सोमवार, २७ जून, २०११

मंतरलेले दिवस - ३० : ७

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 7: 11th June,11


Saga to Paryang (4500 mt.)


सकाळी लवकर आटपून आमच्या गाड्या परयांग च्या दिशेने धावू लागल्या.. इथून पुढे रस्ता चांगला होता.. आता दूरवरची हिम शिखरे, नदीचे खळ खळते पाणी सकाळच्या कोवळ्या किरणात चमकत होते.. थोडं पुढे गेल्यावर जणू  आम्हाला भेटण्यासाठी मेघ जमिनीवर उतरले होते.. मग मला वेडावणारा तो रिमझिम पाऊस..
आणि नंतर तर चक्क बर्फाचा पाऊस.. मी आयुष्यात प्रथमच हिमवर्षाव बघत होते.. गाडीतून बाहेर उतरणे शक्य नव्हते पण काचेवर पडलेल्या बर्फाचा आनंद घेत होते.. अजूबाजूला सगळीकडेच  बर्फ पसरलेला दिसत होता..  भीम भय्या म्हणले, मी इतके वर्ष यात्रेसाठी इकडे येतो पण या परिसरात पहिल्यांदा बर्फ पडलेला बघितला.. मग मी म्हणलं यात्रेला खास लोकं आहेतना यंदा म्हणून.. :)
अजून पुढे गेल्यावर आभाळ स्वच्छ होते, कडक उन्ह पडले होते अक्षरशः.. इथे हवामान क्षणाक्षणाला बदलते..  "कधी उन्ह, कधी पाऊस.. आताशा मनास हे ऋतू कळेनात.. " अशी माझी मनस्थिती झाली होती.. निसर्गाची किमया,अजून काय..
दुपारी १२ वाजता परयांगला पोहचलो.. अगदी छोटंसं गाव.. अजिबात स्वच्छता नव्हती.. इथे खूप गरिबी दिसली.. लहान लहान पोरं सारखी भिक मागत होती..  वाईट वाटले, इतक्या सुंदर ठिकाणी लोकांचे हाल पाहावले नाही..
इथून अवघ्या 250km वरती मनास सरोवर असल्याने  इथे राहावं वाटत नव्हतं.. थेट तिकडे मानस सरोवराला जाऊ असं सर्वांनाच वाटत होतं पण हा उंचीचा तिसरा टप्पा महत्वाचा होता,थांबणे अपरिहार्य होते..
इतके आम्ही छोट्या huts मध्ये राहिलो.. एकेका खोलीत ५/६ जणी.. बाहेर भयंकर बोचणारे थंड वारे वाहात होते, dimox मुले उंचीचा त्रास मात्र आता होत नव्हता.. इथे रूम मध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून स्तोत्रे म्हणली, 'ओम नमः शिवाय' असा १०८ वेळा जप केला.. नंतर कोणी भक्तीगीते म्हणली.. मी माझ्या दोन कविता ऐकवल्या.. मजा आली..
संध्याकाळी गावातल्या गावात फिरून आलो.. बुद्धांचं एक मंदिर होतं त्याला Buddhist Monastery म्हणतात ते बघितलं..  रात्री सुरेख चांदणं पडलं होतं आणि मनात उद्याचे मानस सरोवराचे वेध लागले होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: