गुरुवार, २९ डिसेंबर, २०११

मंतरलेले दिवस - ५० :)

A memorable event in Infosys.. :)

त्या दिवशी अर्चना म्हणाली तिला आणि नम्रताला माझ्याशी काहीतरी बोलायचे आहे.. मी विचार करत होते की त्याना माझ्याकडे काय काम असेल बरे.. चहाला भेटलो तेव्हा नम्रता म्हणाली की वर्षाखेरानिमित्त आपण इन्फी मध्ये झाडपुसायचे काम करतात आणि बागेत दिवसभर जे राबतात त्यांना आपण पार्टी देऊया..  अर्चना म्हणाली की तू असं कहीना काही करत असतेस म्हणून तुला विचारला.. झालं मग चर्चा सुरू झाल्या..

मला ही कल्पना भयंकर आवडली.. नेहमीच जाणवतं की हे लोकं दिवसभर स्वच्छता, बागकाम् अविरतपणे करत असतात.. आपण मधे आधे किती टाइमपास करतो,चहाला जातो, गप्पा मारत बसतो.. पण हा स्टाफ मात्र पहावं तेव्हा कामच करत असतो.. आपल्यापेक्षा फार पटीने हे कष्ट करतात आणि पैसे मात्र आपण जास्त कमावतो.. शिवाय हे सगळे वयाने मोठे असूनही आपल्याशी फार आदराने बोलतात आणि गरज पडेल तेव्हा मदतीसाठी कायम हजर असतात.. मला आठवतय एकदा सकाळी अचानक खूप जोरात पाऊस सुरू झाला.. बस पासून बिल्डींग मध्ये जाईपर्यंत सगळे भिजत होते तेव्हा हाउसकीपिंग स्टाफ पैकी काहीजण प्रत्येकला पळत जाऊन छत्र्या देत होते. . असं करताना ते स्वताहा भिजत होते पण त्याना त्यांच्या तब्येतीची पर्वा नव्हती. . जरी पत वेगळी असली तर तेही माणसचना..


कार्यक्रमाचा आराखडा केला.. अजुन तिघी मुली आमच्या कटात सामील झाल्या..  फेज१ मधे साधारण १०० लोकं होते त्याप्रमाणे बजेट ठरवले.. फक्त आमच्या अकाउंट मधून पैसे गोळा करायचे ठरवले..  DM, HR ची परवानगी घेतली..  सगळ्याना मेल्स पाठवण्यात आले.. आमच्या पैकी प्रत्येकीनी एकेक फ्लोरची जबबदारी घेतली..  मेल गेल्यावर माझ्या टीम मधल्या लगेचच दोघांनी पैसे आणून दिले तेव्हा फार बरं वाटलं. कारण लोकांच्या प्रतिक्रिया काय असेल याची शंका होती.. आम्ही सगळ्याजणी आनंदाने एकमेकीना सांगू लागलो माझ्याकडे इतके इतके जमले म्हणून.. पैसे किती द्यायचे हे आम्ही देणर्यावर सोपवले होते.. प्रत्येकाने २०रुपये दिले तरी पुष्कळ होईल असा आमचा अंदाज होता.. अर्थातच आम्ही सहा जणी जास्तीत जास्त वर्गणी देणार होतो..

थोड्या लोकांनी दिल्यावर मात्र माझ्या इथे शांतता झाली.. बर्‍याच जणांना बराच काही करायचं असतं पण त्यासाठी जरा मागे लगावं लागतं असं मला नेहमीच अनुभव येतो.. मग काय रोज वेगवेगळे प्रेरणा देणारे सुविचार पाठवून सर्वाना एकदा आठवण करून द्यायची.. ते वाचून काहीजण पैसे द्यायला स्वतहुन येऊ लागले.. संगण्याजोगी एक गोष्ट की  टीम मधल्या १०० लोकांपैकी काहीजण कधी जास्त बोलत नाही असे लोकं वर्गणी आवर्जून द्यायला आले..  :)  इतर टीमनेही भरघोस प्रतिसाद दिला.. पुरेसे पैसे जमा झाले..

२८ डिसेंबर तारीख निश्चित केली.. डॉमीनोज पिझा आमच्या बिल्डिंगमध्ये खाली असल्याने तिथे ऑर्डर दिली.. बाकी केक शीतापेय बाहेरून मागवले.. खरतर मी गेले काही दिवस एकाच वेळेस बर्‍याच उद्योगात व्यस्त असल्याने पैसे गोळा करून दिल्यावर ऑर्डर देण्याच्या कामात माझी मदत झाली नाही त्यामुळे मला जरा अपराधी वाटत होते.. पण नंतर ती कसर भरून निघाली..

गेले बरेच दिवस वाट बघत होतो ती संध्याकाळ आली.. ११० जणांना एकदम बोलवलं  तर बसायला जागा मिळणार नाही म्हणून त्यांच्या सुपरवयजर सरांनी तीन गट केले.. ४ वाजता पहिल्या गटातले लोकं जमू लागले.. प्रत्येकाच्या चेहर्यवर उत्सुकता होती.. त्या सर्वाना आम्ही कुठेना कुठे पहिले होते त्यामुळे आम्हाला ते ओळखीचे वाटत होते..  खरतर आम्ही केक कापून पिझा वगैरे खायला द्यायचे ईतकेच ठरवले होते.. पण कार्यक्रम थोडा अनौपचरिकपणे व्हावा, सर्वा स्टाफ ने मोकळेपणाने सहभागी व्हावे म्हणून बाकीच्या जणांनी मला त्यांच्याशी बोलायला सांगितले कारण मराठीत संभाषण करणे महत्वाचे होते..

सग्लेजन जमल्यावर मी प्रथम  आपण कशासाठी जमलो आहोत हे सांगितले.. "तुम्हाला २४ तास काम करताना आम्ही नेहमीच पाहतो.. आमच्यापेक्षा जास्ती काम तुम्ही अगदी मनापासून करता याची सर्वाना जाणीव आहे.. "  असे मी म्हणल्यावर त्यांचे सुपरवयजार सर अक्षरशहा रडू लागले.. जे घडले ते लिहीत आहे,काहीही अतिशयोक्ती नाही.. आपल्या हाताखाली काम करणार्‍या लोकांसाठी डोळ्यात पाणी आलेले लीडर मी पहिल्यांदाच बघितले.. ते पाहून आम्ही भारावून गेलो.. नंतर मग मी प्रत्येकाला ओळख करून द्यायला सांगितले आणि आम्हीही आमची ओळख सांगितली.. ते सर्वजण ईन्फिमधे बरीच वर्ष काम करत आहेत हे समजले.. नंतर त्यांना त्यांचे अनुभव, मते सांगण्याची विनंती केली.. दोघातिघे त्यांच्या सारंबद्दल आणि इनफोसीस बद्दल फार कृतदनेंने बोलले.. सरांनी आम्हाला घडवलं असे प्रत्येकाचे म्हणणे होते.. शिवाय इन्फी मधे आम्हा प्रत्येकाला सन्मानाची वागणूक मिळते जी बाकी इतर ठिकाणी विशेष मिळत नाही,घरच्यासारखे वातावरणा आहे असं सगळा ऐकून माझा इन्फि बद्दलचा अभिमान दुणावाला..

नंतर ग्रूप फोटो काढले,त्यांनी फार एन्जॉय केले.. केक कपताना  ,पिझा खाताना प्रत्येकजण मनापासून सारे खूप खुशीत होते.. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन निरोप घेतला.. जाताना ते आम्हा सर्वांचे आभार मनात होते  तेव्हा आमचेहि डोळे भरून आले..  या उपक्रमासाठी ज्यानी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत केली यांचे आम्ही मनातून आभार मानले...  अशा प्रकारे तीन ग्रूप येऊन गेले, सगळं व्यवस्थित पार पाडलं आणि आम्ही निश्चिंत झालो.. एक वेगळेच समाधान आम्हाला लाभले..  :))

They say..
Life laughs at u when u r unhappy..
Life smiles at u when u r happy..
But life SALUTES u when u make others happy..

गुरुवार, २२ डिसेंबर, २०११

मनातल्या मनात..

मनातल्या मनात..
किती फुले उमलतात..
किती वेली पसरतात..
किती गंध दरवरळतात..
मनातल्या मनात..

मनातल्या मनात..
किती वादळे उठतात..
किती जहाजे बुडतात..
किती पूल तुटतात..
मनातल्या मनात..

मनातल्या मनात..
किती प्रश्न पडतात..
किती तर्क लागतात..
किती उत्तरे मिळतात..
मनातल्या मनात..

सोमवार, १२ डिसेंबर, २०११

मन..

जेव्हा मी माझे सुखं दाखविले,
तेव्हा ते म्हणले खोटं आहे..

जेव्हा मी माझे दुखं दाखविले,
तेव्हा ते म्हणले छोटं आहे..

जेव्हा मी माझे मन दाखविले,
तेव्हा मात्र ते म्हणले मोठं आहे!!!

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०११

मंतरलेले दिवस - ४९

मी ऐकलेले पहिले कीर्तन!  :-)

रविवारी रात्री काकून्चा फोन आला.. दत्त जयंती निम्मित्त उत्सव चालू आहे.. हा आठवडा रोज संध्याकाळी कीर्तन आहे.. तुला आवडत असेल आणि वेळ असेल तर तुही ये.. त्या काकू खूप खास व्यक्ती आहेत.. साहित्य, अध्यात्म, प्रवास आणि इतर कितीतरी कला याबद्दल मला त्यांच्याकडून बरच काही शिकायला मिळतं.. त्यांनी कुठे चल म्हणलं की ती गोष्ट बेष्ट असणार इतका माझा त्यांच्यावर विश्वास आहे.. मी त्यांना म्हणलं यापूर्वी मी कधीच किर्तनाला गेले नाही पण मला नक्कीच आवडेल यायला.. मग त्यानी किर्तना बद्दल थोडक्यात माहिती सांगितली.. पूर्वार्धात भक्तीगीत व निरुपण आणि उत्तरार्धात एक कथा असा साधारणपणे आराखडा असतो.. मला खूप उत्सुकता  वाटली..

काही कारणाने पुढे ढकलत शेवटी आज गुरुवारी किर्तनाला जायचा योग आला.. ओफीस मधून लवकर पळताना मी कोणाला भेटायला चालले असे वाटले असेल... पण आज खरच कारण विशेष होतं.. आश्रमात जरा आधी पोहचले.. तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम चालू होता.. "दिगंबरा दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ दिगंबरा" या नामाच्या गजरात वातावरण दुमदुमुन गेले होते.. ते सगळं ऐकून पाहून मी अगदी भारावून गेले..  कुठे ओफीस आणि कुठे ही प्रसन्न शांत जागा.. भजनी मंडळाचा कार्यक्रम संपला आणि कीर्तनाची तयारी सुरू झाली.. काकून्ची वाट बघत मी तिकडचे निरीक्षण करत होते.. काकू आल्यावर आम्ही दर्शन घेतलं आणि कीर्तन ऐकायला स्थानबद्ध झालो..

कीर्तनकार मकरंदबुवा करम्बळकर यांनी मधुर स्वरात भक्तीगीत गायला सुरुवाते केली.. तबला आणि पेटीवादक त्यांना त्याच तोडीची साथ देत होते.. आणि शेजारी एक आजीबाई वीणा घेऊन उभ्या होत्या.. हळू हळू गर्दी वाढत होती..

धन्य तो संसारी हरिभक्ति करी । जयाचा कैवारी देवराणा ॥

वर वर पाहता याचा अर्थ किती सोप वाटतो.. "संसार करता करता जो देवाची भक्ति करतो त्याला देव संभळतो"! वाचन करताना यासारखा किवा याहून थोडा जास्त अर्थ समजता येतो.. पण कीर्तनकार या शब्दांमधला आतला अर्थ उत्तमपणे मनात ठसवतात असे मला इथे कीर्तन ऐकताना जाणवले.. समर्थानी म्हणले आहे ग्रंथांचा वाचनापेक्षा श्रवण केल्यावर जास्त अर्थ कळतो...

तर निरुपणाचा विषय या अभंगातल्या ओव्या होत्या.. देवाची भक्ति करतो त्याला देव तारतो असं म्हणलं तर सगळे म्हणतील आम्ही रोज पूजा करतो,मंदिरात जातो, वगैरे.. आम्हीही देवाला रोज बोलावतो पण तो येत नाही इत्यादी.. पण भक्तीचा खरा अर्थ वेगळा आहे.. तुम्ही किती भक्ति करता यापेक्षा तुम्ही कशी भक्ति करता हे महत्वाचे.. हे समजण्यासाठी त्यानी प्रल्हाद,बीभीषण, द्रोपदी,ध्रुवाबाळ अशांची उदाहरणे समजावून सांगितली.. देव तुम्ही बाहेरून कसे दिसतात हे पाहत नाही तर तुमचे अंतरंग कसे आहे त्यावरून परीक्षा घेतो.. जो भक्त प्रेमाने अगदी मनापासून परमेश्वराची भक्ति करतो त्याला ईश्वरी कृपा लाभते असं निरुपणाचं तात्पर्य होतं..  शिवाय ज्याच्या मनात राग,वासना,आसक्ती वगैरे विकार नाही त्याच्या पाठीशी भगवंत असतात.. बापरे म्हणलं माझ्या मनात तर हे सगळं आहे.. कधी माझं मन स्वच्छ होणार, कधी मला भगवंत भेटणार!

त्यानंतर  उत्तरार्धात एकनाथांच्या आयुष्यावर आधारित कथा सांगितली.. आणि शेवटी आरती करून कीर्तनाची सांगता झाली. ते सगळं ऐकताना वेळ कसा गेला कळलही नाही.. "कीर्तन" म्हणलं की सहसा सगळे आजी आजोबा जमा होतात.. पण ते जे सांगत होते ते आयुष्य संपल्यावर ऐकलं तर त्याचा विशेष उपयोग होणार नाही असं मला वाटतं.. दैनंदिन जीवनात आवश्यक असणार्‍या कितीतरी गोष्टी त्यांनी सांगितल्या..



तू सागर करुणेचा देवा तुजलाची दु:ख सांगावे । तुज वाचून इतरांशी दिन मुख पसरोनी काय मागावे ॥


मला हे फार भावले.. आपलं दुखं फक्त परमेश्वरच समजू शकतो म्हणून त्याच्यापाशीच मन मोकळं करावं.. बाकीचे कोणीच काही करू शकत नाही,ज्याला त्याला आपले आपले व्याप असतात...

आजकालच्या धाकाधाकीच्या जीवनशैलीत मानसिक ताण मला काय सर्वांनाच आधून मधून येतो.. तेव्हा अधूनमधून अशी कीर्तने आणि भजने ऐकल्यावर भरकटलेल्या मनाला आवर घालणे थोडे सोपे होईल.. मी निश्चय करून टाकला जसा जितका जमेल तेव्हढा सत्संग वाढवायचा.. आणि काकून्चे आभार मानले कारण त्यांच्यामुळेच मी आज इथे आले होते आणि आता नेहमीच येत राहीन..

सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो । कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो ॥

मंगळवार, ६ डिसेंबर, २०११

मंतरलेले दिवस - ४८

शनिवार :
मागच्या शनिवारी मैत्रिणिसोबत एका वृध्दाश्रमात गेले होते.. ते माझ्यासाठी जरा लांब होतं.. शोधत शोधत जाईपर्यंत उशीर झाला.. मी पोहचेपर्यंत बाकी तिघी जणी आल्या होत्या.. मी आत गेले आणि तिथलं सगळं बघून एकदम शांत झाले.. त्या वयस्कर आज्जींपैकी काही जणी खूप आजारी होत्या.. काहीजणी अतिशय मानसिक त्रास झाल्याने की काय पण फारच हसत खेळत बोलत होत्या आणि बोलता बोलता एकदम त्यांची कहाणी सांगायला लागायच्या.. तिथे नॉर्मल व्हायला मला जरा वेळ लागला... आजपर्यंत कितीतरी NGO मध्ये गेले मी पण तिथे निरागस मुलांमध्ये रमुन जायचे.. इथे मात्र मन सुन्न झालं.. नंतर मी सुधा इतर मैत्रीणिंप्रमाणे त्यांच्याशी बोलू लागले.. कोणी गाणी म्हणली, कोणी नाच केला असं चालू होतं.. थोड्यावेळाने  त्यांची जेवायची वेळ झाली आणि आम्ही निघालो.. तिथून घरी परतल्यावर मनात खूप सारे विचार येत होते..
- स्वतहाच्या  जन्मदात्यांवर  अशी वेळ का आणली त्यांच्या मुलांनी?
- मी आजपर्यंत पाहिलेले सगळे आश्रम मग ते लहान मुलांचे असो वा वृद्धांचे ते सगळे ख्रिश्चन लोकांनी काढलेले आहेत.. अर्थात मी सगळ्या ठिकाणी नाही गेले अजुन पण जास्त संस्था ख्रिश्चन लोकांच्याच आहे.. हिंदू लोक या समाज कार्यात मागे का पडतात?
- मला वीकएंडला वेळ असतो तेव्हा  मी माझ्या सवडीने थोडावेळ अनाथ आश्रमात जाते.. माझ्यासारखे बरेचजण तिकडे भेट देतात.. थोडावेळ थांबतात,खाऊ किंवा काही गोष्टी त्याना देतात.. त्याचा कितपत उपयोग त्या मुलांना किंवा वृद्धांना होतो? काहीच न करण्यापेक्षा हे नक्कीच बरय पण तरीही आपण समाजकार्य करतो असा खोटा समज तर आपण उगाच करून घेत नाहीना?


सोमवार:
असंच विचार करता करता सोमवार उजाडला.. आज ओफिसमध्ये थोडं उशिरा चालले होते.. बसची वाट बघत असताना फुटपाथवर कडेला एक वयस्कर माणूस बसलेला दिसला.. फारच आजारी दिसत होता.. पटकन त्यांच्या हातात १०ची नोट ठेवून मी परत बसची वाट बघू लागले.. तरी लक्ष तिथेच जात होतं.. तेव्हा जाणवलं, तो इतका अशक्त होता की त्याला उठून त्या पैशाचं काही घेता येईल का नाही? मी खायला घेऊन द्यायला हवं होतं. आणि नंतर तर तो माणूस केविलवाणा होऊन रडताना दिसला .. ते पाहून मला अगदी अस्वस्थ वाटलं.. काय करावं विचार करेपर्यंत बस आली आणि मी तशीच निघून गेले..
नंतर ओफिस मधल्या वातावरणात सकाळची घटना विसरून गेले.. नेहमीप्रमाणे घरी आले.. त्या रात्री मात्र विचित्र घडले.. मला त्या माणसाचा रडतानचा चेहरा डोळ्यासमोर सारखा दिसू लागला.. आणि मग मला खूप रडू आलं.. कारण मी किती हृदयशून्य माणसासारखी वागले होते.. तो माणूस रडताना कदाचित देवाची करुणा भाकत असेल.. त्याच देवाची एक भक्त म्हणून मी त्याला मदत करायला हवी होती.. पण मी तशीच निघून गेले.. माझे तन मन धन सगळे मातीमोल ठरले.. आई बाबा घरी नव्हते.. मला फार कसंतरी होत होतं.. रात्रीच्या रात्री तिकडे जाउन मदत करावी वाटत होतं पण ते शक्य नव्हतं.. रात्री कितीतरी वेळ तळमळत होते.. शेवटी देवाला मनात एक वचन दिले आणि मग कधीतरी डोळा लागला..


मंगळवार:
सकाळी सकाळी बस स्टॉप वर आल्यावर पहिले,तो कालचा माणूस नव्हता.. तो झोपायला कुठतरी जात असावा त्यामुळे तो सकाळी कधी दिसत नसेल असा निष्कर्ष मी काढला.. ओफीस मधून परतल्यावर रस्त्याच्या त्या बाजूला तो माणूस दिसतोय का बघितलं  पण मध्ये इतकं ट्रॅफिक होतं की समोरचं  काही दिसत नव्ह्तं..  रस्ता ओलांडून त्या बाजूला गेले तर तो कालचा माणूस तसाच पडून होता.. मनात काही निश्चय करून मी जवळच्या एका दुकानात गेले.. एक नवीन बेडशीट घेतलं.. मग पारलेचा सगळ्यात मोठा पुडा घेतला, ब्रेड घेतला.. अजुन काय घ्यावं विचार करत होते.. सगळं घेऊन त्या माणसापाशी गेले.. बाबांच्या वयाचे ते.. त्यांना एकेक गोष्ट काढून दिली.. बेडशीट पाहून ते म्हणले थन्डीचं पांघरायला होईल.. मला कळत नव्हतं अजुन काय द्यावे म्हणून मग त्यांच्या हातात थोडे पैसे ठेवले.. सध्या काळ असा आहे की असे पैसे देताना कोणी पहिलं तर चोरी करणारे लोकं अशा गरीब लोकांकडूनही पैसे किवा बाकी काही हिसकावून घ्यायला कमी करणार नाही म्हणून मी त्यांना पैसे नीट ठेवायला सांगितले.. आणि लगेचच मी तिथून निघून गेले.. त्या गोष्टी त्या माणसाला कितपत उपयोगी ठरतील मला शंका येत होती.. कोणी सोबतीला असलं असतं तर त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात दाखल केलं असतं जिथे त्यांची काळजी घेतली गेली असती..  तेव्हा जाणवलं की अनाथ आश्रमात कमीतकमी अन्न निवार्‍याची सोय होते.. पण अशा रस्त्यावर पडलेल्या बेवरशी लोकांचे फार हाल होतात.. काहीजण सुट्टे पैसे टाकतात त्यावर त्यांचे भागत असेल तेव्हढेच.. आता यावर काहींचे मत असते की भीक मागण्यापेक्षा त्याना काम करायला काय झाले.. मान्य आहे हे.. पण काहींची हलत खरंच खुपच खराब असते त्याना आपण मदत करणे जरूरी आहे.. यासगळ्या प्रसन्गावरून मी ठरवले, अनाथ आश्रमात मदत करणारे बरेच जण असतात पण मी मात्र यापुढे रस्त्यावरच्या गरीब गरजू लोकाना अन्न वस्त्र, औषधे देऊन जमेल तेव्हढी मदत करणार.. अर्थात त्या मदतीने त्यांचे पूर्ण आयुष्या बदलणार नाही पण एखादा दिवस तरी बरा जाईल असे मला वाटते.. मी पूर्ण नाहीए पण मी कमीही  नाहीना. त्या रात्री मला जरा शांत झोप लागली..


विशेष सूचना - या लेखातून मला कोणत्याही प्रकारचा देखावा करायचा नाहीये..  ही गोष्ट मी अजुन  माझ्या घरच्यांना किवा कोणत्याही मैत्रिणीला सांगितली नाही.. पण ज्या ज्या प्रसंगातून मला नवीन काही शिकायला मिळते मग ते आनंदाचे क्षण असो वा दुखाचे ते सगळे मी "मंतरलेले दिवस" या मालिकेत नोंद करून ठेवते.. बाकी काही नाही.

सोमवार, ५ डिसेंबर, २०११

श्रीकृष्णमर्पणमस्तु!!!


तुझा प्रेमळ हस्तस्पर्श मस्तकी होऊदे..
सुखशांतीची झुळूक माझ्या मनात वाहुदे..

तुझ्या कांतीच्या प्रभेत तनमन न्हाऊदे..
प्रत्येक श्वास माझा पवित्र होऊदे..

तुझ्या चरणकमलांशी अढळ स्थान मिळूदे.
निरंतर स्थिरता माझ्या चित्तास लाभूदे..

तुझ्या शीतल छायेच्या सानिध्यात राहूदे..
विकार व्यसनांपासून माझे रक्षण होऊदे..

तुझी दिव्य कृपादुष्टी मजवर असूदे..
सत्कर्माची प्रेरणा मला सदैव मिळूदे..