शनिवार, ३० जुलै, २०११

मंतरलेले दिवस - ३५

Attitude Sickness..

तिची अन माझी ओळख एका कॉमन मैत्रिणीमार्फत झाली.. एकदा माझी मैत्रीण माझा GM मेल वाचत होती तेव्हा 'ती' मला म्हणाली मलाही पाठवत जा तुझे मेल्स.. तसं पाहायला गेलं तर टीम मध्ये बऱ्याच मुली आहेत.. आम्ही सगळ्याजणी वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करतो तरी सगळ्यांची चांगली मैत्री आहे.. पण त्यात 'ती' जरा शिष्ठ वाटल्याने मी स्वतः कधी तिच्याशी बोलायला गेले नाही.. आता तीच म्हणत होती  मेल्स पाठव म्हणून मग मी मग माझ्या यादीमध्ये तिचे नाव घातले.. सुरुवातीला तिचे छान म्हणून प्रतिक्रियादेखील यायची.. 

काही दिवसांनी टीममधल्या एकाचं तिच्याशी जमलंय असं ऐकण्यात आलं..  मला तर ही बातमी ऐकून छान वाटलं.. तो मुलगा चांगला आहे आहे अन हीपण दिसायला सुंदर,अनुरूप जोडा.. शिवाय आपलं आपलं लग्न ठरवणाऱ्यांच्या आई वडिलांना मुलांच्या लग्नासाठी चप्पला झीझवाव्या लागत नाही ही किती चांगली गोष्ट आहे हे मला हल्ली फार जाणवतं.. मला असं जमलं नाही याची खंत नेहमी वाटते.. असो.. तर त्यांच्या  प्रेमप्रकरणाच्या चर्चेचे वारे जोरात वाहू लागले.. अर्थात त्याला कारणीभूत तेच होते.. डोळे मिटून दुध पिणाऱ्या मांजरीला काहीही वाटलं तरी जग तिच्याकडे बघतच असतं.. ही बातमी खरी चांगली होती पण त्याला उगाच वेगळं वळण लागलं.. त्या दोघांचं त्यांच्या रोजच्या जेवणाच्या ग्रुप मधल्या जवळच्यांशी वागणं बदललं.. कितीही चांगला नवरा मिळाला तरी मैत्रीण ही जीवाभावाची मैत्रीण असते हे समजण्याइतपत तिची कुवत नव्हती बहुतेक,कदाचित वयाने लहान असल्याने.. यथावकाश तिचं काही कारणाने माझ्या मैत्रिणीशी, आमच्यातल्या कॉमन मैत्रिणीशी भांडण झालं.. तिने त्यांचा लंच ग्रुप सोडला.. नाश्ता, जेवण, चहा सगळं  त्याच्यासोबत.. गम्मत म्हणजे तिच्यासारखं त्यानेही बोलणं बंद केलं.. नंतर त्याने इन्फी सोडून दुसरीकडे नोकरी धरली... तेव्हा मग ती वेगळ्या मैत्रिणींसोबत जाऊ लागली पण थोड्या दिवसांनी तिचं त्यांच्याशीही पटेनासं झालं.. हळू हळू टीम मधल्या सगळ्या मुलींशी तिने बोलायचं पूर्णपणे बंद केलं.. ती एक सुंदर मुलगी.. फ्रेशर म्हणून लगेच पहिला जॉब इन्फी मध्ये मिळून एखादं वर्ष झालं असावं..  अशा मुलींच्या आसपास मुले नेहमीच घुटमळत असतात.. त्यामुळे आता ती त्या मुलांसोबतच असते पण आम्हा मुलीना मात्र ओळखही दाखवत नाही..

रोज सकाळी आम्ही एकाच वेळेस ऑफिस मध्ये येतो.. वॉशरूम मध्ये गेल्यावर नकळत मी अगदी रोज तिच्याकडे बघून एक स्माईल देत गुड मॉर्निंग म्हणते पण या madam च्या चेहऱ्यावर काहीच भाव नसतात, हास्य तर फार दूरची गोष्ट.. रोज असा अनुभव येऊनही पुन्हा तसंच घडतं..खूप सहजतेने एखाद्याकडे आपण हसून बघतो,शुभेच्छा देतोना.. they say "affection, openness and appreciation of qualities builds a long lasting relationship.."  पण ती मात्र काहीतरी खुन्नस असल्यासारखी वागते.. आमच्यापैकी एकीच नुकतच लग्न झालं म्हणून स्वीट्स आणले होते तर जवळच्या क्युबिकल मध्ये बसूनही 'तिने' ना तिला शुभेच्छा दिल्या ना स्वीट्स घेतले.. अगदी पर्वाची गोष्ट.. रविवारी वाढदिवस झाला तर सोमवारी सगळे मला  belated  happy  birthday  म्हणत होते पण ती काही एका शब्दानेही बोलली नाही.. मी तर रस्त्यावरचा कोणाचा आज वाढदिवस आहे कळलं तरी त्याला शुभेच्छा देते.. कोणी शुभेच्छा दिल्या तर माझा वाढदिवस चांगला आणि नाही दिल्यातर खराब असं काही नसतं.. पण वाढदिवसाला शुभेच्छा देणे हा एक संस्काराचा भाग आहे.. पण यातही लोकं attitude दाखवतात.. यामध्ये कमीपणा वाटतो की काय माहिती नाही..

खरंतर माझं तिच्याशी कधीच काही भांडण झालं नाही.. आणि मी तिला त्याच्यावरून कधी काही विचारलं नाही ना कधी चिडवलं.. तरी ती माझ्याशीही अशी का वागते हा मोठा  प्रश्न  होता.. बर काही चुकलं असेल आमचं तर बोलून दाखवावं.. समोरच्याला कळावं तरी नक्की काय झालंय ते..  त्यावर माझी मैत्रीण स्पष्टपणे  म्हणली की  "तिच्या डोक्यात हवा गेली आहे सध्या.. वेळेवर नोकरी,पैसा, boy  friend सगळं मिळालं आहे  त्यामुळे ती माज करत आहे.. तूही तिला मेल्स पाठवायचे बंद कर".. त्यावर मी मैत्रिणीला म्हणलं.. "माझ्या gm मेल्स मध्ये बरेचदा सुविचार,ओव्या असतात.. त्या तिला जास्त गरजेच्या आहेत त्यामुळे ती जोपर्यंत मला म्हणत नाही की मेल्स पाठवू नको तोपर्यंत मी तिला पाठवणार.. भले ती मेल बघून डिलीट मारत असेल किवा अजून काय.. 'attitude sickness ' झालाय तिला, येईल कधीतरी जमिनीवर.. ती कितीही भाव खाणारी असली तरी मी किती हट्टी आहे हे तिला माहिती नाही.. एक ना एक दिवस माझ्या मेलला ती नक्की उत्तर देईल.. देखते है किसमे है कितना दम.."

एकंदरीत अशा लोकांकडे पाहून मला वाटतं भले मी सुंदर गोरीपान नाही, भले मला कॉलेज झाल्याझाल्या लगेच नोकरी मिळाली नाही,संघर्ष करावा लागला, भले माझ्या नावावर घर गाडी नाहीये,  भले मला कोणी boy friend  नाही,माझं लग्न वेळेवर झालं नाही.. पण काही नाही तरी माझ्या चेहऱ्यावर स्माईल तरी आहे.. कोणाला वाढदिवसाला ,लग्नाला शुभेच्छा देऊन त्यांच्या आनंदात सामील व्हायचे माझ्यावर संस्कार तरी आहेत.. कोणाचं मोकळेपणाने कौतुक आणि आदर करण्याइतपत मोठं माझं मन आहे.. कोणाला गरज असेल तेव्हा शक्य तेव्हढी मदत करायला माझ्याकडे वेळ आणि इच्छा आहे.. am truly luckier than her..


माना अपनी जेब से फ़कीर हैं
फिर भी यारों दिल के हम अमीर हैं
मिटे जो प्यार के लिये वो ज़िन्दगी
जले बहार के लिये वो ज़िन्दगी
किसी को हो न हो हमें तो ऐतबार
जीना इसी का नाम है




बुधवार, २७ जुलै, २०११

मंतरलेले दिवस - ३४

Education makes a difference..


Infy campus! इथे येऊन आता मला जवळ जवळ एक वर्ष होईल पण अजूनही दररोज मला ती सुंदर फुलं पाने, हिरवळ ,पाखरे तेव्हढंच मोहवून टाकतात.. रोज सकळी ऑफिस मध्ये आले की किती अन काय पाहू असं होतं..  कधी कामाचा वा इतर गोष्टींचा ताण आला किवा कधी कंटाळा आला, झोप आली, ब्रेक हवा असेल किवा कधी  कधी काहीही कारण नसतानाही की या बागेत एक चक्कर मारल्यावर एकदम टवटवीत वाटते .. उन्हाळ्यात हिरवगार असलेल्या या परिसराचा रुबाब पावसाळ्यात तर विचारूच नका.. छान छान रंगेबिरंगी फुले उमलेली दिसतात.. हिरव्या गालिच्याची किनार लिलीच्या पांढर्या फुलांनी एकदम खुलून दिसते..  झाडांवर फुलांवर पावसाचे पाणी पडल्याने ते अजूनच सुंदर दिसतात.. आणि या सौदर्याचा उपभोग मी जास्तीत जास्त घेते..

परवा असंच फिरत होते तेव्हा पाऊस सुरु झाला.. मग मी माझ्या खाजगी जागेत म्हणजे अम्पी थेटरपाशी आले..  :) मी कुठे सापडले नाहीतर तिकडे असते असं मी माझ्या मैत्रिणींना सांगून ठेवलं आहे.. हे  थेटर अशी एक मोकळी जागा आहे जिथे इन्फीचे मोठे कार्यक्रम होतात.. पण एरवी दुपारी तिथे कोणी नसतं.. एक छोटं स्टेज आणि त्याभोवती प्रेक्षकांना बसण्यासाठी वर्तुळाकारात फरशीच्या पायऱ्या.. आणि सभोवताली कडेनी झाडे.. बरेचदा मी इथे येते तेव्हा क़्वचित एखादा कोणी फोनवर बोलत बसलेलं दिसतं.. बागेची कामं करणारे लोक कायम असतात.. आजही तिथे काही बायका गवत काढण्याचे काम करत होत्या.. झाडाखाली पायरीवर पाऊस लागत नव्हता म्हणून तिथे पावसाचा आनंद घेत बसले होते.. आणि बघता बघता पावसाचा जोर वाढला.. अन  मी भिजू लागले.. इन्फी मध्ये ठिकठिकाणी छत्र्या ठेवलेल्या असतात पण इथे पायऱ्यांवर छत्री कशी असेल.. त्या बायका लांब होत्या त्या लगेचच स्टेजमागच्या रूम जवळ गेल्या.. मी तिथे जाईपर्यंत पूर्ण भिजले असते असा पावसाचा जोर होता.. तेव्हढ्यात बागेतला एक माणूस छत्री घेऊन लांबून म्हणला, "madam ही छत्री घ्या.."  मी नको म्हणलं कारण ती छत्री ते मला द्यायला पुढे आले असते तर रूमपाशी जाईपर्यंत ते स्वतः भिजले असते.. ते जरी बागेतले कामगार असले तरी माणूसच आहेत, जसं पावसात भिजून माझे कपडे ओले झाले असते,मला सर्दी झाली असती तशी त्यानाही होण्याची शक्यता होती.. त्यांचं ते रुमपाशी जाऊन थांबले असते तरी त्यांना कोणी काही म्हणणार नव्हतं.. तरी ते त्यांच्या कामाचा एक भाग म्हणून मला छत्री द्यायला आले.. किती एकनिष्ठ होते ते त्यांच्या नोकरीशी.. त्याचा त्यांना पुरेसा मोबदला मिळत असेल का?

त्या दिवशी मला अगदी प्रकर्षाने  जाणवलं की हे बागेतले लोक सतत मन लावून  काहीना काही काम करत असतात,उन्ह असो वा पाऊस.. ऑफिसमध्ये काहीजण सतत फारश्या पुसत असतात, काचा पुसत असतात.. कॅन्टीन मधले लोक सकाळपासून रात्रीपर्यंत नाश्ता,जेवण ,साफसफाई यात गुंतलेले असतात.. आणि आम्ही संगणक अभियंता वातानुकुलीत ऑफिस मध्ये निवांत पणे काम करत असतो तेही खाणं पिणं अन गप्पा मारत.. तेही मनुष्य प्राणी आणि आपणही माणसंच.. मग ही फट कुठे तयार झाली?  याचं एकच उत्तर म्हणजे 'शिक्षण'.. नशिबाने आपल्याला योग्य शिक्षण मिळालं अन चांगली नोकरी मिळाली यामागे आपल्या पालकांचे आणि देवाचे आभार मानू  तेव्हढे  कमीच.. नाहीका..


They say.. "The purpose of education is to develop knowledge, skills and character. Knowledge makes all the difference. In this life everything perishes over a period of time. Whether it be beauty, diamond, gold or even land. Only one thing withstands destruction. It is Knowledge. The more you give, the more you get."

I'm not lonely, I'm just alone..

Solitude is the joy of being alone,it is being with urself.. while loneliness is getting bored with being alone..

मी कुठल्या समारंभाला गेले आणि तिथले विषय माझे नसतील  तर तिकडे मला एकटं वाटतं,बोर होतं.. म्हणजे गर्दीत असून एकटेपणा वाटणे..
आणि कधी मी एकटीच कुठेतरी भटकत असते तेव्हा मी मनापासून आनंद घेत असते.. म्हणजे एकटं  असून एकटं नसणं..

समर्थांनी दासबोधात  म्हणले आहे ..
जयास येकांत मानला| अवघ्या आधीं कळे त्याला |

सोमवार, २५ जुलै, २०११

मंतरलेले दिवस - ३३

"एकाच या जन्मी जणू.. फिरुनी नवी जन्मेन मी.." :)


नुकताच वाढदिवस झाला आणि पुन्हा एक नवीन आयुष्य सुरु झालं..  जाता जाता मन एकदा भूतकाळात फिरून आलं..  त्या गतकाळातील अनुभवांवरून मिळालेले धडे  इथे नमूद करत आहे..


कधी कधी आपण कोणाला जवळचं मानून त्यांच्यासाठी काही खास करतो..  आणि कालांतराने ते लोक सगळं विसरून जातात, आपल्यासाठी ते काहीही करत नाही.. आशावेळेस आपणच दुखी होतो.
खरतर आपण प्रेमाखातर त्यांच्यासाठी मनापासून काही केलं असतं इथेच आपलं कर्तव्य सपंतं.. ते किंमत ठेवत नाही ही अडचण त्यांची आहे.. याबाबतीत गंभीर त्यानी व्हायला पाहिजे.. आपण आपल्यापरीने सगळं करून पुन्हा आपणच वाईट वाटून का घ्यायचं..


बरेचदा असं जणवतं की काहीजण आपला ठराविक वेळेपुरता काही कारणासाठी एखाद्या वस्तुप्रमाणे वापर करतात आणि नंतर सोडून देतात.. मग आपणास वाईट वाटतं..
या बाबतीत आपण निश्चिंत राहायला पाहिजे.. आपला उपयोग केला गेला असेल तर आपण कोणाच्यातरी कामी आलो म्हणून आनंदी राहायला पाहिजे आणि  अशा व्यक्तीला गरज पडेल तेव्हा ती व्यक्ती आपल्या आयुष्यात पुन्हा येतेच.. आणि नाहीच आली तर ती व्यक्ती मजेत आहे हे समजून आपण शांत आनंदी व्हायला पाहिजे..


काही वेळा आपल्या आसपासचे लोक कोणत्या न  कोणत्या कारणांनी भेदभाव करून आपल्याला कमी लेखतात.. तेव्हा आपला आत्मविश्वास कमी होऊन आपण खचतो..
खरतर समोरचा आपल्याला कमी लेखणारा,आपल्याकडे दुर्लक्ष करणारा माणूस म्हणजे काही अख्ख जग नसतं.. अशा वेळेस आपल्या मनाची अन् बुद्धीची दृष्टी विशाल केली की समजतं की आपण जसे आहोत तसे खूप काही करू शकतो.. जगात कित्येकांना आपण हवे आहोत..


या व्यवहारी जगात सरळ साधेपणा.. प्रामाणिकपणा.. सवेंदनशीलता.. मोकळेपणा.. या गोष्टीना कमजोर समजले जाते..
परंतु याच मूल्यांमुळे माणुसकी नावाची गोष्ट जिवंत राहते.. आणि कुठेतरी तो सगळं पहात असतो त्यामुळे आज ना उद्या योग्य न्याय नक्कीच मिळतो..


आपण नेहमी दुसऱ्यांच्या चुकांवर रागावतो आणि स्वतःच्या चुकांनी हळहळतो..
खरतर कोणीच परिपूर्ण नसतं .. त्यामुळे मनात काही न ठेवता स्वतःला आणि इतरांना मोठ्या मनाने माफ केला तर मन हलकं होतं.. असे केल्यास आपण  खऱ्या अर्थाने स्वतंत्र अन् मोकळे होतो..


आणि सर्वात महत्वाची शिकवण.. भगवदगीतेत म्हणले आहे जसे..

उथ्धरेथ आत्मनात्मानं नात्मानम अवसाथयेत!
आत्मैव हय आत्मनॊ बन्धुर आत्मैव रिपुर आत्मनः!!

"One must deliver himself with the help of his mind and not degrade himself..  You are your Best Friend & You can become your Own Enemy too!!! "




गुरुवार, २१ जुलै, २०११

मंतरलेले दिवस - ३२

तुम आगये हो.. नूर आगया है.. :)

संध्याकाळची वेळ.. ऑफिसमधून घरी जायला अजून वेळ होता.. तेव्हढ्यात फोन आला आणि मी लगेचच घरी निघाले.. डयुटी लागली होती.. :) बाळाच्या आईला आणि आजीला थोडं बाहेर जाऊन यायचं होतं.. मग एकटे आजोबा कसे सांभाळणार म्हणून मावशीला इकडे तिकडे न जाता थेट घरी यायची आज्ञा झाली होती..
घरी गेल्यावर पिल्लूला म्हणलं "अब तुम मेरे कब्जे मै हो.."!!! तसं एरवी मी घेते त्याला पण आज फक्त आमचंच राज्य..  आणि त्याला आजोबांची खूप सवय आहे पण मी आपलं संधी मिळाली म्हणून चार्ज घेतला होता.. दुध झोप सगळे कार्यक्रम आधीच आटोपल्याने स्वारी खेळायच्या मूड मध्ये होती.. त्याला खाली त्याच्या छोट्या गाडीवर ठेवून मी आणि (माझे) बाबा आम्ही त्याच्याशी खेळत बसलो.. "तुझ्यासाठी आज आल्या आल्या pc  सुरु केला नाही बघ मावशीने, केव्हढा हा त्याग " असं म्हणून बाबा मला चिडवत होते..
संध्याकाळी बाळाला ताजातावाने वाटावे म्हणून त्याला आवरायचा कार्यक्रम.. एरवी त्याला चार लोकं सुधा पुरत नाही..  सतत इतके हात पाय मारून सायकल खेळत असतो कि कपडे बदलताना कोणी हात धरायचे, कोणी पाय असे प्रकार चालू असतात.. आज मात्र आम्ही दोघंच होतो.. टोपडं आणि सगळे कपडे काढल्यावर बाळराजे खुदुखुदू हसू लागतात, त्यांना लई भारी वाटतं.. :) कोमट पाण्यानी अंग पुसताना त्याचे भाव असे असतात ना कि काय करतात हे माझं..  Johnson's baby powder चा वास मला स्वतःला फार आवडतो.. त्या वासासाठी मी या वयात पण ती पावडर वापरते मधून अधून.. ;) तर आता मी त्याला कापसाच्या बोळ्याने हळुवारपणे पावडर लावत होते.. त्याला वास येत असेल का, पावडरने ताजे वाटत असेल का, त्याला समजत असेल का आपण काय करतोय ते  असे side by side माझे प्रश्न चालू होते.. तो मात्र नेहमीसारखा टकामका इकडे तिकडे कुतूहलाने पहात होता..
आता कसं छान फ्रेश वाटतंय म्हणे पर्यंत पठ्ठ्याने शुचा कार्यक्रम केला.. कारंज सगळीकडे उडवले.. माझं ड्रेस तर ओला झालाच पण तोही ओला झाला.. आताच त्याला पुसून काढलं होतं,पावडर लावली होती आणि लगेच चित्र बदलून टाकलं.. मावशीला कसं कामाला लावलं अशा नजरेने छोकरा गळ्यातल्या गालात हसत होता.. पुन्हा पुसून आवरलं.. आणि लगेच डायपर , कपडे घातले आणि म्हणलं आता पाहिजे तेव्हढ कर काय करायचं ते.. :) कपड्यांची मजा म्हणजे जे लगेच मिळालं ते घातलं.. matching वगैरे काही प्रकार नव्हता.. एका रंगाचा शर्ट, वेगळीच प्यान्ट आणि मोजे तिसर्या रंगाचे.. पिल्लूला म्हणलं याला multicolors म्हणतात! आता टीट लावायची..  बाळांना छान आवरून कपाळावर किवा गालावर टीट लावली कि किती गोड दिसतात ना ते.. आणि हे काम सगळ्यात अवघड असतं हे माझ्या आताशा लक्षात आलं... इतकी वळवळ चालू होती त्याची.. बाबांनी त्याला धरलं आणि मी टीट लावायचे प्रयत्न करू लागले.. त्याला धरल्यामुळे तो अजून जास्त हालचाल करत होता, डोकं हलवत होता.. अशात मी टीट लावल ते एका बाजूला कडेला लागला.. म्हणलं तुझी आई मला रागावेल बाबा, आमच्या बाळाला असं का आवरलं म्हणून.. ते पुसून पुन्हा एका प्रयत्न.. आता थोडातरी मध्ये लागलं पण हा पोरगा लगेचच ते फिसकटवतो म्हणून त्यावर थोडी पावडर  लावली.. आता आमचं पिल्लू एकदम वारकरी दिसू लागला.. थोडावेळ विठ्ठल विठ्ठल केलं.. या सगळ्या प्रकारात बाळाने एकदाही कुरकुर केली नाही हे विशेष .. :)
आता गप्पा.. आजी आजोबांनी नातवाला गप्पा मारायची जास्तच सवय लावली आहे.. जरा आम्ही इकडे तिकडे पाहिलेलं याला चालत नाही.. त्याच्या अवती भोवती सगळ्यांनी बसायचं अन त्याच्याशी बोलायचं.. मध्येच बाबांना मी काहीतरी ऑफिस मधलं सांगत होते तर याला वाटलं मी त्याच्याशीच बोलत आहे.. माझं सगळं लक्ष देऊन ऐकणारा तो एकमेव पोरगा असावा या पृथ्वीतलावर.. :) सेलमध्ये "कोणास ठाऊक कसा" गाणं लावला तर याला वाटलं मीच गात आहे,किती निरागस भाव दिसले मला त्याच्या डोळ्यात.. त्याने मध्येच हसायचं, मध्येच रडायचं आणि आपण कारणं शोधायची..
नंतर तर त्याच्या गप्पा सुरु झाल्या.. 'ओ, उ' असं काहीतरी बोलून तो खरच काही सांगत होतं.. मीपण त्याला प्रतिसाद देत होते.. बागेत जायचं, थोडा मोठा हो तू, मग जाऊ आपण.. आई आजी भूर गेली म्हणून तक्रार  करतोयस का, आपण त्यांच्याशी कट्टी घेऊया.. बाबा भेटायला आले नाही ना,आले कि आपण रागवू या वगैरे.. बालक आताच हुशार झाले आहेत.. मध्येच लाडीगोडी लावतो तो घे म्हणून.. आणि त्याला मांडीवर चालत नाही.. त्याला घेऊन घरभर फिरायचं.. हे काम मात्र आजी आजोबाना आणि त्याच्या बाबांनाच जमतं.. :)
आई आल्यावर घडल्यात पहिले तर २ तास होऊन गेले होते.. हा वेळ भूरकन उडून गेला मला अजिबात कळले नाही.. बाळ लीलांमध्ये बाकीच्या गोष्टींचा कसा विसर पडतो याचा प्रत्यय मला आज आला.. मी तर रोज थोडाच वेळ भेटते त्याला तरी मी इतके भारावले आहे.. तर बाळाच्या प्रत्यक्ष आईची मनस्थिती कशी होत असेलना.. प्रत्येक स्त्रीला मिळालेली हि एक अमोल देणगी आहेना.. या जन्मात मलाही हे सुख मिळावं हीच माझी ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना..

गुरुवार, १४ जुलै, २०११

मंतरलेले दिवस - ३१

 कल हो ना हो..

"मुंबई पुन्हा हादरली, तीन स्फोटांची मालिका.. संपूर्ण महाराष्ट्र हादरलं.." मन सुन्न झालं.. निष्पाप जीवांच्या उरावर का बसतात हे लोक समजत नाही.. अतेरिकी , राजकारण हा भाग वेगळा पण त्रास कोणाला झाला.. सफर कोण झालं.. किती गेले, किती जखमी झाले अन कितीजण थोडक्यात वाचले?  त्यातले कित्येकजण खरेदीला गेले असतील, कोणी ऑफिस मधून परतत असतील, कोणी काही कामासाठी बाहेर पडले असतील तेव्हा ते परत कधी येणार नाही अशी शंका त्याच्या घरच्यांच्या किवा स्वतः त्यांच्या मनात चुकूनतरी आली असेल का? त्यांच्यातले कोणी कोणाला भेटून निघाले असतील ती भेट शेवटची याची कल्पना त्यांना असेल का? काहीजण  कोणाला भेटायला निघाले असतील तेव्हा वाट बघणाऱ्याची हालत काय झाली असेल?

बॉम्ब स्फोट ही एक घटना.. तसं भूकंप, पूर, साथीचे रोग (स्वायिन फ्लू), अपघात अशा अचानक उद्भवणाऱ्या अनेक आपत्तींना मनुष्याला तोंड द्यावे लागते.. एक ना एक दिवस प्रत्येकाची वेळ येते.. मरण अटळ आहे.. हे असं इतकं माहिती असताना आपण आपल्या हाताने नाती का तोडायची?  वेळ नाही म्हणून आपल्या सख्यासोयारयाना टाळायचं.. ज्यांच्याशी आता संबंध आहे त्यांच्याशीच बोलायचं अन बाकीच्यांना अजिबात भाव द्यायचा नाही..  'मी का म्हणून' असा खोटा अभिमान धरून संपर्क तोडायचा..  वर्ण, धन संपत्ती, पद, जात अशा हजारो गोष्टीनी आपापसात भेदभाव करायचा.. स्वतः कडे सगळं आहे म्हणून माज करयचा आणि दुसर्यांना कमी लेखून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं.. मनात कोणाबद्दल कशाबद्दल तरी राग धरायचा आणि बोलायचं नाही.. कोणाशीतरी वैर धरायचं..  स्वतःचे हित पाहिचे, बाकीचे गेले उडत..

दोन घडीच आयुष्य आपलं..  आज आहे उद्या नाही, कसलाच भरवसा नाही.. मग कोणाशी असं का तोडून वागायचं? एखाद्याचा काही चुकत असेल किवा त्याच्याबद्दल  काही शंका/संशय असतील  तर ते मनात ठेवण्यापेक्षा स्पष्ट बोलून दाखवलं तर सुधारणा होऊ शकते ना.. वेळ नसेल मिळत तर तसा नीट पद्धतीने सांगू शकतोना..  आणि तुम्ही सुंदर गोरेपान, हुशार असताल, पैसेवाले असताल, तुमचं नशीब बलवत्तर असेल त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना यश येत असेल, तुमचं वेळेवर सगळं होत असेल पण या गोष्टी क्षणिक आहेत.. काळाप्रमाणे बदलणाऱ्या आहेत.. त्यामुळे उन्ह असो वा  पाऊस, आपण एक माणूस म्हणून नेहमी जमिनीवर राहिलं पाहिजे आणि समोरच्याचा एक माणूस म्हणून नेहमी आदर ठेवला पाहिजे भले तो कोणी का असेना..

प्रत्येक दिवस हा शेवटचा आहे आहे असा समजून वागला तर जीवन प्रवासाला खूप वेगळे वळण मिळते.. आज आपण या व्यक्तीशी शेवटचं बोलणार आहोत असं समजायचं.. मग समोरच्यासाठी आपोआप आपलं मन मोठं होतं.. मी हे अनुभवलं आहे.. कैलास मानसला जाताना मी परत येणार नाही अशा भावनेने तयारी केली होती.. सगळ्यांचा निरोप घेतला होता..  अगदी माझ्या खाजगी गोष्टींचं पुढे काय करायचं याची सोय लावून गेले होते म्हणूनच मी त्या अनोळखी लोकांबरोबर यात्रा मस्त एन्जोय करून येऊ शकले.. सरळ शुद्ध मनाने केलेल्या सगळ्या गोष्टीना यश मिळतं, होना..

म्हणून माझी मनापासून नम्र विनंती आहे की ज्यांना तुम्ही हवे आहात त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यांना तुमचा वेळ द्या.. तुम्हाला त्या व्यक्ती आवडत नसतील तरी त्यांच्याशी नातं तोडू नका.. कारण थोड्याच दिवसांचा प्रश्न असतो हा.. और फिर क्या पता कल हो ना हो..

चाहे जो तुम्हें पूरे दिल से
मिलता है वह मुश्किल से
ऐसा जो कोई कहीं है
बस वही सबसे हसीं है
उस हाथ को तुम थाम लो
वह मेहरबाँ कल हो न हो

लहान तोंडी मोठं घास झाला असल्यास माफी असावी..

सोमवार, ११ जुलै, २०११

पहिले पाढे चार...

एक दिवस प्रेमाचा..  दोन दिवस वादाचे..  तीन दिवस विरहाचे..  अन चार दिवस आठवणींचे..

एक दिवस स्वप्नांचा..  दोन दिवस भावनांचे..  तीन दिवस विचारांचे..  अन  चार दिवस वास्तवाचे..

एक दिवस मोहाचा..  दोन दिवस भोगाचे..  तीन दिवस जाणिवेचे..  अन चार दिवस पश्चातापाचे..

एक दिवस तृप्तीचा..  दोन दिवस सुखाचे..  तीन दिवस आसवांचे..  अन चार दिवस कंटाळ्याचे..

एक दिवस जगाचा..  दोन दिवस सोयरयांचे..  तीन दिवस स्वतःचे..  अन चार दिवस ईश्वराचे..