सोमवार, २७ जून, २०११

मंतरलेले दिवस - ३० : ८

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 8: 12th June,11


Paryang -> Manas Sarovar (4550 mt.)


सकाळी सकाळी प्रवास सुरु झाला.. आता कधी एकदा मानस सरोवरापाशी पोहचतोय असं होत होतं.. पण मध्ये एकेठिकाणी checking साठी थांबावे लागले,जवळ जवळ २ तास तिकडे गेले.. आणि तिथे कडकडीत उन्ह..
आता इथून पुढे कोणतंही सरोवर दिसलं की ते मानस सरोवर का किवा कोणतंही शिखर दिसलं की तो कैलास पर्वत का असं वाटत होतं.. केळकर काका आमच्या गाडीत होते ते माहिती देत होते.. सभोवताली वाळूच्या छोट्या छोट्या टेकड्या दिसत होत्या.. आमची उत्सुकता शिगेला पोहचली होती..
काही वेळाने समोर अगदी दूरवर निळ्या-हिरव्या रंगाचे पाणी दिसू लागले.. केळकर काका म्हणले ते पहा मानस सरोवर.. बास,आता patience संपला.. खरंच तिथे जलाशय आहे का अजून काही वेगळे आहे असे वाटत होते.. पुढे एका point  वर गाड्या थांबवल्या गेल्या.. तिथून समोर लांबून मानस सरोवर दिसत  होते..  उजवीकडे कैलास पर्वताचे दर्शन होते.. पण नेमके तेव्हा त्या बाजूला ढग जमा झाले होते त्यामुळे काहीच दिसत नव्हतं..
एरवी ढग आले की माझा मन किती फुलतं आणि आज फार राग आला त्या ढगांचा.. झाडू घेऊन तिकडचं आभाळ स्वच्छ झाडावं असं मला वाटायला लागलं.. कैलासपती आम्हाला दर्शन कधी देणार आशु हुरहूर मनाला लागली.. भीम भैया म्हणले थोड्यावेळाने ढग जातील तिथले पण आम्ही मात्र बैचेन झालो.. निसर्गापुढे आपलं काहीच चालत नाही याचा प्रत्यय आला.. इथपर्यंत आलोतरी  ढगाळ हवामानामुळे कैलास दर्शन होईल का हि गोष्ट आपल्या हातात बिलकुल नाहीये..
या point वरून डावीकडे एक पर्वत आहे (नाव आठवत नाही).. त्या पर्वतातून मानस सरोवराचे पाणी येते.. यामागे अशी गोष्ट आहे की एक शिवभक्त राजा होता तो शंकराची मनोभावे भक्ती करायचा.. शंकराने प्रसन्न होऊन त्याला इच्छित वर मागण्यास सांगितले तेव्हा राजा म्हणलं मला तुझ्या चरणाशी आश्रय दे.. तेव्हा कैलास पर्वताच्या अगदी समोर हा या पर्वताच्या रुपामध्ये या राजाला स्थान मिळाले.. आणि आश्चर्य म्हणजे या पर्वताची शिखरे कैलासाच्या बाजूला झुकलेली दिसतात.. माझ्या सध्या गरीब कॅमेरामध्ये या गोष्टी मी टिपू शकले नाही याचा मला थोडं वाईट वाटलं.. असो.. मनाच्या कप्प्यात सगळं काही साठवून ठेवायचे माझे अथक प्रयत्न चालूच होते..
त्या पवित्र भूमीला स्पर्श करून मी वंदन केले.. अन पाय मानस सरोवराकडे वळले.. १०२ km लांबी असलेल्या या सरोवराची परिक्रमा गाडीतून केली जाते.. सुरुवातीला एके ठिकाणी पूजा आणि दर्शनासाठी गाड्या थांबवण्यात आल्या.. गाडीतून सगळ्यात आधी मी पळत पळत काठाशी आले.. कुठे निळी ,कुठे हिरवी  तर कुठे उन्हात चमकणारी सोनेरी छटा  दिसत होती.. वरती ढग नव्हते त्यामुळे ढगांमुळे वेगळ्या छटा दिसतात असंही म्हणायची सोय नव्हती.. स्वच्छ नितळ या शब्दांचा नेमका अर्थ त्या पाण्याकडे बघून समजत होता..  आधी त्या पवित्र पाण्याला स्पर्श करू आणि मग सावकाश फोटो काढू असे ठरवून लगेचच मी  जर्किन ,टोपी ,शूज  इत्यादी काढून ठेवले आणि पाण्यात गेले.. आणि गेल्या गेल्या खिशात ठेवलेल्या माझ्या  लाडक्या  कॅमेराने  मानस सरोवरात उडी मारली.. क्षणभर मला हसावे का रडावे कळले नाही कारण कारण पडून पडून तो कॅमेरा मानस सरोवरात पडला होता.. केव्हढ त्याचं  भाग्य,काय बोलणार मीतरी..  मग कॅमेरा पुसला,चालू करून पहिला,एक फोटो निघाला आणि लेन्स अडकली.. त्या कॅमेराच्या नादात माझे दर्शन आणि पूजा नीट व्हायची नाही म्हणून मी तो कॅमेरा मग तसाच आत ठेवून दिला.. हे प्रकरण  कोणालाच कळलं नव्हतं कारण मी सगळ्यांच्य आधी इकडे आले होते..
आता सगळे जण काठाशी जमले होते..  स्त्रियांना कपडे बदलण्यासाठी टेंट बांधणार होते.. महेश आणि शेरपा लोक ते काम कात होते पण काही कारणाने ते टेंट उभारू शकले नाही.. मग सगळे पुरुष दुसर्या बाजूला लांब निघून गेले.. मी पाण्यात उभी होते,भारावले गेले होते.. काही कळायच्या आत सगळ्या काकुनी तिथे काठावर  कपडे बदलायला सुरुवात केली.. थार्मल्स वगैरे भिजून द्यायचं  नव्हतं.. त्यामुळे डुबकी मारण्यासाठी सगळ्याजणी वेगळे कपडे घालत होत्या..
मलाही त्या पवित्र पाण्यात डुबकी मारून आतापर्यंत केलेले सगळे पाप धुवून काढायची प्रबळ इच्छा होती.. पण असं उघड्यावरच कपडे बदलण्याचे धाडस मला नाही झालं.. मी थोड्या जणींना म्हणलं आपण ओढणी ,टॉवेल धरून एकेकीने कपडे बदलूया पण माझं कोणी ऐकलंच नाही.. त्या सगळ्याजणी काकू होत्या,त्यांना काहीच लाज वाटली  नाही पण मला नाही जमलं त्यांच्यासारख तसं,मी अजून लहान आहेना.. क्षणभर वाटलं कसे हे स्वार्थी लोक,आपले आपले कपडे बदलून पाण्यात गेलेही लगेच.. पण मग वाटलं चूक कोणाचीही नाही..  सगळेच त्या पाण्याकडे आकर्षले गेले होते.. सगळेच खूप खुश होते,एका वेगळ्या जगात गेले होते.. सर्वाना अंघोळ करून पूजा करायची घाई झाली होती.. मी एकंदर परिस्थिती ठरवून डुबकी मारण्याचा अट्टहास करायचा नाही असं ठरवलं.. हात पाय तोंड धुतले.. डोक्यावर आणि सर्वांगावर पाणी शिंपडले.. माझ्या नशिबात कदाचित इतकंच होतं.. पण मी पण वेगळ्या धुंदीत गेले होते तेव्हा.. त्या सरोवराकडे,आजूबाजूच्या शिखरांकडे किती पाहू अन किती नको असं होत होतं..
सगळ्यांनी शिस्तीत पूजा अर्चना सुरु केली.. मानस सरोवराचे सौदर्य आणि स्वच्छता बाधित ना करता पूजा करण्याची सूचना आधीच सर्वाना दिली गेली होती.. मी पूजेसाठी आणलेले बेलाचे पान, हळदी कुंकू, कपूर आणि उदबत्ती माझ्या मोठ्या ब्यागमध्ये राहिले हे इकडे आल्यवर माझ्या लक्षात आले.. काळ sack मध्ये टाकायचं मी विसरले होते.. आता मी पूजा कशी करू असं वाटू लागले.. पाण्यातच एकटी उभी होते मी कितीतरी वेळ.. तेव्हा समोर अचानक आकाश निरभ्र झाले आणि कैलासाचे शिखर दिसू लागले.. बाकीच्यांचा तिकडे बिलकुल लक्ष नव्हते तेव्हा मी त्यांना म्हणला समोर पहा कैलास पर्वत.. तेव्हड्यात पुरुषांच्या बाजूने जोरात आवाज आला कैलासनाथ  पहा समोर!! खरा सांगू तेव्हा माझ्या डोळ्यातून आपोआप घळाघळा  पाणी वाहू लागले.. महादेवाला म्हणलं आज तुझी पूजा करण्यासाठी माझ्याकडे फक्त माझे अश्रू आहेत,तेच वहाते तुला..
ब्रह्मदेवाच्या मनात या सरोवराची कल्पना झाली म्हणून याला मानस सरोवर म्हणतात.. पृथ्वीवरचे सर्वात शुध्द पाणी.. या पाण्यात सर्व  देवदेवता अंघोळ करतात असं म्हणतात.. अशा या पाण्यात आज मी उभी होते.. मला येतात ती सर्व स्तोत्रे मी तिकडे उभी राहून मनातल्या मनात म्हणले,कैलास मानस आणि सर्व देवांची मनोभावे मी मानस पूजा केली..
दुपारची वेळ असल्याने पाणी अगदी गार नव्हते पण पाण्यातून बाहेर आले आणि थंडी वाजू लागली.. बाकीच्यांचा पूजा पाठ अजूनही चालू होता.. मी पुन्हा स्वेटर  जर्किन अडकवलं आणि काठावर शांतपणे बसले.. कॅमेरा काढून पहिला तर लेन्स पूर्णपणे अडकली होती,फोटो काढणं शक्यच नव्हतं.. जगातल्या सगळ्यात सुंदर जागेवर मी बसले होते,समोर कैलासाचे शिखर दिसत होते आणि मानासारोवाराचे  अथांग रूप विविध छटानी सजलेले दिसत होते आणि नेमका माझं कॅमेरा बंद पडला.. चूक माझिंच,पाण्यात जाताना कॅमेरा बाजूला ठेवायला हवा होता.. backup म्हणून आणलेला कॅमेरापण काठमांडूला विसरले होते ही सुधा माझीच चूक.. मोबाईल गाणी एकून डिस्चार्ज मीच केला होता,नाहीतर त्यातनं तरी काढले असते फोटो.. माझी माझ्यावरच चिडचिड होऊ लागली.. पण क्षणात ही भगवंताची लीला आहे असे वाटले.. मी एखाद्या गोष्टीबद्दल,व्यक्तीबद्दल फार लगेच attach होते.. कॅमेराबद्दल मला खूप आसक्ती आहे.. सारखा कॅमेरा लागतो.. आता बंद आहे तर मला किती वाईट वाटतंय.. हेच माझं चुकत होतं.. आणि कदाचित याबद्दल धडा मिळावा मला,माझी आसक्ती कमी व्हावी म्हणून या सुंदर जागेवर माझं कॅमेरा बंद पडला होता.. मग मी ठरवून टाकलं, जर हा कॅमेरा सुरु झालं नाहीतर मी या पुढे कधीच कोणत्याही ट्रीपला फोटो काढणार नाही,कॅमेरा वापरणार नाही.. फोटो काढले नाहीतर कुठे बिघडतं.. उगाच फोटो काढायचे,कोणाला दाखवयचे मग ते कोणी म्हणणार ते छान आले आहेत किवा अजून असं काही..हे सगळं निरर्थक आहे,क्षणिक आनंद देणारं आहे वगैरे विचार माझ्या मनात चालू होते.. कॅमेरा तसाच ठेवून दिला आणि शांत झाले.. एकटीच अशी कितीतरी वेळ शांत बसले..
नंतर तिथून जवळच जेवणाची व्यवस्था केली होती.. केळकर काक्नी बघितलं,इतका वेळ उत्साह असलेली ही एकदम शांत झाली.. ते मला जेवायला घेऊन गेले.. जेवणाचा ताट घेऊन मी पुन्हा काठावर बसले.. समोर कैलास मानस आणि मी खाली मांडी घालून बसून जेवण करत होते.. कदाचित हे माझ्या आयुष्यातलं सर्वात बेष्ट जेवण होते.. कैलास पर्वताचा इथून south pole दिसत होता.. पर्वतावर एकाबाजूला  ठळकपणे   ओम दिसत होता,खरंच अजिबात अतिशयोक्ती नाही.. :)
नंतर गाडीत बसल्यावर केळकर काका म्हणले आईबाबांची आठवण येत आहे का तेव्हा मला रडू आलं.. खरंच मला आईबाबांची खूप आठवण येत होती याजागेवर..  माझं रडणं बघून बिचारा आमचा चीनी ड्रायवर कावराबावरा झाला.. हिला काय झालं त्याने खुणेने विचारले तेव्हा बाकीचे म्हणले काही विशेष नाही.. :)
आता आमची गाडीतून मानस सरोवराची परिक्रमा सुरु झाली.. कितीतरी विशाल पात्र वाटत होते ते.. सोरोवाराचे वर्णन शब्दात पकडता येत नव्हते खरंतर.. शब्द आणि माझी दृष्टी अपुरी पडत होती त्यासमोर.. वाटेत राक्षस/रावण तलावापाशी आम्ही थांबलो.. हे सरोवर लांबूनच पहिले.. तिथले पाणी रावणाच्या संबंधित असल्याने अपवित्र मानले जाते.. त्याच्यामागेही एक प्रसिद्ध कथा आहे..
मग  आम्ही मानस सरोवराच्या दुसर्या टोकापाशी आलो.. तिथे guest  house आहे.. ते लोकेशन फार भारी होतं..  रूम मधून बाहेर आल्यावर समोर कैलासचे शिखर आणि जवळच  मानस सरोवर..
नंतर थोडा आराम केला.. एव्हाना  मी  रडले आणि माझा कॅमेरा पाण्यात पडला ही गोष्ट वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली होती.. मनाशी निश्चय केला आठवण म्हणून २/४ फोटो मोबाईल मधून काढू बास.. केळकर काकांकडे गेले.. मोबाईल चार्ज होईल का इकडे कुठे विचारले.. त्यांना कॅमेरा बंद पडलेलं कळलं होतं.. आणि विशेष म्हणजे त्यांनी चक्क त्यांचा कॅमेरा मला दिला,घे यातून काढ फोटो असं म्हणले.. मी नको म्हणलं,प्रत्येकाला आपल्या आपल्या कॅमेरातून फोटो काढायचे असतात ना,उगाच कशाला मी त्यांचा कॅमेरा घेऊ.. तर त्यांचा मुलगा अनिकेत म्हणला बाबा विशेष फोटो काढत नाही,just कॅमेरा जवळ ठेवून २/४ फोटो काढतात ते.. तुझं मेमरी  कार्ड चालत असेल तर या कॅमेरात घाल म्हणजे तुझे फोटो continue करता येतील.. मग काका म्हणले अनिकेत काढतोच आहे आमचे प्रोफेशनल फोटो.. तू बिनधास्त वापर हा कॅमेरा.. आणि माझेही अधूनमधून थोडे फोटो काढ बायकोला दाखवायला.. :) बास मग मी लई खुश झाले.. मेमरी कार्ड घालून त्यांचा कॅमेरा घेऊन लगेच सरोवरापाशी गेले आणि मनसोक्त फोटो काढले.. माझा चेहरा फुलाला होता तो केवळ केळकर काकांमुळे.. गम्मत म्हणजे संध्याकाळी माझा कॅमेरा आपोआप ठीक झाला.. आता घरी जाऊन या कॅमेराची पूजा कर असं सगळेजण जातायेता  मला म्हणत होते.. मग काकांना त्यांचा कॅमेरा परत देऊन त्यांचे मनापासून आभार मानले..
संध्याकानंतर मात्र थंडी अजूनच वाढली.. रात्री सरोवरापाशी चक्कर मारायचा माझा विचार होता पण नेमका ढगाळ वातावरण होतं,चांदण्याचा कुठे पत्ता नव्हता.. पहाटे ३ ते ६ या ब्रम्ह मुहूर्ताच्या वेळेस सगळे देव देवता मानस सरोवरात अंघोळ करायला येतात तेव्ह्या कधी कधी पाण्यात ज्योत दिसते असं मी वाचून आले होते.. रात्रीच्या जेवणानंतर मी हे सगळ्यांना सांगितलं आणि म्हणलं जाऊयाका हे पाहायला आपण..  ज्योत दिसेलच अशी काही खात्री नव्हती पण पहाटेचं सौदर्य तरी बघता येईल म्हणलं.. जवळजवळ सगळेच यायला तयार झाले पण ब्रह्म वेळ  आपल्या घडल्याप्रमाणे क चीनी घडल्याप्रमाणे यात वाद होता.. इथे आहोत तर इथल्या घडल्याप्रमाणे असे माझे मत होते आणि तसेच ठरले.. सर्वाना उठवायचे  काम माझ्याकडे होतं.. इथे चार्जिंग ची सोय असल्याने मोबाईल चार्ज झाला होतं.. आपल्या  १चा  म्हणजे चीनी ३.३०चा गजर लावला आणि मी शांतपाने  झोपून गेले..

२ टिप्पण्या:

Pankaj - भटकंती Unlimited म्हणाले...

"उगाच फोटो काढायचे,कोणाला दाखवयचे मग ते कोणी म्हणणार ते छान आले आहेत किवा अजून असं काही..हे सगळं निरर्थक आहे,क्षणिक आनंद देणारं आहे"
साफ अमान्य. क्षणिक आनंद पुन्हापुन्हा अनुभवता यावा म्हणूनच तर फोटो असतात.

वृंदाली.. म्हणाले...

hmm.. patala.. :)