मंगळवार, २९ मे, २०१२

मंतरलेले दिवस - ६३

 

ही युगायुगान्ची नाती.. :)


त्यांचे आणि माझे नक्की नाते काय हे शब्दात नाही सांगता येणार.. एक आंतरिक जाणीव आहे जी फक्त त्या अन् मीच समजू शकतो.. आम्ही ना एका वयाचे, ना एका परिसरातले, ना एका कुटुंबातले.. सुरुवातीपासून एका विलक्षण ओढीने आम्ही जवळ आलो जशी काही आमची जन्मोनजन्मीची ओळख आहे.. प्रत्येक भेटीत ती ओळख जास्त पटते.. दोन्हीकडे भावना, संवेदना जाग्या आहेत त्यामुळे मनाचे सूर आपोआप घट्ट जुळतात..


कोणी  अगदी अचूक म्हणले आहे..   

तेरे मेरे दिल का, तय था इक दिन मिलना..

जैसे बहार आने पर,  तय है फूल का खिलना..


आवडत्या व्यक्तीच्या भेटीसाठी तारीख वेळ पाहावी लागत नाही, अगदी तसेच आमचे होते..  आपापल्या कामात कितीही व्यस्त असलो तरी भेटीसाठी वेळ कसाही काढतो..  आमची भेट म्हणजे माझ्यासाठी खरच एक मेजवानी असते.. त्या थोड्या वेळात मी किती ऐकू अन् किती सांगू असे नेहमी होते.. आमचे विषय मात्र तिसर्या माणसाने ऐकले तर त्याला त्यातील काही समजणार नाही असे असतात.. आमच्या गप्पा सुरू झाल्या की आम्हाला आजूबाजूचे काहीच भान उरत नाही.. या दोघी काय इतके काय बोलतात हा प्रश्न सर्वाना पडत असणार!


त्यांच्याकडून मला खूप विषयां मधील गोष्टी आणि अनुभव ऐकायला मिळतात.. सांगणार्‍याही भारावून जातात अन् ऐकणारीहि.. माझ्या मनात जे काही प्रश्न येतात ते मी अगदी मोकळेपणाने त्यांना विचारते.. त्यासाठी मला त्याना पूर्ण इतिहास सांगावा लागत नाही.. मी त्रयस्थपणे प्रश्न विचारते व त्याही त्रयस्थ पणे उत्तर देतात त्यामुळे कदाचित खरी उत्तरे मिळतात.. आयुष्यात अशी कोणी खास व्यक्ती मिळण्यासाठी नशीब लागतेना,मी या बाबतीत भाग्यवान आहे..

त्यांच्या सहवासात माझ्या मनाच्या गोळयाला चांगला आकार मिळतोय हे मला पदोपदी जाणवते.. सत्संग म्हणतात तो मी खूप जवळून अनुभवत आहे.. त्यांच्यासोबत असल्यावर माझी खात्री होते की हे क्षण माझे खरच मन्तरलेले आहेत.. नंतर या दिवसांची फार आठवण येईल.. देवाकडे माझी मनापासून प्रार्थना आहे की माझ्या जीवनात बाकी काही कमी जास्ती मिळालेतरी चालेल पण आमचा हा ऋणानुबंध कायम असाच टिकून राहावा.. :)

मंगळवार, १५ मे, २०१२

मंतरलेले दिवस - ६२

उन्हाची वेळ अन् गर्दीचा रस्ता.. भल्याभल्यांनाही ट्रॅफिक चुकवता येत नव्हते..
बसमध्ये बसलेला कारवाल्याकडे पाहत म्हणाला यांचे बरे आहे,मस्त एसीत बसायचे.. कारवाला दुचाकीकडे पाहून म्हणाला ते बरय,कुठेही गाडी घुसवून काढायची.. दुचाकीवाला सायकलकडे बघत म्हणाला सायकल चांगली,जग थांबले तरी तिला कोणी थांबवत नाही.. सायकलवाला रस्त्यावरून चालत जाणार्‍या माणसाकडे बघून म्हणाला तो नशिबवान,सूटसुटीत आपले आपले चालत आहे..  चालणारा मनुष्य बसकडे पाहत म्हणाला अशा गर्दीत बसच बरी,उन्हाचा त्रास नाही,निवांत बसून जायचे..
खरच त्यावेळेस नक्की सुखी कोण होते? प्रत्येकात काही जमेच्या गोष्टी तर काही तोटे होते.. सर्वांना एकमेकांकडे पाहून हेवा वाटत होता.. कोणीच पूर्ण नव्हते..
 अशात  एका रीक्षेत छोटसं बालक आपल्या आईच्या मांडीवर निश्चिंतपणे बसले होते.. आईच्या हातातल्या बांगड्यांमध्ये खेळण्यात इतके गाढ रमुन गेले होते की जगाकडे त्याचे बिलकुल लक्षच नव्हते.. ते त्या क्षणी सावलीत आहे म्हणून सुखी  नव्हते ना गर्दीत फसलो म्हणून वैतागले नव्हते ना एसी नाही म्हणून दुखी नव्हते.. त्याला कशाशीच घेणे देणे नव्हते..
त्याच्या चेहर्‍या होतं ते निखळ समाधान.. किती सुंदर दिसत होता त्याचा तो तृप्त चेहरा..
आईच्या कुशीत स्वताहाला झोकून देऊन निर्भयतेने वागणार्‍या  त्या बालकासारखे आपण जर भगवंतांच्या सानिध्यात ,स्मरणात विसावलो तर समाधानाची गोडी आपणासदेखील चाटता येईलना?
I certainly have an attitude for people having extra attitude!

मंगळवार, ८ मे, २०१२

मंतरलेले दिवस - ६१

Every Dress Has A Story ! :)

दिवस असे की म्हणायची वेळ आली.. ट्रेकचे मेल्स बघून जाण्याचा मोह होताच दुसरीकडे ते रणरणते उन्ह दिसून गपचुप घरी बसावे लागत होते.. म्हणून की काय पण सूर्य दुसरीकडे उगवून वृंदा चक्क प्रदर्शने, बाजारपेठा अशा ठिकाणी जाउ लागली.. सकाळच्या प्रदर्शनात एक कुडता आवडला अन् तो स्वस्तदेखील असल्याने  खरेदी केला आणि तिथून गोष्ट सुरू झाली.. :)

त्यावर मॅचिंग सलवार / लेगींस घेण्यासाठी आणि अशीच अजुन छोटी मोठी कामे असल्याने स्वारी आई सोबत लक्ष्मी रस्त्याला लागली.. अतिशय उन्ह असते हल्ली म्हणून सकाळी लवकर जाऊन लवकर परतु असे ठरले.. १० वाजता आम्ही निघालो.. नशीब चांगले होते, मोक्याच्या ठिकाणी पार्किंग साठी सुटसुटीत जागा मिळाली.. सुरूवात अर्थातच माझ्या लाडक्या दुकानपासून झाली.. हस्तकला ड्रेस मेटीरियल्सचे दुकान (साडीचे नव्हे).. वर्शोनवर्षे मी या दुकानात आधी येते अन् तिथेच खरेदी पूर्ण होते व त्यामुळे बाकी कुठे विशेष फिरवे लागत नाही.. आजही तसाच अंदाज होता,पटकन घेऊ आणि घरी जाऊ.. पण आज ताटात काही वेगळेच वाढून ठेवले होते! :)

मला राणीकलर आणि गुलाबी जांभळ्यामधील एक छटा पाहिजे होती.. या रंगाच्या आसपासचे हस्तकलावल्याने त्याच्या स्टॉक मधील सर्व नमुने दाखवले पण छे मॅचिंग नव्हते.. आईला म्हणाले दुसरीकडे पाहु.. हस्तकलाचा मालक म्हणाला कापडामध्ये फरक आहे,एकदम सारखे नाही मिळणार.. आम्ही हो म्हणून निघालो.. पहिल्यांदाच तिथून काही  खरेदी न करता निघालो याचे त्याला अन् आम्हालाही आश्चर्य वाटले..

मग काय अख्खा लक्ष्मी रोड धुवून काढला.. सहेली, हाय फॅशन, लुंकड आणि असेच सारी दुकाने फिरलो.. कुठे थोडी फिकी तर कुठे जास्त गडद अशा रंगाच्या सलवार दिसत होत्या.. दुकानांची परीक्षाच होती जणू.. एव्हढा स्टॉक असून काय उपयोग जर तुमच्या दुकानात  'client requirement' पूर्ण होत नसेल तर असे म्हणून आम्ही पुढे जात होतो.. काही दुकानवाले आव्हान दिल्यासारखे शोधत होते तर काहीजण हा रंग चालतोय असे म्हणून खपवायचे प्रयत्न करत होते.. मी मात्र ठाम होते,मला अगदी तशीच छटा मिळल्याशिवाय मी ऐकणार नव्हते.. कारण वेगळ्या रंगाने त्या ड्रेसची शोभा नक्कीच गेली असती.. शेवटी आम्ही मॅचिंग कापड मिळते का पाहु म्हणून फॅशन मध्ये गेलो अन् सुदैवाने तिथे डिक्टो कापड मिळाले.. पण इथे अजुन गोष्ट संपली नव्हती.. :)

एव्हढी खास सलवार शिवून घेत आहोत तर त्यावर मॅचिंग अजुन एक टॉप घेऊ हा कीडा डोक्यात आला.. मग पुन्हा सगळ्या दुकानांची झडती.. पण नाही, तो रंग निराळाच होता.. मध्ये मध्ये एकदा स्वीटहोमची भेट , मग काही वेळाने आईसक्रिम तर शेवटी चहाचीही वेळ झाली तरी मला पाहिजे तसे काही मिळत नव्हते.. शेवटी मी चिकनचा व्हाईट कुडता त्यावर ही सलवार आणि त्याला मॅचिंग ओढणी असा ड्रेस डिज़ाइन केला.. चिकनचे पांढरे कापड लगेच मिळाले पण त्या खास छ्टेची ओढणी शोधण्यासाठी मोहिम पुन्हा सुरू झाली.. मी हे काम आज नाही केले तर लगेच मी काही इथे फिरकणार नाही हें मला अन् आईलाही नीट माहिती होते.. त्यामुळे भटकंती चालूच राहिली..

शेवटी त्या रंगासाठी डाय करणे एव्हढा एकच पर्याय उरला.. ते मार्गाला लावून बाकी कामे आटपून आम्ही चक्क दुपारी ४ वाजता घरी परत निघालो.. पाय अशक्य दुखत होते.. आई म्हणली तुझे काम होते म्हणून नाहीतर माझे काम असले असते तर किती कटकट केली असतीस तू..  मी आईला म्हणले अग इतके उन्हात फिरायचे होते तर मी ट्रेकला गेले असतेना.. हा एक ट्रेकच झाला म्हणा, sunlight lakshmi road trek! :)

कधी कधी वाटते की मी टिपिकल मुलींसारखी का नाहीए.. म्हणजे माझी एक चप्पल तुटल्या शिवाय मी दुसरी आणत नाही.. दर वीकेंडला उठून खरेदीला जाण्यापेक्षा माझे मन निसर्गात जास्त रमते..  त्यामुळे आईला माझी याबाबतीत सोबत होत नाही याची कधी कधी खंत वाटते.. त्यामुळे आज आईला छान वाटले असेल या विचाराने मलाही छान वाटले.. :)