मंगळवार, २८ डिसेंबर, २०१०

मंतरलेले दिवस - १०

त्या  दिवशी  उशीर  झाला  होता.. office नंतर  बाहेरचं  काम  आटपून  बालगंधर्व  जवळ बसची  वाट  बघत  थांबले  होते.. रात्रीचे  ८.३०  वाजलेतरी  बस  गच्च  भरून  जात  होत्या.. पूर्वी  लाल  डब्ब्याने  बराच  प्रवास  केल्याने  गर्दीत  घुसून  जागा  मिळवायचं  कौशल्य  मला  चांगलं  अवगत  आहे.. भरलेल्या  बसमध्ये  बसायला  जागा  मिळण्याचं  सुख  काय  असतं  ते  रोजच्या  प्रवाश्यांना नेमकं  समजू  शकेल.. असो.. तर  बस  धावत  होती.. थंड  हवा  वहात  होती  आणि  सोबत  मी  गाणी  ऐकत  होते.. नाही  नाही , romantic असं  काहीच  घडलं  नाही  तेव्हा.. :P
त्या  गर्दीत  एक  वयस्कर  माणूस  उभा  होता.. नीट  बघितल्यावर  कळलं  त्याचा  तोल  जात  होता  आणि  तो  वेग  कमीजास्त होईल  तसा  इकडे  तिकडे  पडत  होता.. त्या  माणसाला  कसलीच  शुद्ध  नव्हती.. आणि  लोक  त्याच्याकडे  बघून  हसत  होते.. न  राहवून  मी  त्या  माणसाला  बसायला  जागा  दिली.. लगेचच  शेजारचा  माणूस  मला  म्हणला  तो  पिलेला  आहे  त्याला  कशाला  जागा  दिली? आणि  मग  बाकीचे  लोक  त्याच्याकडे  बघून  अजूनच  हसायला  लागले..
मला  माहिती  होता  खरतर ,दारूचा  एक विशिष्ठ  वास  येतच  होता.. आणि  मला  स्वतःला  दारू व  दारू  पिणाऱ्याबद्दल   अतिशय  चीड  आणि  तिरस्कार  वाटतो.. पण  माणसाची  परिस्थिती  खूप  वेगळी  वाटली.. बाबांच्या  वयाएव्हडा  वयस्कर  माणूस  होता,कपड्यांवरून  साधा  वाटत  होता.. म्हणजे  तरुण  आहे  म्हणून  किवा  पैसे  आहेत  म्हणून  उधळण्यासाठी  दारू  घेतली  नसावी  त्याने असं मला वाटलं..
काहीतरी  वेगळं  कारण  असेल  असं  उगाच  विचार आला  आणि  कसातरी  झालं.. आणि  समजा  त्याने  व्यसनापोटी  दारू  घेतली  असली  तरी  त्याला  हसायचा  का? असं केल्याने तो माणूस अजूनच चुकीच्या मार्गावर जाण्याची जास्त शक्यता  असते.. खरतर  अशावेळेस  कोणाचातरी  आधार  हवा  असतोना ? पण अशा वेळी  सगळे हात वर करतात.. मनुष्यावर  कधी  कुठली  परिस्थिती  ओढवेल  कोणालाच  सांगता  येत  नाही.. मग  दुसर्यांच्या  दुखावर,वाईट  गोष्टींवर ,कमतरतेवर ,अपयशावर  किवा  चुकावर  आपण  का  हसावं? एकतर  मदत  करावी  आणि  ते  जमत  नसेल  तर  गप्प  बसावं, नाही  का?

मंगळवार, २१ डिसेंबर, २०१०

मनाच्या रांगोळित..

मनाच्या रांगोळित.. रंग तुझे भरते..
अन् रंगात तुझ्या मी.. चिंब चिंब भिजते..

मनाच्या समईत.. ज्योत तुझी पेटवते..
अन् ज्योतीत तुझ्या मी.. लख्ख लख्ख उजळते.

मनाच्या अंगणात.. वेल तुझा लावते..
अन् वेलीत तुझ्या मी.. गच्च गच्च बहरते..

मनाच्या शृंगारात.. रत्न तुझे चढवते..
अन् रत्नात  तुझ्या मी.. दिव्य दिव्य सजते..

मनाच्या मंदिरात.. नाम तुझे चिंतते..
अन् नामात तुझ्या मी..  कोटी कोटी वन्दिते..

मंगळवार, १४ डिसेंबर, २०१०

प्रेम तर सगळेच करतात..

काहीजण देतात.. काहीजण घेतात.. प्रेमात तर सारे पडतात..
हेही करतात..  अन तेही करतात.. प्रेम तर सगळेच करतात..

कोणी घरावर..  कोणी जगावर..
पण प्रेम तर सगळेच करतात..

कोणी  मोजूनमापून.. कोणी  भरभरून..
अहो प्रेम तर सगळेच करतात..

कोणी लपूनछपून.. कोणी मुक्तपणे..
मात्र प्रेम तर सगळेच करतात..

कोणी हेतुपुरस्त..   कोणी  निरपेक्ष..
तरी प्रेम तर सगळेच करतात..

कोणी डोळसपणे..  कोणी डोळेमिटून..
नक्की प्रेम तर सगळेच करतात..

काहीजण  प्रेम  शिकतात..  काहीजण प्रेम शिकवतात..
असो प्रेम तर सगळेच करतात..

सोमवार, १३ डिसेंबर, २०१०

तळं मनातलं..

उगवतीला  तांबडं  फुटतं..   अन तळं  लालसर  दिसतं..
दुपारचं  उन्ह  चढतं..   तसं ते सोनेरी  भासतं..

आकाश  निरभ्र  होतं..   अन तळं  निळाशार  दिसतं..
धुकं  दाटून  येतं..   तसं ते अस्पष्ट  भासतं..

जग  काळोखात  बुडतं..   अन तळं  सावळंसं  दिसतं..
चांदणं  फुलून  येतं..   तसं ते चंदेरी  भासतं..

मातीचं रूप  बदलतं..    अन तळं  मातकट  दिसतं..
ओंजळीत जितकं  येतं..   तसं ते रन्गहिन  भासतं..

ज्याचा जसा घडे संग..   तसा तळ्याचा होई रंग..
विचारात होई जेव्हा दंग..   ते तळं भासे मनापरी धुंद..

गुरुवार, ९ डिसेंबर, २०१०

मंतरलेले दिवस - ९

Answered Prayers..


गेल्या  काही  दिवसांपासून मी  'श्रीकृष्ण  पूर्ण  पुरषोत्तम  भगवान' वाचत  आहे.. त्यामध्ये  छोट्या छोट्या  कथांमधून  अध्यात्म  खूप  सुंदरपणे  सांगितलं  आहे.. नेहमीसारखच  काळ  रात्री  झोपताना  ती  कादंबरी  वाचायला  घेतली आणि.. आणि  जीवनातलं  एक  रहस्य  उलगडलं.. :)
आपण  नेहमीच  ऐकतो  कि  या  सृष्टीचा  निर्माता,पालनकर्ता  आणि  संहारकर्ता  'तो' आहे.. सर्व  कारणांचे  कारण  तोच  आहे.. आपण  जन्माला  येतानाच त्याने   आपल्या   जीवनाचे  अध्याय लिहून  ठेवलेले  असतात.. आपल्या  हातून  जे  काही  घडते  त्यामागची  प्रेरणा  आपल्याला  परमेश्वर  तथा  परमात्म्याकडून  मिळत  असते.. 

बर हे  असं  सगळं  आहे  तर  मग  कधी  कधी  माणूस  दुखी  का  होतो? कितीही  प्रार्थना  केलीतरी  प्रत्येक  माणसाला  कधीना  कधी  संकटांचा  तडाखा  का  बसतो? याला  एक  कारण  असं असू  शकतं  कि  आपली  गतजन्माची  कृत्ये.. पण  मग  देव  आपल्या  हातून  असे कर्म  का  घडवून  आणतो  कि  ज्याने  आपणास  खूप  दुख  होतं,त्रास  होतो? असे  प्रश्न  मला  नेहमीच  पडतात! (दिल  तो  बच्चा  है  जी)
काल  मला  या  प्रश्नाचं  उत्तर  मिळालं.. आणि  अगदी  मनोमनी  पटलं.. :)  
"दुखाची  दरी  ओलांडल्याशिवाय  सुखाची  हिरवळ  दिसत  नाही!!!"
सर्वसाधारणपणे  माणूस  देवाची  प्रार्थना करतो  ते  भौतिक  गोष्टी  मागण्यासाठी.. अगदी  लहानपणीपासून  सुरुवात  होते  पहा.. देवा  मला  परीक्षेत  चांगले  गुण  मिळूदे.. मला  चांगली  नोकरी  मिळूदे..  माझं  स्वतःच  घर/गाडी  होऊदे.. देवा  मला  चांगला  जोडीदार  मिळूदे.. माझी तब्येत चांगली ठेव.. इत्यादी.. इथेच  गोचा  होतो..  सगळे  ग्रंथ  हेच  सांगतात  कि  मानवी  जीवनाचा  खरा  हेतू  पैसे  मिळवणे/लग्न/मुलबाळ  होणे   हा  नाहीये.. परमेश्वराला  ओळखणं आणि मी  कोण आहे याचा शोध घेणं  हा  खरा  उद्देश  आहे.. अर्थात  त्यासाठी  संसार  सोडून  सन्यास  घेतला  पाहिजे  असं  काही  नाहीये.. तर  नित्य कर्म  करता  करता  देवाची  शुद्ध  भक्ती  करावी  असं  अभिप्रेत  असतं..  म्हणून  देव  आपल्या  भक्तांना  कधी  कधी  भयंकर  प्रतिकूल  परिस्थितीत  टाकतो  कि  जेणेकरून  आपल्या  मनात  शुद्ध  भक्तीभाव  निर्माण  व्हावा.. तो  मुद्दाउन  एका  क्षणी  सुखाची  सावली  अन  दुसऱ्या  क्षणी  दुखाची  झळ  देतो  त्यामुळे  भक्ताच्या  मनातून  मायावादी  भौतिक  गोष्टींची  आसक्ती  कमी  होऊ  लागते..  त्या  वेळेस  भक्ताला  जाणीव  होते  कि  आपण  जे  आपलं  म्हणून  मिरवत  आहे  ते  काही  आपलं  नाहीये  आणि  ओघाने  माणसाचा  अहंकार  कमी  होतो.. आपल्या  मनातल्या  वासना,अहंकार  वगैरे  वाईट  गुण  गेले  कि  आपण  शुद्ध  भक्तीच्या  मार्गावर  येतो  आणि  मग  आपल्या  आयुष्याची  खऱ्या अर्थाने वाटचाल सुरु होते..
असं  म्हणतात  कि  आपण  जशी  कृत्य  करतो  तशा  योनीमध्ये  आपला  जन्म  होतो.. वाईट  कृत्य  केल्यावर  नीच  योनीत  प्रवेश मिळतो.. चांगली  कृत्ये  केलीतर  स्वर्गात  जागा  मिळते .. आणि जेव्हा  पाप  पुण्याची  संख्या  बरोबर सारखी  होते  तेव्हा  मनुष्यजातीत  जन्म  होतो.. नीच  योनिबद्दल  काही  वेगळं  सांगायला  नको.. स्वर्गाबद्दल  असं  बोललं  जातं  कि  संचित पुण्य  संपला  कि  स्वर्गातून  पुन्हा  खालच्या  योनीत  आणलं  जातं.. याचा  अर्थ  स्वर्ग  हेही  शाश्वत  स्थान  नव्हे.. आता  उरला  तो मनुष्यजन्म..  जीवाला  हि  मिळालेली  एक  सुवर्णसंधी  असते.. माणसाने  जर  आपल्या  जन्माचा अंतिम  हेतू  ओळखला  नाही ,जर  तो  मिथ्या क्षणिक  भौतिक  जाळ्यात  गुंतून  पडला  तर  त्याचा  मनुष्य जन्म  फुकट  वाया  जातो  आणि  मग  त्याला  पुन्हा  इतर  योनीत  जावे  लागते  अशा  रीतीने  तो  जन्म  मरणाच्या  चक्रात  फिरत  राहतो.. पण  जर  एखाद्याने  प्रपंच  सांभाळता  सांभाळता  परमेश्वराला  ओळखण्याचा,त्याच्या  जवळ  जाण्याचा  प्रयत्न  केला  तर  नक्कीच  त्याला परमेश्वराच्या शाश्वत दिव्य धामात कायमसाठी  प्रवेश मिळतो..  आणि त्याच्या  जन्माचं  सार्थक  होते.. 
मी  हे  सगळं  लिहित  आहे  याचा  अर्थ  असं  नाहीये  कि  मला  हे  जमतं..  खरतर मी  आतापर्यंत  दासबोध आणि  अजून  अध्यात्मिक  ग्रंथ/पुस्तके  वाचले  आहेत  त्यातून  सार  शोधण्याचे  प्रयत्न  करत  आहे.. अजून  खूप  मोठा  पल्ला  गाठायचा  आहे.. :)

ग दि माडगुळकरांनी म्हणले आहेना..



तुझे रुप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम


मंगळवार, ७ डिसेंबर, २०१०

कधीतरी..



भिजलेल्या मातीत अंकुर फुटेल कधीतरी
सारवलेल्या अंगणात सडा पडेल कधीतरी..

अवखळ वाऱ्याला दिशा सापडेल कधीतरी
वाहत्या प्रवाहाला  उसंत मिळेल कधीतरी..

निळ्या नभांगणात नक्षत्रे चमकतील कधीतरी
वेळूच्या बनात  चांदणं पसरेल कधीतरी..

ओघळणाऱ्या आसवांचे मोती होतील कधीतरी
भरगच्च मनाचे ओझे संपेल कधीतरी..

कधीतरी शब्दाचा अर्थ कळेल कधीतरी
अन त्या अर्थाचा बोध होईल कधीतरी..

शनिवार, ४ डिसेंबर, २०१०

सुदाम्याचे पोहे - ५


हा  लेख  मी  पंकज  आणि  दीपाली  यांचे  खास  आभार  मानण्यासाठी  लिहित  आहे.. :-)

त्यादिवशी  पंकजचा  mail आला  एक  महत्वाचं  काम  आहे,फोन कर  किवा  नंबर दे.. मी  online होतेच, लगेचच  त्याला  call केला..  तो  म्हणला  दृष्टीकोन २०१०  प्रदर्शनाच्या  उद्घाटनासाठी  सूत्र संचालन  करणारं  कोणीतरी  हवय.. मी  दीपालीच  नाव  सुचवलं.. ती  या  क्षेत्रात  expert आहे  आणि  तिला  बराच  अनुभव  आहे म्हणून.. मग  दीपालीला  फोन  केला  आणि  पंकजशी बोल  म्हणलं.. weekday असल्याने  ऑफिसचा  load बघून  रविवार  पर्यंत  final करायचा  असा  त्यांचं  ठरलं.. 
त्यानंतर  याबद्दल  माझं  ना  पंकजशी  ना   दिपालीशी  कोणाशीच  बोलणं  झालं  नाही.. मला  वाटलं  एव्हाना  त्यांचं  ठरलं  असेल  सगळं.. पण  मंगळवारी  सकाळी  कळलं  कि  नेमकं  त्यादिवशी  client visit मुळे दीपालीला  जमणार  नाहीये.. मग  पंकज  म्हणला  बघ  आता  कोणीतरी.. आज  मंगळवार , कार्यक्रम  शुक्रवारी.. आता  २ /३ दिवसच  राहिले  होते.. कोणाला  विचारावं  बघत  होते..
दिपालीशी   बोलता  बोलता  आम्हा  दोघींना  वाटलं  कि  मी  स्वतः  प्रयत्न  करावा  का.. ती  म्हणाली  तुला  कविता  वाचायची   सवय  आहेच ,जमेल  तुला .. मग  पंकजला  विचारला  कि  मी  केलं तर  चालणार  आहेका  तर  तो  म्हणला  कि  मी  सगळ्यात  पहिल्यांदा  विचारलं होतं  तेव्हा  तू  करावस  अशीच  अपेक्षा  होती,तूच  कर.. मी  पुन्हा  त्याला  म्हणालं  मला  कवितेच्या  कार्यक्रमाचा  अनुभव  आहे  बाकी  मी  असं  बाहेर  कुठे  सूत्रसंचालन  केलं   नाहीये.. तर  तो  म्हणला  आपल्याला  heavy निवेदन  नकोय,कार्यक्रम कार्यक्रम  informal असेल .. 
झालं  मग  खूप  mails mails.. पंकजला  ३  दिवस  खूप  mails करून  त्रास  दिला.. :)) सगळ्यात  आधी कार्क्रमाची रूपरेषा  सांग म्हणलं .. मग   त्याने  कोण  कोण  येणार  वगैरे  बद्दल  माहिती  पाठवली,बर्याच  links पाठवल्या..  मंगळवारी  रात्री  बरिस्तामध्ये  भेटायचं  ठरलं,  तिथे  गाईडलाईन्स मी, भूषण माटे (वसंतोत्सव सारखे कार्यक्रम अरेंज करण्याचा दांडगा अनुभव) आणि सुहास (आमची वन मॅन आर्मी) यांच्याकडून मिळतील असं पंकजने सांगितले..
त्या  रात्रीची  गम्मत  म्हणजे   पंकजला  मी  पहिल्यांदा  प्रत्यक्ष  भेटणार  होते.. :) गेले  कित्येक  महिने  आम्ही  mails मधून  बोलत  होतो.. तिकडे  बरीस्ताच्या   बाहेरच  मोठा  ग्रुप चर्चा  कारत  बसला  होता.. पंकजने सर्वांशी  ओळख  करून  दिली.. मी  तर त्या वातावरणाने  एकदम भारावून गेले.. एकतर  ते  सगळे  gr8 photographers होते..  आणि  तिकडे  सगळ्यामध्ये उत्साह  अगदी  सळसळत  होता.. रात्र   झालीये वगैरे  वाटत  नव्हतं.. तिथे पंकज, सुहास, भूषण  आणि  सकाळचे  मिलिंद  वाडेकर  यांची  भेट  झाली.. त्यांच्याशी  कार्यक्रमाची  रूपरेषा ,क्रम  याबद्दल चर्चा करून  मी लगेच  निघाले.. १०वाजता  आमच्या  गदाजे  दरवाजे  बंद  होतात  ना ..
बुधवारी  पंकजने  पाठवलेली  सगळी  माहिती  वाचून  काढली.. फोटोग्राफर्स@पुणे हा ग्रुप गेले सलग ३ वर्ष छायाचित्रांच प्रदर्शन आयोजित करतो.. आणि त्यातून जमा होणारा निधी विद्या महामंडळाच्या special abilities असलेल्या विद्यार्थ्यांना दिला जातो.. व्यासपीठावर सकाळ’चे मिलिंद वाडेकर, डीएनए’चे विलास अवचट, अविनाश गोवारीकर, आणि विद्या महामंडळाच्या मॅडम, इंकफ्लोटचे सुनील जुनेजा असे लोक असतील असं पंकजने सांगितले.. त्या सर्वांबद्दल थोडी माहिती वाचली आणि  त्यातून  एक  कच्चा   मसुदा  तयार  केला.. दीपालीला  म्हणलं  आज  रात्री मी  तुझ्याकडे  येतीय.. माझ्याकडे  data तयार  होता  पण  मला  सूत्रसंचालनाची भाषा  दिपालीकडून  शिकायची  होती.. ती  जवळच  रहात  असल्याने  रात्री  ८.३०ला  तिच्या  घरी  गेले.. ती   ऑफिसमधून  नुकतीच   आली  होती  आणि  तिला  स्वयपाक  करायचा  होता.. तरी  तिने  माझ्यासाठी  आवर्जून  वेळ  काढला.. मी  लिहिलेलं  तिला  दाखवलं  मग  तिने  काही  typical वाक्य  सांगितली  जसे  कि '... यांना  व्यासपीठावर  पाचारण  करते'! तिच्याशी  बोललं  कि  माझा  आत्मविश्वास  नेहमीच  वाढतो.. तिला  खूप  अनुभव  आहे  या  क्षेत्रात  त्यामुळे  तिने  बर्याच  टिप्स  दिल्या.. हे  सगळं  झाल्यावर  तिने  नुकत्याच  लिहीहिलेल्या  '4th seat' या  लेखावर   आम्ही  खुप वेळ  बोलत बसलो.. १०  वाजले  तरी  आमच्या  गप्पा  काही  संपेना.. तिला  म्हणलं  घरून  फोन  यायच्या  आधी  आता  निघते.. hsbc मध्ये  असताना  बसमध्ये  आमच्या  अशा  गप्पा  खूप रंगायच्या, i really miss those days.. असो.. रात्री  घरी  आल्यावर  मग  सगळं एकत्र  लिहून  पंकजला  mail केलं.. त्याने  लगेच  reply केला,थोडे  बदल  सुचविले.. 
गुरुवारी  काय  काय  बोलायचं  final झालं  होतं  पण  आता  वाचायची  practice करायची  होती.. ६च्या  बसने  घरी  आले  आणि  लगेच  आमच्या  इथल्या  भीमसेन  जोशी  उद्यानात  गेले.. बागेत  गारठा  जाणवत  होता.. विशेष  कोणी  नव्हतं त्यामुळे  थोडावेळ  तिथे  मोठ्यांदा  वाचायचा   सराव  केला.. बागेतल्या  थंडीमुळे  कि  काय  मला  सर्दी  झाल्यासारखं  वाटू  लागलं.. वाटलं आता  उद्या  कसं होणार   आणि  लवकर  झोपून  गेले..
3 dec,10.. कार्यक्रम  सकाळी  १०.३० वाजता  सुरु  होणार  होता .. मी  आणि  बाबा  तिथे  थोडं  आधी  पोहचलो.. बाबानाही  प्रदर्शन  बघता  येईल  म्हणून  चला  म्हणलं होतं.. तिथे  गेले  तेव्हा  तयारी  चालू  होती.. क्षितिजा  भेटली.. पंकजने विचारलं  तू  तिला  कशी  ओळखतेस,मी  म्हणलं  hsbc जिंदाबाद.. :) मग  थोडावेळ  तिथल्या  फोटोमध्ये  मी  हरवून इतकी गेलेकी  मला  सूत्रसंचालन  करायचं  आहे  याचा  विसर  पडला.. सगळेच photos एक से एक होते.. बाहेर सर्व  छायाचित्रकारांचे छायाचित्र लावले होते.. माझ्या ओळखीतले तिथे पंकज,क्षितिजा आणि धृवचे photos होते.. तिथले photos आणि बाकी सगळं पाहून बाबा म्हणले तुला या लोकांनी सुत्रासंचालानासाठी कसं काय बोलावलं.. खरंतर मी सगळी स्टोरी घरी आधीच  सांगीतली होती पण माझं सारखच काहीना काही चालू असत त्यामुळे तेव्हा त्यांनी seriously  ऐकलं नव्हतं.. मी:पंकजने विचारलं.. बाबा: पंकजशी तुझी कशी काय ओळख.. मी: सिद्धार्थ कडून पंकजशी ओळख झाली.. सिद्धार्थ मुळे  मला बरेच चांगले मित्रमैत्रिणी मिळाले  इति.. 
त्यानंतर पंकज/सुहास/भूषणने  ऐन  वेळेसचे   थोडे  बदल  सांगितले.. तिथे  खूप  मोकळे  वातावरण  होते  त्यामुळे  माझ्या  मनावरचे  दडपण  एकदम  कमी  झाले.. p@p च्या  सदस्यांबरोबर, विद्या महामंडळाच्या  शिक्षिका ,पत्रकार  वगैरे  यांच्याशी  ओळख  झाली .. थोड्यावेळातच  पाहुण्यांचे  अविनाश  गोवारिकरांचे  आगमन  झाले.. पण  त्यांनी  आल्यावर  थेट  photos बगःयला  सुरुवात  केली.. त्यांचं  बघून  झाल्यावर कार्यक्रम सुरु करण्याचं  मला  सांगण्यात आलं.. ठरल्याप्रमाणे  मी  बोलायला  सुरुवात  केली.. सुरुवात  नीट   होणं  महत्वाचं   होतं  नंतर  फक्त  बाकीच्यांना  call द्यायचे  होते.. एकामागून  एक  सगळं  इतक्या  पटापट  होऊनही  गेलं.. आधी  mike लांब  धरल्याने  मागे  नीट आवाज  गेलं  नव्हता.. मध्ये  पाहुणे  बोलत  असताना एकाने mike जवळ धरायला सांगीतले.. तेव्हाढ्यातल्या  तेव्हढ्यात   मी  त्यांना  विचारलं  कि  मी  फार  fast बोलले  का  तर  ते  म्हणले नाही तसं नाही,चांगलं बोलत आहेस, फक्त mike  जवळ धर.. सगळ्या  पाहुण्यांचं  बोलून  झाल्यावर  सगळ्यांचे  आभार  मानून  कार्यक्रमाची  सांगता  झाली.. आणि  मला  हुश्श   झालं.. 
खरंतर मी थोडावेळच  बोलले आणि कदाचित ते किरकोळ होतं पण माझ्यासाठी ते खूप होतं.. क्षितिजा   म्हणली  चांगलं  झालं  तुझं  म्हणून..  बाबांना  विचारलं  ते  म्हणले  आधी  आवाज  कमी  आला  पण  नंतर  व्यवस्थित  झालं.. मग  मला  बरं  वाटला.. fc रोडवरून  १२.१५ची  infy बस  पकडायची  होती .. म्हणून  मग  पंकज ,सुहास ,भूषण  यांच्याशी  बोलून  मी  लगेचच  निघाले.. मला  संधी दिल्याबद्दल  त्यांचे  पुन्हा  एकदा मनापासून  आभार  मानले.. 
हे  सगळं  इतकं  सविस्तर पणे   सांगायचं  कारण  कि  पंकज  आणि मी  कधीही भेटलेलो  नसताना  त्याने  माझ्यावर  इतका  विश्वास  दाखवला होता  याचं  मला  खूप  कौतुक  वाटलं.. अशा  या  विश्वासाच्या  जोरावर  कोणीही  चांगलं  काम  करू  शकतं,नाहीका.. आणि   दीपालीचे  मला  खूप  मार्गदर्शन  मिळाले.. त्या  दोघांमुळे  माझ्यातला  आत्मविश्वास  दुणावला  आणि  मी  सूत्र -संचालनाचे  काम  माझ्यापरीने  पार  पाडू   शकले.. त्यांची मी मनापासून ऋणी आहे.. :))

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०१०

श्यामसुंदरा..

वाट चुकलेल्या वासरास या..  कळपात तुझ्या बोलव रे..
श्यामसुंदरा.. श्रीकृष्णा..   मनास या सावर रे..


मंत्रमुग्ध वेणूने तुझिया..  मनास या फुलव रे..
श्यामसुंदरा.. श्रीकृष्णा..  
मनास या सावर रे..

वैजयंती मालेने तुझिया..  मनास सुगंध दे रे..
श्यामसुंदरा.. श्रीकृष्णा.. 
मनास या सावर रे..

मखमली मोरापिसाने  तुझिया..  मनास सुंदर बनव रे..
श्यामसुंदरा.. श्रीकृष्णा.. मनास या सावर रे..

सुदर्शन चक्राने तुझिया..  मनास या आवर रे..
श्यामसुंदरा.. श्रीकृष्णा.. मनास या सावर रे ..

दिव्य लीलांमध्ये तुझिया..  मनास या रमव रे..
श्यामसुंदरा.. श्रीकृष्णा..  मनास या सावर रे..

गीता उपदेशाने तुझिया..  मनास या वळव रे..
श्यामसुंदरा.. श्रीकृष्णा..  मनास या सावर रे..

सच्चिदानंद अस्तित्वाची तुझिया..  मनास जाणीव दे रे..
श्यामसुंदरा.. श्रीकृष्णा..  
मनास या सावर रे..