शनिवार, २ जुलै, २०११

मंतरलेले दिवस - ३० : १२

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 12: 16th June,11


Zuthulphuk ->Zongirpu -> Dongaba

पायाला काहीतरी ओलं लागतंय म्हणून जाग आली.. उठून पहिले तर मोजे ओले झाले होते.. रात्रभर खूप पाऊस झाल्याने तंबूत पाणी शिरले होते.. ते स्लीपिंग ब्याग मधून आत कसे शिरले मला कळले नाही.. घड्याळात  पहिले तर पहाटेचे ३ वाजले होते.. मग तशीच झोपून गेले.. ते थेट ६ वाजता बाहेरचा तंबू काढल्यावर जाग आली.. प्रत्येक तंबूला बाहेरून एक कव्हर होते ते शेर्पाने थेट काढून टाकले,उठवायची ही भारी पद्धत होती.. :)
बाहेर आले तेव्हा उजाडले होते.. आणि पाऊस पडून गेल्यावर सगळं कसं एकदम ताजतवान  दिसतं तसं टवटवीत दिसत होतं.. आणि सगळे आधीच उठून नाश्ता करत होते.. मलाच उठायला जरा उशीर झाला होता.. पण आज फक्त ६ किमी चालायचे असल्याने सगळे निवांत होते..
पावसामुळे किंवा कुठे नदी ओलांडून जावे लागते यामुळे मोजे ओले व्हायची शक्यता असते म्हणून मोज्यांची extra  pair जवळ ठेवायला आधीच सांगितले गेले होते.. पण मी स्याक माझी मी घेणार होते आणि त्यात कमीतकमी समान ठेवायचे होते या गडबडीत extra  मोजे दुसऱ्या ब्यागेतच राहून गेले.. आता माझे मोजे पावसामुळे ओले झाले होते,काय करायचं विचार करत होते.. एकदा तसेच ओले मोजे घालून बाहेर एक चक्कर मारून आले पण तसं ठीक वाटत नव्हतं.. आणि थंडीमुळे मोजे काढून चालायचं धाडस होत नव्हतं.. शेवटी मोजे काढून फक्त शूज घातले.. वेगळा काही पर्याय नव्हतं,बघू म्हणाला आता असंच जाऊ..
उठल्यावर बरेच जण माझ्याशी येऊन बोलले, काल किती वाजता आलीस, कसं वाटलं वगैरे.. तेव्हा कळलं कि काल दोन काकू घोड्यावरून पडल्या मग त्यांची विचारपूस केली.. मुन्ना भाई तयार होते,चल म्हणत होते मग नाश्ता घाईघाईत केला आणि लगेचच आम्ही परिक्रमेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात केली..
आता कोवळं उन्ह पडलं होतं त्यात त्या नदीचे पाणी अगदी चमकत होते.. रात्री एव्हढा पाऊस झाला हे खरंच वाटत नव्हतं..  पुढे साधा रस्ता होता आणि क़्वचित कुठेतरी चढ लागायचा.. काल इतकं चाललो होतो कि आता चालण्याचे काहीच वाटत नव्हते.. आणि कमी उंचीवर आल्याने दम पण जास्त लागत नव्हता.. लवकरात लवकर परिक्रमा पूर्ण करायचा ध्यास लागला होता.. आणि मनात कुठतरी वाटायला लागलं होतं की झालं, परिक्रमा झाली की संपलं मग आपण परत कधी इथे येणार आणि असं पर्वतातून नदीच्या जवळून असं पुन्हा कधी चालणार.. निसर्गाच्या कुशीत असं पुन्हा कधी रहाणार..
आज चालायचा  वेग जास्त होतं.. चालण्यामुळे पायात उष्णता निर्माण होत होती आणि त्यामुळे मोजे न घालूनही मला पायाला थंडी वाजली नाही.. साधारण सकाळी १० च्या दरम्याने आम्ही जोंगीरपू इथे पोहचलो आणि इथे परिक्रमा पूर्ण झाली.. पोहचल्यावर शेर्पाने जूस (गरम गरम) दिला आणि स्वागत केले.. एक भलताच  आनंद आणि समाधान आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता.. घोडेवाले आधीच  आले होते... चालणारे सगळे आल्यवर मग सर्वांनी आनंद साजरा केला,एकमेकांना अभिवादन केले.. मला किती काकुनी जवळ घेतले,आलिंगन दिले.. आणि मग ग्रुप फोटो!!!  आमच्या ५० पैकी ४० जणांनी घोड्यावरून  तर १० जणांनी चालत परिक्रमा पूर्ण केली होती.. चालणाऱ्यापैकी मी एकटीच मुलगी आणि बाकी सगळे काका.. त्यामुळे माझे जास्त कौतुक झाले.. पण खरं सांगायचं तर त्या काकांच जास्त कौतुक केला पाहिजे.. पन्नाशीच्या पुढे त्यांच्या तब्येती इतक्या उंचीवर चांगल्या राहिल्या आणि उत्साहाने त्यांनी परिक्रमा पूर्ण केली.. मी त्यांच्या एव्हढी झाल्यावर माहिती नाही माझ्यात तेव्हढी शक्ती आणि उत्साह असेल का.. आणि घोड्यांवरून परिक्रमा पूर्ण केलेल्यांचेही तेव्हढेच कौतुक.. तेपण अवघड होते बरेच..

आता इथे आमच्या गाड्या परतीच्या प्रवासासाठी सज्ज होत्या.. इकडून आम्ही दार्चेनला गेलो जिथे आमच्यापैकी काही मंडळी जी परिक्रमेला येऊ शकली नव्हती ती राहिली होती.. दार्चेनला गेल्या गेल्या सगळ्यात आधी मी घरी फोन केला आणि आई बाबांना परिक्रमा चालत पूर्ण करता आली हे सांगीतले.. त्यांनाही खूप आनंद झाला.. मात्र फोनला मोठी रांग होती त्यामुळे जास्त बोलता आले नाही.. तिथेच दुपारचे जेवण घेतले.. परिक्रमा पूर्ण झाली म्हणून आज रसगुल्ले होते.. :) तिथून कैलासाचे शेवटचे दर्शन झाले ,खूपच लांबून.. आणि पुढे मानस सरोवर लांबून दिसले.. ते दिसेनासं होईपर्यंत मी तिथे पाहत राहिले.. या यात्रेसाठी मला खूप जणांच्या शुभेच्छा मिळाल्या होत्या त्यासर्वांची मला इथे खूप आठवण झाली.. सगळ्यात आधी माझे आई बाबा आणि घरचे .. त्यांनी मला परवानगी दिलीच नसती तर इथे येण्याची संधी मला मिळालीच नसतीना.. त्यांच्या कडून परवानगी कशी मिळवली हि एक वेगळी मोठी गोष्ट आहे.. :) मग माझा ऑफिस प्रोजेक्टचा client  & TL ,त्यांनी  सुट्टी दिली नसती तर.. नंतर माझे  teammates  आणि ऑफिसमधले friends ज्यांच्याशी इथे येण्याआधी दिवसदिवस किती चर्चा केली होती.. आणि माझे सगळे friends and  well wisher  ज्यांनी मला यात्रेबद्दल शुभेच्छा दिल्या, प्रेरणा दिली, कौतुक केले आणि मार्गदर्शन केले होते.. यासर्वांचे  मी मनातून आभार मानले.. आणि त्यांच्यावतीने कैलास मानसला परत एकदा नमस्कार केला..
आता परतीचा प्रवास सुरु झाला.. असं वाटत होतं कुठे थांबू नये, थेट काठमांडूला जावे आणि तिथून तत्काळ  flight  पकडून लगेच पुण्यात घरी.. खरंच आता सर्वाना घरचे वेध लागले होते..
गाडीमध्ये मग सगळे परिक्रमेच्या वेळेस झालेल्या गमतीजमती सांगत होते.. सगळे मनापासून खुश होते, एक वेगळ्याच हास्याने सर्वांचे चेहरे उजळले होते.. आता प्रवास कमी उंचीच्या दिशेने होता त्यामुळे जास्त प्रवास आणि फक्त रात्रीपुरते राहायचा मुक्काम..
संध्याकाळी आम्ही डोंगबा येथे मुक्कामासाठी थांबलो.. इथेही ४/५ जणी एकेका रूम मध्ये होतो.. थंडी भरपूर होती त्यामुळे अजूनही जर्किन काढायचे धाडस होत नव्हते.. आज रात्रीचं  विशेष म्हणजे आज diamox  गोळी दिली नाही.. काहीतरी चुकल्या चुकल्यासारखे वाटत होते.. आम्ही कितीतरी वेळा गोळीची आठवण केली  पण आता इथून पुढे गोळीची गरज नव्हती.. :)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: