Day 1: पुणे - तारकर्ली
भटकंती बऱ्याच दिवसापासून चालूच होती पण या ट्रिपचे विशेष म्हणजे आईबाबान्सोबत चालले होते त्यामुळे मी एकदम निवांत.. सगळं बुकिंग आधीच झालं होतं.. बाबांनी नेहमीप्रमाणे आम्हाला बस स्थानकावर १ तास आधीच आणलं.. मग तासभर आम्ही स्वारगेट, तिथली गर्दी, सुव्यवस्था? याचं निरीक्षण आणि चर्चा करत बसलो.. दिवाळीमुळे प्रचंड गर्दी होती.. बऱ्याच ज्यादा बस सोडल्या जात होत्या.. शेवटी आमची बस आली आणि आम्ही त्या गर्दीच्या पुरात शिरलो.. आरक्षण केले असताना देखील सर्वाना चढायची घाई असतेच.. ती पण एक मज्जा असते म्हणा... :)
पुणे सातारा रोडवरून मी सलग सहाव्या वेळा जात होते.. तोच रस्ता, तीच फुले, तेच डोंगर आणि तेच टोलनाके.. :) आणि तरीही अगदी नव्याने मी सगळं खिडकीतून पाहत होते.. बस असो रेल्वे असो विमान असो मला हा प्रवास फार आवडतो.. पहाटे लवकर उठून दिवाळीचं अभ्यंगस्नान वगैरे करून निघालो होतो त्यामुळे एकदम उत्साह वाटत होता.. सोबतीला दिवाळीचा खाऊ होता.. असे ९ तास काढायचे होते.. ढगाळ हवामान होता त्यामुळे उन्हाचा त्रास झाला नाही.. सातारा कराड कोल्हापूर सगळीकडे थांबत थांबत, लोकांना घेत घेत बस आरामात चालली होती.. जवळपासच्या गावात जाण्यासाठी लोक उभं राहून येत होती.. लांबची गाडी असूनही असं का चाललं होतं काय माहिती.. कोल्हापूरच्या पुढे कोकण भागात समजू शकतो कि तिकडे बस कमी असतील पण इथे इतकी थांबवायला नको होती..असो.. तर अशा मंद वेगामुळे थोडावेळ प्रवास कंटाळवाणा झाला पण जेव्हा कोकण सुरु झाले तेव्हा बस अजून हळू चालली तरी हरकत नाही असे वाटू लागले.. ती मोठी नारळाची झाडं, कौलारू घरं, छोटे रस्ते, मध्ये अध्ये शेती, विहिरी,तळी आणि दूरवर सह्याद्रीच्या हिरव्यागार रांगा.. वाटेत मोठा पाण्याचा तलाव लागला तिथे अर्धगोल सुरेख इंद्रधनुष्य दिसलं तेव्हा आपली गाडी असली असती तर इथे जरावेळ थांबलो असतो असं वाटून गेलं.. मालवणच्या आधी बरीच छोटी छोटी गावं लागत होती.. दिवाळीमुळे सगळीकडे पणत्या, आकाशकंदील आणि रांगोळ्या दिसत होत्या.. आणि गम्मत म्हणजे तिथल्या मुलांचे किल्ले.. आपल्याकडे सगळे किल्ले उंच गडावर असतात त्यामुळे लहान मुला तसाच प्रकारचे मातीचे किल्ले बधून मग पायऱ्या करतात.. पण इथली मुले सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढलेली.. त्यांनी केलेले किल्ले सपाट होते समुद्रातले जलदुर्ग.. आपण जिथे राहतो,वाढतो तिथला किती प्रभाव असतोना आपल्यावर..बसमधून सूर्यदेवाला म्हणत होते जरा थांब मी येताच आहे, तारकर्लीला पोहचल्यावर लगेच सागरातून तुझं दर्शन घेते.. पण तो कोणासाठी थांबणार?
१० तासाच्या प्रवासानंतर शेवटी मालवणला पोहचलो.. तिथला पहिला रिक्षावाला पुण्याच्या रिक्षावाल्यान्सारखाच होतां.. :) आम्हीही पुण्यातले म्हणून मग दुसरी रिक्षा केली आणि तारकर्लीला याहू रिसोर्टला गेलो.. मालवण तारकर्ली ७ कि मी.. अंधारात कुठल्यातरी जंगलातून चाललोय असं वाटत होतं.. मज्जा आली.. याहुचे काका बाहेर आधीच येऊन थांबले होते.. आत छान बाग होती पण बर्यापैकी अंधारच होता.. त्यांनी आम्हाला आमची कॉटेज दाखवली ती पाहून मी जाम खुश झाले.. तिथे समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता.. पण मग समुद्र कुठेय असं मी लगेचच विचारलं.. त्यांनी सांगितल इथेंच समोर आहे पण मोठी झाडे मध्ये असल्याने आता दिसत नाहीये.. सकाळी दिसेल.. मी म्हणलं आता जाता येईल का ते म्हणले हो जाऊन या, हि जागा सुरक्षित आहे.. मी लगेच बाबांना म्हणलं मला रात्री समुद्र कसा दिसतोय ते पहायचंय.. पण आई बाबा स्पष्ट नाही म्हणले.. :( घरच्यांसोबत ही एक अडचण असते, पाहिजे ते करता येत नाही.. मैत्रिणीसोबत गेले असते तर नक्कीच आम्ही लगेच बीचवर पळालो असतो.. असो.. हा परिसर खूप सुंदर होता.. स्वतंत्र कॉटेज, अंगण, झाडाला बांधलेला झोका इतकंच रात्री दिसलं.. मी फार खुश होते पण बाबांना मात्र कुठल्यातरी जंगलात आल्यासारखे वाटत होते.. त्यांना गजबजलेल्या जागेत राहायला आवडतं म्हणून.. एक मोठा गट बाकीच्या तीन कॉटेज मध्ये राहायला आला होता.. तरीही इथे खूप शांतता होती.. मला फार आवडली.. त्या झोक्यावर आडवं पडून आकाशातले तारे बघताना मनाला खूप आराम मिळाला.. नंतर अस्सल मालवणी जेवण घेतलं.. इथली सोलकढी खऱ्या अर्थाने नारळातल्या दुधातालीच होती.. आपल्याकडे पाणी जास्त घालतात पण इथली एकदम घट्ट अन चविष्ट होती.. आईला सोलकढी विशेष आवडत नसल्याने चार दिवस तिच्या नावाची सोलकढी पण मीच घेतली..
उद्या जवळपास काय काय पाहता येईल यावर आम्ही त्या काकांशी चर्चा केली.. मी स्नोर्कालिंग बद्दल खूप ऐकलं होतं आणि उत्सुक होते म्हणून त्यांना विचारले.. त्यांनी माहिती दिली आणि आमचा उद्याचा प्लान ठरला. दिवसभर प्रवास झाला असल्याने लगेचच झोप आली.. कधी एकदा सकाळ होते आणि मी कधी समुद्रावर जाते असं मला होत होतं.. त्याच विचारात झोप कधी लागली कळलंच नाही..
Day 2 : सिंधुदुर्ग - मालवण
सकाळी लवकर जाग आली.. बाहेर आल्यवर कळलं की ही जागा फारच सुंदर आहे.. गेटच्या बाहेर गेलो तर समोर अथांग पसरलेला समुद्र दिसू लागला.. मी पळत पळत गेले आणि.. आणि दार उघडल्यावर घरातलं लहान मुल कसं पळत पळत यावं तशा त्या लाटा माझ्यापाशी आल्या.. मीही त्यांना अलगदपणे जवळ घेतलं.. अहोटी चालू होती बहुदा.. हा पश्चिम किनारा, तरीही सूर्योदयाच्या छटा सर्वत्र दिसत होत्या.. समोर् दूरवर क्षितिजापर्यंत टेकलेला समुद्र अन आकाश.. आणि इथे किनाऱ्याला उंच नारळाच्या अन सुरुच्या झाडांची सुरेख किनार.. स्वच्छतेमुळे हा सागरी किनारा जास्तच सुंदर भासत होता.. हातात हात घालून येणाऱ्या त्या फेसाळत्या लाटांना बघून मी वेडीच झाले होते.. कितीदाही समुद्र बघितला तरी दरवेळेस त्याचे नवीनच रूप दिसतेना..
आज आवरून नाश्ता करून सिंधुदुर्ग किल्ला पाहायला जायचा होतं त्यामुळे थोडावेळ सागर दर्शन घेऊन परतलो... आमची गाडी नसल्याने रिक्षेने जायचे ठरले होते.. इथे आसपास काहीच जवळ नसल्याने याहूच्या काकांनी फोने करून रिक्षा बोलावली.. आमच्या बरोबरच ग्रुप आमच्या सोबतच त्यांच्या ग्गाद्यानी सिंधुदुर्गला पाहायला निघाला.. छोट्या छोट्या गल्ली बोळातून रिक्षावाल्याने मालवणला नेले आणि तिथे एकीकडे रिक्षा थांबवली.. येताना परत तोच रिक्षावाला आम्हाला घ्यायला येणार होता त्यामुळे त्याने तेव्हा पैसे घेतले नाही.. इथे ही गोष्ट प्रखरपणे जाणवली की सगळं काम झाल्याशिवाय पैसे कोणी घेत नव्हतं कारण हे सगळे एकमेकांच्या ओळखीचे होते.. आम्ही जर येताना त्या रिक्षावाल्याला भेटलो नसतो तर त्याने याहूच्या काकांशी संपर्क साधला असता..
पुढे आम्ही छोट्या वाटेतून चालत एका गल्ल्तीतून पुढे आलो तर काय हा पसरलेला समुद्र किनारा.. आणि दुरूवर दिसाराना जलदुर्ग, सिंधुदुर्ग.. किनाऱ्याला बऱ्याच बोटी होत्या.. जन्जीराला जाताना होडीतून जावं लागता तसंच इथेही आम्ही सगळे होडीतून सिंधुदुर्गाकडे निघालो.. मी अगदी पुढे टोकावर बसून निसर्ग अनुभवत होते पण माझे इवले डोळे कमी पडत होते.. पाहता पाहता सिंधुदुर्ग जवळ येऊ लागला.. बोटीतून उतरल्यावर बोटीवरच्या माणसाने त्याचा फोन नंबर दिला.. इथे सगळीकडे फोनची रेंज होती.. किल्ला बघून झाला की सांगा मग स्नोर्कलिंग पॉईन्टला जाऊ असे त्याने सांगितले..
दिवाळीच्या सुट्टी मुळे किल्ला पर्यटकांनी फुलला होता.. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधताना खडकात शिसे टाकून त्यावर किल्ला उभारला असं वाचलं होतं.. आता प्रत्यक्ष पाहताना फार आनंद होत होता.. महाद्वारातून प्रवेश करून नगारखाना वगैरे पाहत आम्ही शिवराजेश्वर मंदिरापाशी आलो.. आजपर्यंत बघितलेल्या किल्ल्यांवर असं शिवरायांचं मंदिर कुठेच पाहिलं नव्हतं.. शिवराजेश्वर मंदिर हे राजाराम महाराजांनी बांधलेले आहे.. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ्या पाषाणात कोरलेली शिवछत्रपतींची मूर्ती आहे.. महाराजांचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदीर आहे.. तिथे पेटीमध्ये त्यांची एक मोठी तलवार ठेवली आहे.. ती इतकी भारदस्त आहे की आपल्याला उचलायलाच जड.. तर त्यांनी ती तलवार घेऊन लढाई कशी असेल हे त्यांनाच माहिती.. :) पुढे मग तटबंदी, बुरुजे, काही अवशेष, राणीचा वेळा, विहिरी बघत बघत तटफेरी केली.. इथे काही कुटुंब पिढ्यान पिढ्या राहत आहेत.. किल्ल्यावर खाण्यापिण्याची सोय आहे..
किल्ला बघून झाल्यवर आम्ही द्वारापाशी आलो.. होडीतून आम्ही याहूची सर्व मंडळी सिंधुदुर्गालाच लागून असलेल्या स्नोर्कलिंग पॉईन्टला गेलो.. प्रवाळ भागात सूर्यकिरणे डोक्यावर आल्यावर स्नोर्कलिंग केले जाते.. ढगाळ हवामानात स्नोर्कलिंग करता आले नसते त्यामुळे मी कधी नव्हे ते पाऊस नको अशी इच्छा करत होते.. सोबतचा ग्रुप मुंबईचा होता,ते जवळ जवळ सर्वजण स्नोर्कलिंग करणार होते.. माझे आईबाबा मात्र स्नोर्कलिंगकडे माझा एक नवीन हट्ट म्हणून बघत होते.. मी लहानपणी पोहायला शिकले होते पण त्यांनंतर आजगयात कधीही पोहले नव्हते.. त्यामुळे त्यांना जरा काळजी वाटत होती पण तिथे गेल्यावर ट्यूब वर सर्वाना तरंगताना पाहून मग ते बिनधास्त झाले.. जिंदगी ना मिलेगी दुबारा मध्ये दाखवलंय तसं अगदी खाली जायचं नव्हतं इकडे.. तिथे गेल्यावर आम्हाला मास्क देण्यात आले आणि सगळी माहिती सांगण्यात आली.. मास्क लावून तोंडाने श्वास घ्यायचा होता आणि त्यासाठी पाण्याच्या वरती हवेत जाईल एव्हढी नळी लावली होती.. म्हणजे आपण मास्क लावून ट्युबवर तरंगत राहून पाण्यात खाली बघायचे आणि तोंडाने पाण्याबाहेर असलेल्या नळीतून श्वास घ्यायचा.. ओठ पूर्ण घट्ट बंद करणं महत्वाचं होतं कारण तोंडाने श्वास घ्यायचा होता.. मात्र सुरुवातीला माझ्या ओठांची पकड घट्ट होत नव्हती त्यामुळे पाण्यात उतरल्यावर माझ्या तोंडात पाणी गेलं आणि मी पुन्हा बाहेर आले..
थोडावेळ तोंडाने श्वास घायचा सराव करून मी पुन्हा पाण्यात उतरले आणि गाईड सोबत सागर सफारीला निघाले.. खाली बघायला सुरुवात केली.. पाण्याच्या आतला एक वेगळंच राज्य.. कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे, रंगाचे अन आकाराचे मासे दिसू लागले.. कुठे थोडे खडक होते.. वेगवेगळ्या वनस्पती होत्या.. तो गाईड ट्यूब ओढत पुढे पुढे नेत होता आणि माशांची नावे व माहिती सांगत होता.. पैकी एक मखमली निळ्या रंगाचा मासा (angel fish) दुर्मिळ दिसतो म्हणे.. पुढे एकीकडे खूप छोटे छोटे मासे होते ते पायाला चाटून जात होते असं जाणवलं.. मध्ये एकीकडे मी डोकं जरा जास्तच पाण्याखाली घातला त्यामुळे ती नळी पायात गेली काही क्षण श्वास रोखला गेला पण लगेच सगळं सुरळीत झालं.. बोटीपाशी परत आलो तेव्हा मी म्हणलं झालंही इतक्या लगेच.. तो गाईड म्हणे उद्या परत या.. बाबा म्हणले तुला त्यांनी बराच लांब नेलं होतं.. तिथले सगळे लोक नीट माहिती देत होते त्यामुळे कुठे कसलीच भीती वाटली नाही.. अगदी लहान पोरंही स्नोर्कलिंग करत होते.. सर्वांचा झाल्यावर बोटीने आम्ही किनारयापाशी आलो.. तिथे अंघोळीसाठी चांगली सोय होती.. खारट पाण्याने, समुद्राच्या रेतीने भिजलेले कपडे बदलल्यावर फ्रेश वाटले.. आता खूप भूक लागली होती.. मालवण मध्ये मालवणी पद्धतीचे आजचे जेवण ट्रीपमधले d best जेवण होते.. ट्रीपमध्ये खूप जणांनी आम्हाला बसने कसे काय आला असे विचारले.. सहसा सगळे मुंबई पुणे वाले आपल्या गाड्या घेऊनच येतातना.
यानंतर आम्ही मालवण साईट सीइंग केले.. त्यामध्ये जय गणेश मंदिर, रॉक गार्डन आणि चीवला बीच बघितला.. यासाठी रिक्षा केली होती तो ड्रायवर फारच भारी होता.. त्याने जाता जाता आम्हाला मालवणची कचेरी, शाळा, कॉलेज, बाजार, कोणाकोणाचे बंगले यासगळ्या गोष्टी अगदी तप्शिलासोबत दाखवल्या.. मला रॉक गार्डन खूप आवडली.. खडकावरून तयार केलेली बाग.. आणि तिथे पुढे दगडांवर बसून समुद्राचे चित्र फार सुंदर दिसत होते..
तारकर्लीला परतल्यावर चहा घेऊन लगेच सूर्यास्त पाहायला जवळच्या तारकर्ली बीचवर गेलो.. पाहतो तर पाणी सगळं आत गेलं होतं.. खेकड्यांनी केलेलं सुंदर कोरीव नक्षीदार काम आपल्याला यंत्रानेही अवघड गेलं असतं.. गावातली मुळे निवांत क्रिकेट खेळत होती.. गायी अन पाखरे आपापल्या घरी परतत होती.. इथे एक प्रकारची आल्हाददायक शांतता जाणवत होती.. बाकी आमच्याशिवाय बीचवर कोणीच नव्हतं.. आईबाबा तर लांब बसून सुर्यास्ताचा देखावा बघत होते त्यामुळे अख्खा समुद्र फक्त माझाच एकटीचा होता.. :))
तिथे किती फोटो काढून अन नको असं होत होतं आणि असं करता करता कॅमेअची ब्याटरी संपली.. आज आयुष्यात पहिल्यांदा मी सूर्याचा लाल लाल गोळा पूर्णपणे समुद्राच्या पाण्यात बुडताना पाहत होते.. आणि हे सुदंर दृश्य मी कॅमेरामध्ये टिपू शकले नाही.. उद्याचा दिवस होताच म्हणा.. त्यावेळेस इतका छान संधिप्रकाश पडला होता तेव्हा त्या मनमोहक छटा, ते निळे काळे पांढरे पाणी , ते विस्तीर्ण आकाश वगैरे बघून परमेश्वराच्या निर्मितीचे आश्चर्य वाटून मन थक्क झाले आणि नकळत हात जोडले गेले..
येताना मालवणचे दैवत रामेश्वर (नारायण) यांचा पालखी सोहळा बघायला मिळाला.. लोक खूप नाथून थाटून उत्साहाने मनापासून सहभागी होते.. ढोलाच्या नादात वातावरण दुमदुमून गेले होते.. रिक्षावाल्याने आम्हाला त्याबद्दल बरीच माहिती सांगितली.. छान वाटलं ते सगळं पाहून..
सूर्यास्त झाले की इथे फार डास येतात.. संध्याकाळी साधारण ६ ते ७च्या वेळेमध्ये डासांनी आपण हैराण होऊन जातो.. आणि नंतर आपोआप ते डांस निघून जातात ,कुठे काय माहिती.. हा अनुभव तिथे रोज आला.. उद्या विजयदुर्ग अन कुणकेश्वर मंदिर पाहण्यासाठी गाडी ठरवली.. उद्या सकाळी लवकर निघायचं ठरवून रात्री आम्ही लवकर झोपून गेलो..
Day 3 : किल्ले विजयदुर्ग - कुणकेश्वर मंदिर
सकाळी लवकर आवरून आम्ही विजयदुर्ग किल्ला बघायला बाहेर पडलो.. साधारण ६० कि मी अंतर कापायचं होतं.. सकाळचा प्रवास फारच सुंदर होता.. वाटेत मोठ्या मोठ्या नद्या लागत होत्या तिथे आम्ही थांबत होतो, निसर्गाचा आनंद घेत होतो.. देवगडचा रस्ता असल्याने रस्त्याच्या दुहेरी बाजूला मोठमोठ्या आंब्याच्या बागा होत्या.. एकीकडे नाश्त्याला थांबलो तिथले पोहे उत्तम होते.. एरवी मला कांदा पोहे आवडेनासे झाले आहेत.. :P पण कोकणातल्या पोह्यांची चव न्यारीच.. वाटेत एकीकडे सिंधीविनायक मंदिरापाशी थांबलो.. त्या मंदिरातून जिन्याने खाली गेलो तर तिथे तळ्यामध्ये कासवाच्या पाठीवर असलेली महादेवाची पिंड होती.. ती जागा अन तिथलं तळं सुरेख होतं..
पूर्वी विजयदुर्ग समुद्रात आत होता तेव्हा तिथे जाण्यासाठी लकडी पुलावरून जावे लागे.. आता मात्र भर टाकून जमीन केली आहे.. किल्ल्यापाशी आलो तर हा अभेद्य जलदुर्ग आणि बाजूला विशाल समुद्र.. समुद्राचे निळसर पाणी उन्हात सोन्यासारखे चमकत होते..
याहूच्या काकांनी आम्हाला सांगितलेच होते की किल्ला फार मोठा आहे, तुम्ही तुमचा बघायला गेला तर नीट कळणार नाही,गाईड करा.. प्रवेशद्वारापाशी एक गाईड एका वेगळ्या ग्रुपला माहिती सांगत होता,आम्ही त्यांच्यात सामील झालो.. त्यांनी आधी किल्ल्याचा इतिहास सांगितला.. मग पुढे जाऊ तशी माहिती सांगू लागले.. जीभीचा दरवाजा, तटबंदी, तोफ गोळा, कचेरी , खलबतखाना,सदर, धान्याचे कोठार, जखीणीची तोफ, बुरुज, खास राणीसाठी असलेली माडी, दगडात कोरलेली श्री भवानी मातेची मूर्ती अशा कित्येक गोष्टी पाहण्यासारख्या होत्या.. मला आवडलेली गोष्ट म्हणजे थेट समुद्रातून किल्ल्यावर येण्यासाठी तयार केलेला गुप्त भुयारी मार्ग.. आणि मुख्य भव्य दालनात एका एका बाजूने बोललेले शब्द दुसर्या बाजूला व्यवस्थित ऐकू येतील अशी योजना केली होती.. याचं प्रात्यक्षिक आम्हाला त्या गाईडने दाखवलं.. अफाट निर्मितीशक्ती होती त्याकाळी.. ते सगळं पाहून आम्ही सगळे भारावून जात होतो.. किल्ला बघताना आधीच खूप उन्ह जाणवत होतं.. आणि नंतर किल्ल्यावर एके ठिकाणी गेलो जिथून सूर्याचे अंतर खूप कमी आहे.. संपुर्ण जगात सुर्य आणि पृथ्वी यातील सर्वाधीत कमी अंतर असणारी ही जागा.. किल्ला पाहू तेव्हढा कमीच आहे.. भारावलेल्या अवस्थेत आम्ही किल्ल्याच निरोप घेतला आणि गाडी श्री क्षेत्र कुणकेश्वराच्या मार्गाला लागली..
पुढे गेल्यावर कळलं की आम्ही रस्ता चुकलो आहोत.. कोकणात त्या भागात ड्रायवर लोकांचीही कधी कधी गडबड होते.. विचारत विचारत पुढे जावं म्हणलं तर रस्त्यावर दुरदुरपर्यंत एक माणूसही दिसत नव्हता.. पण यामुळे आम्हाला अगदी आतलं कोकण पाहायला मिळालं.. :)) मस्त आंब्याच्या बागा, नारळाची उंच झाडं..शेतं.. तळी, त्यातली कमळं..विहिरी.. कौलारू घरं..वाटेतल्या लोकांची अस्सल कोकणी भाषा.. जवळ जवळ १०/१५ कि मी उलटा जाऊन आम्ही ३ वाजता कुणकेश्वरला पोहचलो.. विशेष गर्दी नव्हती, महादेवाचं दर्शन छान झालं.. मन्दिर सुंदर होतं आणि तिथला समुद्र किनाराही अप्रतिम होता.. दर्शन झाल्यावर दुपारचं जेवण घेईपर्यंत फार उशीर झालं.. उनही फार लागलं होतं त्यामुळे जेवण जास्त गेलंच नाही.. आता मालवणच्या दिशेने निघालो.. रॉक गार्डनला गाडी सोडली आणि सूर्यास्त पाहायला गेलो.. निवांत खडकावर बसून सांज क्षण पाहत होतो.. खडकावर आपटणाऱ्या लाटांचा आवाज खतरनात होता.. इथे फारच गर्दी होती.. आणि लहान मुले खूप होती.. आम्हाला तर प्रत्येक बाळाकडे बघून अर्णवची , माझ्या भाच्याची फार आठवण येत होती.. नंतर मालवण बाजारात फिरलो.. पाणीपुरी अन आईसक्रीम खाल्लं.. :) दिवसभर बराच प्रवास झाला असल्याने रात्री लवकरच गुडूप झोपून गेलो..
Day 4 : तारकर्ली - देवबाग - मालवण - कोल्हापूर
आज इथला कोकणातला शेवटचा दिवस.. सकाळी लवकरच आम्ही तारकर्लीच्या पुढे देवबागला निघालो.. बाबांना कुठेही गेल्यावर तिथल्या स्थानिक बस मधून प्रवास केल्याशिवाय समाधान वाटत नाही.. :) म्हणून देवबागला आम्ही बसने गेलो.. बसची सोय फारच चांगली आणि स्वस्त होती.. बसचालक छोट्या गल्लीबोळातून अगदी कुशलतेने बस चालवत होता.. डावीकडे कर्ली नदी आणि उजवीकडे समुद्र असा सुंदर प्रवास चालू होता..
देवबागला कर्ली नदीतून बोटीने संगम आणि डॉल्फिन सफारीसाठी निघालो.. बोटीत फक्त आम्हीच होतो.. सर्व प्रथम कर्ली नदी जेथे सागराला मिळते ते पहिले.. या बाजूने नदी आणि त्या बाजूने समुद्राच्या उसळत्या लाटा.. पाण्याच्या रंगावरून थोडाफार फरक जाणवत होता.. आणि त्यात सकाळचं कोवळं उन्ह.. मस्त वाटत होतं.. नंतर मग बोटवाले समोरचे बेट दाखवून म्हणले की श्वास सिनेमाचे शुटींग तेथे झाले होते म्हणून आता आम्ही नदीतून समुद्रात शिरलो होतो.. लाटा उलट्या दिशेने येत होत्या.. बोटवाला म्हणला लाटांमधून घ्यायची का कडेणून.. अर्थातच मी त्याला लाटांमधून घ्यायला सांगितला.. बोट पाण्यात हेलकावे खात होती.. मजा आली.. .. डॉल्फिन पोईन्टला आलो.. बोट थांबवली गेली.. दूरवर कुठेही एकही डॉल्फिन दिसला नाही.. चारीही दिशेने फक्त अन नुसता समुद्र बास.. मध्येच एखादा सीगल पक्षी दिसायचा.. पक्षी आकाशातून पाण्यातल्या माशाला अचूक टिपायचे आणि पटकन चोचीत घेऊन भुरकन उडून जायचे हे इतका जवळून पाहिल्यावर आम्ही थक्क झालो.. आजची सागरी सफर मला सर्वात प्रिय वाटली.. :)
नंतर मग आम्ही सुनामी बेट बघितले.. सुनामीच्या वेळेस आपोआप झालेले हे बेट सकळच्या कोवळ्या किरणांमध्ये खूप सुंदर दिसत होते.. कालच्या प्रवासाने, उन्हाने आणि उशिरा जेवल्याने बाबांना जरा बरं वाटत नव्हतं.. त्यामुळे तिथे जास्त वेळ न थांबता आम्ही तारकर्लीला परतलो.. आई बाबा थोडावेळ आराम करू म्हणले.. आणि मी बीचवर पळाले.. मला जरा वाईट वाटत होतं की आता परतायची वेळ आली म्हणून.. पुन्हा सागरदर्शन होईल काय माहिती.. आज जरा तिथे गर्दी वाटली.. पण माझं मी छान एन्जोय केले.. कितीतरी वेळ मी एकटीच लाटांमध्ये फिरले.. सागराशी, निसर्गाशी हितगुज केले.. बराच वेळ झाल्यावर जड पावलांनी परतायचं ठरवलं नाहीतर बाबा शोधात आले असते..
जेवण झाल्यावर सगळा समान आवरून मालवण बस स्थानकावर आलो.. बसची वाट बघत होतो तेव्हा पावसाची जोरात सर येऊन गेली.. तेव्हढीच एक कमी राहिली होती.. पावसाला म्हणलं आता पाहिजे तेव्हढा पड तू.. :) आता कोल्हापूरचा प्रवास सुरु झाला.. बस खूप थांबत थांबत चालली होती.. रात्री १० वाजले कोल्हापूरला पोहोचेपर्यंत.. कोल्हापूरला उतरल्या उतरल्या म्हशीचे ताजे धारोष्ण दुध प्यायले,अर्धा लिटर एकटीने!!! तिथली मुले आपल्यासमोर दुध काढून देत होती आणि दुध प्यायला बरीच गर्दी होती.. उद्या सकाळी देवीचे दर्शन घ्यायला जायचे होते म्हणून हॉटेल मध्ये जाऊन लगेचच आडवे झालो..
Day 5 : कोल्हापूर - पुणे
सकाळी आवरून महालक्ष्मीच्या दर्शनाला निघालो.. आईच्या खूप दिवसापासून मनात होतं.. आज आईने मस्त साडी नेसली आणि मी बऱ्याच दिवसांनी पंजाबी ड्रेस घातला!!! गजरे वगैरे घालून रांगेत उभे राहिलो.. सकाळची वेळ असूनही मंदिराबाहेर २ रांगा होत्या.. पण पटपट पुढे सरकल्याने जास्त वेळ थांबावे लागले नाही.. महालक्ष्मी देवीचे दर्शन खूप छान झाले, एकदम प्रसन्न वाटले तिथे.. मंदिराबाहेर आपल्याकडे बटाटेवडे टाळून देतात तसं गरम गरम आप्पे करून देत होते ते खाल्ले.. आपल्याकडे वडापावच्या गाड्या तसं तिथे सगळीकडे फक्त मिसळ.. कोल्हापूरच्या मैत्रिणीनी तिथल्या प्रसिद्ध मिसळ मिळण्याच्या जागा सांगितल्या होत्या पण आमच्याकडे एव्हढा वेळ नव्हता.. जवळच्या एकेठिकाणी मिसळ खाल्ली, थोडं फिरलो आणि पुण्याच्या गाडीत बसलो.. मनात छान छान आठवणींची शिदोरी घेऊन परतीचा प्रवास सुखद झाला.