागतं तेव्हा बाबा म्हणतात की लहान मुलांसारखी काय धडपडतेस अशी.. ट्रेकिंग कशी करतेस तू कोणास ठाऊक..


असं काही झाल्यावर मला वाटतं मी वयाने मोठी झाले तशी मनाने मोठी झाले नाही का अजून.. पण मग कधी कधी आजूबाजूला बघितलं की  वाटतं की मी जरा जास्त matured आहे.. कधी असं तर कधी तसं.. मी नक्की कशी ते मलाच नाही समजत तर बाकीच्यांचा प्रश्नच येत नाही.. काही वर्षांपूर्वी असं झालं असावं.. श्रींची देवीसोबत लीला चालू असेल.. तेव्हा त्यांनी एक अजब रसायन केलं असेल.. त्या रसायनातून मला बनवताना साक्षात ब्रम्हदेवांनाही कळलं नसेल की नक्की आपण काय निर्माण करतोय.. हाहाहा.. कारण तो जीव हळवाही आणि कठोरही.. समजूतदारही आणि हट्टीदेखील.. सावळा आणि रेखीवही.. लवकर तापणारा आणि लगेच थंड होणाराही.. चुका करणारा आणि माफी मागणाराही.. नाजूक आणि तरीही धाडसी.. सगळं  मोकळेपणाने सांगणारा तरीही कुणालाही न कळलेला तो जीव! असं हे अवघड रसायन झेलायला तोडीस तोड अशा अजून एका रसायानाची निर्मिती झाली असावी, i hope so..


माझ्या वयाच्या मुलींना पोरंबाळं झाली आहेत.. त्यामुळे आईच्या भूमिकेत ते त्यांच्या मुलांचे हट्ट पुरवीत असतील.. पण  माझी भूमिका अजूनतरी 'आईबाबांची मुलगी' एव्हढीच आहे.. त्यामुळे कदाचित माझ्यातलं लहान मुल अजून जागं आहे.. मी स्वताहून कोणती जबाबदारी झटकली नाहीये.. श्रींची इच्छा असेल तेव्हा पुढे मीपण मोठ्यांच्या रांगेत येईन.. :) एक मुल असण्यात आनंद आहे तसं किंबहुना एक आई असण्यात जास्त आनंद असेल.. प्रत्येक पायरीचं सुख वेगळा असतं ना.. कोणाला कुठली सुखं मिळतील हे परमेश्वराने आधीच ठरवून ठेवलेलं असणार..


जिसका जितना हो आंचल यहां पर उसको सौगात उतनी मिलेगी !!
!

रविवार, १७ एप्रिल, २०११

मंतरलेले दिवस - २३



तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी.. 
सरडा कसा रंग बदलतो, तुम्ही पाहिलंय का कधी.. कधी तो भगवा होतो, कधी हिरवा, कधी नीळा तर कधी अजून काही वेगळा.. तो त्याचा गुणधर्म आहे त्यात काही विशेष नाही.. पण जेव्हा नात्यांचा रंग  बदलताना दिसतो तेव्हा मात्र आ वासून बघण्याची वेळ येते.. निसर्गचक्रापुढे कोणाचं काही चालत नाहीना..
कालपरवा पर्यंत आपण चांगले जवळचे असतो.. आणि कधीतरी वाटा वेगळ्या होतात.. धकाधाकीच्या आयुष्यात प्रत्यक्ष भेटून गप्पा होणं मुश्कील होतं..  मग sms, फोनाफोनी आणि मेल्स.. कधीतरी आठवण येणार  आणि मग मी मेल्स करून काहीतरी सांगणार,काहीतरी विचारणार.. आणि त्यावर reply नाही येणार.. मग मी विचार करत बसणार काय झालं.. सगळ्यात आधी मी मागे घडलेल्या घटनांचा आढावा घेणार.. त्यात माझं कळत नकळत काही चुकलं का तपासून बघणार.. उत्तर न मिळाल्यावर त्यांना विचारणार की माझं काही चुकलं का,रागावला आहात का..  ते 'नाही' म्हणणार.. मग मी त्यांच्या बाजूने  विचार करणार कि ते काही वेगळ्या अडचणीत आहेत का.. मग खोदून विचारणार.. पण ते त्यावरही काही नाही बोलणार.. ते म्हणणार की कामात व्यस्त आहे वगैरे .. मग मी ठीक आहे म्हणून अजून थोडा वेळ देणार..  पण पुन्हा तसंच घडणार..  मग माझ्या मनात विचारांचं वादळ उठणार.. कालपर्यंत जवळची व्यक्ती आज अशी तुटकपणे का वागत आहे?  २४ तास मेल्स बघत असताना एक reply करण्यास वेळ मिळू नये हे नक्की कारण आहे का? का मला टाळलं  जातंय? का बरं असं? काय कारण असेल? नुसते प्रश्न आणि प्रश्न.. 
मग मी चिडून विचारणार.. पण ते माझ्यावर उलटे चिडणार.. तू चुकीचा विचार करतेस.. असं काही नाहीये वगैरे वगैरे.. आता याउपर मी अजून काहीही बोलले तरी दोष मलाच दिला जाणार.. कारण माझ्याकडे excuses नाहीयेत.. मी single आहे.. संसाराचा व्याप नाही माझ्या मागे.. सासू सासरे, सण, इतर नातेवाईक, घरातलं सामान,भाजीपाला, बाजार, स्वयंपाक अशा जबाबदाऱ्या नाही माझ्या मागे.. मला काय समजणार त्यांच्या अडचणी.. 
मग 'आहे तसं  आयुष्य आनंदाने जगायचं' असा ध्यास घेतलेलं मन कोलमडून पडतं.. आपण एकटे आहोत याची जाणीव तीव्रतेने होऊ लागते.. आपणास काही उद्योगधंदे नाही म्हणून दुसर्यांना उगाच त्रास देत बसतो असं वाटून अपराधीपणा येतो.. मन सुन्न होतं.. दोन शब्दांचीही अपेक्षा ठेवू नये का कोणाकडून असा प्रश्न पडतो.. अर्थात अख्या जगाकडून अशी अपेक्षा नक्कीच ठेवली जात नाही.. ज्यांना इतके दिवस जवळचं मानलं असतं त्यांच्याकडेच आपले पाय वळत असतात.. त्यांच्या दृष्टीने पूर्वीच्या गोष्टी भूतकाळात जमा झाल्या असतात.. आणि मी तिथेच भूतकाळातच वावरत असते.. कारण माझ्या आयुष्यात मोठे बदल झालेले नसतात.. खरंतर तर आता  मला त्यांची जास्त गरज भासत असते आणि ते उलट अजून दूरवर जात असतात..  सगळे आपल्या आपल्या जागेवर बरोबर असतात,चूक कोणाची नसते.. त्यांनी काळाप्रमाणे रंग बदललेला असतो  आणि मला मात्र रंग बदलण्याची संधीच मिळाली नसते.. दोन जवळच्या व्यक्तींमध्ये उगाच एक अंतर पडते.. this is a phase of life असं मनाला वारंवार समजावते,बास अजून काय.. 

आज अगर भर आई हैं, बूँदें बरस जायेंगी
कल क्या पता इनके लिये आँखें तरस जायेंगी
जाने कहाँ गुम कहाँ खोया, एक आँसू छुपाके रखा था

सोमवार, ११ एप्रिल, २०११

मंतरलेले दिवस - २२


हम होंगे कामयाब एक दिन..

श्री अण्णा हजारेना पाठींबा देण्यासाठी पुण्यात शनिवारी 'candle march'  होणार होतं ते शुक्रवारी होणार असं कळलं.. ६ वाजता बालगंधर्व येथे पोहोचायचं होतं पण ऑफिस मध्ये बरंच काम होतं.. धावत पळत ६ च्या बसने निघाले.. चित्रा आणि तिच्या मैत्रिणी आधीच पुढे गेल्या होत्या.. त्यांना संपर्क केला आणि मंगला थिएटर  परिसरात पोहचले.. तर कॉर्पोरेशन च्या बाजूने मोठा घोळका येताना दिसला.. माझे पाय आपोआप त्या दिशेने धावू लागले.. तिथल्या एका कार्यकर्त्याने मला मेणबत्ती दिली आणि मी त्यांच्यात सामील झाले..  


मागे पुढे पाहिल्यावर कळलं की या उपक्रमात अगदी छोट्यांपासून जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा सहभाग होता.. काही कॉलेज मधले विद्यार्थी.. काही ठराविक संघटनेचे.. काही शाळा कॉलेज मधल्या  शिक्षिका.. आजी आजोबा.. काही तर अख्या  कुटुंबासोबत  आले होते.. काही मित्र मैत्रिणी घोळक्यामध्ये तर काही माझ्यासारखं परस्पर ऑफिस मधून आलेले दिसत होते.. IPL चालू असतानाही मुलांची गच्च गर्दी होती.. शेवटी क्रिकेट हे निव्वळ मनोरंजन आहे हे काही जणांना पटलं होतं तर.. पण जेव्हा मी माझ्यासमोरच्या माणसाला बघितलं  तेव्हा डोळ्यात टचकन पाणी आला.. त्याला एक पाय नव्हता तरी तो उत्स्फुर्तपणे सहभागी झाला होता.. तेथे माझे कर जुळती..

१००० पेक्षा जास्त लोक होते तरी कुठेही धक्काबुक्का नाही याचं आश्चर्य वाटलं.. एव्हढ्या गर्दीत Art of living चा घोळका दिसला आणि मला फार बरं वाटलं..  श्री श्री रविशंकर, किरण बेदी, बाबा  रामदेवजी आणि अशा थोर लोकांचा अण्णा हजारेंना खंबीर पाठींबा होता.. 

गली गली मै शोर है.. हमारे नेता चोर है..
अण्णा तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ हैं..
अरे बघताय काय.. सामील व्हा..

घोषणांच्या आवाजाने सगळा परिसर दुमदुमून जात होता.. जिकडे तिकडे नव चैतन्य दिसत होता.. देशप्रेम म्हणतात ते काय हे जाणवू लागलं आणि अभिमानाने उर भरून आला.. कधीतरी  वारा येई आणि मेणबत्ती विजून जाई.. मग एका कोणाच्या ज्योतीने बाकी सारे ज्योत पेटवत होते.. तेव्हा मला या पंक्तीचा अर्थ नीट उमजला.."ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो" !!!

शनिवार वाड्यापाशी पोहचल्यावर भारताच्या नकाशामध्ये सगळ्यांनी आपली आपली मेणबत्ती लावली.. त्या मंगल वातावरणात शनिवारवाडा परिसर किती फुलला होता.. नंतर सगळ्यांनी मिळून राष्ट्रगान केले तेव्हाचा क्षण अविस्मरणीय ठरला.. शाळे सारखं  ऑफिस मध्येही रोज राष्ट्रगीत झाले पाहिजे असं मला नेहमीच वाटतं.. त्यांनतर सगळ्यांनी मिळून  'हम होंगे कामयाब एक दिन' हे गाणं म्हणलं...

घरी आल्यावरही कितीतरी वेळ मी त्याच मूडमध्ये होते..  FB वर तिथले २ छायाचित्र टाकले तर त्याला इतक्या साऱ्या comments आणि like आले त्यावरून  प्रत्यक्ष अण्णा हजारेंना किती जणांचा पाठींबा होता याची कल्पना येत होती.. दुसऱ्या दिवशी मागण्या पूर्ण होऊन त्यांनी उपोषण सोडलं हे कळल्यावर लई भारी वाटलं.. आता पुढे लोकपाल विशेयक यशस्वी होऊन राजकीय कारभार सुरळीतपणे चालावा हीच ईश्वरापुढे प्रार्थना!!!

बुधवार, ६ एप्रिल, २०११

मनाच्या ओंजळीत



मनाच्या  गं  ओंजळीत  
ताजी ताजी  फुलं पानं.. 
अन  त्यात  ओवलेले 
स्वप्नांचे  कोवळे  हार.. 

मनाच्या  गं  ओंजळीत 
उंच  उंच  अवकाश.. 
अन  त्यात  बुडलेले 
प्रीतीचे  खोल  आभास.. 

मनाच्या  गं  ओंजळीत 
धार  धार अस्त्र शस्त्र..
अन  त्यात  रंगलेले 
वास्तवाचे  एक  चित्र..

मनाच्या  गं  ओंजळीत 
ओले  ओले  काही  क्षण.. 
अन  त्यात  भिजलेले 
स्मृतींचे  इवले  कण.. 

मनाच्या  गं  ओंजळीत 
गोड  गोड  हरी नाम.. 
अन  त्यात  रमलेले 
भक्तीचे  भाबडे   भाव.. 

शनिवार, २ एप्रिल, २०११

मंतरलेले दिवस - २१


वो भुली दास्ता..

माझ्या induction मैत्रिणींपैकी  दोघीजणी माझ्याच account ला आहेत.. नेमकं  त्यांच्या  project मध्ये पहिल्यापासून issues.. Day 1पासून त्यांच्या तक्रारी.. पेपर टाकणार वगैरे रोजचीच भाषा.. त्यांच्यात मी नेहमीच शांत असते.. त्या मला सारखं म्हणतात  तू किती नशीबवान आहेस,आमच्या projectमध्ये आली नाहीस, तुला त्रास नाही आमच्यासारखा वगैरे वगैरे.. हा हा म्हणेपर्यंत नवीन company मधेही ६ महिने झाले.. इथे ६ महिन्यातून एक certification exam द्यावी लागते.. मी  enggच्या सवयीने  last momentला अभ्यास करून पास झाले.. तर या दोघींना कामाच्या ताणामुळे  तिकडे विशेष लक्ष देता आले नाही त्यामुळे त्या अजून नाराज झाल्या.. तोच विषय चालू होता आणि पुन्हा तेच की  तू किती lucky आहेस.. आता मात्र मी शांत बसू शकले नाही.. त्यांना म्हणलं प्रत्येकाचे दिवस असतात.. काही महिन्यापूर्वी मलाही बराच त्रास झाला होता..  

नकळत माझं मन भूतकाळात शिरलं.. तो मधला काळ माझ्यासाठी खूप अवघड होता.. 'वाट चुकलेलं वासरू' हा लेख तुम्हाला आठवत असेल.. प्रश्न फक्त promotion न मिळण्याचा नव्हता.. पण तिथे वर्णभेद होता.. एखाद्या चित्रपट किवा मालिकेत दाखवतात तसं सगळे मंडळी एका so called heroin च्या हातचं  खेळणं झाले होते.. team lunch किवा इतरवेळी ती किती गोरी आहे,अख्या floorवर तिच्यापेक्षा कोणीच गोरं नाही असे विषय चालायचे.. एखादीचं कौतुक करणं वेगळं पण जेव्हा TL बाकी team mates समोर सारखं तिचंच गुणगान गात असेल तर बाकीच्यांनी काय अन कसं वागावं?  ती non marathi इतकी चालू होती, तिला competition नको होती.. त्यामुळे team मध्ये नेहमी freshersला घेतले जायचे.. मी एकटीच senior होते , तिची स्पर्धा फक्त माझ्याशीच होती.. त्यामुळे काम देताना ती मला विशेष scope नसलेलं द्यायची.. बाकीचे लोकं तिची पाण्याची बाटली भरून आणा किवा अजून काही सेवा करून तिला खुश ठेवायचे.. मला असलं उभ्या जन्मात जमणार नाही.. मी तिला कधीच गुळ लावला नाही , त्या manager लोकांशी कधी उगाच गोड गोड बोलले नाही.. पण या सगळ्याचा परिणाम उलटा झाला.. मी त्या teamमध्ये एकटी पडले.. कामाशिवाय आमच्यात कधीच काही interaction नसायचं.. promotion वगैरे तर जाउद्या पण साधी विचारपूस पण व्हायची नाही.. त्याच सुमारास  India,China, Brazil मिळून एक quiz होती त्यात माझा पहिला नंबर आला होता, अख्या company मधून शुभेच्छा मिळाल्या होत्या.. पण त्या लोकांनी congrats पण म्हणलं नव्हतं मला.. attitude,अजून काय.. सुदैवाने companyमध्ये अपर्णा (माझी बहिण) आणि खूप साऱ्या चांगल्या मैत्रिणी असल्याने मी एकटी कधीच  नव्हते.. त्या सगळ्या जणींनी मला नेहमीच खूप धीर दिला.. 

या पार्श्वभूमीवर नवीन ऑफिस मधलं एक साधं उदाहरण.. इकडे नवीन ठिकाणी कामाच्या  संदर्भात माहितीसाठी मी एक doucment करून  ते clientला reviewसाठी पाठवलं होतं.. तर त्याने लगेच oniste/offshore teamच्या सगळ्यांना mail करून कौतुक केलं.. customer म्हणजे देवमाणूस असल्याने मग धडाधड spm,pm वगैरे या सगळ्यांच्या mailsचा वर्षाव झाला.. तसं बघायला गेलं तर ते document फार काही भारी नव्हतं.. पण काहीतरी नवीन वेगळं करण्यासाठी प्रेरणा देणं खूप महत्वाचं असता हे फार थोड्या लोकांना समजतं.. आणि clientला मी काळी का गोरी हे माहिती नव्हतं.. हे कौतुक फक्त कामाचं होतं,बास त्यामुळे बरं वाटलं.. 

या सगळ्यातून मी हे शिकले की कोणतीच company चांगली किवा वाईट नसते तर ते चांगले/वाईट तुमच्या आसपासची लोकं असतात.. मागच्या ऑफिस मध्ये मी तशीच होते आणि आताही तशीच आहे.. पण माझ्या भोवतीचे लोक बदलले आणि मग त्या मैत्रिणी म्हणतात तसं माझं नशीब.. म्हणूनच संतमंडळी सांगतात..  "सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो.. कलंक मती चा झडो विषय सर्वथा नावडो.."

आपल्या खाजगी आयुष्यातही असं बरेचदा होतं की आपण एखाद्यासाठी जीव तोडून काहीतरी करतो पण तो समोरचा माणूस आपली काहीच किंमत ठेवत नाही आणि शेवटी आपणच मूर्ख असं सिद्ध होतं.. पण मला वाटतं आपण एखाद्यासाठी चांगलं केलं असेल तर कुठूनतरी कधीतरी त्याचं चांगलं फळ आपणास नक्कीच मिळतं.. आपण समोरच्याकडून न्याय अपेक्षित करतो पण खरा न्याय देणारा 'तो' वेगळा असतो.. त्या परमेश्वराच आपल्याकडे लक्ष नेहमीच असतं त्यामुळे आपण आपल्याबाजूने शक्य तेव्ह्ढ चांगलं काम चालू ठेवण्यातच आपलं हित आहे.. 



I believe..

यदा यदा हि धर्मस्य.. ग्लानिर्भावतिभारत..
अभ्युत्थानंहि अधर्मस्य.. तदात्मानंसृजाम्यहम..


Meaning- Whenever and where ever there is decline and decay of righteousness,O Bharatha, then I (Lord Vishnu)manifest myself. In all such dark periods of history, some great master comes to present himself as the leader of men to revive the standard of life and moral values.