बुधवार, १३ जून, २०१२

मंतरलेले दिवस - ६४

पाऊस.. मला मनापासून आवडतो.. मग तो रिमझिम असो वा धोधो.. पण तोच पाऊस कित्येकांना नकोसा वाटतो,चिखला मुळे, ट्रॅफिक जॅम मुळे.. म्हणजे पाऊस ही गोष्ट काही परिपूर्ण नाही कारण ती कोणाला आवडते अन् कोणाला नाही..

काही व्यक्तीदेखील अशा असतात ज्या मला चांगल्या वाटतात पण काहींना आवडत नाहीत.. किंवा काही व्यक्तींचा मला चांगला अनुभव नसतो पण इतरांना त्या आवडतात..  म्हणजे अमुक एक व्यक्ती चांगली किंवा बरोबर असे म्हणणे अवघड आहे.. या सगळ्या गोष्टी व्यक्तीसापेक्ष अन् परिस्थितीशी निगडीत आहे..

मग अशी कुठली गोष्ट आहे किंवा कोणती व्यक्ती आहे जी मला आवडते, पटते अन् इतरांनाही बरोबर वाटते..
उत्तर.. तू अहेसना.. मला तर नेहमीच आठवण येते तुझी.. प्रत्येक कणात अन् क्षणात तुझेच चैतन्य असते.. माझ्यासारखी प्रत्येकालाच तुझी जाणीव होत असते..  कोणी मनापासून तर कोणी स्वार्थासाठी का होईना तुझी प्रार्थना करतं.. प्रेम करण्यासाठी तुझ्या एव्हढे कोणीच लायक नाही आणि मदत मागण्यासाठी तुझ्या एव्हढे कोणीच जवळचे नाही..  कितीही माज असला तरी एक दिवस प्रत्येकाला तुझे अस्तित्व मान्य करावेच लागते.. तू सर्वांचा अन् सारं काही तुझच.. तूच सत् चित आनंद!!!


वर्ण अभिमान विसरली याती, एक एका लोटांगणी जाती..
निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे..
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: