सोमवार, २३ एप्रिल, २०१२

वर आभाळाचे छप्पर.. खाली मातीचा आधार..
कसे अन किती देवा, मानू मी तुझे आभार..

गतकाल विस्मृतीसाठी येते ती अंधारी रात्र..
नवसंधी देण्यासाठी उगवतो तो रोज सूर्य..
रंगलेल्या क्षणांची साक्ष देते ती सजून सांज..
कसे अन किती देवा, फेडू मी तुझे ऋण..

आसवास साथ देण्यासाठी पडे त्या जलधारा..
पुढे पुढे जाण्यासाठी वाहे तो उत्साही वारा..
प्रितीच्या गोडीसाठी  तो चांदण्याचा शिडकावा..
कसे अन किती देवा, जाणू मी तुझ्या लीला..

नवी स्वप्ने ओवण्यासाठी उमलतात ती फुले..
मनोरथ आवरण्यासाठी रुततात ते काटे..
निळा आनंद देण्यासाठी ते पाणी निळे निळे..
कसे अन किती देवा, रचू मी तुझे गाणे..

रविवार, १५ एप्रिल, २०१२

मंतरलेले दिवस - ६०


त्या दिवशी मला जरा उशीर झाला होता,घाईघाईत फूडकोर्ट मध्ये गेले..  एव्हाना सगळ्या जणींनी जेवण सुरू केले होते.. त्यांची जोरात चर्चा चालू होती.. काही मिनिटात मला त्या कशाबद्दल बोलत आहे ते समजले.. कोणीतरी एक मुलगी बसमध्ये जप करत होती, तिचे डोळे मिटत होते तरी ती जबरदस्ती जप करत होती, इतकं काय नडलय असे त्यांचे म्हणणे होते.. मी बोलणार होते कदाचित तुम्हाला बाहेरून वाटत असेल तिला झोप येत आहे असे पण ती मन लावून जप करत असु शकते.. पण मी शांत बसले.. मग एक जण सांगत होती की एक ओळखीचा खूप हुशार मुलगा यूसमध्ये शिकला पण नंतर एका संस्थेच्या नादाने डोक्यात खूळ बसले,गरजे पुरतेच कमावणार म्हणून कॉलेजमध्ये नोकरी करतो.. नंतर त्या सर्वजणींनी त्या मुलावर आणि जे materialistic thinking बरोबर नाही असे म्हणतात अशा सर्वांवर यथेच्छ टीका केली.. त्यांच्या दृष्टीने शॉपिंग, मुव्हीस, पैसा, फॅशन, मेकअप ,ऐश इत्यादी हेच आयुष्य.. ज्यांना हे सगळे आवडत नाही ते लोकं बोर.. या मैत्रिणिंची 'देवावर श्रद्धा ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा.. महाभारत,रामायण हे खरे घडले याचा सबुत काय' अशी विचारसरणी..

हे सगळे ऐकून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की या मुली जशा त्या जप करणार्‍या मुलीवर किंवा त्या कॉलेजमध्ये काम करणार्‍या मुलावर टीका करत होत्या तसे माझ्या मागे माझे मेल्स वाचणारे कितीतरी फ्रेण्ड्स मला ठेवत असतील.. मीतर दासबोध,भग्वदगीतेतील श्लोक कितीदा पाठावते किंवा कित्येकदा मला पडणारे प्रश्न मेल मध्ये लिहीत असते ते वाचून तर लोक मला वेड्यात काढत असतील.. माझे  या वयात कैलास मानस यात्रा, चारी धाम यात्रा, गोवर्धन परीक्रमा इत्यादी झाले आहे त्यावरही नावे ठेवली जात असतील.. काय माहिती.. पण मग विचार केल्यावर जाणवले की नावे ठेवण्यासारखे अजुन पुष्कळ विषय लोकांना माझ्यात सापडत असणार.. लग्न नाही का करायचे हिला? सारखी भटकते,घरचे काही बोलत नाही का तिला? किंवा असेच बरेच काही.. इथून तिथून बोलणारे मला बोलतच असणार त्यामुळे मी दुर्लक्ष केलेलेच बरे..

आता राहतो तो प्रश्न देवावरच्या विश्वासाचा अन् अध्यात्म रुचीचा.. मला वाटते की आपण जीवनात जितके सोसतो तितके परमेश्वराच्या जवळ जातो.. किंबहुना भौतिक गोष्टीतून भगवंताची आठवण यावी म्हणूनच मनुष्याला दुख दिले जाते असे मी कुठेतरी वाचले होते.. कधी कधी आपण प्रामाणिकपणे अथक प्रयत्न करूनही काही गोष्टी साध्य होत नाही त्यावेळेस सगळे आपल्या हातात नसते या तत्वावर विश्वास ठेवावच लागतो.. मग कोण आहे सुत्रधार? निसर्गाच्या किमयेचा ज्यांनी अगदी मनापासून अनुभव घेतलाय त्यांना ही अद्भुत निर्मिती कोणाची असा विचार करावाच लागतो.. अशा असंख्य प्रश्नांचे एकच उत्तर ते म्हणजे तो परमेश्वर.. किती छोट्या छोट्या गोष्टीतून त्याचे अस्तित्व जाणवत असते.. अर्थात परम सत्य  समजायला अनेक जन्म जावे लागतात.. त्यामुळे जे अगदीच नास्तिक आहेत ते अजुन मागच्या पायरीवर आहे, माझ्यासारखे गोंधळलेल्या स्थितीत असणारे नवशिके लोक मधल्या एका पायरीवर आहेत, ज्यांना सदगुरू सहवास, कृपा लाभली आहे ते वरच्या पायरीवर आणि ज्याना प्रत्यक्ष  भगवंतांचा शोध लागला आहे,प्रत्यय आला आहे ते सर्वोच्च पायरीवर असतात असे म्हणायचे.. बाकी  काय..  :-)






मंगळवार, ३ एप्रिल, २०१२

आनंद वेदनेतील..

कधीतरी अचानक विचारांचे वादळ उठते..
आठवणींची वीज कडाडू लागते..
आसवांचा पाऊस कोसळू लागतो..
अन् मनाचा बांध तुटून जातो..

पण अशा उध्वस्त स्थितीतही एक सुगंध वाहू लागतो..
त्या वेदनेतही एक आनंद जाणवू लागतो..
कारण तेव्हा एक जाणीव जीवाला स्पर्शून जाते..
व्यवहाराच्या आगीत होरपळलेल्या त्या  भावनाफुलाच्या, जिवंतपणाची ..
तेवढीच तर एक साक्ष शिल्लक असते..

शनिवार, ३१ मार्च, २०१२

मंतरलेले दिवस - ५९ : भाग ४

ताजमहल!!!  :)

सकाळी ६.३०लाच ताजमहल् बघायला निघालो.. माझ्या दोन्ही पायाना फोड आले होते त्यामुळे अख्खा दिवस लगंडत होते.. ताजच्या कॅम्पसमध्येच आम्ही राहत असल्याने चालत जाण्यासारखे अंतर होते.. भारतीयांसाठी ३०रुपये तर फोरेनर्ससाठी २०० रुपये प्रवेश फी होती.. तिकीट काउंटरपासून साधारण १किमी ताज उभा होता.. त्या परिसरात बाहेरील गाड्यांना परवानगी नव्हती म्हणून अंतर्गत शटल्स ठेवल्या होत्या.. इतक्या सकाळीही ताजमहल् पाहण्यासाठी बरीच गर्दी होती,विशेष करून फोरेनर्स लोकं जास्त होते.. मुख्य द्वरापाशी येताच समोर ताजमहल्चे अतिशय सुंदर दर्शन झाले.. पुर्वीपासून त्याचे इतके फोटो पहिले होते की आपण पहिल्यांदाच ताज महल् पाहतोय असे मला बिलकुल वाटले नाही.. पण सोनेरी कोवळ्या किरणांमध्ये तो महल् खरच फार सुंदर दिसत होता.. समोरच्या तळ्यामध्ये उमटलेले प्रतिबिंब मनाला मोहवून टाकत होते.. सभोवतालची बाग अजुन शोभा वाढवत होती..  कारंजे मात्र बंद होते, ते चालू असते तर अजुन  सुरेख दिसले असते कदाचित.. फोटो किती काढू अन् नको असे प्रत्येकालाच होत होते.. या बाजूने त्या बाजूने, मधून, जवळून, लांबून अश्या किती असंख्य दिशेने क्‍लिकक्लिकाट चालू होता.. बाकी त्या मार्बेल नक्षीकामाबद्दल, तिथल्या कोरीव कामाबद्दल वेगळे काय सांगायचे.. ती खरच किती नशिबवान होती जिच्या प्रेमाखातर हा महल् बांधला गेले होता.. या व्यवहारी जगात खरच कोणी कोणावर इतके प्रेम करते तर..

मुख्य महालात चप्पल शूजला परवानगी नव्हती.. आणि आतमध्ये फोटोस सुधा काढून देत नव्हते.. तेजोमहालय बद्दल नुकातच माझ्या लंचग्रूप मध्ये खूप चर्चा झाली होती.. त्यामुळे तिथे पुर्वी महादेवाची पिंड होती आणि नंतर त्याला ताज महालात रुपांतर केले गेले अशी काही माहिती मिळाली होती..आत गेल्यावर मी पाहत होते कुठे पिंड दिसत आहेका पण खाली जायचा रस्ता बंद केला होता.. बाकी काही असो, एक गोष्ट फार खटकली.. जगातले सातवे आश्चर्य म्हणल्या जाणार्‍या या महालात अगदी मुख्य दालनातसुद्धा कचरा पडलेला दिसला तेव्हा फार कसेतरी झाले.. निदान ही जागा तरी स्वच्छ ठेवायला जमात नाही का आपल्या सरकारला.. देशविदेशातून लोकं येतात त्यांच्या मनात भारताविषयी काय मत होत असेल हे बघून.. असो.

ताजमहाल पाहून झाल्यावर आमची ट्रिप संपली.. आता परतीचा प्रवास सुरू झाला होता.. जाता जाता आग्र्याची प्रसिद्ध लस्सी ड्रायवरने आवर्जून  घ्यायला लावली.. ३/४ दिवसाच्या या छोट्या कालावधीत बरेच काही मिळवाल्याचा आनंद मनातून ओसंडून वाहत होता!!!

मंतरलेले दिवस - ५९ : भाग ३

व्रजभुमी : मथुरा - गोवर्धन - वृंदावन

सकाळी ६ वाजता आम्ही मथुरेला निघालो.. वातावरण एकदम प्रसन्न होते.. :) इथे यायच्या आधी कितीतरी दिवस मी गुगलवर या भागात काय काय पाहावायाचे याबद्दल माहिती वाचत होते आता आज एका दिवसात त्यापैकी किती आणि कसं पाहायला मिळेल याची उत्सुकता शिगेला पोहचली होती.. आग्रा मथुरा अंतर साधारण ५०किमी आहे.. ७.३०ला आम्ही मथुरेमधील श्रीकृष्ण जन्मस्थानापाशी पोहचलो.. ते जन्मस्थान म्हणजे पुर्वीचे कारागृह होते जिथे वासुदेव-देवकीला कंसाने कैद करून ठेवले होते.. बाहेरून मोठे मंदिर बांधून आतील भाग तसाच अगदी कारागृहसारखाच ठेवला आहे.. मंदिरात जाताना सेक्यूरिटी अगदी कडक आहे.. कॅमरा फोन सोडाच पण कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू तिथे चालत नाही.. ते लोक ब्याग अगदी नीट तपासूनच मग आत सोडत होते.. मुख्य गाभार्‍यात जाताना मोठे बुलण्द दरवाजे त्यावेळच्या कारागृहाची कल्पना देत होते.. एकाच्या एक असे आम्ही बरंच आत जात होतो.. त्याकाळी वासुदेव बाळकृष्णाला गोकुळात सोडण्यासाठी निघतात तेव्हा हे दरवजे आपोआप उघडतात हे सगळं मी तिथून आत जाताना कल्पनेत बांधत होते.. सगळीकडे पोलिस बंदुका घेऊन सज्ज होते.. अगदी आत जन्मस्थानाच्या पवित्र ठिकाणी आम्ही पोहचलो आणि मी भारावून गेले.. त्या खोलीमध्ये त्या जागेवर श्रीकृष्णाचा स्पर्श झाला होता तिथे मी नतमस्तक झाले.. देवकी-वासुदेव आणि बाळकृष्णाचा फोटो तिथे ठेवला होता.. 'श्री कृष्णाय नमः' या जपाच्या रेकॉर्डिंगने तिथले वातावरण मन्त्रमुग्ध झाले होते.. आणि आम्ही सकाळी सकाळी आल्याने इथे विशेष गर्दी नव्हती त्यामुळे खूप शांतपणे आम्हाला दर्शनाचा लाभ घेता आला.. मला ही जागा फार आवडली.. इथेही आत पोलीस होतेच.. कदाचित अयोध्याप्रकरणामुळे इथे कडक सुरक्षितता ठेवत असतील.. तिथून बाहेर पडलो आणि मग त्या आवरता मोठ्या,भगवदभक्तान्ची मंदिरे होती.. तो परिसर स्वच्छ आणि पवित्र जाणवत होता.. तिथे कृष्णाच्या बाललिलांचा देखावा अतिशय सुंदररित्या मांडला होता..

तिथून मग आम्ही पुढे द्वारकधिश या मथुरेतील प्रसिध्द मंदिरात गेलो.. बाबा म्हणले कृष्ण जन्म सोहळा आणि इतर कार्यक्रम सगळे या मंदिरात मोठ्या प्रमाणात साजरा केले जातात,त्यानी टीव्हीवर बरेचदा पहिले आहे असे ते म्हणाले.. या मंदिरात जाताना अगदी छोटी गल्ली होती त्यामुळे गाडी नेता आली नाही.. मग आम्ही तिथले लोकल वाहन म्हणजे सायकल रिक्षा केली.. पण आम्ही जेव्हा बसलो आणि तो माणूस सायकल चालवू लागला तेव्हा मला आणि बाबांना वाटले उगाच आपले ओझे हा मनुष्य वाहत आहे,आम्हाला अजिबात बरोबर वाटले नाही.. उतरल्यावर बाबांनी त्या माणसाला त्याने मागितले त्यापेक्षा जास्त पैसे दिले.. हा गल्लीतला प्रवास म्हणजे मथुरा दर्शन होते.. छोटे गाव आणि सगळीकडे गायी,वासरे.. मला बर्‍याच लोकांनी सांगितला होतं की मथुरा वृंदावन अजिबात स्वच्छ नाहीए पण मला ठीकठाक वाटले.. कदाचित मी यापूर्वी अशी तीर्थक्षेत्र पहिली आहेत त्यामुळे मला विशेष काही फरक वाटला नाही.. आता द्वारकधिश मंदिरात अतिशय गर्दी होती.. श्रीकृष्णाची ही मूर्ती अगदी द्वारकेतल्या मुर्तीसारखी हुबेहुब होती,द्वारका ट्रिपची मला आठवण झाली.. मुर्तीच्या पुढे फुलांनी छान पायघड्या घातल्या होत्या आणि त्यामुळे दर्शन सगळ्यांनी कडेने लांबून घायचे होते त्यामुळे दर्शन लगेच आणि छान झाले.. त्या आवारात एकीकडे मधे गोटे ठेवले होते आणि सगळे त्याला प्रदक्षिणा मारत होते.. एका बाईला विचारले तर त्या म्हणल्या गोवर्धन पर्वताचे गोटे आहेत,त्याला प्रदक्षिणा घालतात परीक्रमा केल्यासारखे..  मग मी त्यांना गोवर्धन बद्दल थोडी माहिती विचारली.. मीतर इथे येताना बरीच माहिती काढून आले होते आणि परीक्रमा करायचे ठरवूनच आले होते पण तरी बाबांच्या समाधानासाठी पुन्हा त्यांना विचारले.. बाबांनी त्यांना विचारले,एकटी मुलगी करू शकेल ना तिथे बाकी लोकं असतातका? त्या बाई म्हणल्या खूप गर्दी असते तिथे,काळजीचे काही कारण नाही.. :)

आता नाश्ता करून गोवर्धनला जायचे होते.. इथे नष्त्याला गरम काचोरी + जिलेबी + दही / लस्सि याची सर्वत्र दुकाने होती.. आम्ही कचोरी खाल्ली.. बाबांनी मला जूस प्यायला लावला कारण आता मी २१किमी चालणार होते.. मथुरा गोवर्धन साधारण १५कमी अंतर आहे.. हा प्रवास छान होता.. श्रीकृष्णाची व्रजभुमी ती हीच..  आम्ही १०च्या सुमारास गोवर्धन येथे पोहचलो.. खरतर आधी आमचा प्लान असा होता की सकाळी सकाळी गोवर्धनला जायचे आणि उन्ह व्हायच्या आत परीक्रमा करायची आणि मग मथुरा वृंदावन पाहायचे.. पण तिथले सर्व मंदिर दुपारी १२ ते ४ बंद असतात असे कळले मग ४ नंतर अमचं सगळं पाहून झालं नसतं म्हणून सकाळी आधी मथुरा पाहून मग परीक्रमा आणि त्यानंतर मग वृंदावन असे ठरले.

आमच्या ड्रायवरने परीक्रमा सुरू होते तिथे सोडले.. बाबा तिथले मुख अरविंद मंदिर बघून परत गाडीमध्ये येणार होते.. तोपर्यंत मी काही बोलले नव्हते पण आता वेळ आली होती.. मी म्हणले माझी चप्पल गाडीतच ठेवते कारण ही परीक्रमा अन्वाणी करतात हे मी वाचले होते / ऐकले होते.. आता बाबा रागवले,म्हणले उन्हात असं चप्पल ना घालता चालत नसतात,काहीतरी उगाच काढू नकोस.. पण मग ड्रायावर सुधा म्हणाला की इथली गोवर्धन पर्वताची परीक्रमा अशी चप्पल न घालूनच करतात अशीच प्रथा आहे इथे.. बाबा खरतर तयार नव्हते पण मी निश्चय केला होता.. मला कोणी सांगितले नव्हते,माझं मला मनातून वाटत होते त्यामुळे मला चप्पल न घालून चालायचे,उन्हात चालायचे किवा २१ किमी या अंतरचे काहीच कष्ट वाटत नव्हते.. रस्ता तर अगदी सपाट होता,कुठेही चढ उतार नव्हते त्यामुळे दमायचा प्रश्न नव्हतं.. उन्हाची वेळ होती पण आता काही साध्य करायचे असेल तर थोडे कष्ट घायवेच लागणारना आणि मगच त्याचे फळ गोड लागते.. शिवाय हेच माझे वय आहे चालायचे,आज नाहीतर कधी करणार मी हे सगळे? नाही म्हणायला बाबांना माझी काळजी वाटत होती,एकटी २१किमी चालणार,हा रस्ता किती सुरक्षित आहे कोण जाणे.. मला यासाठीच घरच्यांसोबत येथे यायचे नव्हते,उगाच ते काळजी करत बसणार.. असो.. बाबांनी मला बिसलरि बॉटल घेऊन दिली.. ५ तासात होती ही परीक्रमा आणि मध्ये अध्ये वाटले तर रिक्षाही करता येते अशी तिथे माहिती मिळाली..  रस्ता कसा आहे ते पाहायला ते थोडं पुढे आले.. त्यांना काही लोकं चालताना दिसले ते सगळे अन्वाणीच चालत होते हे त्यांनी बघितले.. तेव्हड्यात एक गाडीवाला गाडीने परीक्रमा करायची आहे का विचारात होता.. हेपण मी वाचले होते की बरेच लोक गाडीने परीक्रमा करतात.. बाबा मग त्या गाडीत बसले.. त्यांना कदाचित मी एकटी कुठल्या रस्त्याने चालणार आहे,लोकं किती आहेत हे पाहायचे होते..  मी त्यांना म्हणले मी हळुहळू चालत,तुम्ही गाडीपाशी थांबा नंतर..

परीक्रमा सुरू..
आताशा उजवीकडे श्री गिरिराज - गोवर्धन पर्वताचे दर्शन होऊ लागले.. हा पर्वत उंच नाहीए पण लांब पर्यंत (२१किमी) पसरलेला आहे.. संपूर्ण व्राजवासींना या पर्वताखाली आश्रय मिळाला होता तर.. या पर्वताला श्रीकृष्णाचा स्पर्श झाला असल्याने मलाही त्या पर्वताला स्पर्श करून नमस्कार करायचा होता पण आता तरी पर्वत थोडा लांब होता..  त्यावर छोटे मोठे गोटे आणि उन्हळ्यामुळे वळलेली झाडे दिसत होती.. 

रस्ता सरळ साधा होता.. दोन्ही बाजूला दुकाने,मंदिरे अन् घरे मंदिरे होती.. मध्ये डांबरी रस्ता आणि उजवीकडे मातीचा कच्चा रस्ता किवा कुठे फारश्या टाकून केलेला फूटपाथ होता.. ठिकठीकाणी किती अंतर झाले याच्या पाट्या लावल्या होत्या.. ठीकठिकाणी पाणी, टॉयलेट इत्यादींची सोय होती.. लहान पोरं बाळं, कॉलेजची मुले, तरुण लोकं, नवरा बायकोंच्या जोड्या, वयस्कर लोकं अशी गरीबपासून श्रीमंत वर्गातली आबालवृद्ध मंडळी वीना चप्पल चालत होती.. प्रत्येकाच्या चालण्याच्या गातीप्रमाणे सगळे पुढे मागे चालत होते त्यामुळे मी एकटी अशी नव्हती.. बाबांनी हे पाहून निश्चिंत असावेत असे मनात वाटून गेले.. अर्थात एकटी मुलगी अशी मीच चालत होते.. बाकी बर्‍यापैकी सगळे ग्रुपमध्ये चालत होते.. मी सावकाश काही घाई न करता सगळीकडचे निरीक्षण करत फोटो काढत चालत होते.. उन्ह वाढल्यावर डांबरी रस्त्याला चटके बसू लागले मग मातीतून चालायला सुरूवात केली.. उजवीकडे गिरिराजाचे दर्शन घेत डोळ्यात जितके मावेल तेव्हढे साठवत पुढे जात होते.. मन कुठेतरी जायला लागले की मग राधेकृष्णाच्या नामात मनाला अडकवायचे प्रयत्न करत होते. वैष्णवीदेवीच्या इथे जाताना सर्व लोकं एकेमकांना 'जय मातादी' असे म्हणतात.. कैलास परीक्रमेच्या वेळेस 'ओम नमः शिवाय' आणि आता इथे सगळेजण 'राधे राधे' म्हणत होते... फोरेनर्स तर चक्क साड्या /धोतर नेसून हातात जपमाळ घेऊन जप करत चालताना दिसले तेव्हा मला फार नवल वाटले.. इस्कोन मुळे श्रीकृष्णाची भक्ति जगभर पसरली आहे तर..  रस्त्याच्या एका बाजूला पूर्ण वेळे माकडान्च्या टोळक्या होत्या, पण सुदैवाने ते आम्हाला काही करत नव्हते.. त्यांच्या इतक्या जवळून बिनधास्तपणे मी पहिल्यांदा अशी चालत होते.. गायी वासरे तर ठीकठिकाणी होती,चारा विकत घेऊन त्यांना खायला घाला अशी बरीच दुकाने होती.. खूपजन असे करत होते पण मी नाही केलं ते काही.. बरेच लोकं पैसे मागायला देखील बसले होते.. आणि चालणार्‍यांपैकी काहीजण त्यांना प्रत्येकाला पैसे देत दानधर्म करत चालत होते.. काहीजण पूर्ण लोटांगण घालत परीक्रमा करत होते ते पाहून मला घामच आला.. पुढे एकीकडे मला गिरिधर पर्वत अगदी जवळ आहे असा दिसला.. मग मी त्याच्या पायथ्याशी गेले,हात लावून नमस्कार केला आणि तिथला छोटासा गोटा पर्समधे ठेवला.. एक इच्छा पूर्ण झाली याचा आनंद झाला..
चालताना विचार आला,माझ्या पायांचे सुंदर म्हणून कधी कौतुक झाले नाही.. तरीही परमेश्वरसाठी या पायांचे चालणे झाले ही किती मोठे भाग्य..

१० किमी होईपर्यंत मी पाणी किवा अजुन काहीच घेतले नव्हते.. आता १२ वाजले होते,२ तास न थांबता न बसता चालत होते.. समोर उसचे गुर्हाळं दिसलं मग मला रस प्यायचा मोह झाला.. मी तिथे पटकन रस पिऊन लगेच निघाले.. माझ्यासोबतचे बरेचजन जोरात चालायचे आणि पुढे जाऊन बसायचे मग पुन्हा चालायला लागायचे.. मी मात्र कुठेही न बसता पण हळूहळू चालत होते.. आतापर्यंत निम्म अंतर वेळेत होते पण यापुढे जरा माझा वेग कमी झाला.. नंतर जाणवले की मला मातीतून चालताना पायाला काहीतरी टोचले आहे त्यामुळे पाय मी सावकाश टेकवत चालत होते.. रक्त वगैरे काही नव्हते कदाचित काहीतरी टोचून गेले असावे.. पण आता माझ्या मागून येणारे सगळे माझ्या पुढे जात होते आणि मी मात्र मंदपणे चालत होते.. मी दमले नव्हते बिलकुल  पण पाय नीट टेकवता येत नसल्याने जोरात चालता येत नव्हते.. चालताना मध्ये मध्ये वेगवेगळी छोटी छोटी गावे लागत होती.. कधी कधी रस्ता अगदी त्या गावच्या बाजारातून जायचा.. परीक्रमा करताना बोर होऊ नये म्हणून कदाचित बाजाराची ही करमणूक होती.. पण तिथे डांबरी रस्ता असल्याने पायाला चटके बसत होते,तिथून थोडं पळत जावे लागायचे..
एकीकडे एक गरीब माणूस बसला होता,तो माझ्या हातातील पाण्याची बॉटल पाहून मला पाणी मागू लागला.. मला वाटले पाणी तर इथे सगळीकडे उपलब्ध आहे आणि त्याच्या बॉटल मध्ये थोडे पाणी होतेच तरी का मागत आहे.. पाण्याला नाही म्हणू नये म्हणून मी माझ्याकडचे थोडे पाणी त्याच्या बॉटलमध्ये दिले पण मी माझ्याकडचे सगळे पाणी त्याला नाही दिले,मला लागेल अजुन बरच चालायचय म्हणून.. पुढे गेल्यावर मला वाटले की मी त्याला सगळे पाणी द्यायला हवे होते का,मला घेता आली असती नवीन बिसलरि बॉटल,मी स्वार्थीपणे वागले.. पण आता ती वेळ गेली होती,विचार करून काय उपयोग.. असं नेहमीच का होतं, सगळं घडून गेल्यावर का वाटतं की आपण असं वागायला हवं होतं.. असो..  

आता काउंटडाउन सुरू झाला होता.. शेवटचे ५किमी चालायचे म्हणल्यावर बरंच बरं वाटले.. :) पायाला आता जराही खडे किवा गरम जमीन सोसवत नव्हती.. लगेचच राधा कुंड लागले.. मी ते दिसताच त्या कुंडातल्या पाण्यात पाय घातले खूप बरं वाटलं पण तिथेही बसले नाही कारण जर कुठे बसले असते तर पुढे चालणे अवघड होते.. पुढे गेल्यावर पाटि दिसली की राधा कुंडच्या पाण्यात पाय घालू नका,आंघोळी करा किवा पाणी अंगावर घ्या पण पाय घालू नका.. आता ही पाटी आधी लिहायला हवी होती,मला हे वाचून फार वाईट वाटले.. जाऊदे आता म्हणून मी पुढे चालायला लागले.. पूर्ण २१किमी मध्ये मध्ये सायकल रिक्षावाले रीक्षेतून यायचे आहे का विचारायचे.. आता तर माझा वेग बघून बरेचजन विचारात होते पण मी चालत परीक्रमा करायची ठरवली होती तर कुठल्याही परिस्थितीत रिक्षा करणे अशक्य होते.. पायांना होणार्‍या वेदनेमध्ये एक प्रकारचा आनंद होता..
पुढे मग कुसुम सरोवर लागले आणि शेवटी मानसी कुंड.. शेवटचे १ किमी अंतर मला अतिशय मोठे वाटले.. मानसी कुंड मी लांबूनच पहिले आणि परीक्रमा समाप्त या पाटी पाशी शेवटी मी ३.४५च्या दरम्यान पोहचले.. मला परीक्रमेला ५.३० तास लागले होते तर..

बाबा वाट बघत असतील म्हणून मी मानसी कुंड लांबूनच पहिले आणि परीक्रमा समाप्ती झाल्यावर ड्रायवरच्या मोबाईलवर फोन केला.. गाडी थोडी पुढे लावली होती.. त्या दिशेने मी चालू लागले तर बाबा मला घ्यायला आले.. ते खूप खुश दिसत होते,मला म्हणले झाली का मनासारखी परीक्रमा.. :) कुठेही ना बसता थांबता परीक्रमा पूर्ण केली असं मी त्यांना अभिमानाने सांगितले.. बाबांना मी लवकर जास्तीत जास्त ४ तासात येई असे वाटले होते,त्यांनी ड्रायवरला सांगितले होते तिला सवय आहे ती येईल लवकर.. पण मी मात्र पायला काहीतरी टोचल्यामुळे फार हळू आले होते..  चालताना मला भूक अजिबात लागली नव्हती.. पण इथे बाबाही मी एकटी कुठे चालत आहे म्हणून जेवले नाही, मी येईपर्यंत त्यांना शांती नव्हती.. मला वाईट वाटले,मी किती त्रास देते माझ्या आईबाबांना.. मी म्हणले त्यांना तुम्ही जेवून घ्यायचेना..  मग आम्ही जूस घेतला.. आणि लगेच गाडी वृंदावनच्या दिशेन धावू लागली..

वृंदावनची पाटी दिसताच मला रस्त्याच्या डावीकडे थोडं आत एक सुंदरसा मोर दिसला.. त्याला पाहून मी आनंदाने बाबांना म्हणले तो पहा मोर.. पण तोपर्यंत आमची गाडी पुढे गेली होती.. वृंदावनातच्या अगदी सुरुवातीला मोर दिसला ही गोष्ट मला फारच योगायोगाची वाटली.. पुर्वी हेच वृंदावन सृष्टीसौंदर्याने, फुले वेलींनी, मोर आणि विविध पक्षांनी, गायी वासारांनी, तुळशीने, कृष्णाच्या मुरलीने,  राधा कृष्ण अन् गोप्यान्च्या रासक्रिडेने दिव्य फुललेले असायचे असे वाचले होते..मी अतिशय खुश होते आज.. 
तब्बल ६ तासानंतर गाडीमध्ये बसल्यावर आता उठताना त्रास होत होता.. वृंदावनात खरेतर खूप काही बघायचे होते पण आता मी अक्षरशः लन्गडत चालत होते.. तिथे एक पुजारी माणूस इथली मंदिरे आणि माहिती सांगतो म्हणाला.. बाबा आणि ते पुजारी पुढे होते आणि मागून मी हळू येत होते.. पहिल्यांदा आम्ही श्री रंगनाथ मंदिर पहिले,अतिशय भव्य अन् सुंदर.. नंतर श्री ठाकूरजी मंदिरात दर्शन घेतले.. या गावात लोकं पैशासाठी खूप मागे लागतात असं ऐकले होते आणि तसेच काही अनुभव आले.. आता ६ वाजून गेले होते.. मला सेवाकुंज , प्रेम सरोवर ,यमुनेची आरती बघायची होती पण मला चालता येत नव्हते.. आणि त्याहून महत्वाचे म्हणजे बाबा कन्टाळले होते, ते म्हणले आता बास,आता अजुन आग्र्यला जाईपर्यंत उशीर होईल.. मी मग हट्ट केला नाही कारण बाबा माझ्यासाठी आले होते त्यांचे ऐकणे मला भाग होते.. मग आम्ही तिथली मशहूर लास्सी प्यायली आणि आग्र्याला परतलो.

श्रीकृष्णमर्पणमस्तु!!! :)

मंतरलेले दिवस - ५९ : भाग 2

आग्रा,सिटी ऑफ ताज.. :)

काल अख्खा दिवस प्रवास करून आम्ही  आज सकाळी १० वाजता आग्रा छावणी स्टेशनला पोहचलो.. आधी मुलीमुलींचा प्लान होता त्यामुळे सुरक्षित म्हणून केळ्कर काकान्च्या तर्फे गाडी- हॉटेल सगळे आधीच नीट बुक करून ठेवले होते.. त्यामुळे यावेळेस प्रथमच माझ्या नावाची पाटी घेऊन कोणी उभे होते, तो आमचा तीन दिवसाचा ड्रायवर होता..  :)

ड्रायवरला तीन दिवसाचा प्लान सांगितला.. परीक्रमा चालत करणार म्हनला तर तो फार आश्चर्यचकित झाला, 'आपसे नाही होगा,गाडीसे करलो' असा तो मला सारखा म्हणत होता.. मला हा मागेही असा अनुभव आला होता..
गाडीमधून आग्रा दर्शन करत हॉटेलपाशी आलो.. ताज माहालच्या परिसरात (३००मी) असलेले ताज खिमा हॉटेल यूपी गाव्हरमेन्टचे आहे.. कॅम्पस अतिशय सुंदर.. चेकीनला जरा वेळ होता तेव्हा मी थोडं फिरून आले.. तेव्हा तिथून ताजचे अतिशय सुंदर दूरदर्शन झाले..

सगळं अवरून आम्ही लगेचच बाहेर पडलो.. आज शुक्रवार असल्याने ताजमहाल बंद असतो..  शुक्रवारी तिकडे आतमध्ये लोकं नमाज पडायचे म्हणून कोर्टाने हा निर्णय घेतला.. म्हणून आज आम्ही आग्रा किल्ला आणि फतेहपुर सिकरी पाहायचे ठरले.. दुपारचे उन्ह होते पण पुण्यात आता जितका उन्हाळा वाढला आहे तितकी तीव्रता इथे भासली नाही.. सकल संध्याकाळ तर एकदम आल्हाददायक हवा होती..  प्रथम आम्ही आग्र्याहून ५०किमी वर असनाराया फतेहपुर सिकरीला गेलो, अकबरची राजधानी पाहायला... इथे पाण्याची कमतरता होती म्हणून आग्रा किल्ल्याला स्थलांतर झाले होते म्हणे.. तिथेले वसतुशिल्प अप्रतिम आहे..  त्याकाळाच्या भव्या प्रसदांचे अवशेष अजूनही आहे.. तेथील बुलंद दरवाजा , दर्गा वगैरे अजूनही चांगल्या स्थितीत ठेवले आहे.. आणि सगळ्यात भारी म्हणजे बाहेर उन्ह असले तरी आत इतके थंड वाटत होते.. तिथे मुसलमान लोकं जास्त होती..

पण तिथे गाइड आणि काहीतरी विकणारे लोकं फारच त्रास देतात असा अनुभव आला.. अगदी मागेच लागत होते,लहान मुले तर इतकी होती त्यांना धड ओरडानेही नको वाटत होते तरी शेवटी जरा मोठ्या आवाजात सांगवेच लागायचे.. या प्रकारामुळे थोडे वैतागून गेलो होतो..

नंतर आम्ही आग्रा फोर्ट पाहायला गेलो.. तिथे जाताच किल्ल्याच्या बाहेर मोठ्या चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा पाहून मराठी मन भरून आले.. त्या पुतळ्याच्या इथे मराठीमधे महाराजांची आग्र्याहून सुटका याबद्दल माहिती लिहिली होती.. मला वाटले ते हिंदी इंग्रजी मध्ये लिहायला पाहिजे होते म्हणजे तिथे येणार्‍या सर्व लोकांना माहिती समजली असती.. असो.

आम्हाला हा आग्रा किल्ला फारच आवडला.. दिल्लीच्या लाल किल्ल्यापेक्षा कितीतरी पटीने भव्य.. इतक्या मोठ्या किल्ल्यातून महाराजांनी कशी काय सुटका करून घेतली असेल याचे नवल वाटले..  दिवाणे आम -खास मस्त आहेत.. जोधा-अकबरचे शूटिंग तिथेच झाले असावे असे वाटले.. तिथले नक्षीदार पेण्टिण्ग्स सुंदर आहेत.. आणि इथे एका पॉइण्टअरुण यमुना नदीच्या काठावर असलेल्या ताजमहालचे विहंगाम दृष्य दिसते.. संध्याकाळी येथे आल्यामुळे अधिकच आनंद घेता आला. . इथे माकडान्चा मात्र सुळसुळाट होता..

नंतर आग्रा मार्केट मध्ये जरावेळ फिरलो तिथले लेतर  प्रसिद्ध आहे म्हणून  मग थोडीफार शॉपिंग केली.. आता मथुरा वृंदावन गोवर्धनला जायचे वेध लागले होते,म्हणून उद्या सकाळी लवकर निघायचे ठरले..

मंतरलेले दिवस - ५९ : भाग १

पुणे - आग्रा  :)

माझे बाबा आणि मी सकाळी ८च्या बसने पनवेलला निघालो.. एक्सप्रेसवेचा प्रवास सुंदर होता.. एरवी हिरव्यागार असणार्‍या  डोंगर रांगा आता वळलेल्या गवतात सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकत होत्या.. आमचा अंदाज थोडा चुकाला आणि आम्ही थोडं  आधीच पनवेल स्टेशनला जाऊन बसलो.. ३ तास एखाद्या प्लॅटफॉर्म वर टाइमपास करणे जरा कंटाळवाणे आहे.. पण सुदैवाने ते प्लॅटफॉर्म बरेच स्वच्छ होते.. आणि चक्क तिथल्या कॅण्टीनमध्ये चहा चक्क ३रूपायला चांगला मिळत होता, सगळ्याच किंमती कमी होत्या.. J पुण्यात खायचा प्यायचा खर्च जरा जास्तच आहे,मुंबई स्वस्त आहे असा आम्ही निष्कर्ष काढला.. केरळहून निघालेली सुपरफास्ट रेल्वे ठरलेल्या वेळेच्या आधी आली आणि आमचा रेल्वे प्रवास सुरू झाला.. पण यावेळेस प्रवास शांतपणे होणार नव्हता,बरेच घोळ झाले होते.. फार पुर्वीपासून मला मथुरा वृंदावनला जायची इच्छा होती.. मैत्रिणी मैत्रिणी आग्रा मथुरा वृंदावन अशी छोटी ट्रिप करूया हा विचार मनात येताच क्षणी मेल टाकला.. कोणाला तिथे जायची इच्छा नव्हती  तर  कोणाला इच्छा असून वेळ नव्हता.. शेवटी एका मैत्रिणीचे आणि माझे जायचे ठरले.. सगळं बुकिंग झाले.. मी तर अगदी दिवस मोजत होते.. पण ट्रिपला जायच्या २/३ दिवस आधी त्या मैत्रिणिने काही कारणाने विचार बदलला आणि ट्रिपमधून नाव रद्द केले.. मला मात्र मनातून फार इच्छा होती तिथे जायची आणि इतके प्लॅनिंग करून अशी ऐनवेळेस ट्रिप रद्द करावी बिलकुल वाटत नव्हते.. पण एकटीला घरचे सोडणे शक्यच नव्हते त्यामुळे बाबांनी माझ्यासोबत यायचे ठरले.. येतानाचे विमानाचे तिकीट बदलले, पण जातानाचे रेल्वे तिकीट बदलणे अशक्य होते.. मैत्रिणीच्या तिकिटावर जायचे आणि नंतर टीसी कडून तडजोड करू असे ठरले.. आता होईल ते होईल ,बघुया असा मनाशी निश्चय करून आमचा प्रवास सुरू केला होता.. आपल्यासोबत आपली घरची मंडळी कायम सोबत असतात,बाकीचे कितीही जवळचे म्हणले तरी ते शेवटी त्यांच्या सोईने साथ देतात ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली.. बाबा म्हणले,यापुढे कोणावर विसंबून राहत जाउ नकोस,एकतर आमच्यासोबत प्लान कर,नाहीतर मग पॅकेज टूरस सोबत..
टीसी आल्यावर आम्ही त्यांना सगळी गोष्ट समजावून सांगितली.. सुदैवाने तो एक चांगला माणूस होता.. त्याने आमच्यावर विश्वास ठेवला.. काहीतरी मार्ग  काढू असे म्हणून तो विचार करू लागला..  निघायच्या आदल्या दिवशी बाबांच्या नावाचे तिकीट मी ऑनलाइन काढले होते पण ते वेटिंग लिस्टमध्ये असल्याने कॅन्सल झाले होते.. टीसी म्हणाला ते स्टेशन वर जाऊन काढले असते तर कन्सेल झाले नसते आणि मग मी लगेच मैत्रिणीच्या नावावर आड्ज्स्ट केले असते.. आता हा प्रकार आम्हाला अगदी नवीन होता.. आमच्या समोर एक रेल्वे अधिकारी बसला होता.. त्याने आमची सगळी गोष्ट ऐकली होती,तो टीसीला स्पष्टपणे म्हणले बाकी काही असो,यांचे नीट अड्जस्ट करा..  नंतर टीसी म्हणाला पुढच्या स्टेशनवर रेल्वे जास्त वेळ थांबेल तिथे खाली उतरून तिकीट काढता येईल.. बाबांना उतरणे शक्य नव्हते कारण त्यांच्याकडे तिकीट नव्हते.. मी म्हणले मी उतरते तर टीसीने मला खाली उतरून दिले नाही.. तो म्हनला माझी मुलगी तुझया एव्हढी आहे, मी एका वडिलांचे मन समजू शकतो.. त्याने तिसर्या माणसाला ज्याच्याशी आमचा काही संबंध नव्हता त्याला तिकीट आणायला पाठवले आणि तो चक्क तिकीट काढून आला.. त्याची बायको म्हणली आमची मुलगी तुझ्या एव्हढीच आहे.. सर्वांना माझ्यात त्यांच्या मुली दिसत होत्या बहुतेक.. J
टीसीने मग लगेच तिकीट बाबांच्या नावावर केले.. मला काय चालले आहे समजत नव्हते.. कोण कुठली ही माणसे ,आमच्यासाठी त्यांनी एवढे का करावे.. आभार कसे मानू कळेनासे झाले होते.. आमच्या इथे अजुन एक बाबांच्या वयाचे काका काकू होते ते नैनीतालला अध्यात्मिक शिबिराला चालले होते.. ते म्हणले श्रोकृष्णाची इच्छा आहे,तो सगळी व्यवस्था करतो.. तुमचा योग आहे त्यामुळे सगळे सुरळीत होत आहे..आम्हा सर्वांना हे मनोमनी पटले..
एकंदर या प्रकरणामुळे आमच्या डब्यातल्या बर्‍याचजणांची करमणूक झाली आणि प्रवास मस्त झाला.. :-)