बुधवार, ७ मार्च, २०१२

मंतरलेले दिवस - ५७

पाटीसह झालीच पाहिजे! :)
३ मार्च, २०१२
वीकेंडला चित्राच्या घराजवळ इनऑरबिट  मध्ये सिनेमाचा प्लान ठरला..बर्‍याच दिवसांनी मी हिंदी चित्रपट पहिला आणि फारच आवडला,मी पानसिंग तोमारच्या प्रेमातच पडले.. शिवाय मॉर्निंग शो पहिल्याने पूर्वीच्या दिवसांची आठवण झाली,तिकीट कमी म्हणून आम्ही नेहमी मॉर्नीग शोलाच जायचो.. आणि आता तर अजुन महागाई वाढली आहे तर सकाळचा शो पहाणेच परवडते! सिनेमा संपल्यावर आम्हाला काही कामानिम्मित्त गावात जायचे होते.. ओफिसमधून परस्पर चित्रकडे गेल्याने माझ्याकडे गाडी नव्हती.. आणि चित्राला तिची गाडी घेणे  काही कारणाने जमत नव्हते.. भर उन्हात आम्ही बसथांब्यावर आलो.. बस स्टॉप,बसायला बाकडे,छत वगैरे तर सोडाच पण बस थांब्याची साधी पाटी देखील कुठेही नव्हती.. आपल्यकडे इथेच गडबड आहे.. मागे तो भला मोठा इनऑरबिट मॉल,  तिथे कार मधून येणारे लोक, तिथल्या उंची सुखसोयी, एसी हॉटेल्स, दुकाने  आणि इथे रस्त्यावर सामान्य जनतेसाठी असणार्‍या स्टॉपची ही अशी दुर्दशा.. किती मोठी तफावत!

एक माणूस थांबला होता त्याला विचारलं तर तो म्हणाला इथेच थांबते बस.. एक मोकळी बस आली ती मात्र तिथे थांबली नाही,थोडी पुढे थांबली.. मग आम्ही पुढे गेलो तिथल्या मुलाला विचारले तर तो म्हणाला बस स्टॉप येथे आहे.. तिथे बसची वाट पाहत उभे असताना बस आधी जिथे थांबलो होतो तिथे थांबली.. आम्ही पळत पळत त्या ठिकाणी जायला लागलो.. अजुन दोघी मुली तिसरीकडे उभ्या होत्या त्याही बसच्या दिशेने धावू लागल्या.. बसचा वेग कमी होता म्हणून मी मध्येच बस मधे चढायला लागले तर कंडक्टर साहेब दारात उभे राहून म्हणतात कसे - बस जात नाही, चढू नका..
मी चढत म्हणले - जात नाही म्हणजे.. बस बंद पडली आहे का? थांबवत आहात का बस पुढे? पाटी तर आहे 'मनप' ची..
साहेब - असे मध्येच चढलेलं चालणार नाही.. स्टोपवर थांबा, पुढच्या बसने या..
मी अर्धवट आत बाहेर अशी - स्टॉप कुठे आहे सांगा तर.. एक बस मागे थांबते.. तर एक बस पुढे..  आणि आम्ही वेड्यासारखं इकडेतिकडे धावायचं?
साहेब मोठ्या आवाजात - मागे पाटी असेल,तुम्हाला दिसली नसेल..
मी - अहो शंभर लोकांना विचारले,पाटीचा पत्ता नाही.. आम्ही सुशिक्षित आहोत.. उगाच वाद घालत नाहियोत..
एव्हाना बस मध्ये मी चढले होते.. बस चालू झाली होती आणि चित्रा व इतर लोकं खाली मागेच राहिली होती..
मी - माझी मैत्रीण मागे राहिली आहे.. बस थांबवा..
थोडे पुढे गेल्यावर ड्रायवर साहेबांनी बस थांबवली.. तोपर्यंत चित्रा पळत आली होती,तिला म्हणले पटकन बसमध्ये चढ.. पुढे त्या साहेबाचा पट्टा चालू होता, कुठेही चढलेले चालणार नाही.. मग मी पण शांत बसले नाही..
मी - बस थांब्याची पाटी नाही,प्रवाशांचे हाल होत आहेत.. शिवाय बस गच्च भरली असली असती तर समजू शकलो असतो.. पण बसमधे इनमिन ४/५ लोकं.. काय बिघडले असते तुमचे सर्वांना बसमध्ये चढून दिले असते तर? आजकाल pmt बस ड्रायवर आणि कंडक्टर यांचे काम म्हणजे एका ठिकाणहून दुसरी कडे बस वाहून नेणे ईतकेच आहे वाटते, त्या बस मधुन प्रवाशांना घेऊन जाणे याचा विसर पडलाय.. ही बस सेवा सार्वजनिक सोय आहे, खाजगी नव्हे.. एखादा रिक्षावाला कुठेही न थांबता रिकामा चालला असेल तर हरकत नाही,त्याची मर्जी.. पण pmt सेवा लोकांसाठी आहे.. आणि फुकट नाहीतर पैसे देऊनच ही सेवा वापरतो ना..
माझी इतकी बडबड ऐकून ड्रायवर कंडक्टरची पुढे काही बोलायची हिंमत झाली नाही.. बस मध्ये चित्रा म्हणली तुझे हे रूप मी प्रथमच पहात आहे.. :) बस मधून उतरल्यावर चित्रा मोठ्या ठसक्यात म्हणली,बसचा नंबर घेऊ..
कॉर्पोरेशनला उतरलो होतो, तेव्हा चित्रा म्हणली आपण पाटी बद्दल सांगायचे का इथे ओफिसमध्ये.. आम्ही तिथे विचारपूस केल तर ते लोक म्हणले स्वारगेटला pmtचे कार्यालय आहे तिथे जा..

गावातले काम उरकून आमचा मोर्चा स्वारगेट कडे वळला.. ते कार्यालय म्हणजे अगदी टिपिकल सरकारी ओफीस.. विचारत विचारत तिसर्या मजल्यावर गेलो.. प्रत्येकजण काय काम आहे विचारायचे आणि पुढे जायला सांगायचे.. शेवटी एका माणसाने आमचे म्हणणे ऐकून घेतले.. लगेच माझा नाव आणि सेल नंबर लिहून घेतला.. पण त्यांचे साहेब समोरच होते.. ते काही ऐकायला तयार नाही.. कोणी मुली काही तक्रार घेऊन आल्या आहेत,त्यांच्याशी बोलायची एक पद्धत असते पण नाही ते बडे लोग होतेना.. ते म्हणे ही तक्रार नाहीच मुळी.. आम्ही पण आमची बाजू सोडत नव्हतो.. नंतर त्याने एक माणसाला बोलावून आमची तक्रार सांगितली..
तर तो माणूस म्हणतो कसा - ही तक्रार २ महिन्याधीच नोंदवली गेली आहे,तुम्ही पहिले नाही..  रस्त्याचे काम चालू आहे.. त्यामुळे पाटी लावता येत नाहीए..
आम्ही - दोन महिन्यापासून हे असेच आहे? प्रवाशांचे हाल होत आहेत.. काहीतरी टेम्पररी मार्ग काढा यावर.. कागद तरी लावा साधा तिथे.. नाहीतर त्या मार्गावरून जाणारया कंडक्टर ड्रायवरला कटकट न करता बस थांबावायला सांगा..
तो - टेम्पररी कशाला, कायमचा उपाय करणार.. माझे आमदाराशी बोलणे झाले आहे!!!
आम्ही मनात म्हणलो आता आमदराचा एक पाटी लावण्याशी संबंध येतोच कुठे? इलेक्शनच्या आधी आलो असतो तर हे काम लगेच झाले असते..
शेवटी आमच्या समाधानासाठी त्याने कुठेतरी फोन लावला आणि त्या कामाबद्दल बोलला.. मग आम्हाला म्हणाला होईल ५ दिवसात काम पूर्ण!

चित्रा आणि मी ठरवले ५ दिवस वाट बघू नाहीतर सरळ आपणच कागदाची पाटी लिहून तिथे लावूया..  वाटले तर सकाळमध्ये " नगर रस्त्यावर बसची पाटी नसल्याने प्रवाशांचे  हाल" अशी बातमी देऊ.. ही रेस आपण सोडायची नाही!!! पानसिंग तोमारचा कदाचित हा प्रभाव असेल.. पण खरच तिथे जेव्हा पाटी लागेल तेव्हा आमच्या दोघीनएव्हढे खुश या जगात कोणी नसेल.. चित्रा खास त्या पाटिचा फोटो काढणार आहे.. बघुया,लवकरच यावा तो दिवस! :)


६ मार्च, २०१२
सकाळी चित्राचा फोन आला.. त्या बसथांब्यावर नवीन पाटी लागली आहे!!! :)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: