अध्यात्मावर बोलू काही..
कुठून कशी सुरुवात झाली माहिती नाही.. घरच्यांनी किवा बाहेरच्यांनी मला काही सांगितलं नव्हतं पण एक दिवस थेट मी दासबोध ग्रंथ घरी घेऊन आले.. काही जण म्हणतात या वयात काय अध्यात्म-दासबोध.. पण ग्रंथांच्या अभ्यासामागे नुसतं देव देव करणे हा हेतू नसतो.. रोजच्या दैनंदिन जीवनात मार्गदर्शन देणारे बोधपर श्लोक अशा ग्रंथात कोरलेले असतात.. सहसा आपल्याकडे नोकरीतून निवृत्त झालं की आणि मुलांच्या जबाबदाऱ्या संपल्या की पुष्कळ वेळ असतो तेव्हा मग ग्रंथ पठण सुरु होतं.. खरं म्हणजे तेव्हा सगळं होऊन गेलेलं असतं त्यापेक्षा जरा आधी वाचलं तर जीवनाचा प्रवास थोडा तरी सुधारेल असं मला वाटतं.. ग्रंथातून सगळ्यांना समजतील आणि लागू पडतील असे श्लोक मी बरेचदा सकाळच्या मेल्स मध्ये पाठवते.. हे खरंय की माझ्याकडे आता भरपूर वेळ असतो म्हणून मला जमतं पण उद्या जबाबदाऱ्या वाढल्या तरी दिवसातले १५/२० मिनिट्स याकरता नक्की काढू शकेन असा माझा विश्वास आहे.. जवळ जवळ दोन वर्षापासून मी दासबोध समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे.. झोपताना रोज एक पान वाचून मगच झोपते.. रोज तर वाचतेच पण कधी मूड नसतो,कधी खूप दमलेले असते, कधी बरं वाटत नसतं तेव्हाही हा नित्यक्रम मी बुडवत नाही.. अगदीच गावाला गेले तर मग पर्याय नसतो.. कारण दासबोध एव्हढा मोठा ग्रंथ घेऊन फिरणं शक्यच नसतं.. तर अशा रीतींनी ग्रंथ वाचण्याची मला सवय लागली..
खरंतर हा ग्रंथ खूप कठीण आहे.. रोज वाचताना त्या क्षणी मला अर्थ समजल्यासारखा वाटतो पण पुढे जाऊ तसं मागचं सपाट झाल्यासारखं भासतं.. आणि वागताना वागायचं तसंच वागते.. म्हणजे राग आला की एखादा सदविचार आठवून त्यावर नियंत्रण करणं अजून जमत नाही.. किवा आसक्ती, संशय, शंका, वेदना यापासून मन लगेच काही मुक्त होत नाही.. तर मग काय उपयोग वाचायचा असं कधी कधी वाटतं.. पण याचंही उत्तर तिथूनच मिळतं.. चांगलं काही वाचून ऐकून सोडून दिलं तर काही अर्थ नसतो.. आणि लगेच आचरणात आणणं ही इतकं सोपं नसतं.. तर त्यासाठी जे वाचतो त्याचा मनात सतत विचार केला पाहिजे यालाच चिंतन-मनन असे म्हणतात.. 'विचार करणे' ही मनुष्य प्राण्याला मिळालेली मोठी गोष्ट आहे.. आपण सतत विचार करतो पण कशाचा? मला हे हवंय, तो असं म्हणाला, ती तसं वागली इत्यादी.. या विचारांसोबत संतवाणीचा थोडा विचार करायला सुरुवात केलीतर आज ना उद्या मनाला चांगलं वळण लागू शकेल,नाही का.. तर मला आतापर्यंत कळलेल्या अध्यामाच्या धड्यांचा विचार करायचे प्रयत्न मी करत आहे.. त्यानुसार अध्यात्माच्या पायऱ्या या अशा आहेत..
१) जे जे दिसतं ते सर्व खोटं आहे, नाशवंत आहे, क्षणिक आहे,मायेचा खेळ आहे याची जाणीव होणे..
२) हे जग भगवंतांची लीला आहे.. सगळं त्याच्या योजनेनुसार चालतं याची खात्री होणे..
३) तो भगवंत विश्वव्यापी आहे.. फुलपानात, निसर्गाच्या कानाकोपऱ्यात, जमिनीवर चालणाऱ्या मुंगीपासून आकाशात उडणाऱ्या पाखरांमध्ये ,आजूबाजूच्या सर्व जेष्ट - कनिष्ट , गरीब-श्रीमंत प्रत्येक माणसाच्या अंतकरणात भगवंत आहे ही समज येणं..
४) त्या भगवंताचा स्वतःच्या अंतकरणात शोध लागणं.. 'सोहम' या महाशाब्दाचा अर्थ कळणं..
५) अंतकरणातल्या भगवंताशी तदाकार होणं.. वृत्तीशुन्य होणं..
६) स्वस्वरूपाची जाणीव होणं.. शाश्वत, अनंत, सर्वत्र काठोकाठ भरलेल्या परब्रह्माचा प्रत्यय येणं..
७) परब्रह्माशी गाठ पडली की ब्रम्हज्ञानी माणसाचे जीवन प्रराब्धप्रमाणे चालते.. वासनेचे, देह्बुद्धीचे बीज गळते.. ईश्वरी कृपेने लाभलेल्या उपासनेचे ऋण फेडण्यासाठी अशी ज्ञानी माणसे भक्ती आणि अध्यात्माचा प्रसार करतात.. साधकांना साधनेबद्दल उचित मार्गदर्शन करतात..
मी तर अवघ्या पहिल्या ३ पायऱ्यांवर घुटमळत आहे.. अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे.. असं ऐकलय की शेवटच्या पायरीपर्यंत पोचायला बरेच मनुष्य जन्म घ्यावे लागतात आणि प्रत्येक जन्मात मनुष्याची अध्यात्मिक पातळी हळू हळू वाढत असते.. पूर्ण ज्ञान असल्याशिवाय बोलू नये असं म्हणतात.. तरी मी एक स्वाध्याय म्हणून हा लेख लिहित आहे.. माझ्याकडून काही कमी जास्त झाले असल्यास समजून घावे.. तुमचे याबद्दलचे विचार ऐकायला मला खूप आवडेल आणि नक्कीच मला त्याचा फायदा होईल.. तरी वेळ मिळेल तेव्हा तुमचा अभ्यास, तुमची मते नक्की कळवा.. :)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा