शनिवार, २५ जून, २०११

मंतरलेले दिवस - ३० : ४

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 4: 8th June,11


Tatopani -> Nyalam (3750 mt
)

पहाटे ४ च्या आसपास जाग आली तेव्हा बाहेर पाहिलं तर आधीच उजाडले होते..  ती नदी अजून त्याच वेगाने धावत होती.. कोणाला भेटायला चालली होती ती काय माहिती..  :) आणि ते पर्वत तसेच खंबीरपणे उभे होते!!!
सकाळी सकाळी लक्षात आले की मी अपर्णाचा कॅमेरा backup म्हणून आणला होता तो काठमांडूच्या ब्यागेत राहिला म्हणून.. तो कॅमेरा मी कैलास मानस चे video shooting घेण्यासाठी वापरणार होते.. आणि त्याचे ४ cells extra होते त्यामुळे chargingची सोय झाली नसती तरी चिंता नव्हती.. इतकी नीट तयारी करून मी वेड्यासारखं तो कॅमेरा काठमांडूला विसरून आले होते.. आणि आता चिडचिड करण्यात काहीही अर्थ नव्हता.. अजून काय काय तिकडे राहिले आहे ते आता पुढे कळेल हळूहळू.. महेशला chargingबद्दल विचारलं तर तो म्हणला सागा पर्यंत सोय आहे,काळजी करू नकोस.. माझ्या कॅमेराची एक extra battery जवळ होतीच तरीही सागा नंतर फोटो कमी काढून कॅमेरा जपून वापरायचा असं मी ठरवलं.. बघूया म्हणलं..
चहा घेऊन झाल्यावर काका लोकांसोबत morning walkला गेले.. नदीच्या काठाशी कुठून जाता येतंय का पाहत होते पण रस्ता नाही मिळाला.. पुढे गेल्यावर दोरीने बांधलेला नदीवरचा पूल दिसला.. तो इतका हलत होता त्यामुळे माझं काही त्या पुलाच्या मध्येपर्यंत जायचं धाडस झालं नाही.. नंतर आमची शेरपा लोकांशी ओळख झाली.. १३ शेरपा आमच्या सोबत येणार होते.. आता यापुढची सूत्रे त्यांच्या हातात होती.. हे लोक नेपाळमध्ये हिमालय की गोद मै रहात असल्याने ट्रेकिंग मध्ये मास्तर असतात आणि त्यांना थंडीचा,उंचीचा बिलकुल त्रास होत नाही.. अगदी चपळतेने आणि प्रेमाने सेवा करणाऱ्या या लोकांबद्दल पुढे अजून सांगेनच..
नाश्ता करून आम्ही ७.३०ला तातोपानी सोडले.. लगेचच 2km वर बोर्डर वरचे कोलारी गाव लागले.. तिथे आम्ही बस सोडली.. थोडं चालत गेल्यावर नेपाळ-चीन 'मैत्री पूल' लागला.. त्या पुलाच्या मध्यावर एक रेघ होती.. रेघेच्या इकडच्या बाजूला नेपाळ आणि तिकडे चीन(तिबेट).. त्या भागात security अतिशय कडक होती.. पासपोर्ट बघूनच आम्हाला त्या पुलावर जायची परवानगी मिळाली.. कॅमेराला पूर्णपणे बंदी होती तिकडे.. तिथून पुढे मग immigration checking वगैरे झाले आणि finally आम्ही चीनमध्ये प्रवेश केला..
तिथे भयंकर गर्दी होती.. आणि सगळ्यात आश्चर्य वाटलं जेव्हा लहानांपासून म्हातारे लोक ग्यास सिलेंडर, मोठे पाण्याचे कॅन आणि असे अजून काही अवजड वस्तू पाठीवर घेऊन जाताना दिसले.. पोटासाठी काय काय करावं लागतं, खूप कसंतरी झालं ते दृश्य बघून..
इथून पुढचा प्रवास आता टोयाटो जीप मधून होणार होता.. एका जीप मध्ये ४ जण + १ शेरपा +  एक चीनी ड्रायवर.. अशा आमच्या १५ गाड्या होत्या.. आणि आमचा सर्व समान ट्रकमधून जाणार होतं..
आता तिबेट मधील प्रवास सुरु झाला.. इकडे ड्रायवर डाव्या बाजूला बसून उजव्या बाजूने गाडी चालवत होता त्यामुळे थोडं वेगळं वाटत होतं.. सभोवताली पर्वत रांगा आणि नदीचा प्रवाह.. इथले रस्ते चांगले होते.. शेर्पालोक सांगत होते की काही मागच्या वर्ष रस्ते खूप सुधारले त्यापूर्वी हा प्रवास फारच खडतर असायचा..
पुढे एकीकडे checking साठी गाड्या थांबवल्या गेल्या.. फोटो काढायला गाडीतून उतरले तर बाहेर भयंकर थंडी.. इथून पुढे थंडीच थंडी होती.. हळूहळू पर्वतांवर उंच झाडांऐवजी आता बारीक गवत दिसू लागले.. जसं उंचीवर जाऊ तसं oxygen कमी होतोना म्हणून..  पुढे मग पहिले हिमशिखर दिसले.. :)
साधारण १२.३०च्या आसपास आम्ही न्यालम ला पोहचलो.. हा उंचीवरचा पहिला टप्पा होतं.. कैलास मानस अति उंचावर असल्याने तिथे थेट गेल्यास त्रास होतो... म्हणून उंचीचे असे टप्पे ठरवले आहेत.. आपणास सवय व्हावी म्हणून एका टप्प्यावर  १ रात्र मुक्काम करून पुढचा टप्पा गाठला जातो..
न्यालम येथे उंचीमुळे हिरव्या ऐवजी मातकट ग्रे रंगाचे पर्वत दिसत होते.. इथे आल्या आल्या एव्हढे दिवस वाचत होतो,ऐकत होतो ती थंडी नेमकी कशी काय आहे ते कळलं.. रूम मध्ये आल्यवर आतून थर्मल्स, २  tops, jeans ,मग मोठा जाड स्वेटर, हातमोजे, पायमोजे, स्कार्फ आणि त्यावरून माकड टोपी इतका सारं  अंगावर चढवलं.. आणि  ABC advने चांगले उबदार आणि भरपूर कप्पे असलेलं  जर्किन दिलं तेही घातलं.. इथून पुढे जरा बडबड कमी करून शांत राहायचा होता, energy जास्तीत जास्त वाचवायची होती.. काही त्रास होत असल्यास विचारल्याशिवाय थेट कोणतीही गोळी घेऊ नका असं आम्हाला  सांगण्यात आलं.. इथे चार्जिंग आणि फोन दोन्हीची सोय होती त्यामुळे बरं वाटलं.. नंतर गरम गरम खिचडी+ पापड असे शेर्पानी बनवलेले जेवेन जेवलो.. इतक्या थंडीत त्यांनी सगळं सामान काढून लगेचच एव्हडा चांगला स्वयपाक कसा काय केला याचं मला भारी आश्चर्य वाटलं..
आतापर्यंत सगळं ठीकठाक होतं.. पण जेवण झाल्यावर मात्र माझं डोकं दुखायला लागलं.. उलटी होईल असं वाटू लागलं.. नंतर कळले कि जवळ जवळ जवळ सगळ्यांची डोकी जड झाली होती.. थोडा आराम केला पण नंतर उठवत नव्हतं.. चहा आला तेव्हा एव्हढ्या थंडीत तो गरम चहा मला जाईना.. नंतर लगेच सूप.. महेश आणि भीम भैयाची ऑर्डर होती की जात नसेल तरी सक्तीने सगळं खायचं प्यायचं.. लगेच जेवणाची वेळ झाली.. ताट हातात धरून मी कितीतरी वेळ तशीच बसले होते.. २ घास खाल्ल्यावर थेट बाहेर गेले आणि सकाळपासूनच सगळं बाहेर पडलं.. उलटी होताना माझं समोर लक्ष गेलं.. उंच शिखरावर तो चंद्रमा कधी ढगाआड तर कधी बाहेर लापाचापी खेळत होतं.. आकाशात असंख्य तारे लुकलुकत होते.. समोर इतके सुंदर दृश्य होते आणि मी मात्र उलटी करत होते!!!  छे,असा त्रास होणार असेल तर परिक्रमा कशी पूर्ण होणार असं मला वाटू लागलं.. भीम भय्या म्हणला डोकेदुखी,उलटी हि altitude sickness ची  common लक्षणे आहेत.. मग आम्हाला  diamoxची गोळी देण्यात आली.. आता आराम करा,उद्यापर्यंत  बरं वाटेल असं  ते म्हणले आणि आम्ही सर्वजण ९.३० वाजता गुडूप झोपून गेलो!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: