सोमवार, २३ एप्रिल, २०१२

वर आभाळाचे छप्पर.. खाली मातीचा आधार..
कसे अन किती देवा, मानू मी तुझे आभार..

गतकाल विस्मृतीसाठी येते ती अंधारी रात्र..
नवसंधी देण्यासाठी उगवतो तो रोज सूर्य..
रंगलेल्या क्षणांची साक्ष देते ती सजून सांज..
कसे अन किती देवा, फेडू मी तुझे ऋण..

आसवास साथ देण्यासाठी पडे त्या जलधारा..
पुढे पुढे जाण्यासाठी वाहे तो उत्साही वारा..
प्रितीच्या गोडीसाठी  तो चांदण्याचा शिडकावा..
कसे अन किती देवा, जाणू मी तुझ्या लीला..

नवी स्वप्ने ओवण्यासाठी उमलतात ती फुले..
मनोरथ आवरण्यासाठी रुततात ते काटे..
निळा आनंद देण्यासाठी ते पाणी निळे निळे..
कसे अन किती देवा, रचू मी तुझे गाणे..

रविवार, १५ एप्रिल, २०१२

मंतरलेले दिवस - ६०


त्या दिवशी मला जरा उशीर झाला होता,घाईघाईत फूडकोर्ट मध्ये गेले..  एव्हाना सगळ्या जणींनी जेवण सुरू केले होते.. त्यांची जोरात चर्चा चालू होती.. काही मिनिटात मला त्या कशाबद्दल बोलत आहे ते समजले.. कोणीतरी एक मुलगी बसमध्ये जप करत होती, तिचे डोळे मिटत होते तरी ती जबरदस्ती जप करत होती, इतकं काय नडलय असे त्यांचे म्हणणे होते.. मी बोलणार होते कदाचित तुम्हाला बाहेरून वाटत असेल तिला झोप येत आहे असे पण ती मन लावून जप करत असु शकते.. पण मी शांत बसले.. मग एक जण सांगत होती की एक ओळखीचा खूप हुशार मुलगा यूसमध्ये शिकला पण नंतर एका संस्थेच्या नादाने डोक्यात खूळ बसले,गरजे पुरतेच कमावणार म्हणून कॉलेजमध्ये नोकरी करतो.. नंतर त्या सर्वजणींनी त्या मुलावर आणि जे materialistic thinking बरोबर नाही असे म्हणतात अशा सर्वांवर यथेच्छ टीका केली.. त्यांच्या दृष्टीने शॉपिंग, मुव्हीस, पैसा, फॅशन, मेकअप ,ऐश इत्यादी हेच आयुष्य.. ज्यांना हे सगळे आवडत नाही ते लोकं बोर.. या मैत्रिणिंची 'देवावर श्रद्धा ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा.. महाभारत,रामायण हे खरे घडले याचा सबुत काय' अशी विचारसरणी..

हे सगळे ऐकून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की या मुली जशा त्या जप करणार्‍या मुलीवर किंवा त्या कॉलेजमध्ये काम करणार्‍या मुलावर टीका करत होत्या तसे माझ्या मागे माझे मेल्स वाचणारे कितीतरी फ्रेण्ड्स मला ठेवत असतील.. मीतर दासबोध,भग्वदगीतेतील श्लोक कितीदा पाठावते किंवा कित्येकदा मला पडणारे प्रश्न मेल मध्ये लिहीत असते ते वाचून तर लोक मला वेड्यात काढत असतील.. माझे  या वयात कैलास मानस यात्रा, चारी धाम यात्रा, गोवर्धन परीक्रमा इत्यादी झाले आहे त्यावरही नावे ठेवली जात असतील.. काय माहिती.. पण मग विचार केल्यावर जाणवले की नावे ठेवण्यासारखे अजुन पुष्कळ विषय लोकांना माझ्यात सापडत असणार.. लग्न नाही का करायचे हिला? सारखी भटकते,घरचे काही बोलत नाही का तिला? किंवा असेच बरेच काही.. इथून तिथून बोलणारे मला बोलतच असणार त्यामुळे मी दुर्लक्ष केलेलेच बरे..

आता राहतो तो प्रश्न देवावरच्या विश्वासाचा अन् अध्यात्म रुचीचा.. मला वाटते की आपण जीवनात जितके सोसतो तितके परमेश्वराच्या जवळ जातो.. किंबहुना भौतिक गोष्टीतून भगवंताची आठवण यावी म्हणूनच मनुष्याला दुख दिले जाते असे मी कुठेतरी वाचले होते.. कधी कधी आपण प्रामाणिकपणे अथक प्रयत्न करूनही काही गोष्टी साध्य होत नाही त्यावेळेस सगळे आपल्या हातात नसते या तत्वावर विश्वास ठेवावच लागतो.. मग कोण आहे सुत्रधार? निसर्गाच्या किमयेचा ज्यांनी अगदी मनापासून अनुभव घेतलाय त्यांना ही अद्भुत निर्मिती कोणाची असा विचार करावाच लागतो.. अशा असंख्य प्रश्नांचे एकच उत्तर ते म्हणजे तो परमेश्वर.. किती छोट्या छोट्या गोष्टीतून त्याचे अस्तित्व जाणवत असते.. अर्थात परम सत्य  समजायला अनेक जन्म जावे लागतात.. त्यामुळे जे अगदीच नास्तिक आहेत ते अजुन मागच्या पायरीवर आहे, माझ्यासारखे गोंधळलेल्या स्थितीत असणारे नवशिके लोक मधल्या एका पायरीवर आहेत, ज्यांना सदगुरू सहवास, कृपा लाभली आहे ते वरच्या पायरीवर आणि ज्याना प्रत्यक्ष  भगवंतांचा शोध लागला आहे,प्रत्यय आला आहे ते सर्वोच्च पायरीवर असतात असे म्हणायचे.. बाकी  काय..  :-)






मंगळवार, ३ एप्रिल, २०१२

आनंद वेदनेतील..

कधीतरी अचानक विचारांचे वादळ उठते..
आठवणींची वीज कडाडू लागते..
आसवांचा पाऊस कोसळू लागतो..
अन् मनाचा बांध तुटून जातो..

पण अशा उध्वस्त स्थितीतही एक सुगंध वाहू लागतो..
त्या वेदनेतही एक आनंद जाणवू लागतो..
कारण तेव्हा एक जाणीव जीवाला स्पर्शून जाते..
व्यवहाराच्या आगीत होरपळलेल्या त्या  भावनाफुलाच्या, जिवंतपणाची ..
तेवढीच तर एक साक्ष शिल्लक असते..