सोमवार, २९ ऑगस्ट, २०११

मंतरलेले दिवस - ३९

वाऱ्याचा किल्ला.. रोहीडा..

या पावसाळ्यातली भटकंती पूर्ण झाली असं नुकतंच मी जाहीर केलं होतं.. पण सिमेंटच्या जंगलात कितीही व्यस्त असले तरी हा रिमझिम पाऊस मला बिलकुल स्वस्थ बसून देत नाही.. :) निमित्त होतं सह्यात्रीचं.. ट्रेकर्स मित्रांनी मिळून सह्याद्रीमध्ये भटकंतीचा, गिर्यारोहणाचा आनंद घेण्यासाठी एक नवीन संस्था सुरु केली ही बातमी माझ्या कानावर येऊन पडली.. नोकरी, घर संसार सांभाळून हा आगळा उपक्रम सुरु करत आहेत हे ऐकून मला त्यांचं (ध्रुव, सिद्धार्थ , सागर आणि पराग ) विशेष कौतुक वाटलं.. सह्याद्रीचा आणि हिमालयाचा दर्जेदार अनुभव पाठीशी असलेल्या या ट्रेकर्ससोबत मी याधीही ट्रेक्स केले असल्याने माझा पूर्ण विश्वास आहे.. सह्यात्रीचं पाहिलं लक्ष किल्ले रोहीडा हे होतं.. सिद्धार्थ आणि सागर यांनी या ट्रेकची जबाबदारी उचलली..

खरंतर रोहिड्याला पूर्वी मी गेले होते पण सह्याद्रीतले हे गड किल्ले १० वेळा जरी बघितले तरी पाहू तेव्हढे कमीच आहे, प्रत्येक वेळेसचा तिथला अनुभव हा नवीनच असतो.. आणि योगायोगाने माझ्या ट्रेकिंगच्या जुन्या मैत्रिणीही या ट्रेकसाठी उत्सुक होत्या.. मग काय मोका भी है दस्तूर भी है..

ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी ६ वाजता सगळे  स प महाविद्यालयाच्या दारापाशी जमा होऊ लागले.. गम्मत अशी की यंदा ट्रेकला मुलीच जास्त होत्या.. एरवी मैत्रीणीना पटवता पटवता नाकी नऊ येतात.. सिद्धार्थ मेधावी ज्युतिका आरती नेहा मी एका गाडीत तर सागर संध्या श्रुती विशाखा श्रीनिवास हे सगळे दुसर्या गाडीतून असा आमचा प्रवास सुरु झाला.. पुण्यातच पाऊस बराच चालू होता त्यामुळे तिकडे किल्ल्यावर किती भारी असेल याची कल्पना येत होती.. पुणे सातारा महामार्ग लागला आणि सभोवताली हिरवाई दिसू लागली.. लगेचच नाश्त्यासाठी एकेठिकाणी थांबलो.. सकाळी एकदा व्यवस्थित पोटपूजा केली की मग पुढे भटकायला मोकळे..

पावसाळ्यात कुठेही जाताना जो प्रवास असतो तो मला जास्त भावतो.. हिरव्या रंगाच्या विविध छटा किती पाहून अन नको असं आम्हा सर्वांनाच होत होतं.. नंतर भोर घाटात एका पॉईन्टला थांबलो तिथे नदीचे  नागमोडी वळण फार सुंदर दिसत होते.. थोडे फोटोसेशन करून प्रवास पुन्हा सुरु झाला.. जुन्या ट्रेक्सच्या गम्मतीजम्मती, काही खास आठवणी यावर चर्चा करत भोर गावात कधी पोहचलो समजलेच नाही..

तिथून ७ किमी पुढे जाऊन रोहिड्याच्या पायथ्याशी पोहचलो.. पावसाची रेलचेल चालू होती.. स्याकमधले  काही भिजणार नाही अशी खात्री करून आम्ही गाड्यातून उतरलो.. मग ट्रेकरसिडने आणि सागरने आम्हाला किल्ल्याची माहिती दिली.. हे फार महत्वाचं आहे.. ट्रेकिंग म्हणजे नुसतचं पावसात जाऊन भिजणं ,वडापाव खाणं असं नाहीये.. तर त्या गडकिल्ल्यांची माहिती, इतिहासपण समजून घेणं हा ट्रेकिंगचा एक अविभाज्य घटक आहे.. रोहीडा हा विचित्रगड, बिनीचा किल्ला, वाऱ्याचा किल्ला म्हणून ओळखला जातो.. या किल्ल्यावरून वेगवेगळ्या दिशेला  सिंहगड, पुरंदर, तोरणा, केंजळगड वगैरे किल्ल्यांचे दर्शन होते.. अर्थात आज तर समोर जवळच असलेला रोहीडा देखील स्पष्ट दिसत नव्हता एव्हढे ढग खाली आले होते.. वातावरण अतिशय उत्साहवर्धक होतं.. मन आपोआप प्रफुल्लीत होत होतं..

रोहीडा चढायला सोप्पा आहे असं अगदी खात्रीने मी मैत्रीणीना सांगितले होते आता नक्की काय ते कळेल असं म्हणत आम्ही गड चढू लागलो..  सर्वांनी शक्यतो एकत्र चला, ढगांमुळे वाट चुकण्याची दाट शक्यता आहे अशा सूचना आम्हाला देण्यात आल्या.. पुढे रस्ता दाखवायला सागर आणि सगळ्यात मागे सिद्धार्थ आणि मध्ये आम्ही.. जिथे पाहावं तिथे हिरवळ आणि खाली उतरलेले ढग.. नकळत मनात "झूमकर पर्बतों पे घटा छा रही है.." गाण्याची ओळ डोकावून गेली.. काही ठिकाणी पावसामुळे थोडा चिख्खल होता पण दगडांमुळे चढणे सोपे जात होते..

आता इथे खरी मज्जा होती.. :) पूर्वी इथे आल्यामुळे मला आकर्षण वाटत होते ते इथल्या विविध फुलांचे आणि भन्नाट वाऱ्याचे.. खालपासुनच पाऊस, गार वारा चालूच होतां.. पण किल्ला चढताना एका विशिष्ठ टप्प्यात वाऱ्याचे ते रूप काय सांगावे.. काहीवेळा वाऱ्याबरोबर  मी आता उडून जाईन असं वाटून अक्षरशः खाली बसत होते.. ही अतिशयोक्ती नव्हे बरं.. इथे कोण कसं पडतंय हे बघून आम्ही सगळे मनापासून हसत होतो..

मध्ये मध्ये थांबत, तिथून दिसणाऱ्या विहंगम दृश्याचा आनंद घेत, छायाचित्रे टिपत रमत गमत आमची चढाई चालू होती.. साधारण १०.३० वाजता आम्ही पहिल्या प्रवेशद्वारापाशी पोहचलो.. तिथे गणेशपट्टी आहे पण ठळकपणे दिसत नव्हती.. पुढे दुसऱ्या द्वारापाशी पाण्याची टाकी आहे,त्यामध्ये १२ महिने पाणी असतं म्हणे.. तिसर्या दगडी प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूना गजमुख आहेत आणि त्याखाली डावीकडे देवनागरी आणि उजवीकडे फारसी लिपीत शिलालेख आहेत.. त्याकाळात दळणवळणाच्या आणि इतर काही सोयी नसताना हे सगळं कसं केलं असेल हा प्रश्न मला प्रत्येक गडावरच पडतो..

इथे जवळच एक अर्धवर्तुळाकार बुरुज होतं.. सगळे जमल्यावर सागर आणि  सिद्धार्थने किल्ल्याचा नकाशा दाखवून कोणत्या दिशेला कुठे काय काय आहे याची माहिती सांगितली.. (मला जास्त आठवत नाहीये).. नंतर नेहमीप्रमाणे सिद्धार्थने घोषणा दिल्या आणि आम्ही त्याला प्रतिसाद दिला.. आमच्या \पैकी तिघी जणींना मराठी-संस्कृत समजत नव्हते.. त्यांनी कुतूहलाने घोषणांचा अर्थ विचारला तेव्हा या दोघांनी प्रत्येक ओळीचे स्पष्टीकरण दिले.. आम्हाला नुसता किल्ला चढून,घोषणा देऊन इतका आनंद होतो तर त्याकाळी शिवाजी महाराजांना, मावळ्यांना किल्ले जिंकून किती आनंद होत असेलना..

इथे वरती सुंदर फुलांचा गालीचा पसरला होतां आणि आम्ही ढगातून चालत होतो.. आता किल्ल्यावरचे वेगवेगळे बुरुज, टाकं वगैरे पाहत पाहत गड भ्रमंती चालू होती.. बुरुजांवरून खालची दरी अप्रतिम दिसत होती.. एकीकडे चुन्याच्या घाण्याचे एक मोठे चाक होते ते हलवण्याचे मुलांनी प्रयत्न केले.. पण ते जरा जास्तीच अवघड होते.. मध्ये एके ठिकाणी आमच्या साहसाची परीक्षा झाली.. दोन्हीकडे पाण्याची टाकं आणि मध्ये छोट्या दगडाच्या आधाराने पाय टाकायचा होतां.. अर्थात सह्यात्री मंडळीच्या आधाराने हे सहज शक्य झाला.. आणि ट्रेकचा आनंद द्विगुणीत झाला.. :)

सगळं बघून शेवटी मंदिरापाशी परतलो.. तिथे आडोशाला थोडी विश्रांती घेतली.. भटकंती करून भूक लागलीच होती मग घरून आणलेल्या डब्यांवर सर्वांनी ताव मारला..  साधारण दोन वाजता गड उतरायला लागलो.. आणि आता त्या वाऱ्याच्या टप्प्यावर तर सकाळपेक्षा  अजून जास्त वारा वाहात होतां.. तो इतका का वेडावला होतां कोणास ठाऊक.. वाऱ्याच्या दिशेने पाठ करून उभे राहिले तर आपोआप पुढे ढकललो जात होतो.. इथे फारच सही वाटत होते.. या वाऱ्याचा अनुभव शब्दात मांडणं खरंच कठीण आहे..

खाली उतरताना पळत पळत जावे असं वाटत होते.. पण माझी पावले मात्र जरा जड झाली होती... मागे फिरून पुन्हा पुन्हा मी शक्य तेव्हढे दृश्य मनात साठवायचा प्रयत्न करत होते.. तासाभरात आम्ही गाड्यांपाशी आलो..  आणि ट्रेकच्या सुंदर आठवणी घेऊन आम्ही पुण्याच्या रस्त्याला लागलो..

मला नेहमी जाणवतं की प्रवास भटकंती करण्यामागे केवळ मौजमजा हा हेतू नसतो.. उलट नवनवीन जागा पाहून, वेगवेगळ्या लोकांशी सवांद साधून दरवेळी आपल्याला खूप काही शिकायला मिळतं.. शेवटी अनुभवातूनच ज्ञानाचा वेल वाढत जातोना.. तसंच या एक दिवसाच्या ट्रेक मधून अन मित्रमैत्रिणींकडून मी ज्या गोष्टी शिकले त्याची इथे मनापासून नोंद करावी वाटते..
- हे ट्रेकर्स लोक निसर्गाचा आनंद घेताना आपल्यामुळे शोभा खराब होणार नाही याची नीट काळजी घेतात.. चोकलेट, चिप्स खाल्ल्यावर  त्याचा कागद,प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, पिशव्या तिथे किल्ल्यावर तशाच टाकून देणं हे म्हणजे आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड मारल्यासारखे आहे नाहीका..
- निखळ आनंद घेण्यासाठी नसते धाडस दाखवायची गरज नसते.. सरळ रस्ता असताना उगाच कोणी शॉट कट मारायला गेले तर अशांना ही ट्रेकर्स मंडळी वेळीच आवर घालतात.. दुर्गम भागात  अनुभवी लोकांचा ऐकलेलं कधीही चांगलं..


इतकं सगळं वाचून मला खात्री आहे की आता तुम्हालाही रोहिड्याला एकदा भेट द्यावी असे वाटू लागले असेल.. :) हा किल्ला सुंदर असूनही चढण्यास  सोपा आहे त्यामुळे कोणालाही  जाता येण्यासारखा आहे..  रोहिड्याला भेट देण्यासाठी जायचे असल्यास जून - फेब मध्ये बेत करावा..  गडावरचे द्वार, बुरुज आणि तिथून दिसणाऱ्या सह्याद्रीचे अफाट दर्शन आवर्जून घ्या.. तिथल्या वाऱ्याचा, फुलांचा अनुभव नक्की घ्यावा.. आकाश निरभ्र असल्यास तिथून दिसणारा सुंदर सूर्यास्त चुकवू नका.. वरती खाण्यापिण्याची काही सोय नसल्याने जेवायचे डबे आणि पुरेसे पाणी जवळ ठेवा.. आणि वारा सहन होत नसल्यास स्कार्फ , कापूस वगैरे गोष्टी जवळ ठेवा जेणेकरून तुम्हाला निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येईल..

बुधवार, २४ ऑगस्ट, २०११

मंतरलेले दिवस - ३८

चित्र १ : अशीच एकदा मैत्रिणींसोबत भटकंती पोटपूजा चालू होती.. चांगल्या ठिकाणी चरत होतो.. चहा आला.. माझ्यासारख्या चहाभक्तांना कुठलाही कसाही चहा चालतो.. पण काहीजण फार चोखंदळ असतात.. ठराविक पाण्यात ठराविक दुधाचे प्रमाण असले तरच त्यांना चहा आवडतो.. आता बाहेर गेल्यावर अगदी तसाच चहा मिळेल असं काही सांगता येत नाही.. आमच्यासोबत अशीच एकजण होती.. तिच्या म्हणण्यानुसार चहा बिघडला होता.. तिला तसा पिववत नाही म्हणून तिने तो वाया घालवला.. चहाचे असे कितीसे रुपये असतातना..

चित्र २ :
चावंड हडसर ट्रेकला गेले होते तेव्हा आमचा मुक्काम घाटघर येथे होता.. मंदिरात राहायचं ठरलं होतं पण तिथे पावसाचं पाणी आत शिरलं होतं..  म्हणून बाळू असावालेंनी त्यांच्या घरी राहायची सोय केली.. दोन तीन खोल्या आणि छोटंसं स्वयपाक घर.. रात्री लवकर झोपल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी मी सगळ्यात आधी उठले होते.. त्या वाहिनी माझ्यावर भलत्याच खुश होत्या कारण  धाकट्या मुलीचा मी फोटो काढून  नंतर त्यांना पाठवणार होते.. त्यांची सकाळची कामं चालू होती आणि आमच्यापैकी विशेष कोणी उठलं नव्हतं अजून.. म्हणून त्यांनी मला त्यांच्या स्वयपाक घरात चहा घ्यायला बोलावलं.. मी नको म्हणलं पण त्यांनी फारच आग्रह केला.. चुलीवर चहाचं आधण ठेवलं होतं.. एका कपमध्ये चहा गळून देताना त्या मला म्हणल्या आम्ही असा  काळाच चहा घेतो,दुध परवडत नाही आम्हाला..  चालेल ना तुम्हाला? आयुष्यात पहिल्यांदा घेतलेल्या त्या black teaची चव फारच अप्रतिम होती.. तेव्हा मला चहा बोर आहे म्हणून वाया घालवणाऱ्या मैत्रिणीची, त्या प्रसंगाची आठवण झाली.. आणि माझ्या डोळ्यात चटकन पाणी आलं..


एकीकडे चांगल्या ठिकाणचा चहा ज्यात दुध साखर आलं वगैरे सगळं असून सुधा चहा टाकून देणारी ती मैत्रीण.. आणि दुसरीकडे चहात घालायला दुध नसून देखील समाधानाने चहा घेणारं ते कुटुंब..  कदाचित म्हणूनच तो भगवंत एखादी गोष्ट आपल्याला कमी देत असावा जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीची,भावनांची, आयुष्याची  खरी किंमत समजेल..

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०११

मंतरलेले दिवस - ३७

नुकतंच सह्याद्रीमध्ये भटकून आले.. श्रावण महिन्यातला रिमझिम पाऊस आणि कोवळं उन्ह.. उंच कड्यावरून कोसळणाऱ्या शुभ्र जलधारा.. आणि मनाला ताजेपणा देणारा तो हिरवागार रंग.. निसर्गाच्या कुशीतून सुंदर प्रवास चालू होता..  तेव्हा लक्ष गेला ते भाताच्या शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांकडे..

पाणी भरपूर असल्याने काळ्या मातीतली पिके वार्यावर डोलत होती.. त्याभोवती निरुपयोगी वाढलेलं गवत ती लोकं काढत होते.. ते सुंदर शेत बघून मला क्षणभर त्या लोकांचा हेवा वाटला.. आहा.. किती सुखी आहेत ते लोक, त्यांच्या हिरव्यागार शेतात आनंदाने काम करत असतील.. पण मग लक्षात आलं कि ते शेत काही त्यांचंच असेल असं काही नाही.. दुरून आपल्याला वाटत त्या शेतात जे काम करत आहेत त्यांचंच ते शेत असावं.. खरंतर त्यांच्याकडून काम करून घेणारा मालक कोणी वेगळाच असतो.. मालकाने सगळी योजना आधीच आखून ठेवली असते.. कोण कधी कुठलं काम करणार.. कोणी नांगर फिरवायचा.. कोणी गवत काढायचं.. कोणी संरक्षण करायचं.. कोणी हिशोब ठेवायचा.. कोणी बाजाराचा काम करायचं.. इत्यादी.. काहीजण आपली कामे उत्तमरीत्या पार पडतात त्यांना पगारवाढ मिळते किवा पुढेमागे  वरच्या दर्जाचा काम मिळतं.. काहीजण कामचुकारपणा करतात किवा कोणी चुकीची कामं करतात.. त्यांना वाटतं मालकाचा आपल्याकडे काही लक्ष नाही पण मालक मात्र सगळं काही पहात असतो आणि त्याप्रमाणे पाऊले उचलत असतो.. आज एखाद्याला गवत काढायचं काम मिळालं असेल तर त्याने हिशोब करणाऱ्याकडे पाहून रडत बसण्यात किवा स्पर्धेत पुढे जाण्यासाठी चुकीचा मार्ग धरण्यात काहीच अर्थ नाही.. पदरात पडलंय ते काम आनंदाने आणि प्रामाणिकपणे केलं कि पुढे मालक त्याची बढती नक्कीच करतो..

ते शेत, तिथले शेतकरी आणि त्यांचा मालक.. ते सर्व पाहून मला जाणवलं कि हे जग  म्हणजे एक शेत आहे.. आपण सगळे शेतकरी, कामगार आहोत.. आणि तो एक भगवंत आपल्या सर्वांचा मालक आहे.. प्रत्येक  जीवाला त्याने काही ठराविक काम वाटून दिलं आहे.. प्रत्येकाची उंची वेगळी आहे ..  तो आपल्याकडून सगळं करून घेतो..  आपण फक्त निम्मित्तमात्र.. याचा अर्थ आपण चांगले प्रयत्न सोडून द्यायचे असा नाही..  पण प्रयत्नासोबत श्रद्धा  असणं जरुरी आहे..  कोणत्याही परिस्थितीत आपण स्वतःशी आणि जगाशी प्रामाणिक राहिलं तर आजउद्या तो भगवंत आपल्याला योग्य न्याय नक्कीच देतोना.. चला तर मग असं करून पाहूया..  :-)

शनिवार, ६ ऑगस्ट, २०११

मंतरलेले दिवस - ३६

कॅलेंडर प्रमाणे श्रावण महिना वर्षातून एकदाच येतो.. पण जीवनयात्रेत मात्र श्रावणाच्या उन्ह पावसाचा खेळ सतत अविरत चालू असतो.. आताही उन्हाची एक झळ लागली होती आणि मन कोरडं झालं होतं.. चालता चालता नेहमीच्या मंदिरात प्रवेश केला.. देवाची ती मूर्ती नेहमीसारखीच प्रसन्न दिसत होती.. हात जोडून प्रार्थना करायचे प्रयत्न केले पण मन शांत नव्हतं.. बाकी सगळे मनापासून प्रार्थना करत होते,देवाकडे काहीना काही मागत होते.. मी हसून म्हणलं.. आज काय मागू मी तुझ्याकडे? जे मला मनापासून पाहिजे ते मला कधीच मिळणार नाही.. आणि जे आहे त्यात मन तृप्त होत नाही, मनाला सारखं काहीतरी नवीन हवंच असतं.. आणि खरतरं मला नक्की काय हवंय हे मुळात माहितीच नाहीये.. तूच माझं अंतरंग जाणतोस.. तुला वेगळं काय सांगू मी पुन्हा?

विचारांच्या वादळात हरवले असता अशातच तिकडे एक छोटीशी गोड पोरगी तिच्या आईसोबत आली.. आईने सांगितल्यावर त्या मुलीने इवले नाजूक हात जोडले.. बोबड्या शब्दात ती म्हणली "देवा मला चांगली बुद्धी दे!!!"  आणि त्या क्षणी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.. :) खरंच पैसे, रूप, नाती, पत इत्यादी या गोष्टी येतात आणि जातात.. या सर्व गोष्टी असून जर चांगली बुद्धी आपल्याकडे नसेल तर सगळंच निरर्थक आहे..आणि हे काही आपल्याकडे नसेल पण चांगली बुद्धी असेल तर पुढे मागे या गोष्टी नक्कीच मिळवता येतातना..

लहानपणी चांगला अभ्यास करण्याची बुद्धी.. खेळ आणि कला कौशल्य आत्मसात करण्याची बुद्धी.. नंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे, कोणत्या क्षेत्रात आपला निभाव लागेल हे समजून त्याप्रमाणे निर्णय घ्यायची बुद्धी.. चांगले मित्रमैत्रिणी मिळवण्याची आणि टिकवण्याची बुद्धी.. इतरांना गरज पडेल तेव्हा मदत करण्याची बुद्धी.. शिक्षण झाल्यावर चांगली तयारी करून नोकरी धरायची बुद्धी.. नोकरीत प्रामाणिकपणे  १००% काम करण्याची बुद्धी..

सर्वात महत्वाचं म्हणजे कोण आपलं आणि कोण परकं हे अचूक ओळखण्याची बुद्धी.. मोहाला बळी पडून स्वतःचं नुकसान होऊ नये हे वेळेवर समजण्याची बुद्धी.. नाजूक हळुवार क्षणांना आवर घालण्याची बुद्धी.. आपल्या भविष्याचा विचार करून पाऊल उचलण्याची बुद्धी.. आई वडील सांगतील ते ऐकण्याची बुद्धी.. वेळेत लग्न करून संसार सुरु करण्याची बुद्धी.. वेळेवर सगळ्या जबाबदाऱ्या पार पडायची बुद्धी.. सगळ्यांची मने सांभाळून गुण्यागोविन्दात काळ घालवण्याची बुद्धी.. आपल्या परीने प्रयत्न करून शेवटी जे पदरात पडेल त्याचा मनापासून स्वीकार करण्याची बुद्धी.. आणि अजून असंच काही...

जेव्हा जेव्हा मी स्वतःचा विचार करते तेव्हा मला जाणवतं की मी डोक्यापेक्षा हृदयाचे जास्त ऐकते.. निर्णय घेताना मी बुद्धीपेक्षा भावनांचा जास्त विचार केला.. त्यामुळे कित्येकदा घसरले.. वेळ आणि जग तर केव्हाच पुढे निघून गेलं.. असे असले तरी मला माझ्या गत आयुष्याबद्दल खेद नाहीये.. आतापर्यंत मी प्रत्येक क्षण मनापासून जगले.. हसले अन रडलेही मनापासून.. आता फक्त एव्हढंच वाटतं की माझ्या हळव्या भावनांना चांगल्या बुद्धीचे सरंक्षण मिळावे म्हणजे पुढील उर्वरित आयुष्य सुखकर समाधानी जाईल..

आताशा मीसुद्धा बाप्पाला त्या लहान मुली कडून शिकलेली प्रार्थना करते की.. "आम्हा सर्वाना चांगली बुद्धी दे!!! "  special thanks to that little girl.. :)