रविवार, २० मार्च, २०११

मंतरलेले दिवस - २०


संघर्ष कोणास चुकला ?
Life partnerचं महत्व आताशा कळू लागलंय.. पण मग वाटतं की सगळ्यांच्याच नशिबात असे चांगले जोडीदार मिळतीलच असं सांगता येत नाही.. प्रत्येक स्त्री 'सौभाग्यवती' होतेच असं काही नाहीना.. असे विचार चालू असतानाच रेडिओवर किशोरदांच गाणं लागलं.. 
" कुछ रीत जगत की ऐसी है, हर एक सुबह की शाम हुई..
तू कौन है, तेरा नाम है क्या, सीता भी यहाँ बदनाम हुई..
फिर क्यूँ संसार की बातों से, भीग गये तेरे नयना.. "
आणि मग मनात प्रश्न उमटला.. संघर्ष कोणत्या स्त्रीला चुकला???
सीतेच्या स्वयंवराची गोष्ट सर्वश्रुत आहे.. श्री रामाची पत्नी झाल्यावर तिला किती धन्य वाटले असेल.. पण लंका  प्रकरणानंतर तिला प्रजेच्या इच्छेनुसार वेगळं व्हावं लागल्यावर  आणि शेवटी स्वतःचं पावित्र्य सिद्ध करताना तिच्या मनाची स्थिती काय झाली असेल?   
राधा कृष्णाची जोडी म्हणजे शुद्ध प्रेमाचे प्रतिक.. राधेचं मन चोरलेला तो कान्हा जेव्हा गोकुळ सोडून जातो तेव्हा राधेची हालत कशी झाली असेल? कसं सावरलं असेल तिने मनाला? 
यज्ञ अग्नीतून प्रकट झालेली तेजस्विनी द्रोपदी.. पाच पती समोर असतना दुर्योधनाने भर सभेत तिच्यावर हात टाकला तेव्हा तिने काय दुखं भोगलं असेल? 
पांडू पत्नी कुंतीवर तिच्या मुलांच्या जन्मावरून भलतेसलते आरोप केले गेले तेव्हा तिची दशा कशी झाली असेल? 
या सर्वजणी तर देवीची रूपं आहेत.. तरी त्यांचं आयुष्य सोपं नव्हतं.. मग तुमची आमची तर गोष्टच निराळी..
बर गानसम्राज्ञी लता दिदींनी लग्न का नाही केले?  romantic गाणी गाताना त्यांच्या मनात लग्नाचे विचार कधी आले नसतील का? प्रेमाची जुनी गाणी evergreen सदाबहार आहेत.. ती गाणी म्हणताना त्यांच्या मनात कधी प्रेमाचा अंकुर फुटला नसेल का?
मराठी साहित्यातील रसिकप्रिय बहुश्रुत साहित्यिक म्हणजे शांता शेळके.. यांचं लग्न १६व्या वर्षी नावापुरतं झालं, पुढे टिकलं नाही..  तेव्हा अशा परिस्थितीतून हळुवार कविमनाला त्यांनी कसं सावरलं असेल? "ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा,माझ्या मनातला का तेथे असेल रावा ?"  हे गीत त्यांना कधी कसं सुचलं असेल..
वेगवेगळ्या क्षेत्रात अशी अजून हजारो उदाहरणे आहेत.. या सगळ्यातून निष्कर्ष हा निघतो की या सर्व थोर स्त्रियांनाही बरंच सोसावं लागलं पण त्यांनी त्यांच्या आयुष्याचा उद्देश ओळखून त्या दिशेने वाटचाल केली.. त्या त्या क्षेत्रात त्यांनी उंची गाठली.. त्यांना त्यांच्या आयुष्याचा खरा अर्थ कळला होता.. 
या पार्श्वभूमीवर मी माझा विचार करते तेव्हा जाणवतं की मला एक मुलगी म्हणून कधी कधी वाटतं लग्न करून संसारात रमून जाऊ.. पण ती गोष्ट म्हणजे अभ्यास करून परीक्षा पास करण्यासारखी नाहीये.. मग वाटतं मनसोक्त भटकंती करूया.. कधी वाटतं अध्यात्माचा अभ्यास करावा,  meditation वगैरे करून स्वतःचा आणि परमेश्वराचा शोध घ्यावा.. पण ते वाटतं तितकं सोपा नाहीये,त्यासाठी गुरुकृपा आणि खूप मेहनत लागते.. तर कधी वाटतं चांगला वेळ आहे आपल्यापाशी तर social work करू ,"जनसेवा हीच ईश्वरसेवा!!".. करावं तर बरंच काही वाटत असतं पण एक निश्चित वाट मिळत नाहीये.. मन किती चंचल असतंना.. सतत वेगवेगळे प्रश्न मनात येत राहतात.. म्हणून  मलाही माझ्या आयुष्याचा जो काही उद्देश असेल तो आता लवकरात लवकर कळावा असं मनापासून वाटतं आणि त्यासाठी मी  ईश्वरचरणी प्रार्थना करते !!! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: