सोमवार, २५ जून, २०१२

मंतरलेले दिवस - ६५

एकदा माझ्या बिल्डींग मधील दोन मुले गच्चीत चेंडू खेळत होते.. खेळता खेळता चेंडू खाली पडला..  तो घेण्यासाठी एकजण खाली गेला.. खाली पार्किंग वजा बागीचा आहे.. कुम्पणात इकडे तिकडे चेंडू तो छोटु शोधू लागला.. पण काही अंदाज लागत नव्हता.. शेवटी निराश होऊन त्याने वरती गच्चितल्या मित्राकडे पहिले तेव्हा तो मित्र म्हणाला "अरे तू चुकीच्या बाजूला शोधतोयस.. बॉल तर डावीकडच्या झुडापात दिसतोय,तो पहा तिकडे.."  लगेच हा धावत गेला अन् चेंडू हातात घेऊन म्हणाला "मला वरवरच दिसत होतं ,इतक्या आतले तुला तू उंचीवर असल्याने दिसले.." अन् मग चेंडू घेऊन तो खुशीत पुन्हा खेळायला लागला..

आपलही असच असतंना.. आपली दृष्टी खूप संकुचित.. जे वरवर,बाहेरून दिसते त्यावर आपण विश्वास ठेवतो.. कधी निराश होतो तर कधी फसले जातो.. एकच बाजू माहिती असते आपल्यालला हे कदाचित सार्‍या दुखांचे मूळ असावे.. कधी कधी मनात खूप गोंधळ उडतो,काय चुक काय बरोबर समजेनासे होते अशा वेळेस फक्त आधार असतो तो सद्गुरू महात्म्यान्चा.. कारण त्यांना त्यांच्या अध्यात्मतील उंचीमुळे पुढचे मागचे, इकडचे तिकडचे सगळे न्यात असते..  त्यांना शरण गेले की चिंता कमी होतीलच असे नाही कारण प्रारब्धाप्रमाणे भोग तर सर्वांना भोगावेच लागतातना  पण सगळं सहन करण्याची ताकद आणि सय्यम नक्कीच मिळतो.. ते आपल्याला विश्वास देतात की प्रत्येक गोष्टीमागे काही कारण आहे अन् जे होतय ते चांगल्यासाठीच.. स्वामी विवेकानंद यांनी म्हणले आहे..

God Gave Me Nothing I Wanted..
He Gave Me Everything I Needed.

बुधवार, २० जून, २०१२

अस्तित्व

मेघांचे जोरदार गरजणे..
विजांचे लखलख चमकणे.. कशासाठी.. स्व-अस्तित्वासाठी..

पावसाचे रिमझिम बरसणे..
पाण्यात तरंग उमटणे.. कशासाठी.. स्व-अस्तित्वासाठी..

फुलांचे मोहक बहरणे..
वेलींचे डौलदार झुलणे .. कशासाठी.. स्व-अस्तित्वासाठी..

वाऱ्याचे सुसाट वाहणे..
शिखरांचे गगनास भिडणे.. कशासाठी.. स्व-अस्तित्वासाठी

कोणाचे  वादात पेटणे..
कोणाचे  प्रीतीत वेडावणे.. कशासाठी.. स्व-अस्तित्वासाठी..

प्रवास हा आंधळा  खरा..  स्वतःस सिद्ध करण्यासाठी..
जो तो  इथे धडपडतोय.. कशासाठी.. स्व-अस्तित्वासाठी..!!!

बुधवार, १३ जून, २०१२

मंतरलेले दिवस - ६४

पाऊस.. मला मनापासून आवडतो.. मग तो रिमझिम असो वा धोधो.. पण तोच पाऊस कित्येकांना नकोसा वाटतो,चिखला मुळे, ट्रॅफिक जॅम मुळे.. म्हणजे पाऊस ही गोष्ट काही परिपूर्ण नाही कारण ती कोणाला आवडते अन् कोणाला नाही..

काही व्यक्तीदेखील अशा असतात ज्या मला चांगल्या वाटतात पण काहींना आवडत नाहीत.. किंवा काही व्यक्तींचा मला चांगला अनुभव नसतो पण इतरांना त्या आवडतात..  म्हणजे अमुक एक व्यक्ती चांगली किंवा बरोबर असे म्हणणे अवघड आहे.. या सगळ्या गोष्टी व्यक्तीसापेक्ष अन् परिस्थितीशी निगडीत आहे..

मग अशी कुठली गोष्ट आहे किंवा कोणती व्यक्ती आहे जी मला आवडते, पटते अन् इतरांनाही बरोबर वाटते..
उत्तर.. तू अहेसना.. मला तर नेहमीच आठवण येते तुझी.. प्रत्येक कणात अन् क्षणात तुझेच चैतन्य असते.. माझ्यासारखी प्रत्येकालाच तुझी जाणीव होत असते..  कोणी मनापासून तर कोणी स्वार्थासाठी का होईना तुझी प्रार्थना करतं.. प्रेम करण्यासाठी तुझ्या एव्हढे कोणीच लायक नाही आणि मदत मागण्यासाठी तुझ्या एव्हढे कोणीच जवळचे नाही..  कितीही माज असला तरी एक दिवस प्रत्येकाला तुझे अस्तित्व मान्य करावेच लागते.. तू सर्वांचा अन् सारं काही तुझच.. तूच सत् चित आनंद!!!


वर्ण अभिमान विसरली याती, एक एका लोटांगणी जाती..
निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे..