मंगळवार, २८ जून, २०११

मंतरलेले दिवस - ३० : ९

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 9: 13th June,11


Manas Sarovar (4550 mt.)

मध्यरात्री उठून मानस सरोवर बघायचा किडा मी सर्वांच्या डोक्यात घातला होता.. गजर व्हायच्या आधीच उठले आणि सगळ्यांच्या रूमवर हाकामारी सारखं हाक मारत गेले.. :) एव्हढ्या रात्री मला एकटीला बाहेर फिरायला किंचित सुधा भीती वाटली नाही.. या अख्या यात्रेमध्ये मला कधीच कुठेच भीतीने चुकनही स्पर्श केला नाही.. तसं मला पुण्यातही भूतांची वगैरे भीती कधीच वाटत नाही.. कदाचित मी रोज दासबोध वाचते म्हणून असं असावं.. तर लगेचच आमची स्वारी सरोवराकडे निघाली.. पूर्ण ढगाळ हवामान असल्याने चांदण्यातले  सरोवर,चंदेरी पाणी बघायची संधी हुकली.. बाहेर अशक्य थंडी होती.. आम्ही शांतपणे काठावर  जाऊन बसलो.. पाणी एकदम निश्चल शांत भासत होते.. समोरच्या बाजूला ढग पाण्यात मिसळलेले दिसत होते.. ज्योत दिसतेय का किती आतुरतेने वाट बघत होते मी.. मध्येच आमच्यापैकी कोणीतरी म्हणायचं ते पहा पुढे काहीतरी दिसतंय.. पण ते सगळ्यांना काही दिसायचं नाही.. आता काहीतरी आशेने समोर आपण एकटक बघत बसलो तर आपल्याला काहीना काही भास होणारच तशातला हा प्रकार होता.. मलाही मध्येच उगाच काहीतरी हलल्यासारखे वाटायचे.. चहूकडे अगदी निरव शांतता पसरली होती.. अन त्या वातावरणात मन ध्यान लावल्यासारखे शांत झाले,हलके झाल्यासारखे वाटले.. तासभर बसून थंडी सहन न झाल्याने आम्ही खोलीत परतलो..  ज्योत दिसण्या इतके भाग्य नव्हते माझे मात्र  ते रात्रीचं सौंदर्य एकदा अनुभवलं याचं समाधान मला वाटत होतं.. परतल्यावर थंडीमुळे लगेचच निद्रेच्या अधीन झाले..
सकाळी उठून बाहेर आल्यावर डावीकडे कैलासाचे आणि उजवीकडे मानासारोवाराचे दर्शन झाले आणि मन प्रसन्न झाले.. इथे आल्यापासून दिवस कुठला, तारीख कोणती कसलंही भान नव्हतं..  नंतर लक्षात आलं आज सोमवार होता आणि रात्री आमचे समान आमच्या ताब्यात दिले गेले होते त्यामुळे पूजेचं साहित्य जवळ होते.. लगेच मी सरोवरापाशी गेले.. आता ढग गायब झाले होते.. अन सुर्यराजाच्या किरणांमध्ये ते पाणी सुरेख चमकत होता,जणू ते सोन्याचे पाणी होते..  अन काही पक्षी (नाव माहिती नाही) त्यामध्ये मनसोक्त विहार करत होते.. किती नशीबवान आहेत ते इथे या सरोवरापाशी राहतात! अंघोळ वगैरे शक्य नव्हती.. डोक्यावर थोडं पाणी शिंपडले,डोळ्यांना लावले.. समोरच्या कैलास राजाला , मानस सरोवराला आणि त्या रविला हळदी कुंकू आणि बेलाचे पान  वाहून मनोभावे पूजा केली.. काल राहिली होतीना पूजा करायची म्हणून आज झाल्यावर आणि तेही सोमवारी झाल्यावर फार बरं वाटलं.. माझ्या जीवनात सगळ्या गोष्टी होतात पण थोडा वेळ लागतो,जरा वाट बघावी लागते नेहमीच प्रत्येक बाबतीत.. :)
पूजेला माझी मीच चालले होते तर एक काकूही सोबत आल्या.. या अख्या ट्रीपमध्ये मी कधीच कोणावर अवलंबून नव्हते.. कोणालाही मी माझ्यासोबत इकडे या किवा मला हे हवंय असं कधीच म्हणलं नाही मी.. म्हणून एकटी असले तरी माझं ओझं किवा माझा त्रास कोणालाही झाला नाही.. माझी मी एन्जोय करत होते प्रत्येक क्षण त्यामुळे सर्वांना कौतुक वाटत होतं माझं..
नाश्त्याच्या वेळेस सगळे भेटले तेव्हा रात्रीच्या प्रकरणावर चर्चा चालू होती,मला हे दिसले मला ते दिसले.. आमच्यापैकी काहीजण नंतरही थांबले होते त्यांना ज्योत दिसली म्हणे.. खरंच दिसली का भास होता हे त्यांनाही नक्की माहिती नव्हतं.. खाणंपिणं आटोपल्यावर आम्ही सगळे समोरच्या टेकडीवर सरावासाठी गेलो.. तिथेही वरती बुद्धदेवांचे मंदिर होते आणि तिकडून सगळ्याच बाजूचे दृश्य अतिशय भारी दिसत होते..
खरतर तर आज इथून पुढे नांदी पर्वत,अष्टपद वगैरे बघून दार्चेनला मुक्कामासाठी जायचे होते.. पण विसा मुळे आमचा प्लान १ दिवस पुढे गेला होता..  आणि  ऐनवेळेस दार्चेनला राहण्यासाठी रूम्स मिळाल्या नाही.. त्यामुळे आज इथेच राहायचे होते.. कारण काहीही असो पण मानस सरोवरापाशी २ दिवस राहायला मिळालं हे आमचं अहोभाग्य होतं..
जेवण झाल्यवर मी पुन्हा काठाशी गेले.. आता पुन्हा निळ्या हिरव्या छटान्चा खेळ दिसत होता.. पाण्याकडे कितीतरी वेळ बघत बसले.. "बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले" अशी माझी मनस्थिती झाली होती..सभोवताली पर्वत रांगा आणि समोर हे जलाशय.. त्या पाण्यातल्या तरंगाशी माझ्या मनाचे तरंग एकरूप झाले होते.. स्वर्ग यालाच म्हणतात का असे राहूनराहून वाटत होते.. सौदर्याची ,पवित्रतेची अन शांततेची व्याख्या अजून वेगळी काय असणार.. एरवी हे मोठे शब्द ऐकत असतो आज खुद्द निसर्गगुरू  या शब्दांचा अर्थ समजावून सांगत होते.. आज वेगळा काहीच कार्यक्रम नव्हता.. संध्याकाळी पुन्हा काठापाशी चक्कर मारली आणि मनसोक्त आनंद घेतला..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: